पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ६ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ६


प्रिय सोना

आपले शेजारी वर्षातील बरेच दिवस बाहेरगावी असत

घरी आले की त्या बाई कायम काहीतरी धान्य धुन्य पाखडत असत..

रोज इतके काय पाखडायला लागत असे कोण जाणे असे मी म्हणत असे..

पलीकडून पाखडणेचा आवाज आला की तुझी कमेंट असे...

"अखिल भारतीयपाखडू संघटना चे चीफ आलेत बघा"..😀

काही वेळा मी उगाचच दुसऱ्याचे काही काम अंगावर घेत असे

खरेतर हे असले काही गळ्यात घेऊ नये असे तुझे आधीच म्हणणे असे

पण माझ्या स्वभावानुसार मी ते ऐकलेले नसे

नंतर त्यासाठी घालायला लागणाऱ्या फेऱ्या बघून हे काम का अंगावर घेतले याचा मलाच पश्चात्ताप होत असे

तेव्हा तू म्हणत असे

"गाढव मेल वज्याने शिंगरू मेल येरझाऱ्याने"

ही तुझी आवडती म्हण असे...

कधी कधी अचानक तू एकदम पांडुरंग पांडुरंग म्हणायला लागत असे

आता हे काय असे विचारल्यावर

भावाची आठवण आली असे म्हणून

पांडुरंग  पांडुरंग   बंडुरंग बंडुरंग...

असे म्हणून त्यात बदल करीत असे😀

आप्पा देवरा म्हणून आपले एक स्नेही होते

ते घरी आले की इतक्या गप्पा मारत असत की तास दोन तास उठायचे नाव नसे

ते नुसते दारात दिसले का तू "आप्पा देवरा गप्पा आवरा"असे म्हणत असे

अशा वेळी मी त्यांनी तुझे बोलणे ऐकू नये म्हणून तुला हळू बोलायच्या खुणा करीत असे...😊

पहिल्या पावसात भिजायला आपल्याला खुप आवडत असे

खूप कडक उन्हाळ्या नंतर हा पाऊस तन मन शांत करीत असे

"आज अंग कस स्वाआंग शीतल झालं..."

असे तृप्त शब्द तुझ्या तोंडून येत..😀

असेच थंडीचा मौसम सुरू झाला का

संध्याकाळी तू पटापट खिडक्या बंद करून

"गारवा मारो छे" असे म्हणत असे

  आपल्या बागेत भारद्वाज पक्षाची जोडी आहे

हा पक्षी शुभ समजतात

कधी कधी आपल्या फिरण्याच्या रस्त्यावर सुद्धा भारद्वाज दिसत असे

गंमत म्हणजे उडत येऊन बरोबर तुझ्या समोर हे पक्षी उतरत असत आणि समोरून चालत जात असत..

भारद्वाज बघितला की काहीतरी बातमी समजते असे तुला अनुभव असत

त्यामुळे हा पक्षी दिसला की लगेच..

"या महाराज .. आज काय बातमी आणली"असे तुझे वाक्य असे

सकाळी तुला लवकर जाग येत असे

लगेच तुझी उठून चहा करायची गडबड सुरू होत असे

मी म्हणे काय गडबड झोप ना जरा निवांत

तेव्हा तुझे उत्तर असे..

मला झोपायच होत पण पक्षी लई कल्ला करतात.. मला झोपू देत नाहीत "😃

सकाळी आपण फिरून आलो का मी लिंबू सरबत करीत असे..

आल्यावर बूट काढता काढता तुझे वाक्य..

"सरबत ए खालसा. येऊ दे."

जयसिंग नावाचा आमचा एक शिपाई होता

तो समोरून आला की का कोण जाणे तू "प्राध्यापक जयसिंगराव पवार आले असे म्हणायचा "

याच कनेक्शन कधी समजल नाही 😃

बारीक बारीक कोट्या करायची तुझी हातोटी होती

चव्हाण नावाचे एक सिनियर सिटीझन कायम सायकल चालवायचे त्यावर तुझ काव्य असायचं..

चव्हाण चवली खिशात पावली

सायकल फिरवून आणून लावली 😃

तब्येती मुळे अथवा व्यायामाच्या अभावामुळे पाय ओढत चालणाऱ्या बायकाना तू कायम

"डूग डुगया बायका"म्हणायचा

आपल्या ओळखीतल्या एक बाई बोलताना सारखी मान हलवत

त्यांना तू"डोलकी बाहुली म्हणायचा"

त्या समोरून आल्या तरी तुझी उपाधी आठवून हसू यायचं 😀

हल्ली फॅशन म्हणून आलेल्या मागे गाठ बांधायच्या ब्लाऊज ला तू कायम "उद्घाटना चे ब्लाऊज "म्हणायचा

कारण घालताना काढताना त्याची गाठ बांधायला सोडायला लागायची म्हणून..😀

आपला मुलगा लहान होता तेव्हा त्याला सावळा गे माये रुपे सुंदर हे गाणे खूप आवडायचे

त्याला मुद्दाम चिडवायला तू

"सावळा गे माये सिद्ध्या सुंदर.." असे म्हणायचा

तो ही लहान असल्याने त्याला यातली गंमत समजायची नाही मग तो तुला म्हणायचा

"सावळा गे माये बाबडी सुंदल"

पळसुले .नावाचे माझे सहकारी होते त्यांना कायम तू

   "  पळसुले पळत सुटले   " म्हणायचा 😀

केर गोळा करणारी गाडी इकडे कचरा तिकडे कचरा..असे गाणे वाजवत आली की..

.".तुमच्या माझ्या आली बघ केर घेऊन ये बाहेर" असे म्हणत असे कारण त्या गाण्यात तुमच्या माझ्या आरोग्याचे रक्षण करणे आपल्या हाती असे शब्द होते 😃

वरण फळे हा प्रकार तुझा नावडता होता

फार क्वचित मी तो करीत असे

त्या दिवशी तू "आज काय अश्वखाद्य केलेय का असे म्हणायचा"

त्याला अश्वखाद्य म्हणायचे काय कारण हे कधी समजले नाही..😀

दुपारच्या वेळी तुला कॉफी आवडत असे

ती वेळ झाली की

"ए कापी कापी झाली का "असा तुझा पुकारा असे 😊

ओळखीतला एक दुकानदार घरी पूजा झाल्यावर भरपूर भस्म लावायचा

तू त्याला इबीती (विभूती) किंग म्हणायचा 😀

आपला एक मित्र रोज अंघोळी नंतर कपाळाला चंदन टीका लावायचा

कधीतरी चुकून त्याचा टीका लावायचा राहिला की तू त्याला

"काय आज टीटी लावली नाही वाटते असे विचारायचा

तो शब्द ऐकून त्यालाही हसू यायचे 😀

आपल्या कामवाली च्या घरात तिची मुलगी दोन मुलांसोबत महिना महिना रहायची

कामवाली ची परिस्थिती बेताची होती

मुलगी आली की वारेमाप खर्च करायला लावत असे

आईला अशा वेळी काहीच बोलता येत नसे

तू तिला "घूस" आली म्हणत असे

घूस कशी घर पोखरत असते तशीच ही आईची कमाई पोखरते असे तुझे म्हणणे असे

काही वेळा किती प्रयत्न करून काही गोष्टीत फरक पडत नसे

तेव्हा मी जरा विचलित होत असे

पण तू शांतपणाने..

"काय करनार आता_"असे म्हणून विषय सोपा करीत असे

तुझी झोप खूप सावध असे

कित्येक वेळा छोट्याशा आवाजाने सुद्धा ती डिस्टर्ब होत असे

सकाळ झाली की तू मला सांगत असे

पहिली झोप ठीक लागली नंतर झोप येईना .

मी पण गमतीने मग दुसरी तिसरी चौथी झोप तरी लागली का असे विचारत असे😃

तुम्ही पूर्वी रहात होता तिथे दांडेकर कुटुंब रहात होते

त्यांना जुनी शामा नटी खूप आवडायची

माझं तर तेव्हा तुझ्याशी लग्न झालं नव्हतं त्यामुळे मला दांडेकर ठाऊक नव्हते

पण जेव्हा कधी टीव्ही वर शामा नटी ची गाणी अथवा चित्रपट लागत...

तेव्हा हमखास तू "ती दांडेकरांची श्यामा दिसतेय असे म्हणायचा "

जणू शामा चे आडनाव दांडेकर होते 😀

सकाळी नाश्ता जेवण याआधी आपल्याला गोळ्या घ्यायच्या असत

तू गोळी काढून माझ्या हातात द्यायचा

आणि म्हणायचा..

गोली आणि भुरा घ्या...😀

मी विचारायची भुरा काय असते.

काही नाही सहजच हे तुझे उत्तर ..

तुझ प्रत्येक काम परफेक्ट असे

माझ्याकडून मात्र काही काही कामे अर्धवट रहात

ते सोडून मी दुसरेच काहीतरी करीत बसे

अशा वेळेस तुझं वाक्य असे

"अर्ध्या दाढ्या टाकून कुठ जाऊ नको"😃

आपल्या मुलाला त्यांच्या हिताच्या काही गोष्टी सांगून सुद्धा पटत नसत

मला वाटायचे सांगून त्याच्यात बदल होईल 

पण तसा बदल कधीच होत नसे 

मग मी थोडी नाराज होत असे...

अशा वेळी तू म्हणत असे 

"असे सांगून कोणी बदलले असते तर आणखी काय पाहिजे होते..

ज्याला बदलायचे आहे तो पहिल्यांदाच बदलतो"

तुझे हे परवलीचे वाक्य खरेच माईल स्टोन होते 

आपल्या बागेत बरेच पक्षी येत..

त्यांचे वेगवेगळे आवाज ऐकत आपली पहाट होत असे

त्यातला एक पक्षी ओरडला की "ए तत्या"असे म्हणल्या सारखे वाटत असे

पहाटे साडेपाच वाजले की तुझी उठण्याची चुळबुळ सुरू होत असे

मी कुस वळवून थोडे नाराजीने पाहिले की तू म्हणायचा

तो बघ तत्या बोलावतो आहे मला...

अशी तू बोललेली गमतीशीर असंख्य वाक्ये आठवत राहतात

आठवत राहणार ❤️