गुढ Mahendra Patil द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुढ

आयुष्यात काही क्षण असे येतात, जे आपल्याला पूर्णपणे हादरवून टाकतात. प्राध्यापकाची नोकरी, शिस्तीचे वातावरण आणि रोजचे रुटीन यामध्ये रमलेल्या माझ्या आयुष्यात नेमकी अशीच एक घटना घडली. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ७ ते १० वर्षांचा अनुभव असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत कसे वागावे, याची मला पुरेशी जाण होती. पण एका हरवलेल्या मोबाईलने माझ्या आयुष्यात जी उलथापालथ केली, ती एखाद्या थरारक अनुभवासारखीच होती.

तो दिवस नेहमीसारखाच एका कामाच्या गडबडीत सुरू होता. लॅबमधील प्रॅक्टिकल संपल्यानंतर सर्व विद्यार्थी निघून गेले होते आणि मी माझ्या केबिनमध्ये फाइल्स तपासण्यात मग्न होतो. तेवढ्यात आमचा एक हुशार विद्यार्थी धावतच आला आणि म्हणाला, "सर, कुणीतरी आपला मोबाईल याच लॅबमध्ये विसरून गेलंय."

मी त्याच्या हातातील फोन घेतला. विचार केला की ज्याचा हा फोन आहे, त्याला तो शोधताना किती मनस्ताप होत असेल! मी तो फोन सुरक्षित माझ्याकडे ठेवला, जेणेकरून कुणाचा कॉल आल्यास तो परत करता येईल. मी बरीच वेळ वाट पाहिली, पण फोन काही आला नाही. थोड्या वेळाने लक्षात आलं की बॅटरी डाऊन झाल्यामुळे फोन 'स्वित्च्ड ऑफ' झाला होता. मग मी माझ्या टेबलवरील चार्जर लावून तो फोन थोडा चार्ज केला. फोन चालू झाल्यावर अवघ्या काही वेळातच त्यावर एक कॉल धडकला. पलीकडून एका मुलीचा अत्यंत घाबरलेला आणि रडवेला आवाज आला, जिचा मोबाईल हरवल्याने प्रचंड टेन्शनमध्ये होती. मी तिला शांत करत म्हणलो, "तू अजिबात काळजी करू नकोस. मी या डिपार्टमेंटमधला फॅकल्टी मेम्बर बोलतोय. तुझा मोबाईल माझ्याकडे सुरक्षित आहे. तू निवांतपणे ये आणि घेऊन जा."

माझा आवाज ऐकताच तिचा जीवनातला ताण नाहीसा झाल्यासारखा वाटला. ती अवघ्या काही मिनिटांत लॅबमध्ये येऊन पोहोचली. जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा ती अतिशय साधी आणि सुरुवातीला थोडी धास्तावलेली वाटली. पण फोन सुरक्षित असल्याचे समजताच तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. ती मनापासून माझे वारंवार आभार मानत फोन घेऊन निघून गेली. त्यानंतर बरेच दिवस ती ना लॅबमध्ये दिसली, ना कॉलेजच्या कोपऱ्यात कुठे भेटली. मीही माझ्या नेहमीच्या व्यापात तो सगळा प्रसंग पूर्णपणे विसरून गेलो.

पण एक दिवस... ती अचानक स्वतःहून माझ्या केबिनमध्ये आली. अत्यंत आदराने तिने माझ्या तब्येतीची आणि रोजच्या कामाची विचारपूस केली. निघताना तिने मला माझा मोबाईल नंबर मागितला. एक शिक्षक म्हणून मीही फारसा विचार न करता माझा नंबर तिला देऊन टाकला. पण मला तेव्हा जराही कल्पना नव्हती की एका साध्या नंबरची देवाणघेवाण माझ्यासाठी एका मानसिक चक्रव्यूहाची सुरुवात ठरणार आहे. ती कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये राहत होती.

नंबर दिल्यानंतर त्या रात्रीपासूनच खऱ्या अर्थाने रहस्याची सुरुवात झाली. रात्रीचे साधारण दहा वाजले असतील, तेव्हा माझ्या व्हॉट्सॲपवर तिचा मेसेज चमकला—"जेवण झालं का सर?" वगैरे. मी औपचारिकता म्हणून उत्तर दिलं. पण हळूहळू तिने गप्पांचा ओघ वाढवला. तिने अचानक तिच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो पाठवत घरातील परिस्थितीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यानंतर तिने माझ्या कुटुंबाबद्दलही विचारणा केली. ती सुसंस्कृत कुटुंबातील वाटत असल्याने मीही एक प्राध्यापक म्हणून सौजन्यपूर्ण रिप्लाय देत होतो. पण काही वेळातच तिने विषय वळवला आणि ती म्हणाली, "सर, मला तुम्हाला ट्रीट द्यायची आहे! एकतर तुम्ही माझा हरवलेला फोन परत केला म्हणून आणि दुसरं म्हणजे... माझे काही बॅक लॉगचे विषय निघाले होते, त्यातून बाहेर पडायला तुम्ही मला नकळत खूप धीर दिलात."

रात्री उशिरा एका विद्यार्थिनीचे असे मेसेज करणे मला योग्य वाटले नाही. मी विषय टाळत म्हणलो, "नको, मला आता खूप काम आहे. उद्या माझ्या मुलाच्या शाळेत काही महत्त्वाचं काम आहे." माझं उत्तर ऐकून ती नक्कीच निराश झाली असावी. पण विद्यार्थ्यांशी रात्रीच्या वेळी अशा वैयक्तिक विषयांवर बोलणं धोक्याचं असतं, याची मला गांभीर्याने जाणीव होती. मी तिला 'गुड नाईट' म्हटलं आणि चॅट बंद केलं. हा सगळा प्रकार मी घरी माझ्या पत्नीसोबतही प्रामाणिकपणे शेअर केला. माझी पत्नी गंभीर होत म्हणाली, "सुमित, अशा लोकांपासून थोडं लांबच राहिलेलं बरं. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी कामापुरताच संबंध ठेवा." तिचं म्हणणं अगदी तंतोतंत खरं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला पोहोचलो, तेव्हा माझ्या केबिनमधील टेबलवर एक महागडी 'कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क'ची चॉकलेट बार आणि एक सुंदर 'थँक्यू'चं ग्रीटिंग कार्ड ठेवलेले मला दिसले! माझ्या आयुष्यात याआधी कधीही कोणत्याही विद्यार्थ्याने मला इतकं महाग गिफ्ट दिलेलं नव्हतं. थोड्याच वेळात तीसुद्धा तिथे आली. तोपर्यंत मला तिचं नावसुद्धा माहीत नव्हतं! मी तिला थांबवून विचारलं, "अरे हो, पण तुझं नाव काय आहे?" तिने गोड हसत उत्तर दिलं, "सर, माझं नाव निशा आहे." मी गंभीर होत तिला कडक शब्दांत म्हणलो, "निशा, बघ... मी हे चॉकलेट आणि कार्ड स्वीकारू शकत नाही. एक कॉलेजचा प्राध्यापक म्हणून मला इथे काही शिस्त आणि मर्यादा पाळाव्या लागतात."

पण ती अजिबात संकोचली नाही. उलट ती अत्यंत निर्धास्तपणे हसली आणि म्हणाली, "ठीक आहे सर, कॉलेजमध्ये नाही स्वीकारत हरकत नाही! मग काय हरकत आहे, आपण बाहेर कुठे तरी भेटूया... पण मला तुम्हाला ट्रीट द्यायचीच आहे!"

तिचा तो हट्टी आग्रह पाहून मी विषय तिथेच संपवला आणि तिला 'ठीक आहे' म्हटलं. पण त्या दिवसानंतर मी निशाला नकळतच जरा जास्तच निरखू लागलो. फक्त एक मोबाईल परत केला म्हणून कोणी इतकं मागं लागत नाही, यामागचं नेमकं कारण काय असावं? हे कोडं मला सोडवायचं होतं. एके दिवशी ती पुन्हा माझ्या केबिनमध्ये आली आणि तिने पुन्हा ट्रीटचा विषय काढला. माझ्या मनातही कमालीचे कुतूहल निर्माण झाले होते. अखेर, मी कॉलेज सुटल्यानंतर त्या ट्रीटसाठी तिच्यासोबत जायचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे कॉलेजपासून ४-५ किलोमीटर अंतरावर असलेल्या 'स्वाद' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरलं. ती रिक्षाने येणार होती, पण मीच तिला माझ्या गाडीसोबत yaयला सांगितलं आणि ती एका पायावर तयार झाली.

ती त्या दिवशी अतिशय छान तयार होऊन आली होती, अंगावर मारलेला सुवासिक परफ्युम वातावरण हलकंफुल्कं करत होता. ती गाडीत माझ्या शेजारी बसली. एक प्राध्यापक म्हणून माझ्या मनात थोडी चलबिचल होतीच. आम्ही रेस्टॉरंटच्या ओपन टेरेसवर जाऊन बसलो. तिने काही सँडविच आणि गोड पदार्थ मागवले, मीही तीच ऑर्डर दिली. ती कमालीची खूश दिसत होती. मला तिच्या मनातलं गुढ उलगडायचं होतं, म्हणून मी गप्पांच्या ओघात माझ्या मुलाचे मल्लखांब प्रॅक्टिस करतानाचे व्हिडिओ तिला दाखवले, जेणेकरून तिला समजावून सांगायला सोपं जाईल की मी विवाहित आहे. तिने ते पाहिले आणि माझ्या मुलाचे भरभरून कौतुक केले. पण आता मला थेट विचारल्याशिवाय चैन पडत नव्हतं. मी सरळ विचारलंच, "निशा, तू माझ्यासाठी एवढी धडपड करते आहेस, यामागचं नेमकं कारण काय?"

माझा थेट प्रश्न ऐकताच ती एकदम शांत झाली. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि विचारले, "सर, मी तुमचा हात माझ्या हातात घेऊ का?" मी क्षणाचाही विलंब न लावता लगेच नकार दिला आणि कडक आवाजात म्हणलो, "नाही, नको. तू फक्त मला सांग की तुला काय सांगायचं आहे." तिचा तोर बदलला आणि तिने तिची खरी कहाणी सांगायला सुरुवात केली. ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होती, पण तिला आधीच दोन वेळेला ड्रॉप लागला होता. तिचे आधी एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, जे तिच्या घरी कळाल्यानंतर आई-वडिलांनी प्रचंड विरोध केला आणि त्या मुलाला मारहाणही केली होती.

मी तिचं सगळं ऐकून घेतल्यावर विचारलं, "हे सगळं ठीक आहे, पण तू हे सगळं माझ्यासोबत का शेअर करते आहेस?" तिचे डोळे पाणावले. ती भावूक होत म्हणाली, "सर, कॉलेजमध्ये मला जवळजवळ मित्र-मैत्रिणीच नाहीत. मला स्वतःला खूप एकटं वाटतं. माझे आई-वडीलसुद्धा आता मला समजून घेत नाहीत. त्या प्रेमप्रकरणामुळे वडील माझ्याशी बोलत नाहीत. या सगळ्यामुळे मी खूप लो फिल करते." शेवटी मी तिला विचारलंच की तिला माझ्याकडून नक्की काय अपेक्षित आहे? ती म्हणाली, "सर, मला तुमच्यासोबत खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह फिलिंग येते. मला फक्त तुमचा एक चांगला मित्र म्हणून स्वीकार करा... आणि मला अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करा." मी तिला समजावून सांगत म्हणलो, "बघ निशा, आपलं डिपार्टमेंट वेगळं आहे, त्यामुळे मी तांत्रिक मदत करू शकणार नाही, पण एक व्यक्ती म्हणून मी तुला धीर देण्याचा नक्की प्रयत्न करेन."

तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान झळकलंच. तिने पुढे होऊन मला शेक हँड केला आणि म्हणाली, "थँक्यू सो मच, सर!" मी तिला सुखरूप हॉस्टेलवर सोडले आणि घरी निघालो.

घरी पोहोचल्यानंतर रात्री साधारण दहा वाजता पुन्हा व्हॉट्सॲपवर तिचा मेसेज चमकला—"सर, तुमच्यासोबत आज खूप छान वाटलं..." वगैरे. मी तो मेसेज वाचतच होतो, तितक्यात तिने तिचा एक अत्यंत आक्षेपार्ह, 'पार्शियली न्यूड' फोटो पाठवला!

तो फोटो पाहताच माझे पाय जणू जमिनीशी सुकले. मी अक्षरशः सुन्न झालो! एका प्राध्यापकाच्या आयुष्यात असा प्रसंग येईल, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माझ्या अंगाचा थरकाप उडाला. मी क्षणाचाही विलंब न लावता ते फोटो मोबाईलमधून तात्काळ डिलीट करून टाकले. माझे हात थरथरत होते. मी तिचा नंबर ब्लॉक करण्यासाठी व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जाणार इतक्यात, नोटिफिकेशन बारमध्ये तिचा आणखी एक मेसेज झळकला: "सॉरी सर! माझ्याकडून चुकीने ते पिक्स शेअर झाले. मला माझा रिझल्ट शेअर करायचा होता..." त्यापाठोपाठ तिने तिचा रिझल्ट असलेला फोटोही पाठवला होता.

मी पूर्णपणे चक्रावून गेलो होतो. तिचं हे वागणं साधं होतं की त्यामागे काहीतरी भयंकर ट्रॅप होता, हे मला समजतच नव्हतं. मनात भीती, संभ्रम आणि धडकी भरवणारे विचार दाटून आले होते. मला तिथे एक सेकंदही थांबायचं नव्हतं. मी कसलाही विचार न करता तिला एका शब्दात 'गुड नाईट' टाईप करून पाठवलं, मोबाईलचा डेटा ताबडतोब बंद केला आणि फोन बाजूला फेकून देऊन मी बाल्कनीतL येऊन उभा राहिलो.

मला अजिबात कळत नव्हतं की यावर काय प्रतिक्रिया द्यावी. आजकालचे विद्यार्थी कोणत्याही थराला जाऊ शकतात, एखादा बनावट आरोप किंवा ट्रॅप रचू शकतात. असा एखादा वाईट प्रसंग अंगाशी आला तर माझ्या करिअरचं, माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या प्रतिमेचं काय होईल, या विचारानेच माझा घसा कोरडा पडला होता. त्या क्षणी मी मनाशी पक्की खूणगाठ बांधली की आता कोणत्याही परिस्थितीत या मुलीपासून चार हात लांबच राहायचं, उद्यापासून तिच्याशी सर्व संबंध तोडायचे. हा सर्व विचार करत मी बेडवर येऊन पडलो, पण मनातील भीती आणि अस्वस्थतेमुळे मला त्या रात्री डोळ्याला डोळा लागणं अशक्य झालं होतं. तास न् तास विचारांच्या चक्रात अडकल्यामुळे मला पहाटेच्या सुमारास कुठेतरी अस्वस्थ झोप लागली...