ज्ञानेंद्रियांचा संप Mandar Milind Kulkarni द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ज्ञानेंद्रियांचा संप

झोप लागल्यावर नेहमीप्रमाणे शरीरव्यवस्थेची बैठक सुरु झाली. मनानी त्रास देऊ नये म्हणून त्याला दुसऱ्या खोलीत स्वप्नपट सुरु करून दिला गेला. इकडे सगळी मंडळी आपापल्या जागी बसली. प्रधान मेंदू यायचे होते, दिवसभराच्या कामांनी तेसुद्धा थकून गेले होते.

आज त्वचा, नाक आणि जीभ यांनी एक आवेदन तयार केले होते. प्रधान मेंदू आल्या आल्या त्यांनी त्यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले. त्या मोबाईल, नव्हे स्मार्टफोन नामक वस्तूने नुसता उच्छाद मांडला होता. सगळ्या व्यवस्थेचा खेळखंडोबा करून ठेवला होता. “हा शुध्दपणे भेदभाव आहे!” जीभेने क्षणभरही विचार न करता आपली जीभ उचलली. “अरे, नया है वह...”, डोळे शांतपणाने सगळ्यांना सांगत असतानाच, “क्या नया है वह?”, त्वचा, नाक व जीभ एकसाथ गरजले. 
आधीच डोकेदुखी, पित्ताने व्यथित प्रधान मेंदू म्हणाले, “शांत व्हा सगळे, काय गोंधळ घातलाय हा तुम्ही? सगळेजण आपापली बाजू एक-एक करून मांडा. सगळे मिळून बघू कसा सोडवता येतोय हा प्रश्न ते.” आधीच नम्र असलेले नाक आणखी नम्रपणे म्हणाले, “आपल्या सगळ्यांना माहित आहे की हे एका वाचकाचे शरीर आहे. तेव्हा डोळयांना जास्त अधिकार आहेत. पण आमचे अधिकार का हिरावून घेतले जात आहेत? वाचन करताना माझा उपयोग फक्त चष्मा ठेवायला नाही तर, आई बनवत असलेल्या जेवणाचा खमंग वास तसेच पुस्तकांच्या नव्याकोऱ्या पानांचा सुगंध घ्यायला व्हायचा. पण आता तो मोबाइल पाहण्यासाठी स्क्रीनला टेकू म्हणून माझा वापर करतात. अशाने चपटा होऊन जाईल नं मी एक दिवस! मग कसं?” आपल्या हातातला माइक त्वचेकडे देत नाक खुर्चीवर बसले.

एरवी कोमल असणारी त्वचा आज रागाने लालबुंद झाली होती. तिने आपले म्हणणे मांडायला सुरुवात केली, “ वाचनात तशी माझी काही मोठी भूमिका नाही, पण ते पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकाचा जाणवणारा स्पर्श, कागदाचा पोत, त्याचा मऊपणा, आणि त्या पुस्तकाची येणारी ऊब या गोष्टी पाहून पुस्तकाचा दर्जा ठरवला जायचा. पण आता आम्हाला गुळगुळीत स्पर्शाचं लालूच दाखवून त्या टचस्क्रीनचा गुलाम करून ठेवलंय आणि आमचं काम काय येथे तर नुसती बोटं त्या स्क्रीन वर फिरवायची आणि इकडच्या गोष्टी तिकडे करायच्या? त्याच एका पृष्ठभागावर काही टायपायला आणि पोस्टायला आमची धावपळ होते व जे हाल होतात ते नाही समजणार हो तुम्हाला! नुसतं स्वतःला या स्क्रीन वर आपटून घ्यायचं म्हणजे काय? काही मान-मर्यादा आहेत का नाहीत?” 

त्वचेला आलेलं रडू पाहून डोळेही क्षणभर गहिवरले. पण त्यांनी स्वतःला सावरलं. आतापर्यंत शांत असलेली जीभ मात्र ज्वालामुखी झाली होती. “आता माझं वाचनात काय काम? असं तुम्ही विचारलं पण वाचनात नसलं तरी शरीराला सावध करण्याचं काम मीच करते. जेव्हा वाचन हे जगाचे भान न ठेवता होतं, तेव्हा मीच भुकेची जाणीव करून देते. त्यामुळे जेवताना तरी डोळ्यांना आराम मिळतो. पण आतातर त्या मोबाईल पुढे कुणाचे काहीच चालत नाही. तहान भूक हरपून निरंतर तो फोन पाहणे चालू असते. जर वेळेचे भान न ठेवता अशा प्रकारे फोन वापरला गेला तर शरीर व्यवस्थेचं काय होईल? तेव्हा लवकरात लवकर या फोनवर बंदी घातली गेली पाहिजे. अन्यथा आम्ही संपावर जाऊ!”

“शांतता! शांतता!” प्रधान मेंदू म्हणाले, “असा गोंधळ घालू नका. दुसऱ्या पक्षाला देखील त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊया.” आता डोळ्यांनी आपले म्हणणे मांडायला सुरुवात केली, “सगळ्यांना असंच वाटतंय की हा मोबाईल फक्त डोळ्यांनाच साथ देतोय. पण ही सोबत आम्हालाही त्रासदायक आहे. तुम्हाला का असे वाटते, डोळ्यांना काहीच त्रास नाही होत याचा? मान्य आहे, यात आमच्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. पण जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होते तेव्हा सगळ्या शरीरालाच त्रास होतो. निरंतर त्या मोबाईलकडे पाहत बसल्यावर आम्हीही थकून जातो. आमचं दुखणं वाढत जातं व चष्मा आणि लेन्स यांचा आधार घ्यावा लागतो. पण आम्हाला जास्त त्रास होऊ नये याचीही काळजी घेतली जात आहे की. अनेक सुविधा जसे परिस्थितीजन्य प्रकाश, अक्षरांचा कमी जास्त करता येणारा आकार या शरीराला होणारा त्रास कमी व्हावा म्हणूनच आहे. पण आमचे म्हणणे इतकेच आहे की हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे आणि प्रगत होत आहे. तेव्हा त्याला तेवढा वेळ तर दिला गेलाच पाहिजे. पण या काळात जर मोबाईलचा अतिरेक होणार असेल तर आम्हीही या संपात सहभागी होऊ.”

“आम्ही आत्ता ज्या गोष्टी ऐकल्या त्यांच्यावर जर विचार केला तर दोन्ही पक्ष आपापल्या जागी योग्यच आहेत. पण बदल ही काळाची गरज आहे आणि त्या बदलाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. आम्हाला होणारे फायदे म्हणजे, ऐकणे हा वाचनाचा पैलू आहे हा मुद्दा कधी लक्षातच आला नव्हता पण ध्वनिपुस्तिका (ऑडिओबुक) यांच्या निर्माणाने कधी नव्हे तर आम्हालाही वाचनात महत्त्व मिळालं आहे. पण शेवटी ‘अति तेथे माती’ हेच खरं. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असणारच. जसे चांगले परिणाम आहेत तसेच वाईटही असणारच. पण कुणाला वरचढ होऊ द्यावं हे मनालाच ठरवावं लागेल. त्याच्या निर्णयावर संपाची दिशा ठरवली जाणार आहे. तेव्हा आतापर्यंत भिंतीमागे लपून ऐकणाऱ्या मनाने येथे सभेत आपले म्हणणे मांडावे ही विनंती.” एवढे बोलून कान आसनस्थ झाले.
      
मन धावत धावत आलं आणि हृदयाच्या कुशीत येऊन बसलं. सगळ्यांना वाटेवरचे अश्रूंचे थेंब दिसत होते. मन बोलू लागलं, “तुम्हा सगळ्यांचे म्हणणे मी ऐकले आणि मला तुमची व्यथा लक्षात आली. मी हे कबूल करतो की माझं खूप चुकलं आहे. तुम्ही मला माफ करावं ही अपेक्षा व्यर्थ आहे. कारण मला धडा मिळायला पाहिजे होता आणि तो मिळाला देखील आहे. मी तुम्हाला वचन देतो की, ‘शरीराला त्रास होईल असा कुठलाही रस्ता मी धरणार नाही. षडरिपूंचे अश्व कुठेही उधळू नये याची काळजी घेईन. तसेच स्वतःवर संयम वाढवायचा हळूहळू का होईना प्रयत्न करेन.’ पण माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, हा होऊ घातलेला संप मागे घ्यावा व कामकाज व्यवस्थित सुरू ठेवावे.” 
मनाचे हे मनस्वी बोल ऐकून ज्ञानेंद्रियांनी आपला संप मागे घेतला आणि प्रधान मेंदूचा जीव भांड्यात पडला. मनाच्या समजूतदारपणामुळे आज शरीरव्यवस्थेवर आलेला अनर्थ टळला होता. तेव्हा आजची सभा संपल्याची घोषणा झाली आणि अशा प्रकारे ही पाच ज्ञानेंद्रियांची कथा सुफळ संपूर्ण झाली. जसा पंच ज्ञानेंद्रियांचा शरीरव्यवस्थेवर व मनावर कोप झाला तसा कुणावरही होऊ नये हीच प्रार्थना करूया.