निषाद पर्व भाग ८
एकलव्य भूमीवर आसनस्थ झाला. दोन्ही पायांच्या अंगठ्यांनी वेत्र काष्टावर पकड घेऊन त्याने ते जमिनी समांतर स्थिर केले. दोन्ही ओठांमध्ये धरून त्यावर तीर सज्ज केला.मग ओठानीच प्रत्यंचेसह तीरावर घट्ट पकड घेत त्याने प्रत्यंचा ताणली अन् मानेला हिसका दिला.यावेळीथरथरणाऱ्या प्रत्यंचेने सर्प फुत्काराप्रमाणे ध्वनी निर्माण केला. तो ऐकून एखादा बलिष्ट नागराज तर समीप आला नाही ना या भीतीने पार्थ दचकून मागे सरकला. या वेळचा तीर शरचक्रात भूमीलगत रिंगण घेऊ लागला. त्याचा वेग एवढा तीव्र की शरचक्रातील इतर तीरांपूर्वीच त्याचे मंडल पूर्ण होऊ लागले.
यावेळी शरचक्रामधील मंदगती तीर बदलताना एकलव्याने डावा हात, एक हात, एक पाय, यांचा वापर करूनही तीर सोडून दाखविले. आश्चर्याने थक्क झालेल्या अर्जुनाला तो म्हणाला, "अर्जुना, ही काही आश्चर्य करण्यासारखी कसबे नाहीत. कसब असेलच तर अशा विविध प्रकारे तीर सोडता येतात का?हा विचार सुचणे हेच असावे. अर्थात तुम्हा क्षत्रियांना हा विचार तरी का अन् कसा सुचावा? तुम्ही धनुर्विद्या प्राप्त करता तीफक्त प्रतिस्पर्ध्याचा प्राणघात करावयाच्या एकमात्र हेतूनेच! तुमचे ध्येय्यच सीमित असल्यामुळे तुमच्या प्रभुत्वावरही मर्यादा येणे सहजच आहे! अर्जुना अंगुष्ठछेदनाच्या वेदनांनी मला आणखीही एक महत्वाची दृष्टी दिली. शराघाताने होणाऱ्या यातना,विशेषतःलक्ष्याचे मर्मस्थळ विंधल्यावर त्याला होणाऱ्या यातनांची दाहकता किती तीव्र असेलहे सत्य मला प्रथमच आकळले. या विचारांनी माझ्या चित्तवृत्तींमध्ये एवढे मूलगामी परिवर्तन झाले की, अर्जुना अंगुष्ठ छेदानंतर आजपर्यंतच्या माझ्या मृगयेत एकाही जीवाची हत्या दूरच, त्याला साधा ओरखडाही उठू नये याची दक्षता मी घेत आलो आहे."
"अर्जुना, माझ्या नैसर्गिक उर्मीही आता बदललेल्या आहेत. कदाचित तू विश्वासही ठेवणार नाहीस, पण मी मांसाशन पूर्ण वर्ज्य केले असून कंदमुळे, फळे हाच माझा आहार आहे. माझ्या अघोरी साधनेचे व्रताचरणात रुपांतर झाल्यावर माझ्या संवेदना अधिक तीव्र झाल्या. माझे अवधान पटकन केंद्रित होते.अन्प्रायः विचलित होत नाही, याचाही प्रत्यय मला आला. आता अरण्यविहार करताना मृगयेचा शुद्ध सात्विक आनंद मला मिळू शकतो. कसा ते तूप्रत्यक्षच बघ!"असे म्हणत एकलव्याने त्यांच्या माथ्यावर आकाशात उंच भराऱ्या घेणाऱ्या एका गरुडाकडे अंगुलीनिर्देश केला. भात्यातून एक अत्यंत हलका, नाजूक सूचीकाग्र तीर निवडून जवळच्या रानवेलीचा हातभर लांबीचा तुकडा तीराभोवती वेष्टित वेलीचे एक टोक अग्रात खुपसले. तीर सज्ज करुन वेध घेताच 'सुईऽऽक' असा स्वर काढीत कामठ्यावरुन सुटलेला तीर गरुडाच्या दिशेने सरसरत गेला. काही निमिषातच गोलगोल घिरट्या मारीत गरगरत गरुड भूमीवर पडला. त्याच्या दोन्ही पंखाच्या टोकाकडच्या पिसांमध्ये एखाद्या कसबी शिंप्याने शिलाई घ्यावी तद्वत गुंफलेली वेल दिसली. दोन्ही पंख वेलीच्या तुकड्याने एकत्र बद्ध झाल्यामुळे त्याला धड बसताही येईना. गरुड जमिनीवर आल्यानंतर सूचीकाग्र तीर तरंगत येऊन एकलव्यासमोर जमिनीत रुतला.जखडबंद गरुड क्रोधाने चित्कार करीत पंखांचा फडफडाट करायचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिला. थोड्या प्रयत्नानंतर त्याच्या पंखात गुंफलेली वेल सुटली अन् भरारी मारीत तो दृष्टी आड गेला.गरुडाच्या दिशेने विस्मयाने पहाणाऱ्या अर्जुनाला एकलव्य म्हणाला, "तुझे कुतूहल शमन म्हणा,सुप्त हेतूपूर्ती व्हावी असे प्रांजळ कथन कसलाही आडपडदा न ठेवता मी केले आहे. आता माझे कथन सत्यआहे की,सत्याचा आभास निर्माण करणारे असत्य आहे हे मात्र तुझे तुलाच ठरवायला हवे. कारण नेत्र दूषित असले,विचारांमध्ये विखार असला की अवघ्या चराचरातच व्यंग भरले आहे असे वाटू लागते."
"अर्जुना! गुरुच्या एका शब्दासरशी परिणामांची फिकीरही न करता धनुर्विद्येचे मर्मस्थान, चरितार्थाचे एकमेव साधन असलेला अंगठा छेदून देणारा एकलव्य, तू पूर्वी केलेल्या अपमानाचा, अन्यायाचा कोणताही किंतु मनात न ठेवता, ऐन मोक्याच्या क्षणी तुला सहाय्यभूत ठरलेला वनचर एकलव्य, असत्य भाषण करील ही शंकाही घेणे केवळ तुलाच शोभते. कारण आयुष्याचे श्रेय आणि प्रेय म्हणूनजपलेले सत्य कथनाचे दिव्य व्रत क्षुल्लक स्वार्थासाठी मोडणाऱ्या धर्मराजाशी तुझे रक्ताचे नाते आहे. कपट नीतीचा आधार घेऊन प्रतिस्पर्धी असहाय्य निःशस्त्र असता त्याचा प्राणघात करुनही स्वतःला श्रेष्ठ पराक्रमी पुरुष म्हणवून घेण्याची तुझी मानसिकता आहे.अर्जुना, तू अन् धर्मराज दोघांच्या कृत्यामागे कृष्णाचा आग्रही सल्ला असल्याचे गुळगुळीत समर्थनही तू करु नयेस.कारणअंतिम निर्णय अन् कार्यवाही तुम्ही स्वतःच्या बुद्धिनुसारच केलीत. कुणी सांगावे... भगवंताने तुमची कसोटीही घेतली असेल. तुमचे सामान्यत्व सिद्ध करावयाची ती कृष्णनीतीही असेल."
"अर्जुना! माझ्यापुरते पहावयाचे तर सत्य आणि असत्य यातला भेदही मला पुरतेपणी उमगलेला नाही. द्रोणांनी केलेला माझा अव्हेर सत्य की, मी स्वयं प्रेरणनेने शिकावे यासाठी त्यांनी केलेला उपाय हे सत्य? माझाअगुंष्ठ छेद हे सत्य की, अगुंष्ठाशिवाय धनुर्विद्या साधना करण्यासाठी दूर दृष्टीने केलेले दिशा दर्शन हे सत्य? कारण आता वाटणारे असत्य क्षणभरानंतर सुद्धा सत्य ठरू शकते उलट सुवर्ण कांतीने झळाळणारे सत्य याचा मुलामा उडाल्यावर हिणकस असत्य ठरते. म्हणजे आपल्यासमोरआहे ते सत्य की असत्य हे ठरविणे शेवटी प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबवून असते. मला तर त्याही पलिकडे जाऊन वाटते की या भूतलावर शाश्वत स्वरूपाचे सत्यही अन् असत्यही वास करीत नसावे."( क्रमश:)