गझलनवाज भीमराव पांचाळे AVINASH DHALE द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गझलनवाज भीमराव पांचाळे


माणुसकीचा समृद्ध गझलस्वर : भीमराव पांचाळे 

लेखन : अविनाश भिमराव ढळे (एक अश्वस्थामा)

    अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आष्टगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे. तिथे भीमराव पांचाळे यांचा जन्म झाला. आईने गायलेली जात्यावरची गाणी, वडील म्हणत असलेली भजने आणि त्या भागातली पहाडी रागातील लोकगीते कळत नकळत भीमरावांच्या मनात संगीताविषयीचे प्रेम रुजवत गेली. त्या वेळच्या एकूणच प्रतिकूलतेत हे स्वरच भीमरावांना जगण्याचे बळ प्रदान करीत गेले. पुढे अमरावतीला शिकत असताना राजकमल चौकात अगदी रिक्षावाल्यांना गझल ऐकवत असलेले सुरेश भट त्यांना भेटले आणि भीमराव गझलेच्या प्रेमात पडले. 'आपण गझलेच्या वाटेने गेलो नाही, तर गझलेनेच आपल्या जीवनाची दिशा ठरवून दिली', असे भीमराव पांचाळे आवर्जून सांगतात.

' संघर्षाचं फार कौतुक नको, तो कुणालाही चुकला नाही. गझलने जे भरभरून दिलं आहे, त्याची उतराई शक्य नाही.मराठी रसिकांनी दिलेलं प्रेम आणि गझलने दिलेला आनंद यापुढे सगळं काही फिकं आहे', हेही सांगायला ते विसरत नाहीत. 

   आष्टगावच्या शेतांमध्ये बकऱ्या चारायला जाणारे भीमराव पांचाळे कधीतरी अमरावती, अकोला, मुंबई असा प्रवास करीत जगातील २५ पेक्षा अधिक देशांमध्ये गझलचे गारुड पोहोचवतील आणि जगभरातील मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील, ही गोष्ट शक्य वाटणारी नाहीच आणि म्हणूनच ती मोलाची आहे. १९७२ साली अकोल्यात झालेल्या पहिल्या मैफलीला आता ५४ वर्षे पूर्ण झाली आहेतच, भीमराव पांचाळे यांनी वयाची पंच्याहत्तरी देखील गाठली आहे. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना गझल प्रवासासोबतच आणखी काही महत्त्वाच्या नोंदी घेणे इथे महत्वाचे वाटते.

    भीमरावांचा प्रवास हा कुठल्याही अर्थाने सोपा नव्हता. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी कुठलेही मोठे स्वप्न पाहता यावे, अशा प्रकारची नव्हती. कसलाही सशक्त वारसाही नव्हता. शिवाय त्यांनी निवडलेला गझल हा गायन प्रकार हाच मुळात मोठा अडसर वाटावा, अशी एकूण परिस्थिती होती. गझल मराठी मध्ये कशी काय शक्य आहे, अशी धारणा जनमानासात प्रबळ असताना गझल गायनाची धडपड म्हणजे भिकेचे डोहाळे अशा पद्धतीने त्याकडे पाहिले गेले. मात्र भीमराव नाउमेद न होता एकेक पाऊल पुढे टाकत गेले. भीमरावांच्या मैफली बहरत गेल्या. त्यांना सर्वत्र प्रतिसाद मिळायला लागला. केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर खेड्या-पाड्यात देखील मैफिलींना गर्दी व्हायला लागली. भीमरावांचा चाहता वर्ग झपाट्याने वाढत गेला. सुरेश भट,इलाही जमादारांसारख्या गझलकारांचे शब्द भीमरावांच्या स्वरांना ऊर्जा पुरवत गेले, तसे भीमरावांचे स्वरदेखील महाराष्ट्रातील कित्येक नव्या गझलकारांना लिहिण्याची प्रेरणा देत गेले. या शब्दांना आपल्या आशयप्रधान गायकीचे कोंदण देत भीमरावांनी मराठी गझल जगभर पोचवली. दस्तूरखुद्द कविश्रेष्ठ सुरेश भटांनी एका मैफिलीत त्यांना 'गझलनवाज' ही उपाधी बहाल केली. 

    अरबी- फारसी मधून उर्दू -हिंदीत आलेला गझल हा प्रकार आताशा मराठीत स्थिरावला होता. माधव ज्युलियन यांचेसारख्या कवींनी मराठीत गझल लिहिली असली तरी मराठी मनात गझल रुजवली ती सुरेश भटांनी. आणि त्यानंतर झालेल्या मराठी गझलेच्या प्रवासात भीमराव पांचाळे नावाच्या गझलपर्वाने मराठी वैखरी अक्षरशः व्यापून टाकली. सर्वदूर भीमरावांच्या मैफली होत होत्याच, सोबतच त्यांनी मुंबईत गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना केली. भारतीय स्टेट बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे स्वतःला गझलेकरिता झोकून दिले. गझल हा तंत्रशुद्ध प्रकार असल्यामुळे नव्याने लिहिणाऱ्यांना तो कठीण वाटत होता. गझलेची वृत्ते नव्या गझलकरांच्या शब्दवळणी पडावी म्हणून भीमरावांनी गझलगायन आणि लेखनाच्या शेकडो कार्यशाळा आयोजित केल्या. त्यातून खेड्या-पाड्यात, शहरात सर्वत्र लिहिणारे नवे गझलकार तयार झाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझलला मानाचे स्थान मिळत नाही, ही भीमरावांची तक्रार होती. साहित्य महामंडळ त्यांची ही इच्छा पूर्ण करेल याची वाट पाहत न बसता भीमरावांनी मराठी गझल संमेलनांची सुरुवात केली. अखिल भारतीय स्तरावरची दहा संमेलने त्यांनी आजवर आयोजित केली.अनेक गझलकारांची पुस्तके प्रकाशित केली. गझल कशी गावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले. वृत्तपत्रांमधून गझलविषयक स्तंभलेखन केले. त्यातून महाराष्ट्रभरातील गझलकारांचा परिचय वाचकांना करून दिला. आता तर बोलीभाषेतून देखील गझल उमटायला लागली होती. 

    एक जखम सुगंधी, स्वप्न तारकांचे, पुन्हा तेजाब दुःखाचे अशा ध्वनिफितींमधून सुरेश भट, संगीता जोशी, इलाही जमादार इत्यादी नामवंत गझलकारांच्या गझला गातानाच भीमरावांनी गजानन वाघमारे,आबेद शेख,प्रफुल्ल भुजाडे, माधुरी चव्हाण- जोशी अशा नव्या पिढीतील कित्येक गझलकारांच्या शब्दांना स्वर देऊन ते लोकप्रिय केले. गझल चळवळ फोफावत गेली. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार भीमरावांना प्रदान करण्यात आले. मराठी गझल गायनाला उपशास्त्रीय संगीताचा दर्जा बहाल करण्यात आला. अलीकडे तर महाराष्ट्र शासनाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना बहाल करीत त्यांच्या गझलप्रवासाचा गौरव केला. मराठी गझल म्हटली की भीमराव पांचाळे यांचंच नाव डोळ्यासमोर यावं, इतकी लोकप्रियता भीमरावांना मिळाली. याचे श्रेय निर्विवादपणे त्यांच्या प्रतिभेला आणि त्यांच्या परिश्रमांना असले तरी आणखी काही ठळक गोष्टी इथे नमूद करणे मला महत्त्वाचे वाटते - 

     भीमरावांची गायकी आशयप्रधान आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी घेतलेले असले तरी कधीही शब्दांवर स्वर हावी होणार नाहीत, याची काळजी त्यांनी गाताना घेतली आहे. गझलेचा दोन ओळीचा प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते. त्यातील पहिली ओळ ही समर्पक प्रस्तावना आणि दुसरी ओळ हा दर्जेदार समारोप असतो. पहिल्या ओळीतील आशय भीमराव अशा पद्धतीने स्वरांमधून फुलवतात की रसिक त्या आशयाभोवती रेंगाळत राहतो. आणि दुसऱ्या ओळीतील अपेक्षित किंवा अनपेक्षित समारोप रसिकाला वेगळाच आनंद देऊन जातो. गाणं जसं काळजातून निघतं आणि काळजापर्यंत पोचतं, असं आपण म्हणू शकतो, मात्र उर्दूतील एका व्याख्येनुसार गझल ही एका काळजातून उसळते आणि दुसऱ्या काळजावर कोसळते. हे उसळणं आणि कोसळणं भीमरावांच्या गायनात अधिक प्रभावी होतं, त्यामुळे ती रसिकांना अधिक आवडत असावी. 

    भीमराव पांचाळे हे मातीशी नातं सांगणारे आणि पाय सतत जमिनीवर ठेवणारे एक सच्चे कलावंत आहेत. आपले अस्तित्व गझलेमुळे आहे आणि गझलेचे मोठेपण हे रसिकांच्या लाभणाऱ्या प्रेमात सामावले आहे, ही जाणीव त्यांनी सतत जपली आहे. त्यांचं अंतरंग आणि बाह्यरंग वेगवेगळं नाही. रंगमंचावर आणि रंगमंचाच्या मागे ते सारखेच आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलताना आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर एखाद्या रसिकाशी हितगुज साधताना भीमरावांचा विनय आणि साधेपणा तंतोतंत सारखाच असतो. म्हणून ते अगदी आज म्हणजे पंचाहत्तरीतही मैफल संपल्यानंतर भेटायला येणाऱ्या रसिकांसाठी तासनतास थांबलेले असतात. ते त्यांच्या सहकलावंतांच्या सुखदुःखात सहभागी असतात. १९७२ साली अकोल्यात झालेल्या पहिल्या गझल मैफिलीचे साक्षीदार आणि संवादिनीची साथसंगत करणारे साथीदार सुधाकर अंबुसकर हे आजही त्यांच्या साथीला आहेत, हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. गाडीचा ड्रायव्हर असो किंवा रेस्ट हाऊसला स्वयंपाक करणारा खानसामा, अगदी मैफिलीत ध्वनीव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तीलाही हा कलावंत मोठा आणि हवाहवासा वाटतो, यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. खेड्यापाड्यात शहरात महानगरात आणि देश विदेशात देखील भीमरावांनी मराठी गजलेचा सुवास पोचवला आहे, तो त्यांच्या ठायी कलावंत आणि माणूस म्हणून असलेल्या ह्या मोठेपणामुळेच. 

   भीमरावांनी गझलेला सामाजिक बांधिलकीचा स्पर्श दिला आहे. इतकेच नव्हे तर सामाजिक दृष्ट्या उपेक्षित घटकांच्या मदतीकरिता त्यांनी अनेक मैफलीदेखील केल्या आहेत. लाखो रुपयांचा निधी सामाजिक संस्थांना अर्पण केला आहे. गझलेतून सातत्याने माणुसकीचा विचार अधोरेखित करीत त्यांनी आपली स्वरयात्रा समृद्ध केली आहे. माणसाला माणुसकीची दिशा दाखवणे आणि मानवतेचा मार्ग प्रशस्त करीत जाणे, हाच त्यांच्या गझल गायनाचा उद्देश राहिला आहे. नाट्यशास्त्राच्या अंगाने जाणारी गझल, बोलीभाषेतील गझल, उर्दू- मराठी संमिश्र गझल असे अनेक प्रयोग मराठी गझल गायकीमध्ये केल्यामुळे भीमरावांची गझल सर्वव्यापी,सर्वस्पर्शी झाली आहे. गझल गायनाचे पारंपारिक मापदंड बाजूला ठेवत ती सर्वसामान्य मराठी रसिकांची कशी होईल, ह्यासाठीच भीमरावांची गझल साधना आहे. हे त्यांचे वेगळेपण आणि सामर्थ्यदेखील आहे. मराठी गझलेला रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान करण्यात भीमराव पांचाळे यांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. त्यांना अमृत महोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Repost @अविनाश ढळे