प्रकरण ६
रात्रीचे पावणे दोन वाजले होतं वज्र अजूनही तिची वाट बघत पेट्रोल पंपा जवळ एक खुर्ची टाकून बसला होता हातात सिगरेट पेटवून त्याचे झुरके घेण्यात मग्न होता. कोणतीच वाहनं आता येत नव्हती.
अचानक त्याला ती बाहेर आलेली दिसली. आपण नेमकं कुठे बसलो हे तिला कळावं म्हणून हातातल्या सिगरेटची ठिणगी तिला दिसेल अशा पद्धतीने त्याने हात हलवला. ती त्याच्या शेजारी येऊन खुर्चीत बसली.
"तू गोंधळात टाकलंस मला. तू बोगस माणूस आहेस हे माझ्या लक्षात आलं होतं पण तू तिजोरी फोडणारा दरोडेखोर असशील आणि तुरुंगातून पळून आलेला कैदी असशील हे मला नवीनच होतं. तू एकदम सेलिब्रेटीच झाला आहेस."
"जोपर्यंत मी इथे माझी नोकरी करतोय आणि तुझ्या नवऱ्यासाठी पैसे मिळवून देतोय तोपर्यंत मी कोण आहे याच्याशी तुला काय करायचं आहे?"वज्र म्हणाला
"पोलिसांना तुझ्याबद्दल सांगितलं नाही तर मी अडचणीत येईन का याचा मला विचार करावा लागेल" सांझी म्हणाली
"सांगणार आहेस तू त्यांना?"
"अजून ठरवलं नाही ते मी. तुझ्यावर अवलंबून आहे ते."
"माझ्यावर काय अवलंबून असायचंय त्यात?"
"पलाश कडे अभेद्य कंपनीची तिजोरी आहे तू ती उघडायची आहेस. तुझा निर्णय काय होतो यावर मी तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की नाही हे ठरवणार"
"त्या तिजोरीतलं तुला काय हवंय का ? आणि हवं असेल तर ते तू तुझ्या नवऱ्याकडे का मागत नाहीस? तो तुला खर्चायला पुरेसे पैसे देत नाही का? ते पैसे माझ्याकडून चोरी करून घेण्याचं काय कारण आहे तुला?"वज्र ने विचारलं
"दुपारीच तुला सांगितलंय मी. मला उलटे काहीही प्रश्न न विचारता मी सांगेन तेच तू इथून पुढे करायचं आहेस.”
याचा अर्थ पलाश चा मेव्हणा उदित उपाधी म्हणाला ते बरोबर होतं, तू त्याच्या पैशावर डोळा ठेवून आहेस.”
“उदित काय म्हणाला ते महत्त्वाचं नाही तू तिजोरी उघडणार आहेस की नाही सांग.”-सांझी
“समज उघडली मी तिजोरी पुढे काय?”-वज्र
“मी तुला त्यातले 25 हजार रुपये देईन आणि इथून पळून जायला २४ तासांची मुदत तुला मिळेल असं मी पाहीन.”
वज्र पटापट विचार करायला लागला तिने त्याच्या पुढे चांगलाच सापळा टाकला होता. पलाशला आपली तिजोरी पूर्णपणे रिकामी झालेली दिसेल आणि वज्र तिथून निघून गेल्याचं त्याच्या लक्षात येईल त्या दोन्हीचा अर्थ तो असाच काढणार की वज्र पैसे घेऊन पळून गेला. प्रत्यक्षात तिला काही लाख रुपये मिळालेले असतील आणि वज्रला त्यातले फक्त २५०००. पोलिसांना वज्रचे वर्णन दिलं जाईल ते असंच समजतील की तिजोरीतले सगळेच पैसे वज्रने घेतले आहेत तिच्यावर कोणालाच संशय येणार नाही. तिला फक्त तिजोरीतले पैसे कुठेतरी लपवून ठेवावे लागतील एवढेच. वज्रला पोलिसांनी पकडल्यानंतर वज्रने त्यांना कितीही सांगण्याचा प्रयत्न केला की तिने त्याला तिजोरी फोडायला लावली तरी त्यावर पोलीस विश्वास ठेवणार नाहीत. काही काळाने सर्व काही शांत झाल्यावर ती लपवलेले पैसे बाहेर काढेल आणि परागंदा होईल.
“काडी- काडी करून तुझा नवरा जे पैसे साठवतो आहे आणि ते त्याने तिजोरीत ठेवले आहेत ते कशासाठी माहिती आहे तुला तो तुला जगातील सर्व देशात फिरवून आणणार आहे उत्तम उत्तम हॉटेल मध्ये तुला नेणार आहे आणि त्याच्याशी तू अशी प्रतारणा करणार आहेस?” वज्र ने विचारलं
“तो मूर्ख माझा नवरा, त्याच्याबरोबर मी वर्ल्ड टूर वर जाऊ? त्याच्याबरोबर तर मला बाजूच्या गावातही जायची इच्छा होत नाही. फालतू बोलू नकोस तू तिजोरी उघडणार आहेस की नाही तेवढेच सांग.”
“अभेद्य कंपनीची तिजोरी उघडणं म्हणजे एखाद्या घराचं कुलूप उघडण्यासारखं नसतं. कोड नंबर माहित असल्याशिवाय ती कोणालाही उघडता येत नाही हे लक्षात ठेव.” वज्र तिला म्हणाला त्याला काही करून वेळ काढायचा होता पलाश बद्दल त्याच्या मनात निश्चितच आदर होता त्याची तिजोरी लुटणे हे मानसिक दृष्ट्या वज्रला अवघड जात होतं पण ते केलं नसतं तर या बाईनं त्याला पुन्हा तुरुंगात घालवलं असतं ती कल्पनाही त्याला सहन होऊ शकत नव्हती. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा होता काहीतरी मार्ग असणारच होता. वज्र ला फक्त वेळ हवा होता.
“कुठे आहे तिजोरी?” त्यांन विचारलं
“बंगल्यातल्या आतल्या खोलीत.”--सांझी
“त्याला कुठलाही आवाज न येता मी तिजोरी उघडू शकेन अशी अपेक्षा तू कशी करतेस?”
“शनिवारी तो एका मीटिंगसाठी बाहेर जाणार आहे त्या वेळेला तू हे करशील.”
“आणि मी तिजोरी उघडत असताना तू तिथे काय करत असणं अपेक्षित आहे? माझ्याकडे बघत बसशील?”
“त्यावेळेला माझी रात्रपाळी असेल मी रेस्टॉरंटच्या भटार खाण्यात काम करत असेन. मी कामात एवढी मग्न असेन की तू निघून गेल्याचं मला लक्षात सुद्धा आलं नाही असं मी भासवीन. पलाश येईपर्यंत तू तिथे नसल्याचं माझ्या लक्षातही आलं नाही असं मी भासवीन.”
तिचा कसा बंदोबस्त करायचा याचा वज्रने विचार करून ठेवला.फारतर पुन्हा इथून पळून जायला लागेल, इथली नोकरी गमवावी लागेल, पण पलाशशी प्रतारणा तर करावी लागणार नाही.
“ सर, जातात कधी आणि येतात कधी?” वज्रने विचारलं.
“ सात ला निघेल आणि दोन वाजता परत येईल.”
वज्र मनात विचार करत होता, आपण तिजोरी उघडायची.जेव्हा सांझी पैसे घ्यायला तिजोरी जवळ येईल तेव्हा आपण लावलेल्या सापळ्यावरून ती चालेल आणि अडकेल.त्यातून सोडवणूक करून घेई पर्यंत आपण बरंचसं अंतर कापलेलं असेल.तिला तिथून फोन करता येणार नाही किंवा सायरन वाजवता येणार नाही याची व्यवस्था आपण आधीच करून ठेवायची. पलाश येईल तेव्हा त्याला ती सापडेलच.दूर निघून गेल्यावर आपण पलाश ला काय घडलं ते सर्व कळवायचं आणि त्याचे सगळे पैसे परत करायचे, एकूण एक रुपया.तेव्हा त्याला जाणीव होईल की मी त्याच्याशी एकनिष्ठ होतो आणि आपण किती नीच स्त्री जवळ लग्न केलंय ते.
“ तर मग शनवारचा कार्यक्रम नक्की.” ती म्हणाली आणि वज्र काय म्हणेल याचा विचार न करता उठून निघून गेली.
टेबलावर आता पत्ते उपडे करून ठेवलं गेले होतं. कोण कसा डाव टाकतो त्याची जीत होणार होती.वज्रला विश्वास होता तिच्याकडे चारही राजे असणार आणि आपल्याकडे चार एक्के !
दुसऱ्या दिवशी सकाळी वज्र झाडलोट करत होता आणि पलाश घोष पंपावर काम करत होता.सांझी तिथेच होती.वज्र तिला म्हणाला,
“ तिजोरीचे कोड नंबर म्हणजे कॉम्बिनेशन मला दे.ते मिळाल्याशिवाय उघडता येत नाही. ”
“ देते तुला.” ती म्हणाली.
त्यानंतर दिवसभरात पलाश तिथे नसताना संधी साधून तिने वज्रच्या हातात चिट्ठी सरकवली.तो नंबर बघताच वज्रच्या लक्षात आलं की त्याच्या गळ्यात एक जुनाट मॉडेल मारलं गेलं आहे. अद्ययावत मॉडेल मधे किल्ली लावल्यावरच दार बंद होत असे, पण हे जुनं मॉडेल असं होतं की दार बंद केल्यावर आपोआपच लॉक होत असे.तुलनेने हे मॉडेल उघडायला खूप सोप होतं.वज्र ते दहा मिनिटात उघडू शकणार होता.
गुरुवारी पलाशने वज्रला सांगितलं की शनवारी त्याला एका मीटिंग साठी जायचंय. सांझीवर लक्ष ठेव.ती एखाद्या ट्रक ड्रायव्हर ला पटवून पळून जाणार नाहीना ते बघ.
वज्रला खूप वाईट वाटलं.किती विश्वास आहे पलाशचा आपल्यावर ! त्याच्या बायकोवर नाहीये पण आपल्यावर आहे.आणि इथे आपल्याला काय करावं लागतंय त्याच्या सोबत. त्याच्या मनात तरी असेल का, की तो त्याच्या बायकोवर जो संशय घेतोय ते कृत्य आपण करणार आहोत म्हणून?
“ काळजी नका करू.” आपली व्यथा चेहेऱ्यावर न दाखवता वज्र म्हणाला.
शुक्रवार आला. वज्रला त्या दिवशी सुट्टी असायची.
“ सर एक विनंती करायची होती,आज माझी सुट्टी असते, मला जरा कलकत्या पर्यंत जायचं होतं.तुमची गाडी नेली तर चालेल का? आणि मला थोडे पैसे हवं होतं खर्चायला, म्हणजे मला तुम्ही दिलेले, जे तिजोरीत ठेवलंत तुम्ही.”
“ अरे, जरूर घेऊन जा गाडी.आणि किती हवंत पैसे?”
“सहा-सात हजार द्या.” वज्र म्हणाला.आणि पलाशने त्याला तिजोरीतून पैसे काढून दिले. याला एवढे पैसे का लागत असतील असं त्याच्या मनात आलं पण त्याने विचारलं नाही.
“ कलकत्यावरून तुम्हाला काही आणू का येताना?” वज्र ने विचारलं.
“ नको.तू फक्त येताना पिऊन येऊ नको.” वज्रच्या बरगडीत ढोसत पलाश हसून म्हणाला.
वज्र पलाशची गाडी घेऊन निघाला तेव्हा सांझी किचन मधून त्याच्याकड बघत होती. आपण पळून जातांना विमानाने जायचे नाही हे वज्रने पक्क ठरवलं होतं.कारण त्याला शोधायच्या प्रयत्नात पोलिसांनी सर्वात प्रथम विमान प्रवासाचा शोध घेतला असता. एका ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिस समोर वज्रने आपली गाडी थांबवली आणि रेल्वे ची चौकशी केली रात्री १२.३० ला एक ट्रेन सुटत होती.
पलाश मिटिंग ला जाण्यासाठी शनवारी संध्याकाळी ७ वाजता निघणार होता. साडेसात वाजेपर्यंत आपण त्याची तिजोरी उघडू आणि पैसे पॅक करून पावणे आठ पर्यंत निघू शकू असा अंदाज वज्रने बांधला.अगदी सांझीचा बंदोबस्त करण्यात लागणारा त वेळ लक्षात घेतला तरी १२.३० ची ट्रेन आरामात मिळू शकत होती. त्याने जवळच्या दुकानात जाऊन काही कपडे, बूट, गॉगल, हेअर डाय आणि एक नवी सुट केस खरेदी केली.त्यात सगळ्या वस्तू भरून सूटकेस लॉक केली आणि कारच्या डिकीत ठेवली. सांझी पोलिसांना वर्णन करेल तेव्हा कपडे, डोक्याच्या केसांचा रंग, डोळे, असं वर्णन करेल त्यापेक्षा पूर्णत: वेगळे असं वेषांतर करण्यासाठी या वस्तू वज्रला लागणार होत्या. ही सगळी खरेदी झाल्यावर तो गाडी घेऊन पुन्हा पलाशच्या धाब्याच्या दिशेने निघाला. वाटेत एका ठिकाणी निवडुंगाची खूप झुडपं होती.एका खुणेच्या जागी झुडपात सुटकेस लपवली.पुन्हा आपल्याला ही सापडायला हवी आणि इतर कुणाला दिसता कामा नये याची काळजी त्याने घेतली होती. हे सर्व करून तो सायंकाळी सात च्या आधी धाब्यावर पोचला. रात्रीच्या जेवणाच्या तयारीच्या दृष्टीने त्याने सांझी आणि पलाशला नेहेमी प्रमाणे मदत केली.रात्री दहा पर्यंत रेस्टॉरंट मधे जेवणे चालू राहिली आणि अकरा पर्यंत सर्व आवरा आवरी होऊन पलाश घोष झोपायला निघून गेला.त्या रात्री वज्रची रात्र पाळी होती.सांझी आपल्या खोली मधे गेली आणि वज्र पंपाजवळ जाऊन बसला. रात्री उशिरा केव्हातरी सांझी वज्र बसला होता तिथे सावधपणे आली.
“ कलकत्यात कशासाठी गेला होतास?”
“ तुझी काय कल्पना आहे? इथून तिजोरी उघडून गेल्यावर पळून जाण्यासाठी दुबईचं विमानाचं तिकीट काढायला गेलो होतो? ” वज्रने विचारलं.
“ तिकडे जायचा प्लान आहे?” –सांझी.
“ तुला काय देणं घेणं आहे मी कुठं जावं याच्याशी? तुला तिजोरी उघडून हव्ये आणि मी ती देईन.” वज्र म्हणाला.
“ द्यावीच लागेल तुला.” सांझी म्हणाली आणि सावकाश चालत आपल्या बंगल्यात गेली.
सांझीला डबल क्रॉस करून सगळी रक्कम वज्र घेऊन जाणार होता.मनात आणलं तर या रकमेतून पलाशच्या या धाब्या सारखा एखादा धाबा सुद्धा तो खरेदी करू शकला असता, लग्न करून ऐषारामी आयुष्य जगू शकला असता.
वज्रने थोडा वेळ तिथेच बसून काढला.अजून एकच दिवस आणि पुन्हा कधीच इथं येणं होणार नाही. त्याच्या मनात आलं. त्याला ही जागा आवडायला लागली होती.एक प्रकारची अनोखी ओढ, प्रेम त्याला वाटायला लागलं होतं.जागे बद्दल आणि पलाश घोष बद्दल.किती चांगला माणूस होता तो ! आपल्याला देवा सारखा भेटला. आश्रय दिला, प्रेम दिलं पैसे दिले. त्याला एकदम आवंढा आला. त्याचे इथून नेलेले एकूण एक पैसे आपण परत करायचे.त्याने पुन्हा निश्चय केला.
शनिवारी सकाळी सहा वाजताच पलाश घोष रेस्टॉरंट मधून बाहेर आला आणि वज्रला म्हणाला,
“ तू ठीक आहेस ना शीर्ष? मी अंघोळ उरकली की निघतोय. सांझीला बोलू नकोस पण मी दोन वाजायच्या आत परत येईन असं वाटत नाही.मिटिंग लांबू शकतं आणि नंतरचे खाणे पिणे......” हसून वज्रच्या बरगडीला ढोसून पलाश म्हणाला. त्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस वज्रला झालं नाही. सांझीमुळे आपल्याला काय करावं लागतंय! अजून एक तास आणि आपण कायमचं या चांगल्या माणसाच्या आयुष्यातून निघून जाणार हा विचार वज्रला सहन होईना.त्याच्या डोळ्याच्या कडेने पाणी बाहेर आलं तेव्हा तो भानावर आला. पलाश त्याचं आवरायला घरी गेला.जातांना वज्रने स्टेशन वॅगन ने जायचं ठरवलं होतं.त्यात पम्पावरचे डीझेल भरलं, ऑईल चेक केलं. हवा चेक केली. पुढील काही काल पंपावर गाड्या आणि ट्रक येताच राहिले पण आज वज्रने त्यातल्या कोणालाच जेवायला थांबयचा आग्रह केला नाही. सायंकाळी सात वाजायच्या सुमारास पलाश मिटींगला जायला निघाला.अंगात भारी सूट आणि ओठात सिगार. अशा थाटात तो एखादा इंग्रज अधिकारी वाटत होता. सांझीचा निरोप घेण्यासाठी तो गेला. केव्हा एकदा हा जातोय आणि आपण तिजोरी मोकळी करतोय असं वज्रला झालं. प्रत्यक्ष कृती पेक्षा त्याचा विचार जास्त भयावह असतो याचा अनुभव त्याला येत होता.सांझीचा निरोप घेऊन पलाश बाहेर आला आणि आपल्या गाडीत बसायला लागला तेव्हा त्याला जवळ घ्यावं असं वज्रला तीव्रतेनं वाटलं.
“ मी येतो, इथलं सगळं नीट सांभाळ.” हसून पलाश म्हणाला आणि पुन्हा वज्र भावना विवश झाला. या इतक्या चांगल्या माणसाला आपण फसवतोय.
गाडीत बसून धुराळा उडवत पलाश निघून गेला. वज्र गाडी दृष्टीआड होई पर्यंत थांबला आणि नंतर बंगल्याकडे निघाला. सांझी आधीच तिथे होती.
“ कुठे आहे तिजोरी?” वज्रने विचारलं. ती त्याला तिजोरीच्या खोलीत घेऊन गेली.
“ ठीक आहे, तू पंपाजवळ थांब. मला दीड-दोन तास लागतीलच.”
“ एवढा वेळ?” –सांझीने संशयाने विचारलं.
“ मी म्हणालो होतो ना, या तिजोऱ्या उघडायला सोप्या नसतात.”-वज्र म्हणाला.त्याने तिजोरीचे निरीक्षण केलं.त्याला किल्ली नव्हती.म्हणजे फक्त कोड नंबरची जुळणी करून ती उघडत असे.
“ तू रेस्टॉरंट बंद कर म्हणजे सारखं डिस्टर्ब होणार नाही, आणि मला तुझ्या मदतीला यायची गरज भासणार नाही.” वज्र म्हणाला.
“ आधीच केलंय मी.” सांझी म्हणाली.
“ मी गॅरेज मधून हत्यारं घेऊन येतो.” वज्र म्हणाला आणि बाहेर पंप जवळ आला.सांझी सुद्धा त्याच्या बरोबर बाहेर आली.वज्रने टूल बॉक्स बरोबर एक रिकामी बॅग पण उचलली, पैसे नेण्यासाठी ती उपयोगी झाली असती.ती हातात घेऊन तो आत जायला वळणार तोच एक जीप आत आली आणि त्यातून दोन पोलीस खाली उतरले. वज्र आणि सांझी दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. सांझी त्यांच्याकडे वळली पण त्यांनी वज्रला हक मारून बोलावलं. त्याचा नाईलाज झाला. संपलं सगळं.त्याच्या मनात आलं.
“ डिकी उघड, आणि आत स्टेपनी टायर पंक्चर झालाय तो ठीक कर.” एक पोलीस म्हणाला.वज्र आणि सांझी दोघांना हायसं वाटलं.
“ यस सर.करतो.” तो म्हणाला.
“ आणि ते होई पर्यंत आमच्या जेवणाची सोय कर.” दुसरा पोलीस सांझीकडे बघून म्हणाला.
“ जेवण नाहीये तयार. सँडविच करून देऊ का?” तिने विचारलं.
“ चालेल. पटकन कर.”
वज्रने पंक्चर काढून त्यांचे सँडविच खाणे होई पर्यंत आठ दहा झालं. वज्रने ठरवलेल्या वेळेत हा मोठाच अडथळा निर्माण झाला होता. एव्हाना तो कलकत्याच्या दिशेने निघायला हवा होता.आपण आता १२.३० ची ट्रेन गाठू शकणार नाही असंच वज्रला वाटलं.
त्या नंतर गाड्या सतत येताच राहिल्या सगळ्यांनाच जेवायला, खायला हवं होतं. आणि त्यांना ते करावंच लागलं. सगळ आवारे पर्यंत रात्रीचे दहा वाजले.
“ आज हे तिजोरी उघडायचं आपण रद्द करू.”
“ ठरलंय ते करायचंच.” सांझी म्हणाली.
“ नाही. आज नाही.” वज्रने निक्षून सांगितलं.
ती काही बोलली नाही.सावकाश फोन हातात घेतला आणि म्हणाली, “ तिजोरी उघड किंवा नागपूरच्या कारागृहात जा.”
“ तूच म्हणाली होतीस की मला पूर्ण चोवीस तासांचा अवधी देशील तू पळायला.” वज्र म्हणाला.
“ पलाशला उद्या सकाळी आठ वाजे पर्यंत कळणार सुद्धा नाही तू आहेस की नाहीस ते. आणि तिजोरी तर तो आणखी दोन तीन दिवस उघडणार नाही. तुला भरपूर वेळ आहे. उघड तिजोरी.” सांझी म्हणाली.
वज्रने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिने खरंच पोलिसांना बोलावलं असतं. आता त्याला रात्री १२.३० ची गाडी मिळाली नसतीच पण वेष बदलून तो कलकत्यात एक दिवस दडून राहू शकत होता. त्याने बाहेर जाऊन पुन्हा टूल बॉक्स आणली. एक ट्रक डीझेल भरायला आला पण सांझी त्याला अटेंड करायला गेली.वज्र तिजोरी पुढे मांडी घालून बसला.आणि कान तिजोरीला लावून तिजोरीची डायल सावकाश डावी कडून उजवीकडे फिरवायला सुरुवात केली.काही सेकंदात तिजोरीचा पहिला खटका सुटल्याचा आवाज आला.त्यानंतर वज्रने उलट दिशेने पुन्हा डायल फिरवायला सुरुवात केली.काही अवधीत दुसरा खटला सुटला.अशा पद्धतीने सहा खटके त्याने आरामात मोकळे करून तिजोरीचे दार उघडलं.केवळ अकरा मिनिटांचा खेळ! आत मधे शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांची बंडलं नीट रचून ठेवली होती.वज्रने आपल्या हाताने ते बंडले उचलण्यासाठी हात घातला आणि मागच्या बाजूने आवाज आला.
“ काय करतोयस तू हे शीर्ष?”
वज्रने मागे पाहिलं.पलाश घोष उभा होता! त्याचा चेहेरा कठोर झाला होता. वज्र असं काही करेल हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं.दमदार पावलं टाकत तो तिजोरी जवळ बसलेल्या वज्र जवळ आला.वज्र हाताने तिजोरीतील पैसे चोरतानाच पकडला गेला होता.पलाश जवळ येताच अपसुकच वज्र उठून उभा राहिला.
“ विश्वास ठेवा माझ्यावर, मी चोरी करत होतो असं दिसलं असंल तुम्हाला, पण तशी वस्तुस्थिती नाहीये. विश्वास ठेवा प्लीज.”
दारात सांझी आल्याची चाहूल वज्रला लागली.ती पांढरी फाटक पडली होती पण चतुराईने तिने बाजू पलटवली.
“ काय गडबड चालल्ये इथे?” ती म्हणाली, “ अरे ! याने तिजोरी उघडली की काय! मला वाटलंच होतं.एक न एक दिवस हे घडणारच होतं. तुला आधीच सावध केलं होतं मी पलाश! मी किचन मध्ये असतांनाच हा इथे नजर चुकवून आला असणार.” सांझी उद्गारली. तिच्या बोलण्याकडे फार लक्ष दिले नाही पलाशने.तो वज्रला म्हणाला, “ अरे काय करून बसलायस तू? काय खुलासा आहे तुझ्याकडे?”
“ आहे, सगळंच सांगतो मी. मी शीर्ष सहानी नाही.मी खोटं बोललो तुझ्याशी.मी वज्र द्विवेदी आहे.नागपूरच्या जेल मधून दीड महिन्यापूर्वी पाळलेला कैदी. ”
पलाश हताश होऊन खाली बसला.त्याचे हात थरथरत होतं.
“ वाचल होतं मी ते.” पलाश म्हणाला.
“ तुझ्या बायकोने, सांझीने काल माझा फोटो आणि बातमी किराणा मालाच्या कागदी पॅकिंग वर पाहिली आणि तिला मी कोण आहे हे समजलं.मी तिजोरी फोडायच्या गुन्ह्यातच सजा भोगत होतो हे तिला कळलं.आपली घरातली तिजोरी उघडून दे नाहीतर तुझं नाव पोलिसांना कळवेन असा दम तिने मला दिला. ” वज्र म्हणाला.
“ खोटारडा आहेस तू! पलाश, याच्यावर विश्वास ठेऊ नको.स्वत:ला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप करतोय हा.मी पोलिसांना बोलावून घेते. ”सांझी किंचाळून म्हणाली.
“ तू गप्प बस.पोलिसांना बोलवायचं की नाही आणि कधी बोलवायचं हे मी ठरवीन.” पलाश म्हणाला.
ती रागाने असहाय्य होवून थरथरत होती.
“ अजून तुला काही सांगायचं आहे की एवढंच?” पलाशने वज्रला विचारलं.
“ हिलाच ते पैसे हवं होतं.हिला एक ठोसा मारून बेशुद्ध करून मी तिला काही न देता सगळे मीच नेणार होतो. आणि तुला ते सगळे परत करणार होतो, त्या पैशाबरोबर मी तुला उद्देशून चिट्ठी लिहून सगळ कळवणार होतो.” वज्र म्हणाला.
पलाश ने आपल्या धारदार नजरेने त्याच्याकडे पाहिलं.वज्रने सुद्धा ठाम पणे त्याच्या नजरेला नजर दिली.
“ हा खोटं बोलतोय असं तुझं म्हणणं आहे?” त्याने सांझीला विचारलं.
“ अर्थात!”
“ माझ्या डोळ्यात बघून सांग.”
ती ते करू शकली नाही.
“ आत जाऊन झोप ”तो म्हणाला.
“ मी पोलिसांना फोन....” सांझी म्हणाली.त्याने तिला हिसडा दिला आणि बेडरूम कडे ढकललं.तो आता एकदम थकलेला आणि म्हातारा वाटत होता.खांदे पार पडले होतं.
“ माझ्यावर विश्वास बसावा असं कृत्य मी केलंलंच नाही.पण मी केलंला खुलासा अत्यंत प्रामाणिक आहे.मी पुन्हा पकडला जाऊ नये म्हणून मी तिच्या दबावाखाली येऊन हे केलं.”
पलाश थकून बसला.
“ काय नियती आहे साली! ज्या मिटींगला मी जाणार होतो त्या संस्थेच्या अध्यक्षांच्या बायकोला हार्ट अॅटॅक आला म्हणून मिटिंग रद्द झाली आणि मी इथे लवकर आलो. इथे येऊन बघतोय तो माझ्या बायकोच्या कर्तुत्वामुळे मला हार्ट अॅटॅक यायची वेळ आली आहे. ”
“ याचा अर्थ मी जे तुम्हाला सांगितलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवलात!” वज्र आश्चर्याने म्हणाला.
“ माणूस ओळखण्यात मी चुकत नाही वज्र. पण या बाईला ओळखण्यात चुकलो.”
“ मी तुमचे सर्व पैसे परत करणार होतो.ते वाचवण्यासाठी सांझीच्या मनाप्रमाणे वागतोय असं दाखवण्यावाचून पर्याय नव्हता मला.” वज्र म्हणाला.
“ तू इथून जा वज्र. तू इथे सुरक्षित नाहीस.ही बया तुला कधी धोका देईल सांगता येत नाही.”
“ बरोबर.”
“ कुठे जायचंय तुला?”
“ मुंबईत. तिथल्या गर्दीत मी विरून जाईन.कुणाला न समजता. ” वज्र म्हणाला.
“ तुला मी लाखभर रक्कम देतो, काहीतरी धंदा चालू करायला. तू मला मुला सारखी मदत केली आहेस.तू कायम माझ्या स्वरणात राहशील.”
काय बोलावे ते वज्रला कळेना.ज्याच्या घरी चोरी केली आणि पकडले गेलो, तो माणूस आपल्याला पोलिसांच्या ताब्यात न देता एक लाख बक्षीस देत होता.
त्या वेळी वज्रचं लक्ष सांझीकडे गेलं. तिच्या हातात रिव्हॉल्व्हर होतं आणि ते तिने त्या दोघांकडे रोखलं होतं.
(प्रकरण ६ समाप्त. )
कॉमेंट्स करा, मित्र नातलग यांना वाचायला सुचवा