थंड झाल्यार खावचा भाग ३
त्याला भाताचा भला खासा ठाय आज्जी वाढून देई नी वर पावशेर भर विरजण ओती. तोण्डी लावायला पाच सहा तळलेल्या सांडग्या मिरच्या किंवा बचकाभर लोणचं घाली. बोंबड्या आमच्यासारखा सगळा भात एकदम कालवून न घेता एका बाजूने दही भात कोलसवून घास हातात झेलवून झेलवून त्याचा चेण्डू सारखा गोळा करून तो मोठा आ करून चोंदित असे. वाटेली विठू घाडी नी त्याची चेडवं सुद्धा असंच जेवीत . आम्हाला त्याचं अप्रूप वाटायचं .
आज्जीच्या मागिलदारी डेगेखाली खूप मोठ्ठं रायवळ आंब्यॎचं झाड होतं . त्याला ‘ साखरी आंब’ म्हणत. मुळापासून दहा फूट उंचीवर त्याचाएक फाटा जमिनी समांतर आडवॎ वीसेक फुट लांब वाढून मग उभा व्ळलेला होता. त्या नंतर हात दोन हात अंतरावर पाच सहा डेळे उभे सूळ अस्मानात गेलेले होते . दोन तीन फाटे कोरम होवून मोडलेले असून तिथे पोकळ ढोली पडलेल्या असून त्यात चान्यांचं नी कांडेचोरांचं आदस्थान असायचं. ऐन दुपारी मजलेल्या चॎन्या कर्कश स्वरात च्युक च्युक आवाज करीत एकमेकींशी पाठशिवणीचा खेळ खेळत खोडाभोवती रिंगण घालायच्या. आज्जी पुढिलदारी अंगणात घुडघुडे (सुके नारळ ) कापुन त्याच्या वॎट्या करून सुकत घाली . चान्या हळूच एखादी वाटी तोंडात धरून भिंतीवरून सरसरत मागिलदारी जात नी मग दरडीवरच्या रामफळीवर चढून तिथून उड्या मारीत मारीत केशरी आंबीवरच्या ढोलीत जावून नाहिशा होत.आजी खोबरं किंवा भुईमूगाच्या शेंगा वाळत घातल्या की खोबऱ्याच्या साताठ काठळ्या, बचकाभर शेंगा सुकवणाच्या बाजूला चान्यांसाठी पसरून टाकी नी नऊ वारी लुगडं टाकून नाहीतर वाव दीड वाव जाळ्याच्या तुकड्याखाली सुकवण झाकून ठेवीत असे.
साखरी आंबीचे आंबे बचक्या एवढे, लांबट नी पिकल्यावर पिवळे धम्मक दिसायचे. आंब्याचा रस हापुस सारखा घट्ट , केशरी रंगाचा , चवीला मधूर नी मोहक वास असलेला आणि साल खुसखुशीत लागायची.तेंव्हा आंब्यांचा सुकाळ असला तरी केशरी आंबीचे आंबे विकत घेवून खाणारे शौकिनही होते. पैशाला चार, चवलीला आठ, पावलीला दीड डझन , अधेलीला तीन डझन नी सव्वॎ रुपयाला शेकडा दराने आंबे खपायचे. एरव्ही रायवळ आंब्याचे साट म्हणजे काळे मिचूट नी लोचट व्हायचे . पण साखरी आंबीचे साट पिवळे धम्मक नी खुसखुशीत व्हायचे. तळच्या आडव्या फाट्यावर वाटेली विठू घाडी अगदी रुखाडी चढणारा असूनही जाऊ शकत नसे. त्या फाट्यावरचे आंबे पिकून खाली पडल्यावर मिळायचे. झाडाचा विस्तार खूपच पसरलेला. दर वर्षी आलटून पालटून एक दोन खांदे धरले तरी सात ते आठ फाटी भरून आंबे मिळायचे. चैत्र्या पौर्णिमेच्याआगे मागे आंबे पिकायला लागायचे.पाड झाला की भावकीतल्या दोन्ही घरी दोन दोन मोठे टोपूल भरून आंबे आज्जी द्यायची. त्याशिवाय आम्ही पोरं गेलो की आमच्याही हातावर दोन आंबे पडायचे. वैशाख्या द्वितियेला शेजारच्या गावात भावकाईची जत्रा असायची त्या जत्रेत आज्जी बैलगाडीतून तीनचार फाटी भरून आंबे विकायला धाडी नी सगळे आंबे हातोहात खपत असत.त्या नंतर चार दिवसानी चिचखरीत मुसलमानांचा उरुस असे तिथेही आंबीचे आंबे किती असतील तितके खपायचे.
दहा - बारा वर्षाच्या भरीला बोंबड्या अट्टल चढणारा झाला. आमच्या गावात विठू घाडी, शंकर बाणे , परशा धोपटे, भिऊ टुकरूल, धाकु बंडबे हे चढणारे म्हणून प्रख़्यात पण बोंबड्या त्यांच्या वरकडी ठरला असतॎ. केशर आंबीच्या आडव्या फाट्या वर जमिनीवरून चालतात तसा तो लीलया चालत जाई. आज्जीच्या आगरातला एक माड ही असाच अर्ध्यावरून आडवा वाढत गेलेला होता त्यावरही विठू चढत नसे पण बोंबड्याने त्या माडावर चढून दातात नी हातात देठं धरून खेपेन चार शहाळी उतरवून दाखवली. हे कसब बघितल्यावर मधल्या बर्व्यांच्या घरवडीतला सुरेश म्हणाला,“बोंबड्या, साकरेच्या बांदार आमचे सात माड हत , तेंच्यार आजून पावत कोण्ण्येक चडूक शकलेलो नाय .... ” बोंबड्या फुशॎरकीने म्हणाला, “ असली भाकडां माका सांगो नुको .... मी दाकवलय चढोन तर काय देशी? ” सुरेश म्हणाला , तु चार शाळी काड , तेतली दोन तुका द्येयन, नी वर येक चवली ( दोन आणे) द्येयन. पैज ठरली नी पाच सहा पोरांची फौज मळ्यात निघाली. मळ्यात साखरेच्या बांधावर बर्व्यांच्या मधल्या घरवडीच्या हिश्शाचे सात माड होते . सातही माड अक्राळ विक्राळ वाढत पार अस्मानात गेलेले. त्यात त्या नस्तावर चोवीस तास वाऱ्याच्या कावट्या सुटायच्या त्यामुळे त्या माडांवरही कोणी गडी चढत नसे. त्यांचे नारळ सुकून पडतील तसे चोरा पोरी जाऊ नयेत म्हणून तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या म्हाद्या चांभाराला अर्धलीने राखणीला दिलेले असायचे. आंग ओलीवर माड हूं म्हणून धरत, पण चांभार लबाडी करी. सगळ्या माडांची मिळून वर्षाकाठी जेमतेम तीस चाळीस नारळाची अर्धल देई
मळ्याच्या पार टोकाला खाडीच्या नस्ताजवळ सत्तरेक वाव लांब बंधारा घालून खाडीचे पाणी थोपवलेले होते तो साखरेचा बांध. तिथेच आतल्या बाजुला मळ्यांमध्ये माड होते. आम्ही तिथे पोचलो. बोंबड्याने माड बघितले. मग कमरेची रशी सोडून हातात धरीत, “मी चडान पन पायात खाटू घालूची लागणार” सुरेश पैज लावणा रा त्याची काहीच हरकत नव्हती. मग रशीची खाटू बांधून ती पायात अडकवून बोंबड्या ने माडाला वेंघ घातली नी दोन्ही हातांवर थूंकून भार घेत सावधपणे तो वर वर जावू लागला. तो दोनेक वाव गेल्यावर धास्तावत सुरेश म्हणाला, “बोंबड्या, तुका भय झालो तर मातर खाली उतर हां उगीच इरेसरीन फुडे जाव नुको ....आमी काय चिडवणार नाय तुका ” बोंबड्याने फक्त मुंडी हालवली.अर्धे मकण मारल्यावर त्याने जरा दम छाटला नी मग मात्र माडाच्या कवाथ्या पर्यंत एका दमात पल्ला गाठला. बोंबड्या मोठ्या आवाजात म्हणाला, “ जरा बुडचे बाजूक होवा, सुकलेले नारळ हत ते पाडवतय. ” आम्ही मुळापासून जरा लांब गेल्यावर त्याने पेंदीचे नारळ धडा धड पाडवले. आता चांभारांच्या घरांकडे कोणाला तरी आमची चाहूल लागली होती नी दोन तीन पोरगे नी दोन बायल माणसं आमच्या दिशेने येऊ लागली होती. सुरेश ओरडून म्हणाला, “ बोंबड्या बाबा आता शाळी नुको काडू ... तुका ह्येतले नाराळ द्येतय. तू सावधपणान खाली ये.... तू पैज जिकलस. ” पाचच मिनीटात बोंबड्या खाली उतरला. नी चांभार वाडीतली माणसं आम्हाला गाठी पर्यंत सतरा सुके नारळ घेवून आम्ही घराकडे निघालो. (क्रमश:)