भाग २
खोलीचं दार बंद होताच खोलीत शांतता पसरली. श्रीजा दाराजवळच उभी होती. तिची नजर खाली होती. हात अजूनही थरथरत होते. शिवांशने तिच्याकडे पाहिलं.
"बस."
ती बेडच्या एका टोकाला जाऊन बसली. शिवांश टेबलजवळ गेला. जारमधून ग्लासमध्ये पाणी ओतलं. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला.
"हे घे."
श्रीजाने त्याच्या हातातला ग्लास घेतला. पाणी प्यायलं. पण तिच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. तिची अवस्था पाहून शिवांशने तिच्या खांद्यापर्यंत नेलेला हात पुन्हा मागे घेतला. त्या दोघांमध्ये अजूनही एक अनोळखी अंतर अजूनही होतं. तो काही क्षण शांत होता. मग तिच्याकडे बघून म्हणाला,
"श्रीजा.... शांत हो."
"गोष्टी अशा घडल्यात की सगळं लगेच सहज स्वीकारलं जाईल असं नाही."
"आत्ता जे काही खाली घडलं.... ते मनाला लावून घेऊ नकोस."
"हे असं घडलं नसतं तर आश्चर्य वाटलं असतं."
श्रीजाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
"आत्ता तू फक्त आणि फक्त बाळाचा विचार कर."
"मन शांत ठेवावं लागेल."
"प्रत्येक गोष्टीला वेळ हेच सोल्युशन आहे."
तो खिडकीजवळ जात म्हणाला. श्रीजाने अश्रू पुसले. काही वेळ ती काहीच बोलली नाही. मग हळू आवाजात म्हणाली,
"तुम्हाला तुमच्या घरचे बोलताहेत."
"तुम्ही का हे विनाकारण सहन करताय?"
तिचा आवाज कापत होता.
"मी म्हणलं होतं ना...माझं बाळ मी एकटीने सांभाळेन."
शिवांशने मान हलवली.
"श्रीजा... तू हे जे बोलतेयस ते ऐकायला खूप सोपं वाटतं."
तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला.
"पण प्रत्यक्ष आयुष्य इतकं सोपं नसतं."
त्याचा आवाज शांत होता.
"हे सगळं इतकं सहज असतं तर तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय मी घेतलाच नसता."
श्रीजा गप्प बसली.
"जगाचा अनुभव अजून तुला नाही."
"लोक काय बोलतील, कसं वागतील, कोणत्या नजरेने पाहतील...."
त्याने वाक्य अर्धवट सोडलं.
"मी ते सगळं पाहिलंय. एका मुलीसाठी हे सगळं सहन करणं अवघड असतं."
खोलीत काही क्षण शांतता पसरली.
"पण तुमचं लग्न ठरलं होतं....आता काय म्हणतील....?"
तिला वाक्य पूर्ण करता आलं नाही.
शिवांश काही क्षण शांत होता मग म्हणाला,
"माझ्या ठरलेल्या लग्नाचा प्रश्न....."
"तर गेल्या दहा दिवसात ह्या विषयावर माझा पूर्ण विचार करून झालाय."
त्याच्या चेहऱ्यावर बोलताना कोणतेच भाव नव्हते.
श्रीजा काही बोलली नाही. त्याच्या आयुष्यात आपण केवढं मोठं वादळ घेऊन आलोय ह्याची जाणीव तिला होत होती.
शिवांशने एक दीर्घ श्वास घेतला.
"आणि अजून एक सांगायचंय...."
पुढे काही सेकंद थांबून तो शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत होता.
"घरात आणि बाहेर...."
"सगळ्यांसमोर आपल्याला नॉर्मल नवरा बायकोसारखंच वागावं लागेल."
श्रीजा थोडी दचकली.
"का?"
ती काहीतरी बोलणार इतक्यात त्याने तिला थांबवलं.
"कारण मला आता आणखी कॉम्प्लिकेशन्स नकोयत."
त्याने सरळ उत्तर दिलं.
"आधीच खूप काही हाताबाहेर गेलंय."
"लोकांना जेवढं कमी समजवावं लागेल तेवढं बरं."
"बाबांचा राग चुकीचा नाही. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्यांची रिऍक्शन हीच आली असती."
"त्यांना वेळ लागेल समजून घ्यायला."
"तोपर्यंत शक्य तितक्या कमी अडचणी निर्माण होतील ह्याची काळजी घे."
तो वॉर्डरोब उघडत म्हणाला.
"आता जास्त विचार करत बसू नकोस."
"मी काही कपडे आणून ठेवलेत तुझ्यासाठी. हा नाईट ड्रेस घाल. फ्रेश हो. समोर वॉशरूम आहे."
तो तिच्या हातात नाईट ड्रेस देत म्हणाला. श्रीजा चेंज करून फ्रेश होऊन आली.
पुन्हा ती बेडवर अवघडून बसली. शिवांशने तिच्याकडे पाहिलं.
"उद्या घरातले प्रश्न पुन्हा सुरु होतील. ते मी हॅन्डल करेन... पण ऐकून घेण्यासाठी तयार रहा."
"तुझ्या घरी पण उद्या जायचंय."
"तुझ्या आई बाबांना सगळं सांगावं लागेल."
"तिथे जे काही घडेल त्यासाठीही तयार रहावं लागेल."
" आता येणाऱ्या कोणत्याच सिच्युएशन पासून पळता येणार नाही."
तो निर्विकारपणे म्हणाला. श्रीजाच्या चेहऱ्यावर पुन्हा भिती वाढली.
"माझ्या घरच्यांना कळलं...."
"कळणारच आहे."
शिवांश तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता म्हणाला.
"आणि जितक्या लवकर कळेल तितकं चांगलं."
त्याचा आवाज शांत होता.
"पण एक गोष्ट लक्षात ठेव. बाळावर ह्या सगळ्याचा कोणताही इफेक्ट व्हायला नको."
त्याचा आवाज पहिल्यांदाच थोडा कडक झाला.
"आत्तापासून तुला स्वतःपेक्षा जास्त त्याचा विचार करावा लागेल."
"घरच्यांचा राग, नातेवाईकांचे प्रश्न, लोकांची मतं... हे सगळं नंतर."
तो खिडकीतून बाहेर बघत म्हणाला.
"आत्ता प्रायोरिटी एकच.... "
"बाळ."
तो काही क्षण थांबून म्हणाला.
श्रीजाचा हात हळूच पोटावर गेला. त्या जीवाशी जोडलेली प्रत्येक आठवण दिव्यांशपाशी जाऊन थांबत होती. आणि वास्तव मात्र वेगळंच होतं.
कारण दिव्यांश आता फक्त आठवणीत उरला होता.
आणि नियतीने तिला अशा एका नात्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं ज्यासाठी ती अजिबातच तयार नव्हती.
समोर उभा असलेला शिवांश मात्र वेगळाच वाटत होता.
जसं घडलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता.
त्याच्या चेहऱ्यावर ना राग, ना दुःख, ना पश्चाताप होता.
जसं हा सगळा विषय भावना नव्हे तर्काने सोडवायचा प्रश्न होता.
तो फक्त परिस्थिती हाताळत होता.
एक समस्या समोर आली होती....
आणि त्याने इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या समस्येवर उपाय शोधला होता.
म्हणूनच त्याच्या मनात काय चाललंय ह्याचा अंदाज बांधणं अशक्य होतं.
त्याच्या आवाजातून , चेहऱ्यावरून आणि वागण्यातून तो काय गमावून बसला आहे ह्याची एकही झलक दिसत नव्हती.
रात्री साडेनऊच्या सुमारास दारावर टकटक झाली. शिवांशने दार उघडलं. हातात जेवणाची ताटं घेऊन सुषमा उभी होती. शिवांश बाजूला झाला.
"मी जेवण घेऊन आलेय."
सुषमा आत येत शक्य तितक्या नॉर्मल आवाजात म्हणाली. तिने ताटं टेबलवर ठेवली आणि खोलीत नजर फिरवली. श्रीजा बेडच्या एका कोपऱ्यावर बसली होती. तिची अवस्था अजूनही फारशी बदलली नव्हती. चेहरा उतरला होता. डॊळे रडून लाल झाले होते.
"चल जेवून घे आधी."
सुषमा तिच्याजवळ बसत म्हणाली.
"मला खरंच भूक नाही."
श्रीजाने मान हलवली. पुन्हा तिचे डॊळे भरून आले.
सुषमाला तिच्याकडे बघून वाईट वाटलं.
"भूक नाही म्हणून चालणार नाही आता."
सुषमाने मायेने तिच्या हातावर हात ठेवला. तिची नजर नकळत श्रीजाच्या पोटाकडे गेली.
"आता तुझ्याबरोबर अजून एक जीव आहे."
श्रीजाने डॊळे पुसत चेहरा दुसरीकडे वळवला. सुषमाच्या नजरेतून ते सुटलं नाही.
सुषमाने हळूच श्रीजाच्या डोक्यावरून हात फिरवला. श्रीजाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिला काही बोलताच आलं नाही.
सुषमाच्या मनात नकळतच गार्गीचा चेहरा तरळला. आत्ता श्रीजाच्या जागी गार्गी असती तर? ह्या नुसत्या विचारानेच तिच्या काळजाचा थरकाप झाला.
चूक कोणाची? बरोबर कोण?... हा विचार करायची ही वेळ नव्हतीच.
तिच्यासमोर आत्ता एक घाबरलेली, विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेली एक मुलगी बसली आहे एवढंच एका आईचं मन जाणत होतं.
"जेवून घे थोडं."
तिने श्रीजाच्या डोक्यावरून हात फिरवला. श्रीजाला पुन्हा भरून आलं. तिने रडत मान हलवली. सुषमाने तिच्यापुढे ताट केलं. मग तिची नजर शिवांशकडे गेली.
तो खिडकीजवळ उभा राहून बाहेर बघत होता.
"शिव चल तू पण जेवून घे."
सुषमा त्याच्यासाठी आणलेलं ताट हातात घेऊन म्हणाली.
"काकू मला भूक नाही."
शिवांश मागे वळत म्हणाला.
"भूक नाही असं म्हणून कसं चालेल शिव. सकाळी नाश्ता करून निघाल्यानंतर तू काही खाल्लं नसशील."
"रात्र झालीये आता. काही न बोलता इथे बस आणि जेवून घे."
आता तिच्या आवाजात आईची सक्ती होती. शिवांश खुर्चीवर येऊन बसला. तिने त्याच्यासमोर ताट ठेवलं. थोडंसं खाऊन तो उठणार होता पण सुषमाने त्याला बळं अजून थोडं खायला लावलं. काही वेळात दोघांचं जेवण झालं. सुषमाने ताटं आवरली आणि ती खाली जायला निघाली. दारापाशी जाऊन ती पुन्हा थांबली.
"शिव..."
शिवांशने तिच्याकडे बघितलं.
"थोडं उशीरा आमच्या खोलीत ये...."
"बोलायचंय."
शिवांशने मान हलवली. सुषमा खाली निघून गेली. दार बंद झालं आणि खोलीत पुन्हा शांतता पसरली.
शिवांशने श्रीजाकडे बघितलं. मग त्याची नजर घड्याळाकडे गेली. रात्र बरीच झाली होती. शांत आवाजात तो श्रीजाला म्हणाला,
"झोप आता तू. झोप नसेल येत तरी प्रयत्न कर झोपायचा."
श्रीजाने त्याच्याकडे बघितलं. मग तिची नजर बेडकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर संकोच स्पष्ट दिसत होता. शिवांशच्या ते लक्षात आलं. तो काही न बोलता वॉर्डरोबकडे गेला. वरच्या कप्प्यातून त्याने तीन चार उशा काढल्या. बेडच्या मध्यभागी उशांची सरळ रेष करत तो श्रीजाकडे वळला.
"तू एका बाजूला झोप. मी दुसऱ्या बाजूला झोपेन."
"बेड मोठा आहे. आणि मध्ये ह्या उशा आहेतच."
तो सरळ म्हणाला. काही क्षण थांबून तो पुन्हा म्हणाला,
"आई आणि काकू अधूनमधून वर येतात."
"आपण वेगळं झोपतोय असं त्यांना दिसलं तर पुन्हा नवीन प्रश्न उभे राहतील."
"आणि मला सध्या आणखी प्रश्न नकोयत."
श्रीजाने मान हलवली. तिच्या चेहऱ्यावरचा ताण किंचित कमी झाला.
"तुला माझ्यामुळे कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी मी घेईन."
तो निर्विकारपणे म्हणाला. त्याचा आवाज केवळ व्यावहारिक होता.
त्याने दिवा बंद करून नाईटलॅम्प सुरु केला. फक्त नाईटलॅम्पचा मंद प्रकाश खोलीत पसरला. श्रीजा बेडच्या एका टोकाला झोपली. तिच्या आणि शिवांशच्या मध्ये उशांची भिंत होती. पण त्यापेक्षाही मोठं अंतर त्यांच्या मनांमध्ये होतं.
एकाच छताखाली... एकाच बेडवर
एका नात्याने बांधलेले असूनही.... ते दोघे पूर्ण अनोळखी होते.
To be continued.....
*******************