मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 Likhasa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3

भाग ३

संध्याकाळ झाली होती.

दमन त्याच्या आवडत्या कॅफेमध्ये बसला होता. समोर कॉफीचा मग ठेवलेला होता, पण त्याचं लक्ष वारंवार दाराकडे जात होतं. तो कोणाची तरी वाट पाहत होता.

काही मिनिटांनी रोहन आत आला.

"इतक्या लवकर?" दमनने विचारलं.

रोहन समोरच्या खुर्चीत बसत हसला.

"तुझं नशीब चांगलं आहे."

"मिळाली माहिती?"

दमनच्या आवाजातली अधीरता लपली नव्हती.

"सगळी."

दमन सरळ होऊन बसला.

रोहनने मोबाईल टेबलवर ठेवला.

"स्पृहा वैद्य."

हे नुसतं नाव ऐकताच दमनच्या ओठांचे कोपरे नकळत रुंदावले.

रोहनने ते पाहिलं आणि डोकं हलवलं.

"तुझी केस गंभीर आहे."

दमनने त्याकडे दुर्लक्ष केलं.

"पुढे बोल."

रोहन काही क्षण शांत राहिला.

मग म्हणाला,

"वय तीस."

दमनच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही.

"मग?"

"मग म्हणजे?"

"पुढे."

रोहनने दीर्घ श्वास घेतला.

"लव्ह मॅरेज झालं होतं."

"एक वर्षापूर्वी तिचा नवरा गेला."

क्षणभर...

दमनच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं.

"काय?"

"हो. कॅन्सर."

रोहनचा आवाज आता गंभीर झाला होता.

"लग्नाला चार वर्षं झाली होती. उपचार खूप झाले. पण वाचवता आलं नाही."

काही क्षण दोघंही शांत होते.

दमनची नजर दूरवर जाऊन थांबली.

त्याच्या डोक्यात मीटिंगमधली आत्मविश्वासाने बोलणारी ती स्त्री उभी राहिली.

आणि त्याचवेळी...

सिग्नलवर मनापासून हसणारी तीच मुलगी.

त्या हसण्यामागे एवढं दुःख असेल, याचा त्याने विचारही केला नव्हता.

रोहन पुन्हा बोलू लागला.

"सासू-सासरे आहेत."

"त्यांच्याच बरोबर राहते."

"नोकरी करते."

"आणि..."

तो थोडा थांबला.

"दुसऱ्या लग्नाचा सध्या तरी कोणताही विचार नाही."

दमनने हळूच मान वर केली.

"तिने सांगितलं?"

"ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून कळलं."

पुन्हा शांतता पसरली.

रोहन त्याच्याकडे पाहत होता.

"दमन."

"हं?"

"आता तरी मागे फिर."

दमनने भुवया उंचावल्या.

"का?"

"कारण ही गोष्ट तुझ्या सवयीची नाही."

"ती तीस वर्षांची आहे."

"तुझ्यापेक्षा मोठी आहे."

"ती विडो आहे."

"आणि तिच्या आयुष्यात खूप काही घडलंय."

दमन काही क्षण काहीच बोलला नाही.

मग शांतपणे विचारलं,

"आणखी काही माहिती आहे का?"

रोहनने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं.

"मी काय बोललो ते ऐकलंस ना?"

दमनच्या ओठांवर हसू उमटलं.

"ऐकलं."

"मग?"

तो खुर्चीत मागे रेलला.

नजर खिडकीबाहेरच्या पावसावर स्थिरावत म्हणाला,

"मला तिच्याबद्दल अजून माहिती हवी आहे."

रोहनने कपाळावर हात मारला. कारण त्याला स्पष्ट समजलं होतं...

दमन मागे फिरणार नव्हता.



दुसऱ्या दिवशी सकाळी...

शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या त्या कॉर्पोरेट बिल्डिंगसमोर दमन उभा होता.

नजर प्रवेशद्वारावर.

काही वेळातच एक पांढरी कॅब येऊन थांबली. दार उघडलं. आणि ती उतरली.

क्षणभर तिला पाहिल्यावर...

दमनच्या छातीत एक अनोखी धडधड उठली.

नकळत..... अनपेक्षित.

कितीतरी वेगवान रेसमध्ये त्याने भाग घेतला होता.

ताशी तीनशेच्या वेगाने बाईक चालवली होती.

पण अशी धडधड...

अशी बेचैनी...

असं काही त्याला कधीच जाणवलं नव्हतं.

त्याची नजर तिच्यावर थांबून राहिली.

ती फोनवर बोलत चालली होती.

काहीतरी म्हणाली.

आणि हसली.

दमनच्या ओठांवरही नकळत हसू उमटलं.

जणू तिचं हसणं पाहणं हा त्याच्या दिवसाचा पहिला चांगला क्षण होता.

ती बिल्डिंगमध्ये शिरताना अचानक मागे वळली.

बहुतेक कुणीतरी तिला हाक मारली असावी.

पण त्या क्षणी दमनच्या हृदयाचा एक ठोका नकळत चुकला.

त्याला वाटलं...

ती त्याच्याकडे पाहणार.

ती त्याला पाहणार.

पण तसं झालं नाही.

ती दुसरीकडेच पाहत होती.

दमन स्वतःशीच हसला.

पण त्या क्षणी त्याला एक गोष्ट जाणवली...

तो तिच्याकडे फक्त पाहत नव्हता.

तो तिच्या एका नजरेची वाट पाहत होता.

आणि तिथून त्याची रोजची सकाळ सुरू झाली.



त्या दिवसानंतर दमन रोज सकाळी आठ वाजता उठून तयार असायचा.

पहिल्या दिवशी विद्या भोसले यांना योगायोग वाटला.

दुसऱ्या दिवशी आश्चर्य.

तिसऱ्या दिवशी संशय.

आणि चौथ्या दिवशी खात्री.

कारण दमन भोसले सकाळी साडेआठला तयार होऊन घराबाहेर पडत होता.

तोच दमन...

जो सकाळी दहा वाजण्याआधी उठणं हा मानवी हक्कांचा भंग समजत होता.



एक काळी सुपरबाईक रोज त्याच ठरलेल्या जागी उभी राहत होती.

दमन समोरच्या कॅफेमध्ये बसलेला असायचा.

कॉफी कधी थंड व्हायची त्याला कळायचंही नाही.

कारण त्याचं लक्ष समोरच्या बिल्डिंगवर असायचं.

मग ती यायची.

कधी कॅबमधून.

कधी स्वतःच्या कारमधून.

कधी फोनवर बोलत.

कधी कुणाशी तरी हसत.

आणि दमनचा दिवस सुरू व्हायचा.

आठ दिवसांत त्यांची एकदाही ओळख झाली नव्हती.

एकदाही बोलणं झालं नव्हतं.

एकदाही तिने त्याच्याकडे पाहिलं नव्हतं.

पण तरी...

दमन रोज तिला पाहण्यासाठी तिथे येऊन थांबायचा.

हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं.

तो आता मित्रांच्या ग्रुपमध्ये कमी दिसू लागला.

रात्रीच्या राईड्स कमी झाल्या होत्या.

पार्ट्या कमी झाल्या होत्या.

ड्रिंक्सचे ग्लास अर्धेच राहू लागले होते.

सिगारेट पेटवायचा.

दोन झुरके घ्यायचा.

आणि विझवून टाकायचा.

कारण मन दुसरीकडेच असायचं.

तिच्याकडे.... फक्त तिच्याकडे.

एका रात्री रोहनने शेवटी विचारलंच.

"दमन, तू नक्की करतोयस काय?"

दमन खिडकीत उभा होता.

हातात बीअरची बाटली.

नजर मात्र दूर कुठेतरी.

"माहीत नाही."

"खोटं."

"खरंच."

रोहन त्याच्याजवळ आला.

"तू तिच्या ऑफिससमोर रोज जातोयस."

"हो."

"सकाळी तिची वाट बघतोयस."

"हो."

"संध्याकाळी पुन्हा जातोयस."

"हो."

"आणि अजून तिच्याशी बोललाही नाहीस."

दमन काही क्षण गप्प राहिला.

मग हळूच हसला.

"ती दिसली की दिवस चांगला जातो रे ."

रोहन त्याच्याकडे पाहतच राहिला.

हा तो दमन नव्हता...

ज्याला तो इतकी वर्षं ओळखत होता.

आणि अचानक त्याला दमनचेच शब्द आठवले...

"प्रेम शोधायचं नसतं."

"ते झालं की कळतं."

"आणि ज्या दिवशी होईल..."

"...त्या दिवशी मी माझा राहणार नाही."



रात्री उशीवर डोकं टेकवल्यावरही दमनच्या मनात तिचाच विचार असायचा.

सकाळी उठल्यावर पहिला विचार तिचाच.

आणि दिवसभरात नकळत मनात उमटणारं एकच नाव...

स्पृहा.

कधी भेट झाली नव्हती.

कधी बोलणं झालं नव्हतं.

पण तिची एक झलक पाहण्यासाठी तो रोज वेळेआधी उठत होता.

हे प्रेम नसेल...

तर मग प्रेम नक्की कशाला म्हणतात?

त्या रात्री...

झोपण्यापूर्वी दमनने मोबाईल उघडला.

स्क्रीनवर तिचा फोटो दिसला.

तो बराच वेळ नुसता त्या फोटोकडे पाहत राहिला.

मग हळूच बोटांनी स्क्रीनला स्पर्श केला.

त्याच्या ओठांवर एक हरवलेलं मंद स्मित उमटलं....

आणि त्याने स्वतःशी कबूल केलं

"हो... मी प्रेमात पडलोय तुझ्या." 




घराच्या टेरेसवर दमन एकटाच उभा होता. 

झोप येत नव्हती म्हणून तो टेरेसवर येऊन उभा राहिला.

हातात सिगारेट होती.

पण ती कधीचीच विझली होती.

नजर मात्र आकाशाकडे होती.

खाली शहर झोपेच्या तयारीत होतं.

आणि वर...

त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं.

तो स्वतःशीच हसला.

आठ दिवस.

फक्त आठ दिवस.

आणि त्याच्या आयुष्याची सगळी गणितं बदलली होती.

रात्रीच्या राईड्स.

पार्ट्या.

मित्र.

सगळं तसंच होतं.

पण तरी...

काहीतरी बदललं होतं.

तो बदल म्हणजे ती.

स्पृहा.

दमनने डोळे मिटले.

त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा तरळला.

मग रोहनचे शब्द आठवले.

ती तीस वर्षांची आहे.

ती विडो आहे.

तिच्या आयुष्यात खूप काही घडलंय.

दमन काही क्षण शांत राहिला.

मग स्वतःशीच म्हणाला,

"मग काय?"

वारा त्याच्या चेहऱ्यावर येऊन आदळला.

"त्याने काय बदलतं?"

"तू तीस वर्षांची आहेस..."

"मी पंचवीसचा आहे..."

"म्हणून काय?"

त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं.

"वय मोजता येतं..."

"भावना नाही."

तो रेलिंगला टेकून उभा राहिला.

"तुझ्या आयुष्यात माझ्याआधी कोणीतरी होतं..."

"हे सत्य आहे."

"आणि त्या सत्याचा मी कधीही अपमान करणार नाही."

त्याचा आवाज हळूहळू गंभीर झाला.

"पण एक सत्य माझंही आहे."

"तू पहिली मुलगी आहेस..."

"जिला पाहिल्यावर माझा दिवस बदलतो."

"जिला न पाहिलं तर काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं."

"जिचं हसणं पाहिलं की नकळत मीही हसतो."

"आणि जिला पाहिलं की माझा श्वास अडकतो, हृदय वेगाने धावायला लागतं."

तो स्वतःशीच हसला.

कारण हे सगळं त्याच्यासाठी नवीन होतं.

पूर्णपणे नवीन.

"प्रेम शोधायचं नसतं म्हणायचो ना मी..."

"बहुतेक खरंच झालंय."

आकाशाकडे पाहत त्याने दीर्घ श्वास घेतला.

आणि अगदी हळू आवाजात म्हणाला,

"तू मोठी असशील..."

"तुझा भूतकाळ असेल..."

"पण माझ्या भावना बदलणार नाहीत."

त्याच्या ओठांवर पुन्हा तेच हरवलेलं स्मित उमटलं.

"कारण पहिल्यांदाच..."

"मला मनापासून कुणीतरी हवंय."





To be continued......

                           ******************