निषाद पर्व - भाग 4 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निषाद पर्व - भाग 4

निषादपर्व  भाग ४

"सकृत् दर्शनी, पूर्व परिचय नाही अशी धारणा असतानाही मला तुच्छ लेखीत वनचर म्हणून तू संबोधिलेस. पण मागाहून माझ्या शरसंधानाचा प्रत्यय आल्यावर मात्र त्याच वनचराला दांभिकतेने गुरूबंधू म्हणून संबोधिण्याचे तुझे धारिष्ट्य, तुझ्या अंगी मुरलेल्या कुटील राजनीतीला अन् सर्पफणेप्रमाणे केवळ दिखावू अशा तुझ्या विनयी वृत्तीला शोभणारे आहे! इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, आयुष्याच्या उतरणीला लागल्यामुळे, असहाय्य अगतिक झाल्यामुळे तरी मला भेटल्यावर-निदान माझी ओळख पटल्यावर तरी पश्चात्तापाचे दोन कामचलाऊ शब्दही तू उद्‌गारले नाहीस. उलट अंगुष्ठरुपाने जीवन सर्वस्व गमावल्यावरही मी अद्यापि जिवंत आहे, एवढेच नव्हे तर माझे शरसंधान कौशल्यही शाबूत आहे, ते खंडित झाले नाही या बद्दल खदखदणारे वैषम्य... शिष्टाचार म्हणून तरी कृतक आनंद व्यक्त होण्याऐवजी मनीचे वैषम्य तू व्यक्त केलेस."

"अशिष्ट अर्जुना...! केवळ मृत्तिका रूपाने गुरूची स्थापना करून आत्यांतिक श्रद्धेने, आत्मप्रेरणेतून, आत्मबलावर, केवळ धुनर्विद्याच काय स्वयंसाधनेद्वारा कोणतीही साधना करणाऱ्या एकलव्याची उपासना केवळ अगुंष्ठ छेदाने खंडित व्हावी ही शक्यता तरी तू कोणत्या आधाराने गृहित धरलीस? अर्जुना, तुला कदाचित अजूनही ज्ञात नसेल पण गुरूद्रोणांना गुरूदक्षिणा म्हणून मी अंगठा छाटून दिल्यापासून माझ्या सर्व निषाद बांधवांनी तिरकामठ्याला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या स्पर्श करणेही वर्ज्य केले आहे. आता आम्हा निषादांच्या लेखी शरसंधानामध्ये उजव्या हाताचा अंगठा हा त्याज्य अवयव असून निषादांच्या भावी पिढ्याही हा वारसा जतन करतील. अगुंष्ठ छेदासाठी का होईना गुरूकृपेचा लाभ निषादांसारख्या नीच वर्णियांना झाला. हा सुवर्ण क्षण आम्ही निषाद युगानुयुगे हृदयांतरी जपू...!"

एकलव्याच्या सडेतोड आणि परखड कथनाने पार्थ चांगलाच वरमला. एकलव्याच्या अमोघ शरसंधानाचा प्रत्यय आल्यावर विरोचित वृत्तीने त्याचे कौतुक करण्याऐवजी अनावधानाने, तेजोभंग झालेल्या अवस्थेतही मर्मभेदक शब्द मुखावाटे उच्चारिले जाऊन त्याला डिवचण्याचे निंद्य कृत्य आपल्या हातून घडावे यांची खंत पार्थाला वाटली. त्याहीपेक्षा नागरी संस्कार आणि शिष्ट वर्तन यांचा वाराही न लागलेल्या या सामान्य अरण्यवासीने नीतिकोविद असलेल्या, देववाणीचे ऋजू संस्कार झालेल्या आपल्या मुखातून सहजोद्‌गार म्हणून निघालेल्या शब्दांमधूनही आपला हेतू, आपली भावना अचूक ओळखावी याचे आश्चर्य पार्थाला वाटले. एकलव्याच्या शरसंधाना विषयी असंख्य प्रश्न शंका पार्थाच्या मनी उद्भवल्या.

श्रेष्ठ धनुर्धर गुरू द्रोणांनी वर्णिल्याप्रमाणे शरसंधानात अचूकता आणि भेदक सामर्थ्य येण्यासाठी धनुर्विद्येमध्ये अंगुष्ठाचे नियंत्रण अन् वापर आत्यंतिक महत्वपूर्ण! बाणाची दिशा, गती व परिणामकारकता निर्भर असलेले मर्मस्थान म्हणजे अंगुष्ठ!! त्यांचा हा धडा आयुष्यभर मनात जपून आपण भरत खंडातील एकमेव, सर्व श्रेष्ठ धनुर्धर ही उपाधी प्राप्त करून ती सार्थही केली. मत्स्य भेद, किरात रूपधारी शंकरांशी युद्ध असे किती प्रसंग आठवावे... प्रत्येक प्रसंगी प्रतिस्पर्ध्यावर मात करून गुरूद्रोणांच्या कथनाचे यथातथ्य प्रत्यंतरही आपण घेतले. आपल्या शरसंधानाला तर दिव्य अस्त्रांची जोड असायची. खेरीज गांडीव धनुष्य, अक्षय भाता या अमोघ साधनांची जोड असतानाही एकलव्याच्या कौशल्यापुढे ते सारे उणे ठरले. एकलव्याने अंगुष्ठ, अस्त्र, धनुष्य निवड, विशिष्ट पद्धतीनेच कुशल तंत्रज्ञांनी सिद्ध केलेले शर सारे-सारे निरर्थक ठरवित दाखविलेली अद्भूत किमया! आयुष्यभर धनुर्विद्या साधना करूनही आपले कसब एकलव्यापुढे थिटे ठरावे ही बोचरी जाणीव पार्थाच्या मनात ठसठसत राहिली. एकलव्याच्या शरसंधानात निश्चित आपणाला नव्हे तर गुरूद्रोणानांही अगम्य असणारे इंगित रहस्य असलेच पाहिजे या निष्कर्षाप्रत तो आला. अन् तसे असेल तर काहीही करून ते इंगित आपण एकलव्याकडून ज्ञात करुन घ्यावे. हा विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला. या रहस्याचा उपयोग आपणाला होणार नाही. हे आता अटळ सत्यच आहे. तथापि आपल्या वारसांना तरी कुरूंचा दैदिप्यमान वारसा पुढे चालविताना आपल्या सामर्थ्यात खचितच भर घालता येईल असा हेतू पार्थाच्या मनात उद्भूत झाला. अत्यंत लीन होऊन आर्जवी मार्दवयुक्त स्वरात पार्थाने पृच्छा केली.

"एकलव्या...! माझ्या हातून तुझा उपमर्द करण्याचा जो अपराध अजाणतेपणामुळे घडला, त्या बद्दल मी मनःपूर्वक क्षमा मागतो. माझी एकच विनंती आहे. एकलव्या! शरसंधानातील लक्ष्यवेध, शब्दवेध या कौशल्यांबरोबरच त्याहीपेक्षा श्रेष्ठ नारायणास्त्र, पाशुपतअस्त्र, पर्जन्यअस्त्र, अग्न्यास्त्र अशी एकूण एक प्रलयंकारी अस्त्रेही मी साध्य केली होती. या अस्त्रबळावर माझ्या अगणित प्रतिस्पर्थ्यांना मी नामोहरम केले अन् कंठस्नान घालून त्यांचे अस्तित्व शून्यवत ठरविले. पण शरचक्राची जी किमया तू करुन दाखवलीस असे काही अस्त्र माझ्या ऐकिवात नाही. या किमयेमागे काही वेगळे, मला अज्ञात असे अस्त्र वा काही अद्भुत रहस्य असावे अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. सर्व अस्त्रे अन् शरसंधान कौशल्यही पूर्णपणे गमावून या क्षणी मी हतप्रभ झालो आहे. हे तू जाणतोसच. तरीही धनुर्विद्या, धनुर्विद्येतील रहस्ये मला प्राणांहूनही प्रिय आहेत. एकलव्या केवळ जिज्ञासा तृप्ती म्हण वा कुतूहल शमन म्हणून तरी तुझ्या शर संधानामागील रहस्य कोणते आहे? ते तू कोणाकडून कसे साध्य केलेस? एकलव्या...या माझ्या प्रश्नांची सत्य आणि केवळ सत्यच उत्तरे तू द्यावीस अशी माझी विनंती आहे."

पार्थाचे हे कथन सुरू असताना शरचक्रातील मंदगती तीरांच्या जागी नवीन तीर सोडून शरचक्र अखंडित ठेवण्याचे एकलव्याचे कार्य सतर्क सजगतेने सुरू राहिले. पार्थाचे कथन पूर्ण झाल्यावर शरचक्रातून माघारी आलेले तीर उपसून काळजीपूर्वक भात्यात ठेवून एकलव्य बोलू लागला. "अर्जुना, अस्त्रे कोणतीही मला ज्ञात नाहीत. अरे! अस्त्र विद्या जाणण्यासाठी मंत्र शिकले पाहिजेत. अन् मंत्र येण्यासाठी देववाणी गीर्वाण भारती अवगत केली पाहिजे.  (क्रमश: )