वाईट काळ - एक शिकवण Yogesh Jadhav द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वाईट काळ - एक शिकवण


वाईट काळ माणसाला सर्व काही शिकवून जातो.

जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर वाईट परिस्थिती येते, तेव्हा नकळत आपण त्याच्यावर हसतो. मनात विचार येतो की, “तो प्रयत्न करत नसेल… त्याच्यामध्येच काहीतरी कमी असेल…” पण जेव्हा तीच परिस्थिती आपल्या आयुष्यात येते, तेव्हा कळतं की परिस्थिती आपल्या विरोधात गेल्यावर सगळं किती कठीण होतं.

आपण सर्व काही करून पाहतो, पण तरीही प्रत्येक ठिकाणी अपयश येतं. एकामागून एक दरवाजे बंद होत जातात. कुठूनही मदतीचा हात मिळत नाही. तेव्हा जाणवतं की, दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसणं किंवा त्याच्या अपयशाची टिंगल करणं किती चुकीचं आहे.

म्हणून कोणाच्याही परिस्थितीवर, त्याच्या अपयशावर कधीही हसू नये किंवा त्याची टिंगल करू नये. कारण आज जी परिस्थिती त्याच्यावर आली आहे, ती उद्या आपल्यावरही येऊ शकते.

वाईट काळात आणखी एक गोष्ट जाणवते—मित्र आणि नातेवाईकही हळूहळू बोलणं कमी करतात, दुर्लक्ष करायला लागतात. कधी कधी आपल्या घरचेही टोमणे मारायला सुरुवात करतात. हळूहळू आपल्याला मिळणारा आदर कमी होतो आणि वारंवार जाणवून दिलं जातं की, “तू काहीच करू शकत नाहीस… तू अपयशी आहेस.”

सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं, जेव्हा आपण ज्यांच्या वाईट काळात ठामपणे त्यांच्या सोबत उभे राहिलो असतो, त्यांच्या अपयशात त्यांना साथ दिलेली असते, त्यांच्या भविष्यासाठी आणि करिअरसाठी स्वतःच्या गोष्टींचाही विचार केलेला नसतो… तेच लोक आपल्या वाईट काळात आपली साथ सोडतात.

मग माणूस हळूहळू एकटा पडायला लागतो.
एकटेपणात विचार वाढतात. मनात प्रश्न निर्माण होतात. “माझंच असं का होतंय?” “मी खरंच काहीच करू शकत नाही का?” आणि नकळत माणूस खचायला लागतो. एकट्यात रडतो, पण बाहेरून मात्र सगळं ठीक असल्यासारखं दाखवतो.

जेव्हा प्रत्येक बाजूने अपयश येत असतं, तेव्हा त्या अपयशातून सावरण्यासाठी कोणीतरी आपल्यासोबत असावं असं वाटतं. कोणीतरी फक्त एवढं म्हणावं—

“काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे.”
यशाच्या काळात सगळे साथ देतात, कौतुक करतात, जवळ येतात. पण खरं तर माणसाला साथ हवी असते ती त्याच्या अपयशाच्या काळात.

या काळात शेवटी एकच आधार उरतो—परमेश्वरावरचा विश्वास.

कधी कधी वाटतं की देवही आपली खडतर परीक्षा घेत आहे. सगळे साथ सोडतील, पण परमेश्वर आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही, असा विश्वास मनात असतो. वेळ लागेल, पण एक दिवस सगळं ठीक होईल, ही आशा माणसाला पुढे चालत राहण्याची ताकद देते.

जीवनात जे काही घडतंय—वाईट असो किंवा चांगलं—ते परमेश्वराची इच्छा समजून स्वीकारायला शिकलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शिकवण असते.

पण या संपूर्ण वाईट काळातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली—

या जगात प्रत्येक वेळी प्रत्येकजण आपल्या सोबत असेलच असं नाही.

काही लोक परिस्थितीनुसार बदलतात. काही लोक फक्त आपल्या यशात सोबत असतात. पण म्हणून आपणही खचून जायचं नाही.

जे घडतंय ते नशिबाचा भाग समजून स्वीकारायचं आणि त्यातून जे सकारात्मक शिकता येईल ते शिकायचं. परिस्थितीवर मात करायची. लोकांना बोलून नाही, तर करून दाखवायचं.

मेहनत दुप्पट करायची. पडल्यावर पुन्हा उठायचं. कितीही वेळ लागला तरी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आणि एक दिवस असं काही करून दाखवायचं की, ज्यांनी आपल्याला कमी लेखलं होतं, त्यांनाही आपल्या कर्तृत्वाची जाणीव व्हावी.

आणि घरचे टोमणे मारत असतील, तर त्यांचाही राग मानू नये. कारण कदाचित त्यांनीही आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. आपल्या आयुष्यात आपण यशस्वी व्हावं, एवढीच त्यांची इच्छा असते. त्यांची बोलण्याची पद्धत चुकीची असू शकते, पण त्यामागची काळजी कदाचित खरी असते.

वाईट काळ कायमचा नसतो.

आज सगळे दरवाजे बंद झाले असतील, पण याचा अर्थ पुढे जाण्याचा मार्गच नाही असा होत नाही. कधी कधी एक दरवाजा बंद होतो, कारण आपल्यासाठी दुसरा मार्ग तयार होत असतो.

म्हणून वाईट काळाला शाप समजू नका.

तो आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला घडवण्यासाठी आलेला काळ असतो.

- योगेश