शेतकरी बाईची पावसाची वाट Namrata tryambak pagar द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेतकरी बाईची पावसाची वाट

नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो.राधे राधे..🙏

     मी नम्रता. मी आज तुमच्यासमोर माझ्या अनुभवातील शेतकरी पावसाची किती वाट पाहतो हे स्पष्ट करते आहे...

     आषाढ महिना सुरू झाला परंतु आकाशाकडे पाहिल्यावर एकही ढग दिसेना काय करावे शेतकरी डोक्याला हात लावून बांधावर बसलेला आणि तो म्हणजे माझा बापच होता. मी जवळ गेले व विचारले बाबा असे डोक्याला हात लावून का बसले आहेत बांधावर.. तुम्हाला ऊन नाही लागत का..? बाबा म्हणाले हा प्रश्न तुझ्या आईला विचार.

   मी आई जवळ गेले व आईला विचारले आई तू आणि बाबा असे उदास का दिसतात..?आई म्हणाले काय सांगू बाई तुला या शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याचे जीवन म्हणजे निसर्गावरच अवलंबून निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्यांचा आयुष्याचं सोनू होईल आणि साथ सोडली तर शेतकऱ्यांचे आयुष्य मातीमोल व्हायला वेळ लागत नाही.. अगं आई असं काय आहे ग त्यां निसर्गाच्या हातात..? 

    अगं बाई आषाढ महिना लागला आकाशाकडे पाहिलं तर एकही ढग दिसेना.. हे बैल बघ बांधावर उभे राहून हंबर्डा फोडत आहेत. त्यांना खायला हिरवळ चारा नाही.पाऊसाचा थेंब यायला तयार नाही.हा नांगर इथे आशेने आणुन पडला. पाऊसच नाही तर त्याला कुठे फिरवू . आणि हे बघ आशेने घेतलेले हे बियाण्याचे पॉकेट हे बी पाऊसाने ओल होईल की नाही या वर्षी याची चिंता लागली.

     आई सकाळी उठली की आकाशाकडे बघून हात जोडून भगवंताला विनंती करायची. देवा किती अंत पाहतोस रे...आमच्यासाठी नको निध्यान आमच्या लेकरा बाळांसाठी व या मुक्या जनावरांसाठी तरी तुझा पावसाच्या सरींचा वर्षाव होऊ दे व एकदा ताहानेने व्याकुळ झालेले वृक्ष पशुपक्षी सगळ्यांना तुझ्या अमृताच्या वर्षावात भिजुन नाहु दे...🙏 

    आईची रोजच्या दिवसाची सुरुवात अशी आकाशाकडे बघून आणि भगवंताला विनंती करतच होत होती. तेवढ्यात गल्लीतील बायांचा आवाज आईच्या कानावर आला... बाई या वर्षी पण दुष्काळ आहे की काय सगळीकडे तर दुष्काळाचीच चाहूल लागते आहे. हे शब्द ऐकून आईचे हृदय डगमगून जात होते. परंतु तशीच हिम्मत धरून आई चटणी भाकर रुमालात बांधून आई शेताच्या रस्त्याने निघाले.. आईला येताना बघून बैलांनी हंबर्डा फोडला. आई इकडे तिकडे बघू लागले मालक दिसत नाही. बैलं हंबर्डा फोडत आहेत काय झालं असेल..? आई पटपट पाऊल टाकत शेताच्या रस्त्याने चालू लागले जवळ गेल्यावर कळाले की बैलांना अजून पाणी पाजले नाही. इकडं तिकडं पाहतेस तर मालकही दिसत नाही. कुठे गेले असणार आई विहीरी जवळ गेले. विहिरीत पाहिलं तर मालक विहिरीत उतरून मध्यभागी साठलेले पाणी एका बादलीत प्लॅस्टिकच्या डब्याने भरत होते. आई म्हणाली हे काय हो आता मालक म्हणाले अगं आलीस का तू? तुझीच वाट पाहत होतो हे बघ बैलांना पाजायला पाणीच नाही मोटर चालू केली तर पाणी येईना म्हणून मी खालून बादली भरून देतो तू वरती खेचून त्यांना तेवढं पाणी पाज..

    बाबांनी खालून विहिरीतून बादली भरून द्यावी व आईने वरती ओढून ते पाणी बैलांना पाजावे.बैलांना पाणी पाजल्यानंतर बाबा वरती आले बाबा डोक्याला हात लावून बसले किती दिवस असे दुष्काळाचे काढावे लागतील आता तरी पावसानं वर्षाव केला पाहिजे. पेरणी नाहीच झाली तरी चालेल निदान मुका जरा जनावरांना चारा तरी होईल या आशेने बाबा डोक्याला हात लावून आकाशाकडे पाहत होते.

    आई बाबांना हिम्मत देत म्हणाली.. मालक तुम्ही काही चिंता करू नका त्याच्या हातात सर्व आहे त्याने चोच घडली म्हणजे त्या चोचीसाठी दाण्याची निर्मिती ही तोच करणार आहे. असे म्हणत आई एका लिंबाच्या झाडाजवळ गेली व लिंबाच्या झाडाचे फांद्या मोडून बैलांच्या समोर टाकू लागली व त्या कडुलिंबाची पानं बैल आवडीने खाऊ लागली..

   आई त्या बैलांच्या पुढे त्या कडुलिंबाच्या फांद्या मोडून टाकताना भगवंताला तिच्या साध्या गोळ्या शब्दातून विनंती करत होती...

   "येरे येरे पावसा येरे येरे पावसा...शेतकरी राजा वाट पाहतो...ll

  कुठे गेले सरकार का त्या नाही कळेना... रडतो हा बळीराजा त्याचे डोळे कापूसेना...ll

   कारे गरीबाचा अंत पाहतो... शेतकरी राजा वाट पाहतो...ll

   येरे येरे पावसा.. येरे येरे पावसा... शेतकरी राजा वाट पाहतो...ll 

     माझी आई डोळ्यात अश्रू घेऊन जणू ही सरकारला आणि भगवंताला विनंतीच करत होती. आणि खरंच भगवंताच्या हातात सर्व काही आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की

"वृक्षाचिए पान हलेजाची l सत्ता कोण बोलविता हरी विन ll

   आणि खरंच भगवंताने जणू माझ्या आईची हाक ऐकलीच असावी आणि पाहतोच तर काय आकाशातून एक थेंब जमिनीवर पडला. आकाशाकडे पाहिलं तर चहुबाजूने काळीशार ढग दाटून डोक्यावर जमा होत होती.आईच्या व बाबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू ओघळत होते. आणि तेवढ्यातच जोरदार वारा सुटला व पावसाच्या सरी जोरजोराने त्या ओसाड नांगरलेल्या जमिनीच्या ढेकळांमध्ये येऊन पडु लागल्या.🌧️💧

   एका क्षणातच सर्व वातावरण बदलले निसर्गने पावसाची हजेरी लावल्यामुळे आमची बैल तर पाठीवर शेप टाकून नाचू लागले आई-बाबा पावसाकडे पाहू लागले आम्ही एका लिंबाच्या झाडाखाली प्लास्टिकची घोंगडी पांघरून बसलो होतो. पावसाच्या धारा जशा काळ्या आईच्या कुशीत शिरल्या तसा निसर्गात एक वेगळा सुगंध निर्माण झाला मी तर म्हणते पहिल्या पावसाच्या सरी पडल्यावर जो मातीचा सुगंध येतो तो जगातील कोणत्याच परफ्युम मध्ये नसेल...

    सगळीकडे आनंदी आनंदाचे वातावरण पसरले झाडांवरील पक्षांचा चिवचिवाट सुरू झाला.. वृक्ष आनंदाने डोलु लागले.. वेली आनंदाने बहरू लागले. जनु काही सगळेच आनंद साजरा करतं होते.. व प्रत्येक स्त्री व शेतकरी ज्या पावसाच्या सरींची वाट पाहत होते तो पाऊस आल्यानंतर बी बियाणे व खत खाद्य घेऊन शेताच्या बांधावर आनंदाने जाऊ लागले.

    हे सर्व दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते.मी भगवंताला हात जोडले व विनंती केली हे देवा पांडुरंगा या शेतकऱ्याला सदैव निसर्गाची साथ लाभु दे..🙏 व हा देश सदैव कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाऊ दे..🙏 या धरती वरील प्रत्येक जीवजंतू प्राणी पक्षी सगळ्यांचा सांभाळ करणारा तूच आहेस.. जसे आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद लहरी झळकत आहेत अशा या आनंदाच्या लहरी सदैव माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर असू दे...🙏

   माझ्या बंधू आणि भगिनींनो ही एक काल्पनिक कथा नसून ही एक मी प्रत्यक्ष माझ्या आई-वडिलांसोबत अनुभवलेली वास्तविक जीवनाची व्यथा आहे.जर तुम्हाला या शेतकरी बांधवांच्या जिवनाचा लेख आवडला असेल तर सर्वांनी या लेख ला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद...ll

तुमचीच मैत्रीण...

नम्रता आळंदीकर.