अनुबंध बंधनाचे. - भाग 53 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 53

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५३ )
आज प्रेमच्या लग्नासाठी सर्वच उत्सुक होते. चाळीतील प्रत्येक घरात असं वातावरण होतं की, जणु त्यांच्याच घरातील कोणाचं तरी लग्न आहे. सर्वांची लगबग सुरू होती. छोटी मुलं मुली नवीन कपडे वगैरे घालुन प्रेम दादाच्या लग्नासाठी सर्वात आधी तयार झाली होती. एरियामधून खुप लोकं येणार याची कल्पना होती त्यामुळे आरवने एक बस अरेंज केली होती. 
सकाळी आरवच्या घरी वरती सर्वजण आठ वाजेपर्यंत झोपले होते. त्याच्या आईने सर्वांना उठवले. आणि तयारी करण्यासाठी आपापल्या घरी पाठवले. त्याच्या घरी पण तयारी चालु होती. त्याच्या घरातील आई, ताई,भाऊ हे सर्वजण येणार होते.
प्रेमच्या घरी खूुप लगबग सुरू होती. सर्वजण आवरून निघायची तयारी करत होते. त्याची आई व ताई तिकडे लागणाऱ्या सर्व वस्तू व्यवस्थित बॅग मधे भरून घेत होत्या. चुकून काही राहू नये म्हणून पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होत्या. सर्व तयारी झाल्यावर त्या बॅग चाळीतील मुलांकडून बस मधे पाठवण्यात येत होत्या.
प्रेम कधीचा आवरून बाहेरच एका खुर्चीवर चाळीतील मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. तेवढ्यात आरव आणि रमेश तिथे येतात. घरी त्याच्या आईला भेटून सर्व तयारी झाल्याची खात्री करून घेतात. साई आणि विजय, प्रेम ज्या कार मधुन जाणार होता, ती कार छान फुलांनी सजवून घेऊन आले होते. 
प्रेम चाळीतील लोकांना खाली रोडवर उभ्या असलेल्या बस मधे बसायला सांगतो. प्रेमला आणि त्याच्या आईला घेऊन तो कारजवळ येतो. त्याला मागच्या सीट वर ताई, व त्याच्या गावावरून आलेल्या बहिणीसोबत सोबत बसायला सांगतो. पुढे आईला बसवतो. साई गाडी चालु करतो आणि बस च्या पुढे गाडी घेतो. आरव बस मधे चढून बघतो तर बस एकदम फुल झाली होती. आणि काही लोक खाली पण होते. तो बस ड्रायव्हरला कार च्या मागोमाग या असं बोलून खाली उतरतो. साईला गाडी चालु करून निघायला सांगतो. त्याच्या गाडीच्या मागोमाग बस पण एरियामधून निघते. बाकी उरलेल्या लोकांसाठी तो एक एक ऑटो येईल तशी भरून चार पाच ऑटो भरून ऑटो ड्रायव्हर ला आधीच पैसे देऊन त्या पत्त्यावर सोडायला सांगतो. जवळ जवळ सर्व लोक गेल्यानंतर तो, विजय, रमेश आणि एरियातील त्याचे सर्व मित्र बाईक वरून निघतात. एक दोन नाही तर जवळपास वीस पंचवीस बाईक तिथून निघतात. प्रेमच्या गाडीच्या सोबतच सर्व बाईक चालल्या होत्या. मागे बस येत होती. 
काही वेळातच ते सर्वजण लग्नाच्या ठिकाणी पोचतात. प्रेमची कार जशी तिथे पोचते तसे खुप फटाके वाजायला सुरुवात होते. तो कार मधुन खाली उतरतो. तिच्या घराकडील सर्व पाहुणे वैगरे त्याला पाहण्यासाठी त्याच्या आजूबाजूला जमा झाले होते. 
लग्न मंडपाच्या गेट वर आत जाण्याआधी त्यांच्या रीतीप्रमाणे त्याचे खास स्वागत करण्यात आले. तिथे बाजूलाच सजवलेला रुखवत त्याला दाखवण्यात येतो. 
दोन्ही घरचे सर्व पाहुणे मित्र मंडळी हळू हळू जमा होऊ लागली होती. 
प्रेमच्या ग्रुप मधील सर्व मित्र मैत्रिणी पण आवर्जून आले होते. त्यामध्ये ज्योती ताई, तिची मम्मी, आरवची आई, ताई, भाऊ, तसेच राघव ची मम्मी, विजयची आई, रमेशची आई, सर्वजण लग्नाला आलेले पाहून प्रेमला खुप समाधान वाटत होते. 
त्याच्यासोबत सर्वजण हा क्षण एंजॉय करत होते. 
काही वेळातच लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. प्रेम स्टेज वर आला होता. लग्नविधि साठी खास करून त्याने त्याच्या मोठ्या मामाला गावावरून बोलावून घेतले होते. 
काही वेळातच वैष्णवीला पण स्टेज वर आणण्यात आले. ती आज खुप सुंदर दिसत होती. दोघेही एकमेकांना पाहून खुश होते. 
अखेरीस तो क्षण आला होता ज्या क्षणाची प्रेम आणि वैष्णवी सोबत सर्वजण अगदी आतुरतेने वाट पहात होते.
दोघे समोरासमोर पाटावर उभे हातामधे फुलांचा हार घेऊन उभे होते. मधे अंतरपाट धरला गेला होता. दोघांचे मामा सुरीला लिंबू लाऊन दोघांच्या पाठीमागे उभे होते. दोघांच्या परिवारातील जवळचे नातेवाईक सर्व स्टेजवर उपस्थित होते. 
मंगलाष्टका चालु झाली होती....

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम,
 मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम,
 चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम, विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम,
 शुभ मंगल सावधान......
 
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,
गोदावरी नर्मदा ।
.......
.......
........
........
........
 
आली लग्न घडी समीप नवरा,
 घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा,
 अन्तर पटा ते धरा।
दृष्टादृष्ट वधु वरा न करिता ,
 दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे,
 लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम,
 शुभ मंगल सावधान......

जशी शेवटची मंगलाष्टक पूर्ण होते. तसे सर्व लोकं आपल्या हातातील सर्व अक्षदा प्रेम आणि वैष्णवीच्या दिशेने टाकतात आणि टाळ्या वाजवून त्या दोघांचे अभिनंदन करतात. 
त्या दोघांमधील अंतरपाट काढला जातो. प्रेम आपल्या हातातील फुलांचा हार वैष्णवीच्या गळ्यात घाललो. वैष्णवी पण तिच्या हातातील फुलांचा हार प्रेमच्या गळ्यात घालते. दोघेही एकमेकांना पाहून थोडे गालातच हसतात. आता खऱ्या अर्थाने ते पती पत्नी झाले होते. 
काही वेळातच लग्नाच्या पुढील विधी पण आवरण्यात आल्या. होम प्रदक्षिणा झाल्यावर प्रेमने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. थोड्याच वेळात कन्यादान विधी झाला. हे सर्व विधी आवरून ते दोघे रिसेप्शन साठी तयार व्हायला जातात.
वैष्णवी तिच्या घरी जाते. प्रेम आरव आणि रमेश सोबत तयारी करण्यासाठी त्या गेट मधुन बाहेर पडत होता. तिथे त्या गर्दीमधे त्याला अंजलीला पाहिल्याचा भास होतो. तो या गोष्टीची खात्री करण्यासाठी इकडे तिकडे पहात होता. पण आरव त्याला पुढे घेऊन जातो. तिथेच जवळ एका घरी तो ब्लेझर वैगेरे घालुन तयार होतो. रमेश आणि ज्योती ताई मिळुन त्याला छान तयार करतात. 
दोघांना एकत्र गेट मधुन एंट्री करायची होती, त्यामुळे वैष्णवी येईपर्यंत त्याला तिथेच थांबावे लागणार होते. त्या वेळात त्याला पुन्हा ती गोष्ट आठवते. मघाशी आपण ज्या मुलीला पाहिलं ती खरच तर अंजली नसेल...? पण ती अशा क्षणी का येईल...!
हे विचार त्याच्या डोक्यात चालु होते तेवढ्यात वैष्णवी तयार होऊन तिथे येते. 
तिथून ते दोघे मंडपाच्या गेट वर येतात. तिथून हातात हात पकडुन स्टेज कडे चालत येत होते. उपस्थित सर्वजण त्यांना पाहून टाळ्या वाजवत होते. फोटोग्राफर त्यांचे काम करत होते. 
ते दोघे स्टेज वर येतात. त्यांच्यासाठी तिथे खास दोन खुर्च्या ठेवल्या गेल्या होत्या. ते दोघे तिथे जाऊन बसतात. 
काही वेळ फोटोसेशन होते. मग रिसेप्शन ला सुरुवात होते. स्टेज च्या बाजुला लोकांची लाइन लागते. एक एक फॅमिली स्टेज वर येऊन दोघांना भेटुन त्यांना आहेर व भेटवस्तू देत होते. त्यांना आशीर्वाद देऊन सोबत फोटो काढून खाली जात होते. 
मधेच प्रेमची नजर पुन्हा गेटवर जाते. त्या गेटच्या बाहेरून कोणीतरी त्याला हात करत होते. तो नीट तिकडे पाहतो, अंजली आणि मेघा दोघीही तिथे उभ्या होत्या अंजली काही वेळ त्याच्याकडे पहात उभी होती. मग मेघा तिला जबरदस्ती हाताला खेचुन बाजुला घेऊन गेली. आता त्याला खात्री होते की, अंजली तिथे आली आहे....
तिला तिथे पाहून प्रेमला खुप टेन्शन आले होते. पण मेघा तिला तिथून ओढून घेऊन गेली होती. प्रेम खुप वेळ तिकडे लक्ष देऊन होता पण त्यानंतर त्या दोघी तिथे दिसल्या नाहीत. 
रिसेप्शन चा कार्यक्रम खुप वेळ चालला होता. सर्व पाहुणे मित्र मंडळी यांना भेटुन त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून झाल्यावर ते दोघे दोघांच्याही फॅमिली सोबत काही फोटो काढतात. त्यानंतर प्रेम आरव, राघव, साई , विजय, या सर्वांना स्टेज वर बोलवतो आणि ते दोघे त्यांच्यासोबत फोटो काढतात. या सर्वांनी हे कार्य पार पाडण्यासाठी किती मेहनत घेतली होती याची जाणीव प्रेमला होती.
 मंडपात एका बाजुला जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वजण त्याचा लाभ घेत होते. काही वेळाने मंडपातील गर्दी कमी व्हायला लागली होती. 
आता घरी निघायची वेळ झाली होती. वैष्णवीला निरोप देताना तिच्यासोबत तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते. सर्वांना भेटून मग ते दोघे गाडीमधे बसले. आणि गाडी तिथून प्रेमच्या घरी यायला निघाली.
वाटेत वैष्णवी खुप रडत होती. प्रेम तिची समजुन काढत होता. 
काही वेळातच त्यांची गाडी एरियाच्या गेट वर पोचली. आरवने वरातीची तयारी आधीच जाऊन केली होती. बेंजो वाले तयारच होते. त्यांची गाडी तिथे पोचताच फटाक्यांची आतिषबाजी झाली. 
प्रेम वैष्णवी सोबत गाडीतुन बाहेर आला आणि ते तिथून चालत निघाले. हळू हळू वरात पुढे जाऊ लागली. बेंजो च्या तालावर सर्वांनी ठेका धरला होता. मधेच कोणीतरी प्रेमला ओढुन नाचायला नेत होते. कोणी त्याला खांद्यावर घेऊन नाचत होते. 
तिथून घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. चाळीच्या गेट वरील मंदिरात जाऊन दोघांनी दर्शन घेतले. मग तिथून घरी आले. रीतीप्रमाणे उखाणे वगैरे घेऊन मग वैष्णवीचा गृहप्रवेश झाला. मग सर्वजण आपआपल्या घरी निघुन गेले.
घरात प्रवेश केल्यानंतर प्रथम त्यांनी देव्हाऱ्यातील देवांना नमस्कार केला. 
दोघेही खुप थकले होते. 
काही वेळाने दोघेही थोडे फ्रेश होतात. घरात पाहुणे खुप होते. त्यामुळे वैष्णवीला थोडं अवघडल्यासारखं वाटू लागले होते. पण तिला एका गोष्टीचे समाधान होते की, फायनली ती लग्न करून प्रेमच्या घरी त्याची बायको म्हणून आली होती.
रात्री सर्व आवरेपर्यंत झोपायला खुप उशीर झाला होता. त्या दिवशी प्रेम आणि त्याचा लहान भाऊ वरती माळ्यावर झोपले. वैष्णवी आणि आई खालीच झोपल्या होत्या.
बेडवर पडल्यावर प्रेम त्याचा मोबाईल चेक करतो. त्याला अंजलीचा मॅसेज आलेला दिसतो. तो ओपन करून वाचायला लागतो.
"प्रिय मित्र प्रेम... 
 सर्वात आधी तुमच्या लग्नाबद्दल दोघांचेही खुप खुप अभिनंदन आणि खुप साऱ्या शुभेच्छा. 💐
प्रेम मॅसेज वाचुन लगेच डिलिट करतो. थोडा थकवा आल्यामुळे तो मोबाईल बाजुला ठेवून झोपुन जातो. 
सकाळी त्याला आईच्या हाकेने जाग येते. तो ऊठुन खाली येतो. अंघोळ वगैरे करून झाल्यावर आईने बनवलेले कांदे पोहे खात असतो. तेवढ्यात आरव आणि रमेश तिथे पोचतात. वैष्णवी त्या दोघांना पण प्लेट मधे पोहे देते. थोडा वेळ ते लोक गप्पा मारतात. मग चहा वगैरे पिऊन झाल्यावर ते दोघे निघुन जातात. 
घरी पाहुणे वगैरे असल्यामुळे पुढील दोन तीन दिवस असेच निघुन जातात. प्रेम आणि वैष्णवीला नीट असं बोलता पण येत नव्हते. 
लग्नाच्या पाचव्या दिवशी सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. तो पूजेचा कार्यक्रम ही त्याच्या मित्र मंडळी आणि चाळीतील लोकांच्या मदतीने खुप छान पार पडला. 
त्या दिवसानंतर प्रेम आणि वैष्णवी वरती झोपू लागले. 
प्रेमला ऑफिसमधून दहा दिवसांची सुट्टी मिळाली होती. त्यामुळे तो आणि वैष्णवी त्याच्या गावी कोल्हापूरला जाऊन आई महालक्ष्मीचे व जोतिबाचे दर्शन घेतात. पुढील दोन दिवस तिथेच एका हॉटेल मधे थांबतात. त्यातील एक दिवस तिथून जवळच असलेल्या पन्हाळा किल्ल्याला भेट देतात. दुसऱ्या दिवशी दिवसभर तो तिला कोल्हापूर फिरवतो. संध्याकाळ झाल्यानंतर ते दोघे रंकाळ्याला जातात. तिथे उशिरापर्यंत थांबुन मग जेऊनच हॉटेल वर येतात.
मग तिथून तो तिला आपल्या गावी, तसेच मामाच्या गावी नेऊन सर्वांची ओळख करून देतो. मग दुसऱ्याच दिवशी ते दोघे मुंबईला परततात. 
गावावरून परतल्यावर एक दिवस आराम करून प्रेम ऑफिसला जायला लागतो. वैष्णवी पहाटे लवकर उठून आईसोबत त्याला डबा तयार करून देत होती. पुढे काही दिवसांनी वैष्णवी पण तिच्या ऑफिसला जायला लागली. 
काही महिने असेच निघुन गेले. प्रेमला अंजलीचा अधुन मधुन एखादा मॅसेज येत होता. पण तो वाचुन त्याला कोणताही रिप्लाय न देता लगेच डिलिट करत होता. 
नकळत तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता हे अंजलीला कळत होते. पण तिने त्याला प्रॉमिस केले होते. त्यामुळे ती त्याला जास्त काही बोलू शकत नव्हती.
एक दिवस अचानक दुपारी त्याला अंजलीचा भला मोठा मॅसेज येतो.
' प्रेम... सॉरी...! तुला डिस्टर्ब केला...! बाकी कसा आहेस तु...? आणि वैष्णवी कशी आहे...? बाकी सर्व कसं चालु आहे...?
सर्व छानच असेल....!😊
प्रेम....! तु माझ्या मॅसेज ला रिप्लाय करत नाहीस...! इट्स ओके...! मी समजु शकते. 
खरं तर मलाच कळायला हवं...! सॉरी...!यापुढे नाही करणार...! माझ्या या चुकीला एक मित्र म्हणुन माफ करशील...?
प्लीज माफ कर...🙏🏻
अजुन एक गोष्ट..., सोमवारी माझा वाढदिवस आहे. निदान त्या दिवशी तरी माझ्यासाठी म्हणजे तुझ्या मैत्रिणीसाठी थोडासा वेळ काढून येशील...?
प्रेम...! मी तुझ्या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत. तु फक्त माझी ही एक गोष्ट मान्य करावीस असं मला मनापासून वाटतं. 
हवं तर मी तुला प्रॉमिस करते की, त्यानंतर म्हणजे पुढच्या बर्थ डे पर्यंत तरी मी तुला कधीच मॅसेज किंवा कॉल करणार नाही. गॉड प्रॉमिस...! प्लीज विश्वास ठेव...!🙏🏻
प्रेम...! फक्त एकच गोष्ट मागतेय, तुझ्या आयुष्यातला थोडासा वेळ...! 
तुला जर मनापासून वाटत असेल तर तु ये, एक मैत्रीण म्हणून तरी त्या दिवशी मला भेट, फक्त एवढीच माझी इच्छा आहे. बाकी तु ठरव, मला माहित नाही की, आता मित्र म्हणुन माझा किती हक्क आहे तुझ्यावर, जेणेकरून मी तुला त्या हक्काने बोलावू शकेल. पण तु नक्की येशील... अशी आशा करते. बाकी जास्त काही बोलत नाही. काळजी घे स्वतःची आणि सर्वांची...
बाय...! तुझी मैत्रीण... अंजली. 
प्रेम तो मेसेज वाचुन झाल्यावर मोबाईल बंद करून बाजुला ठेवतो. तिला काय रिप्लाय द्यावा हे त्याला सुचत नव्हतं. 
काही वेळ त्याला जुन्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. त्यातुन बाहेर पडण्यासाठी तो कामात व्यस्त होतो. 
त्या दिवशी रात्री त्याला थोडं अस्वस्थ पाहून वैष्णवी त्याला विचारते.
वैष्णवी : काय झालं...? आज मुड का ऑफ आहे तुझा...?
प्रेम : काही नाही असच....! 
बस् एवढं बोलुन तो झोपुन जातो...
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आवरून तो ऑफिसला जायला निघतो. आज दिवसभर त्याच्या डोक्यात फक्त हाच विचार चालु असतो. तो पुन्हा पुन्हा मोबाईल चेक करून बघतो. पण त्या मॅसेज नंतर अंजलीचा पुन्हा कोणताही मॅसेज आला नव्हता. तो मोबाईल बाजूला ठेवून कामाला लागतो. संध्याकाळ होईपर्यंत तो मधे मधे मोबाईल चेक करत होता. पण तिचा मॅसेज काही आला नव्हता. 
तो घरी जायला निघतो. वाटेत हाच विचार त्याच्या डोक्यात चालु असतो... का आज तिच्या मॅसेज ची वाट पहात होतो...? काय करावं...! जावं का तिच्या बर्थडे ला तिला भेटायला...? फक्त यावेळी तरी...!
 तसंही तिने हे सर्व ॲक्सेप्ट केलं आहे. मग मी तिला एक दिवस नाही भेटू शकत का...! एवढीच तर अपेक्षा आहे तिची...! आधीच तिला हे सर्व स्वीकारताना किती त्रास झाला असेल...! मग तिला तेवढाही हक्क नाही का...?
जावू दे.....! यावेळी तिला भेटू, पुढचं पुढे.
असा विचार करून तो हा मनातला विषय संपवून घरी येतो. 
दोन तीन दिवस असेच निघुन जातात. एक दिवस आधी म्हणजे रविवारी त्याला सुट्टी होती. त्या दिवशी तो वैष्णवीला मार्केट मधे घेऊन जातो. वैष्णवी तिच्यासाठी घरी वापरण्यासाठी एक दोन साड्या घेते. त्यातील एक साडी प्रेमने त्याच्या पसंतीने घेतली होती. थोडा वेळ फिरून रात्री ते दोघे घरी येतात.
घरी आल्यावर ती त्या साड्या आईला दाखवत असते. त्यावेळी त्यातील एका साडीवर डाग असलेला त्यांना दिसतो.
वैष्णवी ती साडी पुन्हा घडी घालून बदलण्यासाठी प्रेमकडे देते आणि त्याला सांगते, उद्या सूुट्टी आहे मग हि साडी आठवणीने बदलून आणा. 
प्रेम तिला बोलतो...
प्रेम : खरं तर हि साडी त्या दुसऱ्या साडीपेक्षा छान आहे. आणि तो डाग निघुन जाईल धुतल्यावर. बघ अजुन विचार कर, त्याच्याकडे सेम साडी नव्हती. या पॅटर्न मधे ही एकच होती. 
वैष्णवी : नको... मला नाही आवडली तेवढी, तुम्ही दुसरी बदलुन आणा. 
प्रेम : ठिक आहे...
प्रेम ती साडीची बॅग आपल्या सॅक मधे ठेवून देतो. त्या रात्री १२ वाजता तो अंजलीला मॅसेज करतो. 
" वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. " असा मॅसेज करून तो मोबाईल बाजूला ठेवून झोपून जातो.
दुसऱ्या दिवशी पण सूुट्टी असल्यामुळे तो सकाळी आरामात उठतो. वैष्णवी आधीच उठून खाली गेली होती. तो आधी मोबाईल चेक करतो. त्याच्या मॅसेज ला अंजलीचा रिप्लाय रात्रीच आलेला होता. तो मॅसेज वाचतो...
" खुप खुप थॅन्क्स प्रेम... मला माहित होतं, तुझा मॅसेज नक्की येईल. मी आज संध्याकाळी सहा वाजता आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट बघतेय. येशील ना....? तुझी मैत्रीण अंजली. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️