भाग ४
ऑफिस सुटायची वेळ झाली होती. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. कॉर्पोरेट बिल्डिंगमधून एम्प्लॉयी एकामागून एक बाहेर पडत होते. कुणी फोनवर बोलत होतं.
कुणी घरी जायच्या घाईत होतं.
आणि समोरच्या बाजूला... काळ्या सुपरबाईकला टेकून दमन उभा होता.
गेल्या आठ दिवसांपासून तो तिला फक्त दूरून पाहत होता.
पण आज...
आज तो तिच्याशी बोलणार होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं. मग बिल्डिंगच्या दरवाजाकडे. आणि तेवढ्यात...
ती बाहेर आली.... स्पृहा
ऑफ-व्हाईट शर्ट.
काळी ट्राउझर.
खांद्यावर लॅपटॉप बॅग.
एका हातात मोबाईल.
ती कुणाशीतरी बोलत चालली होती.
दमनची नजर तिच्यावर स्थिरावली.
आणि त्याच्या छातीत तीच धडधड सुरू झाली.
अनोळखी... नवीन.... पण आता आवडू लागलेली.
त्याने एक दीर्घ श्वास घेतला.... स्वतःलाच धीर दिला.
आणि तिच्या दिशेने चालू लागला.
स्पृहाने फोन ठेवला.
ती पार्किंगच्या दिशेने वळणार इतक्यात...
दमन तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.
स्पृहाची पावलं थांबली. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
पहिल्यांदाच.... खरंच पहिल्यांदाच.
दमनला क्षणभर बाकी सगळं विसरल्यासारखं झालं.
गेल्या आठ दिवसांपासून ज्यांना पाहण्यासाठी तो रोज सकाळी उठत होता...
ते डोळे आज त्याच्याकडे पाहत होते.
"येस ?"
स्पृहाचा शांत आवाज त्याच्या कानावर पडला.
दमन भानावर आला.
"हाय."
स्पृहाने मान हलवली.
"हाय."
पण तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
काही क्षण शांतता होती.
दमनच्या डोक्यात तयार केलेले सगळे डायलॉग गायब झाले होते.
तो स्वतःवरच वैतागला.
रेसच्या ट्रॅकवर कधी घाबरत नाही...
आणि इथे दोन शब्द बोलताना जीव अडकतोय.
स्पृहाने पुन्हा विचारलं.
"काही काम होतं का?"
"हो."
"काय?"
"मला तुमच्याशी बोलायचं होतं."
दमनने पटकन उत्तर दिलं.
स्पृहाच्या भुवया किंचित उंचावल्या.
"माझ्याशी?"
"हो."
"का?"
आता मात्र दमन अडकला. कारण खरं उत्तर सांगता येणार नव्हतं.
"मी तूझ्या प्रेमात पडलोय."
हे पहिल्याच भेटीत सांगितलं असतं तर ती कदाचित तिथून निघूनच गेली असती.
त्याने काही क्षण विचार केल्यासारखं केलं. मग म्हणाला,
"तुमचं मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन पाहिलं होतं."
"इम्प्रेसिव्ह होतं."
स्पृहाच्या चेहऱ्यावर कोणताही विशेष भाव उमटला नाही.
"थँक यू."
ती इतकंच म्हणाली.
दमनला जाणवलं... ही बाकी मुलींसारखी नाही. तिला कौतुकाची सवय आहे.
आणि ती त्याने प्रभावित होणार नाही.
"कॉफी?"
त्याच्या तोंडून अचानक बाहेर पडलं. स्पृहाने त्याच्याकडे पाहिलं.
"नो."
एकच शब्द.
पण दमनने हार मानली नाही.
"पाच मिनिटं?"
"नो."
"उद्या?"
"नो."
आता मात्र स्पृहाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
बहुधा तिला हा मुलगा गंमत वाटत असावा.
ती म्हणाली,
"मिस्टर..."
"दमन."
"मिस्टर दमन."
ती शांतपणे म्हणाली,
"आपली ओळख दोन मिनिटांपूर्वी झाली आहे."
"आणि मला अनोळखी लोकांसोबत कॉफी प्यायची सवय नाही. आणि आवडतही नाही."
दमन तिच्याकडे पाहत राहिला. स्पृहाने घड्याळाकडे पाहिलं.
मग म्हणाली,
"मला उशीर होतोय."
"हॅव अ गुड इव्हनिंग."
आणि ती त्याच्या बाजूने निघून गेली. दमन तिथेच उभा राहिला.
त्याच्या हातात काहीच आलं नव्हतं.
नंबर नाही.
कॉफी नाही.
ओळख नाही.
काहीच नाही.
पण तरीही ...
त्याच्या ओठांवर हसू उमटलं.
कारण आज पहिल्यांदा तिने त्याच्याकडे पाहिलं होतं.
पहिल्यांदा त्याच्याशी बोलली होती.
आणि तिच्या त्या शांत, संयमी, अलिप्त स्वभावाने...
तो तिच्या आणखी प्रेमात पडला होता.
दमनने खिशात हात टाकला. आकाशाकडे पाहिलं. आणि स्वतःशीच हसत म्हणाला ,
"कठीण आहेस तू , स्पृहा..."
"पण मला सोपं काही आवडतही नाही."
"विचित्र मुलगा आहे..."
स्पृहा मान हलवत हसली. गाडीत बसल्यावर स्पृहाच्या मनात विचार सुरु झाले. तिने पुन्हा खिडकीबाहेर नजर टाकली. तो तिच्यापेक्षा लहान वाटत होता.
कदाचित खूपच लहान. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसत होता... पण त्याचवेळी एक अवखळपणाही. जगाकडे अजूनही थोडं बेफिकिरीने पाहणाऱ्या मुलांसारखा.
स्पृहाने नकळत पुन्हा मान हलवली. तिच्या आयुष्यातून तो टप्पा खूप मागे राहिला होता. ती आता वेगळ्या वळणावर उभी होती. जबाबदाऱ्या, वास्तव आणि अनुभवांनी तिला खूप आधी मोठं केलं होतं.
आणि म्हणूनच...
तिने त्याच्याकडे एका वयाने लहान मुलाकडे पाहावं तसं पाहिलं. फक्त एक अनोळखी मुलगा. त्यापेक्षा जास्त काही नाही. असं स्वतःला सांगत तिने मोबाईल उघडला.
आणि काही क्षणांतच तिचं लक्ष पुन्हा कामात गुंतलं.
तिला कल्पनाही नव्हती...
ज्याला ती आज फक्त एक अनोळखी, वयाने लहान मुलगा समजून विसरून जात होती... तो मुलगा मात्र तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.
रात्री जेवण आटोपलं. सासूबाई आणि सासरे त्यांच्या खोलीत गेले. स्पृहा तिच्या खोलीत आली. तिने दार अलगद बंद केलं. आणि काही क्षण तशीच उभी राहिली.
दिवसभर लोकांमध्ये वावरणारी स्पृहा... या चार भिंतींमध्ये आली की एकदम शांत व्हायची. तिने नजर समोरच्या टेबलवर टाकली. तिथे एक फोटोफ्रेम ठेवलेली होती.
तिच्या नवऱ्याचा फोटो.... तिने हळूहळू ती फ्रेम हातात घेतली. बोटांनी फोटोवरची धूळ हलकीशी पुसली. काही क्षण ती नुसतीच त्या फोटोकडे पाहत राहिली.
डोळ्यांत पाणी नव्हतं. आता रडणं कमी झालं होतं.
पण आठवणी... त्या अजूनही तिथेच होत्या.... ताज्या.
तिने हळूच डोळे मिटले. क्षणभरासाठी भूतकाळ पुन्हा तिच्यासमोर उभा राहिला.
हसणं.
भांडणं.
कॉफी डेट्स.
हॉस्पिटलचे कॉरिडॉर्स.
उपचार.
आशा.
आणि शेवटी...
एक न भरून येणारं रिकामेपण. साहीलच्या... तिच्या नवऱ्याच्या आठवणीने पुन्हा मनाचा एक कोपरा रोजच्यासारखा हळवा झाला. स्पृहाने डोळे उघडले. फोटो परत जागेवर ठेवला. मग खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर हलका पाऊस सुरू होता. आणि तिच्या मनात साहीलच्या आठवणींचा पूर आला होता.
आयुष्य पुढे चाललं होतं.
तीही चालत होती.
हसत होती.
काम करत होती.
जगत होती.
पण मनाचा एक भाग अजूनही भूतकाळाच्या दाराशी उभा होता.
आणि म्हणूनच...
आज ऑफिसबाहेर भेटलेल्या त्या अनोळखी मुलाचा विचार तिच्या मनात क्षणभर आला असला... तरी त्याला तिने फारसं महत्त्व दिलं नव्हतं.
कारण तिच्या आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट पुन्हा येईल...
हा विचारही तिच्या मनात डोकावला नव्हता.
तिला कल्पनाही नव्हती...
की एक मुलगा रोज सकाळी तिची एक झलक पाहण्यासाठी वेळेआधी उठत होता. तिला पाहण्यासाठी रोज तिच्या ऑफिससमोर येऊन थांबत होता.
ऑफिसमधून बाहेर पडताना स्पृहाची नजर नकळत समोरच्या कॅफेकडे गेली.
तो... दमन बाहेर त्याच्या सुपरबाईकला टेकून उभा होता. तिने विशेष लक्ष दिलं नाही.
योगायोग असेल. ती पुढे निघून गेली.
दुसरा दिवस...
पुन्हा संध्याकाळ.... पुन्हा तीच काळी सुपरबाईक.
स्पृहाची नजर क्षणभर त्याच्यावर थांबली.
मग ती स्वतःशीच हसली.
"पुन्हा हा?"
पण पुढच्याच क्षणी तो विचार विसरून ती निघून गेली.
तिसरा दिवस...
ती बिल्डिंगमधून बाहेर पडली तेव्हा दमन फोनवर बोलत उभा होता.
तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
स्पृहाने ते पाहिलं. आणि पहिल्यांदाच तिच्या मनात प्रश्न आला.
"हा खरंच योगायोग आहे का?"
चौथा दिवस...
सकाळी ऑफिसमध्ये जाताना...
समोरच्या कॅफेमध्ये बसलेला तो पुन्हा दिसला.
स्पृहाची पावलं क्षणभर हळू झाली.
कारण यावेळी तो संध्याकाळी नव्हे... तर सकाळीही तिथे होता.
तिने घड्याळाकडे पाहिलं.
साडेनऊ.
"याला काही काम नसतं का?"
मनातल्या मनात ती पुटपुटली.
पाचवा दिवस...
संध्याकाळी ती बाहेर पडली.
दमन नेहमीप्रमाणे तिथेच होता. पण यावेळीही त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही. दूरून फक्त हात हलवला आणि स्माईल केलं ओळखीचं.
स्पृहानेही मान डोलावली. आणि पुढे निघून गेली.
पण कारमध्ये बसल्यावर नकळत तिची नजर आरशातून मागे गेली.
तो अजूनही तिथेच उभा होता. तिची कार दिसेनाशी होईपर्यंत बघत थांबला होता.
स्पृहाच्या भुवया किंचित जुळल्या. आता हा योगायोग नव्हता.
हे स्पष्ट होत होतं.
आणि मग...
सहाव्या दिवशी संध्याकाळी
दमन तिच्याशी बोलायला आला. त्याने तिला पाहताच हात हलवला.
"हाय."
स्पृहाने मान हलवली.
"हाय."
दोघं काही क्षण एकत्र चालत राहिले.
दमनने नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात केली.
"आजचा दिवस कसा गेला?"
"छान."
"फक्त छान?"
"हो."
"तुम्ही फार कमी बोलता."
स्पृहाने त्याच्याकडे पाहिलं.
"आणि तुम्ही फार जास्त."
दमन हसला.
"बॅलन्स राहिला पाहिजे."
स्पृहाच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं.
पण पुढच्याच क्षणी ती पुन्हा गंभीर झाली.
दोघे पार्किंगजवळ पोहोचले.
स्पृहा तिच्या कारजवळ थांबली.
दमनही थांबला.
काही क्षण शांतता पसरली.
मग स्पृहाने त्याच्याकडे सरळ पाहिलं.
पहिल्यांदाच.
जणू त्याला वाचण्याचा प्रयत्न करत होती.
"एक प्रश्न विचारू?"
दमनने मान हलवली.
"विचारा."
स्पृहाने हाताची घडी घातली.
"तुम्ही रोज इथे का असता?"
स्पृहाचा आवाज शांत होता. पण प्रश्न सरळ होता.
"म्हणजे?"
"म्हणजे..."
ती काही क्षण थांबली.
"योगायोग एकदा होतो."
"दोनदा होतो."
"पण रोज होत नाही."
दमन काही बोलला नाही.
स्पृहाने त्याच्याकडे पाहतच पुढे विचारलं,
"तुम्हाला माझ्याकडून नक्की काय हवं आहे?"
क्षणभर...
दमनच्या मनात अनेक उत्तरं आली.
मला तुझ्याशी बोलायचं आहे.
मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे.
मला तुझं हसणं पाहायचं आहे.
मला तू हवी आहेस.
पण त्यापैकी एकही उत्तर तो देऊ शकत नव्हता.
अजून तरी नाही.
त्याने तिच्याकडे पाहिलं.
आणि पहिल्यांदाच त्याचा आवाज पूर्णपणे गंभीर झाला.
"खरं सांगू?"
स्पृहाने मान हलवली.
"सांगा."
दमन काही क्षण तिच्या डोळ्यांत पाहत राहिला. मग म्हणाला,
"मलाही अजून पूर्ण उत्तर माहीत नाही."
स्पृहाच्या भुवया किंचित उंचावल्या.
"म्हणजे?"
दमन हलकंसं हसला.
"तुम्हाला पाहिलं..."
"आणि पुन्हा भेटावंसं वाटलं."
"पुन्हा भेटलो..."
"तर पुन्हा बोलावंसं वाटलं."
"आता बोलतोय..."
"तर अजून थोडं बोलावंसं वाटतंय."
तो खांदे उडवत म्हणाला,
"यापेक्षा चांगलं उत्तर सध्या माझ्याकडे नाही."
स्पृहा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.
तिला अपेक्षा होती एखाद्या तयार डायलॉगची.
फ्लर्टिंगची.
किंवा उथळ कौतुकाची.
पण हे उत्तर अनपेक्षित होतं.
कारण ते प्रामाणिक वाटत होतं.
ती काही न बोलता कारचं दार उघडू लागली.
दमनला वाटलं... बहुतेक पुन्हा नकार मिळणार.
पण दार उघडताना स्पृहाने अचानक विचारलं,
"तुम्ही नेहमी असेच असता का?"
दमन गोंधळला.
"कसे?"
स्पृहाच्या ओठांवर स्मित उमटलं.
"विचित्र."
क्षणभर दमन तिच्याकडे पाहत राहिला. मग तोही हसला.
"तुमच्या मते."
"माझ्या मते?"
स्पृहाच्या आवाजात आश्चर्य होतं.
"मी खूप छान आहे."
दमनने हसून सांगितलं.
स्पृहाने नकळत डोकं हलवलं. आणि अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर अगदी मनापासून हसू उमटलं.
"गुड नाईट, मिस्टर दमन."
"गुड नाईट."
कार निघून गेली.
दमन तिथेच उभा राहिला.... नुकतंच बघितलेलं तिचं हसू आठवत.
To be continued.....
******************