रानभूल - भाग 3-4 Balkrishna Rane द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रानभूल - भाग 3-4

रानभूलभाग ३ पाचही जण झपाझप पावलं उचलू लागले. वेळ खूप झालाय याच भान त्यांना आलं होतं. त्यांनी पुन्हा काठ्या उचलल्या.उताराच्या मार्गावर चालताना पाय घसरणीची शक्यता होती.सगळी जपून पावले उचलत होती.तेवड्यात वरच्या बाजूला सरसराट ऐकू आली.चार ते पाच प्राणी झुडपांतून धावत येत असावेत." हा कसला आवाज?" मनवेलने विचारले." बहुतेक डुक्कर असावेत. आपण त्यांच्या वाटेत आडवे आलो तर आपली खैर नाही." रोशनने सर्वांना सावध केले ." त्यांचे सुळे भयानक असतात. भले भले प्राणी त्यांनाघाबरतात." नासीर म्हणाला." सारखो भिययता." मनस्वी म्हणाली." जिथे आहात तिथे शांत उभे रहा." उदय म्हणाला.तेवढ्यात त्यांच्या डोक्यावरुन मघाचचा कोतवाल पक्षी कर्कश आवाजात ओरडत गेला.काही क्षण सगळे जीव मुठीत धरून उभे राहिले.पण काही वेळाने आवाज अचानक थांबला.आता फक्त वा-याची सळसळ आणि पाखरांचे आवाज कानावर पडत होते." देवच पावलो. चला लवकर." रोशन स्वतः सर्वात पुढे चालू लागला.त्या पाठी मनवेल नंतर मनस्वी...उदय तर सर्वात मागे नासीर चालत होता.एक माणूस  चालेल अशी ती पायवाट होती.दहा पंधरा मिनिटे चालल्यावर पायाखालची वाट अनोळखी वाटू लागली. रोशन तिथेचथबकला." येताना आपण वेगळ्या वाटेने आलो होतो बहुतेक!"" तू आता थांबा नको. सामको खाली उतर."नासीर म्हणाला." सांज झाली. घरच्यांना पण आपण सांगाक नाय."मनस्वी रडवेल्या सूरात म्हणाली.काही क्षण थांबून पुन्हा त्यांनी वाट उतरायला सुरुवात केली.अचानक भल्या मोठ्या माकडांचा कळप ओरडत फांद्यांवरून उड्या मारत कुठूनसा आला.मुलांकडे रागानेबघत ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होते.हे पाहून सगळीच झपाट्याने पावल उचलू लागली.पण माकड त्यांची वाट सोडेनात जणू ती त्यांचा पाठलाग करत होती." आता कितें करपाचा? हुप्प्ये फाठसूनच लागले."मनस्वी म्हणाली.तेवढ्यात एक परीचीत गंध येवू लागला." अरे,हा तर भाग्याच्या फुलांचा गंध."" अगो,तूझी भाग्याची फुला...संकटच घेवून येतहत."उदय म्हणाला. तेवढ्यात जादू व्हावी तशी ती सगळी माकड अचानक मागे वळली." अरे ही माकडा रिटर्न कशी गेली?"मनवेल आश्चर्य चकित होत म्हणाला." कशी पण जावंदे .पण आपला पाठलाग सोडला हे बरं झालं."घाबरलेल्या मनाने पुन्हा सारी वाटचालू लागली. पण त्यावेळी समोरच्या पांढर्या  नेन्याच्या झाडावर बसलेला तो कोतवाल पक्षी कुणाला दिसला नव्हता.आता साडेपाच वाजून गेले होते.घनदाट पर्णराजीतून प्रकाश खाली येत नव्हता.त्यामुळे अंधारल्या सारखं वाटतं होतं.सगळ जंगल एका अजब उदासीनतेने भरून गेलं होतं. आजूबाजूच्या पाल्या पाचोळ्यातून मधे मधे सरसर असा आवाज येत होता.छोटे मोठे सरपटणारे प्राणी मुलांच्या चाहुलीने दूर जात होते." रोशन , अरे काकाक फोन लाय.""अगो बाय, बाबाक, मघापासून फोन लायतय पण रेंज नाय हा."" अरे, देवा...हांव सांगा होतंय लवकर चला म्हणून."मनस्वी वैतागली.सगळीच दमली होती.थोड बसावं असं सगळ्यांना वाटतहोत.पण कोणालाच थांबण्याचे धाडस होत नव्हते.चालता चालता भरून आणलेल्या पाण्याच्याबाटलीतल पाणी ते घोट घोट घेत होते.एक उतार पार केल्यावर ते एका ओढ्याजवळ आले.ओढ्यात थोडंफार पाणी होतं...ते एका बारीक धारेने खाली उतरत होतं.अनेक गोल गोटे तिथे पडलेले दिसत होते. थोडी उसंत घ्यायला ते थांबले. तेवढ्यात रोशनच लक्ष ओढ्याच्या वरच्या बाजूला गेले.जे दिसलं त्याने त्याचे हातपाय थरथरायला लागले.ह्रदय धडधडू लागले.त्याने हाताने मनवेलला हरवलं व तिकडे बघायला खुण केली. " माय गॉड... !"मनवेल पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला. तोपर्यंत सगळ्यांना ते दृश्य दिसलं.तिथे दोन भले मोठे गवे रेडे पाणी पीत होते. हत्तीं सारखे गलेलठ्ठ ....भरदार आणि धिप्पाड गवे रेडे मुलांची चाहूल लागताच वळून त्यांच्याकडे पाहून लागले.तेवढ्यात मनस्वीने घाबरून किंकाळी फोडली.तसा पुढे असलेला गवारेडा आपली भलीमोठी दणकट शिंगे हलवत मुलांच्या दिशेने वळला." पळा... आणखी पण गवे आजूबाजूला असणार."उदय ओरडला.त्याने पळायला सुरुवात केली.तसं सारेच वाट मिळेल तसे झुडपातून धावू लागले.या गडबडीत उदय,नासीर व मनस्वी उजवीकडे वरच्या दिशेला पळाले तर रोशन व मनवेल समोर पळाले.खरंतर कोण कुठे गेला ते सुरूवातीला कोणालाच कळले नव्हते.सुमारे सात आठ मिनिटांनंतर उदय एका उंच झाडाजवळ पोहचला. तो धापा टाकत तिथेच बसला." रोशन.... नासीर... मनस्वी कुठे आहात? "थोड्याच वेळात नासीर तिथे पोहचला." मनस्वी.. मनस्वी खंत हा?" उदयने घाबरून विचारले." माझ्या पाठल्यान होती..."" ओ..गॉड...!" दोघंही मनस्वीला हाका मारू लागले.मनस्वीला काही झाले तर मोठे संकट ओढवणार होते.चार मिनिटांनंतर मनस्वी भेलकांडत तिथे आली.आल्या आल्या तिने तिथेच पाचोळ्यात स्वतःला झोकून दिले.तिघांच्याही अंगावर काट्यांचे ओरखडे उमटले होते.काही क्षण तिघही तशीच शांत राहिली." रोशन आणि मनवेल खंय पळाले?"नासीर चिंताग्रस्त झाला होता. " काही आयडिया नसली...आपण सगळेच संकटात सापडलो आहोत." उदय म्हणाला." चला आधी त्या दोघांना शोधू या." मनस्वी उठत म्हणाली. मघापासून रडवेली झालेली मनस्वी नव्या ऊर्जेने भारल्यासारखी दिसत होती. मनस्वी पुढे चालू लागली. आपण वरच्या बाजूला पळालो होतो तर ते दोघे सरळ पळाले होते.याचा अर्थ आता तिघांना डावी कडे वळावे लागणार होते.ती एका मोठ्या सागाच्या झाडाला वळसा घालून खाली उतरु लागली. तिघ रोशन व मनवेलला हाका मारत होते.-------*****-------****------****---------**** ज्या वेळी माकड मुलांचा पाठलाग करत होते तेव्हा कोतवाल पक्ष्याने वनराणीला ही माहिती दिली.वनराणी काही क्षणातच तिथे पोहचली.तिच्या मुकूटातल्या फुलांचा गंध तिथे दरवळला . तिने माकडांना मागे फिरण्याचा इशारा दिला. पण ऐनवेळी उद्भवलेल्या गवारेड्यांच्यासंकटामुळे मुलं सैरभैर होऊन एकमेकां पासून दूर गेली.त्यामुळे वनराणी चिंतेत पडली." मुलं सुखरूप पुन्हा एकत्र आली पाहिजेत.ती या जंगलात असेपर्यंत आपणाला त्यांचं रक्षण करावं लागेल."" पहिल्यांदा या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे."कोतवाल म्हणाला." मी जंगलाच्या सगळ्या दिक्पालांना सुचना देते की ही मुलं जंगलात असेपर्यंत कोणताही प्राणी किंवा निशाचरत्यांना अपाय करणार नाही याची त्यांनी खबरदारी घ्यावी.ती मुलं एकत्र येण्यासाठी काय करता येईल ते तू बघ.जा लवकर."कोतवाल उडून गेला तसं वनराणीने आपल्या लांब केसांना झटका देत एक छान गिरकी घेतली.तस त्या सोनेरी सांजवेळी गंधभारीत अशा हवेचे तरंग उठले.वनराणी हवेत हात फिरवत आपल्या मधुर आवाजात म्हणाली..." हे दशदिशांच्या देवतांनू ह्या जंगलात काही मुलं रानभूल पडल्यामुळे संकटात सापडली आहेत. या जंगलातील अनेक श्वापदे त्यांच्या मागावर आहेत त्यांच्यापासून या मुलांना कोणतेही इजा होऊ देवू नका." दुसर्याच्या क्षणी सगळ्या जंगलातून हुंकार ऐकू आले.जंगलातल्या अदृश्य देवता जागृत होऊन सतर्क झाल्या होत्या.------******------*****------"****-----****---रोशन आणि मनवेल पळता पळता अश्या जागेवर पोहचले की समोर एक उभा सुळका होता.त्या खाली पन्नास - साठ फूट खोल दरी.नशिब अजून थोडंफार दिसत होतं.रोशनने समोर बघितलं आणि तिथेच झपकन थांबला.या पाठोपाठ मनवेलही थांबला.आपण नशीबवान म्हणून वाचलो असा भाव दोघांच्याही चेहऱ्यावर होता. एका जाडजूड वेलीचा आधार घेऊन दोघे धापा टाकत होते." देव बरे करो." मनवेल गडबडला." खराच देवच पावलो."पण रोशनला आश्चर्य वाटले होते की धावता धावता त्यांचे पाय अचानक कोणी जखडल्या सारखे का झाले होते.खर तर त्याचे लक्ष वाटेवर नव्हते.कदाचित ती प्रतिक्षिप्त क्रिया असावी." आता बाकिच्यांना कसं शोधायचं?" मनवेल म्हणाला." म्हणूनच आपण एन.सी.सी. घेऊया असं सांगत होतो.दिशा आणि वाटा कश्या शोधायच्या ते कळलं असतं.". रोशनने याही परिस्थितीत विनोद केला. "आपण मागे फिरुया...तिघे वरच्या दिशेला गेलेत."" माका जास्त काळजी मनस्वीची वाटता..."रोशन खरच घाबरला होता.मनस्वीला काही झालं तर तो घरी कुठच्या तोंडाने जाणार होता?" नको टेन्शन घेव...सगळी सुखरुप असतली." तेवढ्यात वर कोतवाल पक्षी ओरडत घिरट्या घालताना दिसला." तो बघ कोतवाल पक्षी...तो सकाळचाच तर नाही ना...? तो कायतरी सांगताहा....हा पक्षी म्हणजे रानातला वाटाड्या!"रोशन त्या कोतवाल पक्ष्याच्या मागोमाग धावू लागला.तसा मनवेलही सोबत धावू लागला.काही वेळाने त्यांना हाका ऐकू आल्या." अरे, मनस्वी उलयता ." मनवेल खूष होत म्हणाला." मनस्वी... मनस्वी..!" रोशन ओरडला." रोशन... मनवेल..." समोरच्या झुडपां पलिकडून हाक आली.आवाजाच्या रोखाने सगळ्यांनी धाव घेतली. काही क्षणातच ते पाचही जण समोरासमोर होते.एकमेकांना पाहून त्यांना एवढा आनंद वाटला की त्यांनी एकमेकांना मिठी मारली.हसू आणि आसू एकाचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होते. " चला वेळ काढू नका...अंधार झालो...वाट शोधू या ." उदय भानावर येत म्हणाला. त्यावेळी पावणे सात वाजले होते.आता पायवाट किंवा एखादी खुणा काहिच दिसत नव्हते.सगळे देवावर भरवसा ठेवून उजवीकडच्या उताराच्या दिशेने निघाले. एक अनोखा सुगंध त्यांच्या पुढे सरकत चालला होता.त्या मोहक सुगंधाची भूल पडल्यासारखी पाचही जण झपाझप पावलं टाकत होती.कोणीच काही बोलत नव्हते.चिंता आणि तणाव यांचं मळभ त्यांच्या मनावर पसरलं होतं. बाहेर पसरत चाललेला काळोखमनात धडकी भरवत होता. " ती पय...नदी ...!" नासीर ओरडला.समोर नदीच पात्र दिसत होतं. खडकातून वाहत येणारे पाणी तिथे साचून डोह तयार झाला होता. आजूबाजूला गर्द झाडी होती.भली मोठी उंच झाडे दोन्ही बाजूला होती.मोकळं आकाश नदी पात्रातून दिसत होतं." इथंच थांबू या....घरी फोन लागतो का बघूया."रोशनने सुचवलं." हो.आता खाली उतरलणे शक्य नाही."मनवेलने ह्या सुनेला पाठिंबा दिला.तिथल्या दगडांवर बसून प्रत्येकजण फोन लावण्याचा प्रयत्न करत करत होता.पण रेंज मिळत नव्हती.फोनच चार्जिंगही कमी होत चालले होते.आता काय? हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता.-----****------*****------****------***----***भाग तीन समाप्त.

रानभूल ४   पावणेआठ वाजता दोडामार्ग पोलिस स्टेशनमधला फोन वाजला.हवालदार देसाईने बसल्या जागेवरुन फोन उचलला.त्यावेळी स्टेशनमध्ये एकूण चार जण होते.पोलिस निरिक्षक गवस, पोलीस उपनिरीक्षक परमेकर,महिलापोलिस हवालदार रुपाली कुबल." हॅलो.. हॅलो...बोला..!"" सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयातून बोलतोय..."हवालदार देसाई ताडकन उठून उभे राहिले. समोर चक्क एस.पी.साहेब होते." जय हिंद साहेब.?" हवालदार देसाईने कडक सॅल्युट ठोकला.  हे ऐकून गवस साहेबही तत्काळ उठून उभे राहिले.देसाईंकडून फोन घेत ते म्हणाले..." नमस्कार सर. बोला...!"काहितरी गंभीर बाब असणार हे त्यांच्या लक्षात आलं होतं." हे बघा, नागपूर आपत्तीकक्षाकडून वायरलेस आलाय.विर्डीच्या जंगलात गोव्यातील पाच मुले अडकली आहेत. त्यात एक मुलगी आहे.ती नेमकी कुठे आहेत हे माहीत नाही.परिस्थितीगंभीर आहे. तुम्ही चार पाच जण तत्काळ तिथे चला.किती वेळ लागेल पोहचायला?"" जीप गावात जात नाही... पाऊण तास चालावं लागेल.आम्ही आत्ताच बाहेर पडतो.मुल तोपर्यंत सुरक्षित असली म्हणजे मिळवली."" आपण तशी अपेक्षा करुया...बाहेर पडा..."     गवस साहेबांनी तत्काळ आपली हॅट उचलली." देसाई, तुम्ही स्टेशनमध्ये रहा....वाटल्यास हवालदार नाईकांना बोलवून घ्या. हवालदार वारंगाना फोन करा...तयारी करून रस्त्यावर उभे राहायला सांगा."खरं तर देसाईंना या शोध मोहिमेवर जायचं होतं पण पोलिस स्टेशन पूर्ण बंद करून जाता येणार नव्हते. देसाईंनी दोन बॅटर्या...दोन वॉकी टॉकी... जीपमध्ये ठेवल्या. स्वतः गवस ड्रायव्हिंग सीटवर बसले.वाटेत माटणेला हवालदार वारंगाना त्यांनी जीपमध्ये घेतलं.ते तयारी करूनच उभे होते.जीप वझरे...आयी...तळेखोल असा अवघड मार्ग पार करत विर्डीला पोहचली. वस्ती अजून दूर होती.गाडी तिथंच ठेवावी लागणार होती.छोटा रस्ता होता. सगळी कडे अंधार पसरला होता .पावणेनऊ वाजले होते." वारंग ,पोलीस पाटीलांच्या घरी पोहचायला किती वेळ लागेल?"" कमीत कमी अर्धा तास...!"गवसांनी वेळ न दवडता चक्क धावायला सुरुवात केली. त्यांच अनुकरण इतरांनी केली.फक्त एक बॅटरी ,मागे असलेल्या वारंगाच्या हाती होती. परमेकर थोडे स्थूल होते पण ते ही न थांबता झपाझप पावले टाकत होते.वस्तीच्या जवळ पोहोचताच. रुपाली कुबल तरुण असल्याने ती अधिक जोमाने धावत होती.गावातल्या कुत्र्यांनी ढुंकून एकच हळकळ्ळोल उडवला. हातातल्या काठीने त्यांना हाकलवत पोलीस एका घराजवळ पोहचले.खरतर सगळं गाव सगळं काम आटोपून झोपण्याच्या तयारीत होते.पण कुत्र्यांचं तार स्वरात व ओरडणं...बुटांचे आवाज...काठ्यांचा खडखडाट ऐकून दहा बारा घराचे दरवाजे धडाधड उघडले. दरवाज्या समोरच्या लाईट लावल्या गेल्या.नेमक काय घडलंय ते कोणालाच माहीत नव्हतं. समोर पोलीसांना बघून सगळे जाम घाबरले होते.आता जवळजवळ सगळा गावतिथे जमा झाला होता." पोलीस पाटील कुठे आहेत?"गवसांनी विचारलं. तेवढ्यात विसीतला एक तरुण समोर आला." बाबा , कामासाठी गोव्यात गेलेत उद्या येणार."तो भिरभिरत म्हणाला. गवसांनी वेळ न दवडता थोडक्यात माहिती दिली.तिथे असलेली रुक्मिणी काकी पटकन म्हणाली..." अगो बाय ,ती प्वारा अजून येवा नाय.एक सुरंगी पण आसा..."परमेकरांनी रुक्मिणी कडून त्या मुलांची माहिती घेतली." ती धबधब्याच्या आसपास असणार...तुमच्यापैकी कोणी यायला तयार आहेत?" गवसांनी विचारलं दहा जण तयार त्यात पोलीस पाटलांच्या मुलगा शरदही होता. रुक्मिणी काकी पण यायला तयार झाली. गवस तिला नको म्हणत होते.पण ती ऐकना." साहेब, जंगल दाट आहे. अनेक प्राणी जंगलात आहेत. लवकर पोहचावे लागेल." शरद म्हणाला." कुंभयाकडच्या चढाव गेला तर लवकर धबधब्याजवळ जावं." रूक्मिणी म्हणाली. जमेल तेवढ्या बॅटर्या...काठ्या...वाटेवरी झुडप तोडण्यासाठी दोन पाळ ... सोबत घेऊन सगळे घाई करत मार्गस्थ झाले.-----*****-----*****-----*****-----***-****---इकडे वाळवंटी नदीच्या पात्रात थांबलेली पाच मुलं  मदतीची वाट बघत जीव मुठीत धरून बसली होती.आता पूर्ण अंधार झाला होता. वर आकाशात काही तारे चमकताना दिसत होते.तर आजूबाजूच्या झाडांवरअसंख्य काजवे चमचम करत होते.अख्ख झाड एकाचवेळी प्रकाशमय होत होतं.काजव्यांचा प्रकाश पाण्यावर पडून पाणी चमकत होते.पण हे सुंदर दृश्यही त्यांना भयावह वाटत होतं.उदय मध्ये मध्ये मोबाइलची बॅटरी चालू करत होता.पण त्या भयाण अंधारात तो प्रकाशही काजव्यासारखा वाटत होता.जरा कुठे सरसर...खरखर झाले की सगळी दचकत होती.सगळी एकमेकांच्या एवढी जवळ बसली होती की त्यांना एकमेकांच्या ह्रदयाची धडधड ऐकू येत होती.नासीर काहीतरी आठवलं.त्यानेपाठीवरची सॅक काढली.शेवटच्या पॅकेजमध्ये तो काहीतरी शोधू लागला.अखेर त्याला पाहिजे ते मिळालं." लायटर आसा... केमिस्ट्री प्रॅक्टिकलाक लागा. तशोच रवलो . आग पेटवक गावतलो."त्याने मोबाईलची टॉर्च चालू केली.लहान काठ्या गोळाकेल्या.त्यावर सुकलेली पाने टाकली.लायटरने आग पेटवली. लाल जांभळ्या ज्वाळा वर उठल्या.सगळ्यांना हायस वाटल.खर तर थोडी ऊब...आणि प्राण्यांपासून संरक्षणासाठी आग गरजेची होती. नशीब नासीर जवळ लायटर होता व त्याला ते आठवलं . " आजूबांजून लक्ष ठेवा." मनवेलने सावध केले.खरंतर कोणी बोलायलाही घाबरत होते.आता साडे आठ वाजून गेले होते.एक एक क्षण शंभर वर्षांसारखा वाटत होता.मदत मिळेल न मिळेल काहीच कळत नव्हतं.सोबतीला काळाकभिन्न अंधार... रातकिड्यांचा आवाज ...पानांची सळसळ...प्राण्यांचे भितीदायक आवाज..कधी कुठून कोण झेप घेईल सांगता येत नव्हते." रोशन ते पय...थय काय चमकता."मनस्वी कुजबुजली.सगळ्यांनी आजूबाजूला पाहिले.चारीही बाजूंनी क्रूर हिरव्या डोळ्यांच्या जोड्या त्यांच्या दिशेने रोखून बघत होते. कोणाचे डोळे होते ते? कोल्हे... लांडगे...की रानकुत्री की आणखी कुणी?पाचही जण पार टरकले. सगळं शरीर थिजल्यासारख निश्चल झाले होते." इ..इथून हलू नका... आगीमुळे ते येत नसावेत."रोशन हळू आवाजात म्हणाला.खरं तर कुणातही पळण्याचा त्राण नव्हते.शिवाय पळून जाणार कुठे? चारही दिशांना अंधकार... घनघोर जंगल!-----------******----------******-------*****---- गवस साहेबांनी त्यांच्या सोबत असलेल्या माणसांच्या दोन तुकड्या केल्या. पुढे गावातला माहितगार माणूस व मागून इतर अशी रचना केली.बॅट-्यांच्या प्रकाशातकाठ्या सरसावत सगळे चालू लागले.शरद हातातल्या पाळावे वाटेवरी झुडप चाटत चालला होता.रूक्मीणीमावशीने सांगितल्या प्रमाणे सगळे कुंभ्याच्या झाडाकडून वर चढत होते. रूक्मिणी या वयातही सहजपणे उड्या मारत चालली होती.तिच्या पाठोपाठ हवालदार रुपाली कुबल व परमेकर व इतर गावकरी चालले होते.थोडे अंतर ठेवून दुसर्या बाजूने गवससाहेब व काही गावकरी चालले होते." पायाखाली लक्ष ठेवा... काही आढळल्यास सूचनाद्या...व्हिसल वाजवा."स्वतः गवस अतिशय सावध होते.त्यांचे कान आणि डोळे कोणतीही हालचाल व आवाज टिपायला सज्ज होते.दहा वाजायला दहा मिनिटे होती.मुले सुरक्षित असू दे अशी ते प्रार्थना करत होते. अचानक एका उंच झाडावरून कुणीतरी धपकन दुसर्याझाडावर उडी मारली.अंधार चिरत आवाज सगळी कडे घुसला. सगळे दचकून जागेवरच थबकले." हे कोण होतं ?"हवालदार वारंगानी विचारलं." घोरपड असावी." नागेश सुतार म्हणाला." हयल्या घळीत...घोरपडी हत."रूक्मिणी काहीच झाले नाही अश्या सुरात म्हणाली.तिला ह्या जंगलाचा कोपरान कोपरा माहिती होता. रानमेवा...पान...लाकड गोळा करायला ती जंगलात यायची. तिला कशाचिही भिती वाटत नव्हती." आता... उजव्या अंगान सरका..." तिने सूचना केली. रुक्मिणीच्या अंदाजा प्रमाणे वीस एक मिनिटात ते वाळवंटी नदीजवळ पोहचणार होते.------*****-----****------*****------****---वनराणी सायंकाळ पासूनच या मुलांच्या सोबत होती.जिथे मुलं बसली होती त्या पाठीमागच्या एका गेळ्याच्या काटेरी झाडाच्या मुळाशी ती बसली होती.उदयने ११२नंबरला लावलेला फोन ऐकून ती सुखावली होती.या मुलांना लवकर मदत मिळावी ही तिची  इच्छा होती.या बाजूला रानटी पशू किंवा सरपटणारे प्राणी येवू नयेत.यासाठी जंगलचे राखणदार तिने तैनात केले होते.मुलांची अवस्था पाहून तिला वाईट वाटत होते पण घडणार्या घटनांमध्ये वनराणीला हस्तक्षेप करता येत नव्हता.हे जंगल ...इथले प्राणी...अन्य वाईट शक्ती यावरती हुकूमत चालवू शकत होती.      अचानक तिला जाणवलं की काही माणसांनी जंगलाच्या हद्दीत प्रवेश केलाय.नक्कीच ते या मुलांच्या सुटकेसाठी येत असणार.वनराणीला आनंद झाला.ती आनंदाने गुणगुणली.-----*****----******-------*****-------****--भाग ४ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026