भाग २
पावसाने शहराला पुन्हा एकदा वेढलं होतं. रस्त्यावर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि गाड्यांच्या हेडलाईट्स ओल्या रस्त्यावर चमकत होत्या. दमनची काळी सुपरबाईक सिग्नलकडे येऊन थांबली. लाल दिवा लागला होता. त्याने ब्रेक दाबला. इंजिनचा आवाज अजूनही मंदपणे घुमत होता. हेल्मेटच्या व्हायझरवर पावसाचे थेंब जमा झाले होते. त्याने ग्लोव्ज घातलेल्या हाताने ते पुसले. आजूबाजूला गाड्यांची गर्दी होती. कोणीतरी घरी जाण्याच्या घाईत, तर कोणीतरी उशिरा निघाल्याच्या वैतागात. दमन मात्र निवांत उभा होता, सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत.
तेवढ्यात त्याची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका कॅबवर गेली. सहज. कसलाही हेतू नसताना. कॅबची काच अर्धी खाली होती. आत एक स्त्री बसली होती. तिच्या एका हातात फोन होता. बहुधा कुणाशीतरी कामाबद्दल बोलत असावी. आवाज बाहेर येत नव्हता, पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत होते. काही क्षण ती समोर बघत काहीतरी बोलली आणि अचानक ती हसली. अगदी मनापासून. नकळत.
दमनची नजर तिच्यावर थांबली. काही सेकंद. फक्त काही सेकंद. पण त्याला जाणवलं... तो तिच्याकडे पाहतोय. ती सुंदर होती का? कदाचित. पण त्याचं लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेलंच नाही. त्याचं लक्ष त्या हसण्याकडे गेलं. त्या सहजतेकडे. त्या निरागस क्षणाकडे.
अचानक मागून हॉर्नचा आवाज घुमला आणि दमन भानावर आला. सिग्नल हिरवा झाला होता. त्याने समोर पाहिलं. पुन्हा एकदा नकळत कॅबकडे नजर वळली. ती अजूनही फोनवर बोलत होती. तिचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं, कारण तिला त्याच्या अस्तित्वाची कल्पनाही नव्हती. कॅब पुढे निघून गेली.
दमनने बाईक पुढे घेतली, पण पुढची काही मिनिटं त्याच्या डोक्यात सतत एकच गोष्ट फिरत राहिली..... ते हसू. तो स्वतःशीच डोकं हलवत हसला.बाईक पुन्हा वेगाने पुढे गेली. पण पावसाच्या त्या संध्याकाळी, गर्दीच्या त्या सिग्नलवर, ते अनोळखी हसू त्याच्या मनात कुठेतरी अडकून मात्र राहिलं.
............
मंगळवार. सकाळचे साडेनऊ वाजले होते. भोसले हाऊसमध्ये नेहमीप्रमाणे हालचाल सुरू होती. नोकर-चाकर आपापल्या कामात व्यस्त होते. डायनिंग टेबलवर बसलेले विक्रम भोसले वर्तमानपत्र चाळत कॉफीचा घोट घेत होते. समोर विद्या भोसले निवांत नाश्ता करत होत्या. आणि घराचा एकुलता एक वारसदार? साहेब अजूनही सोफ्यावर पाय पसरून पडले होते. एका हातात मोबाईल, दुसरा हात डोक्याखाली. समोर टीव्ही सुरू होता, पण त्याचं लक्ष ना टीव्हीकडे होतं ना मोबाईलकडे. विक्रम भोसले यांनी घड्याळाकडे पाहिलं. मग मुलाकडे. आणि एक दीर्घ श्वास घेतला.
"दमन."
"हं?"
मोबाईलवरून नजर न हटवतच उत्तर आलं.
"किती वाजलेत माहिती आहेत?"
"सकाळचे वाजलेत इतकं लक्ष आहे माझं."
विक्रम भोसले यांनी कपाळावर आठ्या आणल्या.
"बारा वाजता मीटिंग आहे."
यावेळी मात्र दमनने मोबाईल बाजूला ठेवला.
"डॅड."
"काय?"
"पुन्हा मीटिंग."
"हो."
"कॅन्सल करा."
"नाही."
"डॅड..."
"मी एकदा सांगितलं नाही म्हणजे ते बदलत नाही."
दमन उठून बसला.
"मी गेलो तर काय होणार?"
"तू शिकशील."
"मी नाही गेलो तर?"
"मी चिडेन."
दमनने गंभीर चेहरा करत मान हलवली.
"तुम्ही फार कठीण पर्याय देता."
विद्या भोसले यांच्या तोंडून हसू फुटलं. विक्रम भोसले यांनी टायची नॉट थोडी सैल करत त्याच्याकडे बघितलं.
"ऐक."
"हं."
"यावेळी बहाणे चालणार नाहीत."
"ठीक आहे."
"वेळेत ये."
"हो डॅड."
उत्तर इतकं सहज आलं की विक्रम भोसले यांना लगेच संशय आला.
"खरंच येशील ना?"
"शंभर टक्के."
"दमन..."
"मी शब्द देतो."
विक्रम भोसले काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग मान हलवली.
"म्हणूनच काळजी वाटते."
"काय?"
"तुझ्या शब्दाची."
विक्रम भोसले त्याच्याकडे बघत होते.
"बारा वाजता."
"हो."
"वेळेत."
"हो."
"दमन."
"हो डॅड."
"मी गंभीर आहे दमन."
"मी पण."
विक्रम भोसले यांनी निराश नजरेने पत्नीकडे पाहिलं.
"हा मुलगा मला एक दिवस हॉस्पिटलमध्ये पोहोचवणार बघ."
"काळजी करू नकात."
विद्या हसत म्हणाल्या.
"तुम्हीही तुमच्या वडिलांना असंच त्रास दिला होता."
"मी इतका नव्हतो देत."
"देत होतात."
विक्रम भोसले काही बोलण्याआधीच विद्या हसायला लागल्या. शेवटी वैतागून त्यांनी ब्रीफकेस उचलली आणि ऑफिससाठी बाहेर पडले.
दार बंद झालं. घरात शांतता पसरली. दमनने घड्याळाकडे पाहिलं. मग मोबाईलकडे. मग पुन्हा घड्याळाकडे. आणि आरामात परत सोफ्यावर रेलला.
"बारा वाजेपर्यंत खूप वेळ आहे."
तो स्वतःशीच म्हणाला.
...
पण... अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मात्र तो अजूनही घरीच होता.
.............
दुपारचे बारा वाजून गेले होते. विक्रम भोसले यांच्या मते दमन उशिरा आला होता. दमनच्या मते मात्र तो अजूनही वेळेतच होता. कंपनीच्या भव्य इमारतीसमोर त्याची काळी सुपरबाईक येऊन थांबली. हेल्मेट काढत तो आत शिरला. रिसेप्शनमधल्या मुलीने त्याला पाहताच ताबडतोब उभं राहत ग्रीट केलं.
"गुड आफ्टरनून, सर."
दमनने फक्त मान हलवली.
कंपनीतले बहुतेक एम्प्लॉयी त्याला ओळखत होते. शेवटी तो मालकाचा मुलगा होता. भविष्यात कंपनीची जबाबदारी त्याच्याकडेच येणार होती. पण त्या गोष्टीत त्याला फारसा रस नव्हता. त्याचं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर होतं. लिफ्टसमोर उभा राहून तो निवांतपणे काहीतरी स्क्रोल करत होता.
काही सेकंदांनी लिफ्टचं दार उघडलं. तो आत शिरला. आत आधीच काही एम्प्लॉयी उभे होते. प्रत्येकजण त्याला ग्रीट करत होता. लिफ्टचं दार बंद होऊ लागलं. आणि तेवढ्यात बाहेरून एक स्त्रीचा आवाज आला.
"होल्ड द लिफ्ट, प्लीज!"
एका कर्मचाऱ्याने लगेच बटण दाबलं. दार पुन्हा उघडलं.
दमनने सहज वर पाहिलं...
आणि क्षणभर तसाच थिजून राहिला.... तीच.
चार दिवसांपूर्वी सिग्नलवर दिसलेली तीच मुलगी.
त्याला सर्वात आधी तिच्या हातातली लॅपटॉप बॅग दिसली. मग ऑफ-व्हाईट शर्ट. काळी ट्राउझर. त्या दिवशी मोकळे असलेले केस आज नीट बांधलेले होते. ती घाईत आत आली.
"थँक यू."
लिफ्ट थांबवणाऱ्या एम्प्लॉयीला हसून म्हणाली.
तो एम्प्लॉयी लगेच हसला.
"मोस्ट वेलकम, मॅम."
तिने मान हलवली.
आणि मग समोर वळून उभी राहिली. दमनपासून अवघ्या एक फुटावर. पण तिची नजर एकदाही त्याच्याकडे वळली नाही. जसं तो तिथे अस्तित्वातच नव्हता.
दमन मात्र तिच्याकडेच पाहत होता.
चार दिवसांपूर्वी सिग्नलवर काही सेकंद दिसलेली मुलगी. आणि आता ती अचानक त्याच्यासमोर उभी होती.
"ही इथे काय करतेय?"
विचार नकळत त्याच्या मनात आला.
लिफ्ट वर जात होती. आत शांतता होती. दमनचं पूर्ण लक्ष त्या अनोळखी मुलीकडे होतं. कधी नव्हे ते मिटींगला आला ह्यासाठी त्याने आत्ता मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटली.
...........
दमन मीटिंग रूमच्या दिशेने चालत होता. पण खरं सांगायचं तर त्याचं लक्ष नव्हतंच. लिफ्टमध्ये दिसलेला चेहरा अजूनही त्याच्या डोक्यात फिरत होता. चार दिवसांपूर्वी सिग्नलवर दिसलेली मुलगी. आणि आता अचानक इथे. तो स्वतःशीच हसला.
"काय योगायोग आहे..."
मिटींग रूमचं दार उघडून तो आत शिरला. आत आधीच बरेच लोक उपस्थित होते. प्रोजेक्टर सुरू होता. स्क्रीनवर काही स्लाईड्स झळकत होत्या. विक्रम भोसले समोरच्या रांगेत बसले होते. दमनने त्यांच्याकडे बघितलं. तेवढ्यात त्याची नजर स्क्रीनसमोर उभ्या असलेल्या व्यक्तीवर गेली. आणि तो जागच्या जागी थांबला.
तीच.
सिग्नलवरची मुलगी
लिफ्टमधली मुलगी...
आत्ता तर दिसली होती दोनच मिनिटांपूर्वी...
पण आता मात्र ती पूर्णपणे वेगळी भासत होती.
नाही...
भासत नव्हती.
वागत होती.
हातात प्रेझेंटर. समोर पंधरा-वीस लोक. पण तिच्या चेहऱ्यावर किंचितही दडपण नव्हतं.
"जर आपण हा मॉडेल वापरला, तर पुढच्या सहा महिन्यांत ऑपरेशनल कॉस्ट जवळपास अठरा टक्क्यांनी कमी होऊ शकते."
तिचा आवाज शांत होता. स्पष्ट होता. आत्मविश्वासाने भरलेला होता.
दमन मागच्या खुर्चीत बसला. पण त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. ती बोलत होती. प्रत्येक मुद्दा मांडत होती.
दमनने नकळत आजूबाजूला पाहिलं. रूममधले सगळे लोक तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते. कोणीही तिच्या बोलण्यात अडथळा आणत नव्हतं. कोणीही तिच्याकडे दुर्लक्ष करत नव्हतं. कारण ती बोलत असताना दुर्लक्ष करणं कठीण होतं.
दमनच्या ओठांवर स्मित उमटलं.
सिग्नलवर त्याला तिचं हसू आवडलं होतं.
लिफ्टमध्ये तिचा अलिप्तपणा.
पण इथे...
इथे काहीतरी वेगळंच होतं.
तो नेहमीच अशा लोकांमध्ये वावरला होता जे स्वतःला मोठं समजायचे. पैसा. पद. सत्ता. पण तिच्यात ते काहीच नव्हतं. तिच्यात आत्मविश्वास होता. आणि त्या आत्मविश्वासाला कुठल्याही दिखाव्याची गरज नव्हती.
"एनी क्वेश्चन्स ?"
तिने प्रेझेंटेशन संपवत विचारलं.
रूममध्ये काही क्षण शांतता पसरली. मग एकामागून एक प्रश्न सुरू झाले. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ती तितक्याच सफाईदारपणे देत होती.
दमन मात्र आता प्रश्न ऐकत नव्हता. तो तिच्याकडे पाहत होता. फक्त एकटक नजर अजिबात न हटवता पाहत होता.
त्याला जाणवलं...
सिग्नलवरचं ते हसू त्याला तिच्याकडे खेचून घेऊन गेलं होतं.
पण तिचं व्यक्तिमत्त्व...
तिच्या व्यक्तिमत्वाने त्याला तिच्यापाशीच थांबवून ठेवलं होतं.
मिटींग संपली. लोक खुर्च्यांवरून उठू लागले. ती फाईल्स गोळा करत होती. दमनची नजर अजूनही तिच्यावरच होती. त्याच्या मनात एकच विचार आला.
"मला हिच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय."
.........
कॉन्फरन्स रूममधून लोक बाहेर पडत होते. कोणी प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होतं, तर कोणी पुढच्या डेडलाईनबद्दल. पण दमनचं लक्ष त्यात नव्हतंच. त्याची नजर दाराकडे होती, जिथून काही क्षणांपूर्वी ती बाहेर गेली होती.
"दमन."
विक्रम भोसले यांचा आवाज आला.
तो भानावर आला.
"हं?"
"मी तुला काहीतरी सांगतोय."
दमनने निर्विकार चेहरा केला.
"खोटं बोलू का खरं?"
विक्रम भोसले यांनी डोळे बारीक करत त्याच्याकडे बघितलं.
"एक शब्दही ऐकलेलं नाही."
विक्रम भोसले यांनी दीर्घ श्वास घेतला आणि डोकं हलवलं.
दमन हसला. मग सहज विचारल्यासारखा म्हणाला,
"डॅड ती कोण होती?"
"कोण?"
"आत्ताच प्रेझेंटेशन देत होती."
विक्रम भोसले काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले.
"स्पृहा वैद्य."
दमनच्या मनात ते नाव पुन्हा उमटलं.
स्पृहा.
"त्या कन्सल्टन्सिची प्रोजेक्ट हेड आहे."
"हम्म..."
दमनने फक्त मान हलवली. पण त्याच्या डोक्यात वेगळंच सुरू होतं.
त्या रात्री...
नेहमीप्रमाणे मित्रांसोबत बसूनही दमनचं लक्ष कुठेच नव्हतं. समोर बीअरचा ग्लास होता, पण तो अर्धा तास तसाच पडून होता.
"भाऊ."
रोहनने हात हलवला.
"पृथ्वीवर परत ये."
दमनने त्याच्याकडे पाहिलं.
"हं?"
"काय झालंय?"
"काही नाही."
"मग गेल्या दहा मिनिटांपासून मोबाईलमध्ये काय शोधतोयस?"
दमन काही बोलला नाही. रोहनने मोबाईल हिसकावून घेतला. आणि मोठ्याने वाचलं.
"स्पृहा वैद्य."
"नाव बहुतेक मुलीचंच आहे."
क्षणभर शांतता.... मग टेबलवर एकच गोंधळ उडाला.
"ओहोऽऽऽ!"
"कोण आहे ही?"
"दमन भोसले मुलीचं नाव सर्च करतोय?"
"आज सूर्य पश्चिमेला उगवला का?"
सगळे हसायला लागले. दमनने वैतागून मोबाईल परत घेतला.
"नाटकं बंद करा."
रोहन अजूनही हसत होता.
"मग सांग."
"कोण आहे?"
दमन काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा ते हसू आलं....सिग्नलवरचं.
मग मीटिंगमधला तिचा आत्मविश्वास. आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारी ती.
ते आठवून तो हसला.
"माहीत नाही."
रोहनने भुवया उंचावल्या.
"माहीत नाही म्हणजे?"
"म्हणजे खरंच माहीत नाही."
दमन खुर्चीत मागे रेलला.
"पण जाणून घ्यायचंय."
टेबलवर पुन्हा काही क्षण शांतता पसरली. मित्रांच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. कारण ते सगळे दमनला ओळखत होते. दमनला कधीच कोणत्या मुलीत इंटरेस्ट नव्हता. कोणी मुलगी जवळ आली तरी तो स्वतः लांब व्हायचा.
पण...
आज त्याच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. रोहनने बीअरचा घोट घेतला.
मग मिश्कीलपणे विचारलं,
"दमन...लेका प्रेमात पडलायस का?"
दमनने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या ओठांवर स्मित उमटलं.
आणि नजरेसमोर पुन्हा एकदा तेच हसू तरळून गेलं.
To be continued......
******************