एक निरोप असाही... - 3 Ashish Devrukhkar द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक निरोप असाही... - 3

हॉलमधून बाहेर पडल्यावर तिघे त्या भल्यामोठ्या ट्रकमध्ये चढले. ट्रक सुटल्यावर इकडे हॉलमध्ये लग्नाच्या विधी पुन्हा सुरू झाल्या. अर्थात कोणाचं लक्ष नव्हतेच त्याकडे. इकडे ट्रकला जीव असता तर तो ही गहिवरून गेला असता इतके भावनिक वातावरण झाले होते. ट्रक आता मुंबई गोवा हायवेच्या दिशेने धाऊ लागला.

"सॉरी सर, भर लग्नातून तुम्हाला यावे लागले." ले.क. सुधीर.

"सॉरी काय त्यात, आपलं कर्तव्य आहे ते. देशासाठी लढायचं तर भावभावना, नातीगोती सगळं घरी ठेवून यावे लागते." गॉगल काढत तो बोलला.

"तरीही, असो. आता तुम्हाला रत्नागिरी एअरबेसवर सोडले की आमचे काम झाले."

"म्हणजे"

"तिथून तुम्हाला पुढच्या सूचना मिळतील. अजून २ पायलट तिथे पोहचले असतील. तुम्ही तिसरे आहात."

"बर नक्की काय झालंय?" त्याने सरळ विषयात हात घातला.

"पाकिस्तानने घुसखोरी केली ते कळल्यावर पॅट्रोलिंग पार्टी गेली ती आलीच नाही."

"हो ते माहितेय."

"दुसरी टीम गेली. तिचा एक मेसेज आला आणि गायब झाले."

"हे सुद्धा माहितेय."

"त्यानंतर मिग २१ बायसन गेले तेसुद्धा गायब झाले. एकूण २३ जण गायब झालेत. तातडीने सेना काश्मीरच्या दिशेने रवाना झालीये."

"युद्धाला तोंड फुटणार म्हणजे."

"अजूनतरी नाही. पण शक्यता वाटते. कारगिल युद्ध झाले त्यावरून अनुभव आहे."

"ज्या ध्येयासाठी वेडा झालेलो तो क्षण येतोय. युद्ध." 

   हॉलपासून रत्नागिरी एअरबेसपर्यंत येणार मुंबई गोवा महामार्ग इतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता तसेच कोल्हापूरहुन येणारा आणि गोव्यावरून येणार मार्गसुद्धा इतर वाहतुकीसाठी बंद होता. तिन्ही मार्गांवरून फक्त आर्मीचे हे ट्रक तीन पायलटला घेऊन रत्नागिरी एअरबेसच्या दिशेने बेफाम धावत होते.

   तासाभराने ह्याच्या ट्रकने रत्नागिरी एअरबेसवर प्रवेश केला. रत्नागिरी विमानतळ भारतीय नौसेनेच्या ताब्यात आहे. डी. आशू तिथे उतरल्यावर लेफ्टनंट कर्नल शेखर त्याच्या जवळ आले.

"माहीत नाही पुन्हा कधी भेट होईल पण तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे. वेगाचा बादशाह म्हणून तुम्ही वायुसेनेत प्रसिद्ध आहात आणि तुमच्यासोबत वेळ घालवायला मिळाला."

"धन्यवाद."

"एक विनंती होती."

"बोला ना."

"आर्मीचे २२ जवान बेपत्ता झालेत त्यात आपल्या महाराष्ट्राचे ३ सुपुत्र होते."

"काय?"

"हो. घातपात नक्की झालाय. तुम्ही त्याचा बदला घ्या इतकेच सांगेन."  इतकं बोलून त्यांनी सॅल्युट केले आणि निघून गेले.

आत प्रवेश केल्यावर सिक्युरिटी सोपेस्कर पार पडल्यावर तो रनवेच्या दिशेने जाऊ लागला. पाहतो तर काय समोर 'Westland WS-61 Sea King Mk42C' दिमाखात उभे होते. C म्हणजे commando . त्याच्या सारख्या असंख्य पायलटना न्यायला आले होते ते.

आता 'Westland WS-61 Sea King Mk42C' बद्दल बोलू थोडे. हे भारतीय नौदलाच्या ताफ्यातले ऑल राऊंडर हेलिकॉप्टर आहे. खरे तर Mk42C ही सिरीज खास भारतासाठी विकसित केलेली आहे. मूळचे अमेरिकन जरी असले तरी याचे उत्पादन ब्रिटनमध्ये वेस्टलँड हेलिकॉप्टर्स कंपनीने केले आहे आणि १९७० पासून हे भारतीय नौदलात आहेत. याचा वेग ताशी २०८ किमी आहे आणि ही नौदलाच्या मार्कोस (Marcos) कमांडो यांना शत्रूच्या प्रदेशात उतरवण्यासाठी केला जातो. एका वेळेला ते शस्त्रास्त्रे आणि २८ कमांडोज ना नेऊ शकते. याला ऑल राऊंडर म्हणतात कारण हे सर्च अँड रेस्क्यू साठी खूप उपयुक्त आहे. याला भारतीय नौदलात 'समुद्री योद्धा' म्हणून संबोधले जाते. यात Mk42B सिरीज येते जी पाणबुडीविरोधी युद्धात वापरली जाते.

     तर नौसेनेच्या रत्नागिरी विमानतळावर स्वागताला कमांडर राघवन उपस्थित होतेच. सगळे प्रोटोकॉल व्यवस्थित पाळले जात होते. वायुसेनेच्या विंग कमांडरला न्यायला पायदळाचे सारख्या पदाचे लेफ्टनंट कर्नल आले होते आणि नंतर एअरबेसवर नौसेनेच्या कमांडर. अजूनही पायलट तिकडे पोहचले होते.

"Welcome boys. It's time to go beyond the limits." 

"Yes sir."

"Let's go Boys."   

    ते सगळे त्या Westland WS-61 Sea King Mk42C हेलिकॉप्टरमध्ये बसले. नौसेनेचे सुसज्ज असे हेलिकॉप्टर होते ते. कुठे निघालो आहेत ते कोणालाच माहीत नव्हतं. थोड्यावेळाने हेलिकॉप्टर लँड झाले. दरवाजे उघडले तेव्हा कळले की ते एक अजस्त्र युद्धनौकेवर उतरले होते. युद्धनौकेचे नाव होतं 'आय. एन. एस. विक्रमादित्य'. नौसेनेच एक अजस्त्र जहाज, जहाज नाही युद्धनौका.

      पण त्या युद्धनौकेवर खूप गडबड गोंधळ दिसत होता. डेकवर १३ Mikoyan MIG 29 K आणि ५ Kamov Ka 39 हेलिकॉप्टर सज्ज होती. युद्धाला तोंड फुटणार दिसून येत होतं. विक्रमादित्य आपल्या पूर्ण वेगात गुजरातच्या दिशेने जात होती. 

     आता थोडे 'आय. एन. एस. विक्रमादित्य' बद्दल बोलू. याला  हिंदी महासागराचा राजा म्हणले जाते. भारतीय नौदलाची सर्वात मोठी आणि शक्तिशाली युद्धनौका आहे. मूळची रशियन युद्धनौका आधी 'ॲडमिरल गोर्शकोव्ह' या नावाने ओळखली जायची. भारताने २००४ मध्ये या नौकेबाबत करार केला आणि मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण आणि दुरुस्ती केल्यावर १६ नोव्हेंबर २०१३ मध्ये भारतीय नौसेनेत डेरेदाखल झाली. या नौकेवर एकूण २२ मजले (Decks) आहेत आणि ही नौका ताशी सुमारे ५६ किमी (३० नॉट्स) वेगाने धावू शकते.  एकाच वेळी सुमारे १,६०० ते २,००० नौसैनिक आणि अधिकारी राहू शकतात. या नौकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावरून उड्डाण करणारी विमाने. यावर साधारणपणे ३० ते ३४ विमाने आणि हेलिकॉप्टर्स तैनात असतात. त्यात प्रामुख्याने मिग -२९के (MiG-29K) लढाऊ विमाने आणि कामोव-३१ (Kamov-31), कामोव्ह-२८, आणि सी किंग (Sea King) हेलिकॉप्टर्स असतात. आणखी एक सांगेन की आयएनएस विक्रमादित्यवर दररोज साधारण १ लाख लिटर दुधाचा वापर होतो आणि नौसैनिकांसाठी दिवसाला हजारो चपात्या बनवल्या जातात.

     थोड्यावेळाने जहाज एकेठिकाणी स्थिरावल. सगळे पायलट बाहेर डेकवर  उभे होते, तेवढ्यात लांबून एक हेलिकॉप्टर उडताना दिसले. काही क्षणात एक अजस्त्र हेलिकॉप्टर जवळ आल आणि डेकवर उतरलं. ते होते वायुदलाचे 'बोइंग सीएच 47 चिनुक'. हे सगळे पायलट त्यात बसले आणि ते हेलिकॉप्टर गुजरातच्या भुजमध्ये असलेल्या मिलिटरी एअरबेसकडे उडाले. सगळ्या पायलट ना असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हेलिकॉप्टर मध्ये बसवून नेले जात होते जेणेकरून शत्रूला त्याचा सुगावा लागू नये. 

बोइंग सीएच 47 चिनुक हे ताशी ३०२ किमी इतक्या प्रचंड वेगाने उडणारे हेलिकॉप्टर असून एका दमात ते ७४० किमी पल्ला गाठू शकते आणि २०००० फूट उंची गाठू शकते. याला एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरणारे दोन पंखे असतात. हे हेलिकॉप्टर १० टन वजन आरामात उचलून नेऊ शकते. हे हेलिकॉप्टर तोफा, लष्करी वाहने आणि रसद वाहून नेण्यासाठी वापरले जाते. एकाच वेळी ३३ ते ५५ पूर्ण शस्त्रास्त्रांसह सैनिक नेण्याची याची क्षमता आहे. पूर किंवा भूकंपग्रस्त भागात मदत कार्य करण्यासाठी आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी याचा वापर होतो. सगळ्यात महत्त्वाचे हे हेलिकॉप्टर केवळ जमिनीवरच नाही, तर पाण्याच्या पृष्ठभागावरही स्थिर राहू शकते (Water Hovering).

(क्रमशः)