शोध: साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा २पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व साहित्यिक रविंद्र पिंगे यांच्या घरांना भेटी आज ३/०४/२०२६ वार- शुक्रवार आम्ही (१९८२ ची एस.पी.के.ची सायन्स शाखेची बॅच) साहित्यिकांच्या मूळ घरांना भेट देण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या वेळी आम्ही वि.स.खांडेकर,जयवंत दळवी,मंगेश पाडगावकर व आरती प्रभू यांच्या कार्यक्षेत्रला किंवा जन्मस्थळाला भेट दिली होती.त्या प्रवास वर्णनाला वाचकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.पण तो प्रवास सावंतवाडी पासून साधारण चाळीस एक किलोमीटरच्या परीघात होता.पण यावेळी अंतर होतं जवळपास १४० किलोमीटरच्या आसपास होत. मराठीतील पहिले वृत्तपत्र ' दर्पण 'काढणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर व आयुष्य म्हणजे आनंदाच झाड आहे ह्या वृत्तीने अफाट लेखन करणारे रविंद्र पिंगे यांच्या गावाला व घराला भेट देऊन अभिवादन करण्याच आमचं ध्येय होते. आमचा प्रवास सकाळी आठ वाजता सुरू झाला.प्रवासी एकूण १४ होते.त्यात विनय सौदागर ( यांनेच पहा प्रस्ताव मांडला होता.) अरुण धर्णे,श्री व सौ.गोडकर,श्री व सौ.झांट्ये, श्री व सौ.देसाई,श्री व सौ.पेडणेकर व श्री. व सौ. केरकर व श्री.व सौ. राणे असे वेडे पीर होतो. हो ! वेडे पीरच होतो. कारण लोक तिर्थक्षेत्र,किल्ले,रमणीय किनारे यांना भेट देतात पण आम्ही चक्क साहित्यिकांच्या घरी भेट द्यायला निघालो होतो.ज्या गावांची नावेही आम्हाला काल पर्यंत माहित नव्हती व तिथे कसं जायचं हे ही माहित नव्हते तिथे आम्ही जाणार होतो.दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सगळे साठी पार केलेले तरूण (हो) होतो. या प्रवासाची सुरुवात आम्ही पणदूर (अणाव) येथील ' संविता अनाथाश्रमाला ' भेट देवून केली.समाजाची एक वेगळी बाजू या अनाथाश्रमामुळे समोर येते.इथे स्त्रीयांची संख्या जास्त आहे.त्यात मतीमंद, मनोरूग्ण,निराधार स्रीया व मुली होत्या.पुरुषही खूप होते.एकूण १७२ च्या वर अनाथ व वृध्द लोक होते.प्रत्येकाची कथा ... व्यथा व वेदना वेगळ्या होत्या.काही मिनिटांच्या भेटीने त्या कळणारही नव्हत्या. एक निश्चित संदिप परब व त्यांचे सहकारी एक अभूतपूर्व कार्य करत होते. या कार्यात आमचा खारीचा वाटा असावा या प्रेरणेने आम्ही त्यांना वस्तूरूपाने मदत केली. आम्ही गोवा मुंबई हमरस्त्यावरुन कासार्डे गाठलं.इथून डावी कडे वळलो.हा रस्ता विजयदुर्गलाही जातो.हायवेवरून १८ कि.मी.वर उजवीकडे एक कमान दिसते.( खरंतर आम्ही चुकून पुढे गेलो होतो. तिथे एक घर दिसले .बाहेर एक छोटी मुलगी पुस्तक वाचत होती.सौदागर गेट ओलांडून तिला माहीती विचारण्यासाठी गेला.त्याला बघताच ती पुस्तकं उचलून आत गेली व दरवाजा बंद केला.व खिडकीजवळ येऊनमाहिती दिली. त्यामुळे योग्य मार्ग सापडला.पण त्या छोट्या मुलींची सावधगिरी व संस्कार लक्षात घेण्यासारखे व आजच्या काळासाठी आवश्यक असे होते.)कमानीवर ' बाळशास्त्री जांभेकर स्मारक ' असा उल्लेख आहे.इथून पाच एक किलोमीटरवर जांभेकरांच जन्म गाव देवगड तालुक्यातील ' पोंभुर्ल ' गाव आहे.रस्ता, एक गाडी आरामात जाईल एवढा रूंद व चांगल्या स्थितीत आहे.इथे जुन्या काळातील पारंपरिक वातावरण होतं...शांतता...मोकळी हवा.. गाड्यांचा आवाज नाही...एखादा कामकरी वाटेत दिसत होता.एके ठिकाणी कवळा ( झुडपांच्या सुकलेल्या छोट्या फांद्या) एका टेम्पोत भरून नेत होते.धर्णेने खाली उतरून फोटो मारला.यांचा उपयोग शेत भाजणीसाठी व मांगर - गोठा यांना तटकी (दरवाजा)बांधण्यासाठी वापरतात.आमच्या लहानपणी आम्ही पण कवळांचा उपयोग शेत भाजणीसाठी करत होतो.अखेर आम्ही जांभेकरांच्या घराजवळ पोहचलो.सगळ्यांच्या मनात उस्कुकता होती.अवघ्या चौतीस वर्षांचे आयुष्य (१८१२-४६)१४ व्या वर्षी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक... विसाव्या वर्षी मराठीतल पहिले दैनिक - दर्पण...पहिले मासिक...कुलाबा वेधशाळेचे प्रमुखपद.... मुंबई इलाख्याचे शैक्षणिक अधिकारी. जर्मन,इंग्रजी,फारसी या सारख्या दहा भाषा... फ्रेंचच्या राजाकडून सन्मान ...दादाभाई नौरोजी, मुंबईचे शिल्पकार दादाभाई नौरोजी... तत्कालीन मुंबई सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश यांनी त्यांची विद्वत्ता मान्य केली होती गणित,रसायन शास्त्र,भोतीकशास्त्र, वनस्पतीशास्त्र,संस्कृत , ज्योतीषशास्र, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र यातत्यांनी अफाट संशोधन व लेखन केले.अंधश्रद्धे विरोधात लेखन केलं.चित्रलिपी व अन्य पुरातन लिपी शिकून त्यांनी कोकणातील अनेक शिलालेखांचा व ताम्रपटांचा उलगडा केला. त्यांच्या आवारात जाताच अंगावर काटा आला आपण किती लहान आहोत हे जाणवले. बाळशास्त्रीच्या तिसर्या पिढीतील सुनेने आमचं स्वागत केलं.तिच अदबशीर वागणं..नम्रपणे बोलणं मनाला भावल.घराच्या बाजूला जांभेकरांच स्मारक उभं केलंय . यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ व महाराष्ट्र सरकार यांनी सहकार्य केलय.आयताकृती छोटेखानी इमारतीतचा दरवाजा उघडून आम्ही आत गेलो.समोर अगदी मधोमध बाळशास्त्री जांभेकर यांच्या रौप्य अर्धपुतळ्याच दर्शन झालं.मन आदराने भरून गेलं. तिन्ही भिंतीवर त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे फलक मांडले होते.एक कोकणी माणूस एवढं अफाट कार्य करतो ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. तिथे सुखद गारवा होता.खाडीवरून येणारा प्रसन्न वारा उन्हाची झळ जाणवू देत नव्हता.समोर एक उंच असा भलामोठा फणस अंगावर लेकरबाळ वागवतउभा होता.कदाचीत त्याने बाळशास्त्री जांभेकरांच बालपण पाहिलं असेल असं वाटलं.जांभेकराच्या घराचं खळ स्वच्छ सारवलेल होत.पाठीमागेसुध्दा शेतकामासाठी खळ तयार केलं होतं.व्हरांड्यात सुंदर कमानी होत्या.बंदुक, दांडपट्टा व तलवार होती.काही ट्राॅफीज होत्या.कदाचीत नव्या पिढीने त्या नेमबाजी किंवा अन्य मर्दानी खेळात मिळवलेल्या असतील.एकूण घराचा बाज हा सरदार घराण्याचा वाटत होता.आम्ही कुपंणालगत असलेल्या हिरवा पर्णसंभार मिरवणार्या दोन आंब्याच्या झाडांच्या सावलीत जेवणासाठी बसलो.हिरवाई..सुखद सावली व वाहता वारा यामुळे जराही गरम होत नव्हतं.हसत खेळत जेवण झाले.घरच्या माऊलीने थोडी वाटाण्याची उसळ आमच्या साठी करून दिली होती. अखेर जांभेकर कुटुंबाच आभार मानून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला.पुन्हा हमरस्त्यावर येत आम्ही खारेपाटणाचा नयनरम्य परीसर पार करत राजापूरच्या अलिकडे जैतापूर फाट्यावरून डावीकडे वळलो. फारसी वर्दळ नसलेल्या वळणा वळणाचा रस्ता पार करत आम्ही रविंद्र पिंगे यांच्या 'उपळे ' गावाकडे चाललो होतो.आम्ही गुगलची मदत घेत होतो.पण सकाळी गुगलच्या नादात अख्ख्या आणावं गावाला (रामेश्वरालाही) आमची परीक्रमा झाली होती.अनुभव लक्षात घेता आम्ही वाटेत भेटणार्यांना विचारतही होतो. अखेर आम्ही उपळेत पोहचलो.आमच पहिलं लक्ष हे सौदागर ने ठरविल्याप्रमाणे काळे यांचा तिनेशे वर्ष जुना वाडा होता.काळे हे वैद्य होते. त्यांच्या दवाखान्याच नाव " रंगसंध्या 'असं होतं.नाव वाचून वाटलं की हा इसम कलाकार किंवा साहित्यिक असावा.पण बोर्डाच्या खाली लिहिले होते की हे नाव त्यांच्या आजी व आजोबांच्या म्हणजे ' पांडुरंग व संध्या यावरुन ठेवलं होतं. काहीही असो पण नाव आगळं वेगळं होतं हे नक्की! गाडीतून उतरून सगळे वाड्याकडे गेलो. वाटेत काही कामगार महिल परसातला पतारा ( सुका पाला पाचोळा ) गोळा करून पोत्यात भरून खालच्या शेतात पसरवत होत्या.भाजणीची तयारी चालली होती. समोर खाडीच निळसर पाणी दिसत होतं . पलिकडे देवगडातल मुटाट अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर ( होडीतून) होत. एक प्रशस्त चौसोपी वाडा..रुंदअंगण...लाकडी खांब...पावळ्यात आणि परस बागेत नाना औषधी वनस्पतींची लागवड केली होती .अंगणात साठ , किसलेल्या कैर्या,आमरस सुकत ठेवला होता.इथ आयुर्वेदिक औषधेही बनवली जात असावी.चार ते पाच महिला व बाहेर काही पुरुष तिथे काम करत होते.ते आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. आमचं दुर्दैव म्हणजे वैद्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते.आम्हाला वाडा बघायचा होता.पण घरची मालकिण आमची बाहेरूनच बोळवण करण्याच्या तयारीत होती.अखेर विनयने वैद्य्यानां फोन लावला.मग आम्ही आत गेलो. आतला दिवाणखाना मोठा होता.इथही लाकूड वापरले होत. भिंतीवर मोडी भाषेतले लेख, साप शिडी खेळाचा फलक जो आयुर्वेदाशी निगडीत होता.काही ॲन्टिक पीस भिंतीवर व टेबलांवर ठेवले होते.त्यात तुळजा भवानीची देखणी मूर्ती मखरात होती.एकूण वैद्य खरोखरच कलाकार व साहित्यिक आहेत याची खात्री पटली.त्यांना भेटता आलं असत तर मजा आली असती.पण ते होणे नव्हते हेच खरं!नंतर आम्ही रविन्द्र पिंगे यांचे घर असलेल्या 'घाडी वाडा ' येथे पोहचलो. गाडीतून उतरून आम्ही चिरे बसवलेल्या पाणंदीतून घराजवळ पोहचलो. घराच्या वरच्या बाजूला हनुमान मंदीर आहे. घराला लागून ओढा आहे. त्यावर छोटा पूल व रेलिंग आहे.पावसात इथं मजेशीर वातावरण असणार हे नक्की.पिंगे कुटुंबीय मुंबईत राहत असल्याने घर बंद असतं व किल्ली शेजारच्या सुगंधा घाडी यांच्याकडे असते ती घेण्यासाठी दोघेजण गेले.मी पुलावरून अंगणात गेलो.आत काहीतरी हालचाल जाणवली." या, आत या."खरंतर हा सुखद धक्का होता.घर बंद असणार या अपेक्षेने आम्ही आलो होतो.पण समोरअख्ख पिंगे कुटुंब आमचं स्वागत करत होतं.एवड दूर आलो त्याच सार्थक झाले होते.चाळीस पुस्तकांचे लेखक...शंभर प्रवास वर्णने... पन्नासहून अधिक मानपत्रे... विविध मासिकातून अडिचशे लेख....तिनशे भारतीयांची व्यक्ती चित्रे..तेवढीच विदेशी व्यक्तिमत्त्वांचा परीचय...अस अफाट लेखन करणार्या लेखकाच्या दारात आम्ही उभे होतो.यापरत भाग्य ते कोणते? हे त्यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे.आम्ही आत बसलो.प्रथम विनयने आम्हा सर्वांची ओळख करून दिली. मग रविंद्र पिंगे यांची कन्या चित्रा वाघ यांनी घरातली मंडळींची ओळख करून दिली.त्यात रविंद्र पिंगे यांचा मुलगा सांबप्रसाद पिंगे व त्यांची मिसेस.. रविंद्र पिंगे यांच्या बहिणीचा मुलगा...त्यांची मिसेस.अस सगळं कुटुंब उद्याच्या कणकवलीतील कार्यक्रमासाठी आले होते. आम्हाला बघून ते ही भारावले होते.आपल्या बाबांमुळे दूर सिंधुदुर्गातील विज्ञान शाखेतील ही मंडळी ' उपळे ' गावाचा शोध घेत आली होती.ही त्यांच्यासाठी कौतुकाची बाब होती.एक गाव एका लेखकांच्या नावाने ओळखला जातो हे विशेष होय. मग छान गप्पा रंगल्या.चित्रा यांनी आपले वडील मंत्रालयातील व नंतर मुंबई आकिशवाणीतील नोकरी सांभाळून आल्यावर न थकता कसे लिखाण करत हे सांगितले.त्यांच टेबल - खुर्ची व लेखणी यांचा किस्सा सांगितला.टाईम्स मध्ये ' आपला चहा आपण करावा'व त्याचा आस्वाद कसा घ्यावा हा लेख आला होता.हा लेख वाचून चित्रा या आपल्या बाबांना म्हणाल्या हा लेख अगदी तुमच्या शैलीत कुणीतरी लिहिलात.खरतर लेखा खाली नावच नव्हते.त्यावेळी रविंद्र पिंगे हसून म्हणाले..' अगं ,तो माझाच लेख आहे."अनेक रसिकांनी लेखा खाली नावच नसतानाही पिंगेना लेख आवडल्याच सांगितले होते.नुसत्या लेखनशैली वरुन लेखक ओळखला गेला होता .ही लेखनाची ताकद होती.हा किस्सा ऐकून आम्हाला हसूही आलं होतं आणि आनंदही झाला होता.सांबप्रसाद हे आर्किटेक्ट आहेत तर चित्रा वाघ या निवेदक म्हणून काम करतात.रविंद्र पिंगे यांचं साहित्य आजच्या पिढीला कळाव ..परीचित व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या नावच एक युट्युब चॅनेल सुरू केलंय. बाजूच्या हनुमान मंदिरात ' विनू मास्तरांची 'शाळा भरायची तिथे ' बापू गोखले ' शिकलेयत अस सांबप्रसाद यांनी सांगितले.तर रविंद्र पिंगे लहानपणीतिथे जात अस चित्रा वाघ म्हणाल्या.त्यांनी आम्हाला रविंद्र पिंगे यांच्या आई व आजी व आजोबा यांचा दुर्मिळ फोटो दाखवला.ही सर्व मंडळी त्या काळात शिक्षक म्हणून प्रसिद्ध होती.आम्ही रविंद्र पिंगे यांच्या रंगीत फोटोला अभिवादन कले . हेमंत झांट्ये यांने ' झांट्ये काजू' पार्सल भेट म्हणून पिंगे कुटुंबाला दिले.तद्नंतर आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.पोंभुर्ले व उपळे ही दोन्ही गाव सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांच्या सीमेवर आहेत.सुंदर व स्वच्छ आहेत.गडबड...गोंगाटप्रदुषण यापासून आजही अस्पर्श आहेत. साहित्यिकांच्या जन्मगावाला व घरांना भेटी देण्यात जो आनंद आम्हाला मिळाला होता तो चिरकाल टिकणार आहे हे नक्की!( गाडी वातानुकुलीत होती.चालक शांत होता व सुरक्षित गाडी चालवत होता.त्यामुळे प्रवास अधिकच सुखद झाला.नेहमी प्रमाणे नियोजन गोडकर,केरकर व झांट्ये यांनी उत्तम केले होते.) बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026