भाग ३
रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. घरात आता शांतता होती. शिवांशने एकदा श्रीजाकडे पाहिलं. दिवसभर ताण सहन करून थकल्याने तिला झोप लागून गेली.
एक क्षण तिच्याकडे बघून त्यालाही वाईट वाटलं. तिचीही स्वप्नं असतील. पण नवं आयुष्य सुरु करताना एक जबाबदारी आणि लादलेलं नातं तिच्या वाट्याला आलं होत. लहानही होती त्यामानाने. पण हे सगळं आणि तिला सांभाळताना त्याला मात्र मनावर दगड ठेऊन कठोर व्हावं लागत होतं. खाली येऊन तो काका काकूच्या खोलीसमोर आला. दार अर्ध लोटलेलं होतं. त्याने टकटक करून दार वाजवलं. आतून महेंद्रचा आवाज आला.
"शिव ये आत."
"बस."
तो समोरच्या खुर्चीवर बसला. काही क्षण तिघांमध्ये शांतता होती. आज इतकं काही घडून गेलं होतं की काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी हेच समजत नव्हतं. शेवटी सुषमानेच शांतता मोडली.
"श्रीजा झोपली का?"
"हो. थकून झोप लागली तिला."
शिवांशने मान हलवत उत्तर दिलं. महेंद्र काही क्षण विचारात पडले. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"शिव परिणाम समोर दिसत असताना काय झालं, कसं झालं हे जाणून घेण्यात आणि त्यावर बोलण्यात आता काहीच अर्थ नाही."
"तुम्ही जे वागलात ते अत्यंत चुकीचं आहे."
"तुझ्यासारखा जबाबदार मुलगा असं वागेल ह्यावर विश्वास ठेवणं अवघड जातंय."
"तुझं लग्न ठरलेलं असताना तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती."
महेंद्रकाकाचा आवाज कठोर नव्हता पण स्पष्ट होता. शिवांश मान खाली घालून ऐकत होता.
"श्रीजाच्या घरी सांगितलं आहे का?"
शिवांशने आता त्यांच्याकडे बघितलं.
"नाही अजून. पण उद्या सकाळी मी तिला घेऊन जाणार आहे."
शिवांशने शांत आवाजात उत्तर दिलं.
"ठीक आहे. पण तुम्ही दोघंच जाणार नाही."
"मी आणि सुषमा येतोय तुमच्याबरोबर."
"तू ह्या घरातला मुलगा आहेस. त्यामुळे जबाबदारी आमचीही आहेच."
"आणि श्रीजा आता ह्या घराचा सदस्य आहे. ह्या घरची सून आहे."
महेंद्रना जे बोलायचं होतं ते शांत आवाजात त्यांनी सांगितलं.
"हो शिव."
सुषमाने पण दुजोरा दिला.
"तिचे आई वडील कसे रिऍक्ट करतील सांगता येत नाही."
"मुलगी आहे त्यांची ती. धक्का बसणं स्वभाविक आहे."
सुषमा काही क्षण थांबली आणि पुढे म्हणाली.
"पण तिच्या ह्या अवस्थेत तिची काळजी घ्यावी लागणार."
"शिव येणाऱ्या जबाबदारीचा तू पूर्ण विचार केलायस ना?"
"आता माघार घेता येणार नाही."
शिवांशचा चेहरा गंभीर झाला.
"हो काकू. मी पूर्ण विचार केलाय."
"हे बाळ हवंय मला."
त्याचा आवाज बोलताना ठाम होता.
"मेधा वंन्स आणि सुरभीच्या घरी बोलावं लागेल आपल्याला. नातं जोडलं जाणार होतं तुझं सुरभीशी. त्यामुळे आपल्याकडूनच त्यांना सांगावं लागेल."
"भावोजींचा राग शांत व्हायला वेळ लागेल. आणि वहिनींची अवस्था बघवत नाहीये.
आपल्याला तिघांनाच बोलावं लागेल."
"दिव्यांशला जाऊन अजून पंधराच दिवस झालेत आणि आता ही अवघड सिच्यूएशन... ह्याचा खूप ताण घेतलाय वहिनींनी."
दिव्यांशचं नाव निघताच तिघांच्याही चेहऱ्यावर वेदनेची कळ उमटली.
"भावोजी रागावले तरी वडील आहेत. वाईट त्यांनाही वाटतंच रे."
"मगाशी बळं मागे लागून त्यांना दोन घास खायला लावले. ताटं घेतली सगळ्यांसाठी तर पुन्हा पुन्हा तुझ्या खोलीकडे बघत होते."
बोलताना सुषमाचा आवाज भरून आला.
"शिव आता जे काही बोलायचंय श्रीजाच्या घरी किंवा नातेवाईकांकडे ते विचार करून आणि शांतपणे बोलावं लागेल. रागाने नाही."
महेंद्रचा आवाज शांत होता.
"श्रीजासमोर तर विशेष काळजी घ्यावी लागेल."
"ती ज्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेत तिला मानसिक ताण येणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल."
सुषमाच्या आवाजात काळजी होती.
शिवांशने मान हलवली. उद्याचा दिवस सोपा नसणार ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास गाडी भोसले यांच्या घरासमोर येऊन थांबली. श्रीजाच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. घराच्या दारात पाऊल टाकतानाच तिच्या छातीत धडधड वाढली. दाराची बेल वाजली. काही क्षणातच सारिका श्रीजाच्या आईने दार उघडलं. दारात श्रीजाला पाहून ती हसली.
"अगं तू तर संध्याकाळी येणार होतीस ना आदितीकडून?"
मात्र पुढच्याच क्षणी तिची नजर श्रीजाच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर गेली.
हसू जागच्या जागी विरलं. तिने गोंधळून शिवांशकडे पाहिलं.
"हे... काय आहे?"
तिच्या आवाजात स्पष्ट धक्का होता. आतून दिनेश श्रीजाचे बाबा बाहेर आले. त्यांच्यामागे सावित्रीबाई आणि दिक्षाही आली. सगळ्यांच्या नजरा श्रीजावर खिळल्या.
घरात काही क्षण भयाण शांतता पसरली.
"आत बसून बोलू या."
महेंद्र पुढे होऊन म्हणाले. सगळेजण हॉलमध्ये जाऊन बसले. मात्र श्रीजा बसण्याचंही धाडस करू शकत नव्हती. ती खाली मान घालून उभीच राहिली.
महेंद्रने सगळं सांगायला सुरुवात केली. त्यांचं बोलणं संपेपर्यंत सगळे शांत होते.
सारिकाच्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतं. दिक्षा अविश्वासाने बहिणीकडे पाहत होती.
आणि दिनेश...
त्यांच्या चेहऱ्यावरचा संताप प्रत्येक क्षणाला वाढत होता. ते उठले.
"श्रीजा!"
त्यांचा आवाज घरभर घुमला.
श्रीजा दचकली.
"हे काय केलं आहेस तू?"
तिची मान आणखी खाली गेली. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता.
पुढच्याच क्षणी दिनेश तिच्याकडे चालत गेले....आणि हात उगारला.
श्रीजाने डोळे घट्ट मिटले. पण हात तिच्यापर्यंत पोहोचला नाही.
मध्ये शिवांश उभा राहिला होता. त्याने त्यांचा हात पकडला.
शिवांश शांत पण ठाम आवाजात म्हणाला,
"ती आता फक्त तुमची मुलगी नाही."
त्यांनी संतापाने त्याच्याकडे पाहिलं.
"बायको आहे ती माझी."
शिवांशचा आवाज किंचितही चढला नव्हता.
"लग्न केलंय आम्ही."
"तिला हात लावायचा नाही."
"बाबा...प्लीज शांत व्हा."
दिक्षा पहिल्यांदाच बोलली. तिच्याही डोळ्यांत पाणी होतं.
सावित्रीबाईंनीही पुढे येत दिनेशच्या खांद्यावर हात ठेवला.
"बस आता."
त्या ठामपणे म्हणाल्या.
"ओरडून जे झालं ते बदलणार आहे का?"
दिनेश बाजूला झाले. पण आता त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं. काही क्षण कुणीच बोललं नाही. सारीका उठली. ती श्रीजाजवळ आली. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हातात घेतलं. आणि थरथरत्या आवाजात म्हणाली,
"एकदाही मला सांगावंसं नाही वाटलं गं?"
श्रीजाच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं.
"मी तुझी आई आहे."
सारिकाचा आवाज भरून आला होता.
"इतके परके झाले होतो का गं आम्ही?"
ते शब्द ऐकताच श्रीजाचा बांध फुटला. ती रडू लागली. पण तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. घरभर फक्त हुंदक्यांचा आवाज पसरला. सावित्रीबाईंनी डोळे पुसले.
त्यांनी श्रीजाकडे पाहिलं.
"जे व्हायचं होतं ते होऊन गेलं."
त्या म्हणाल्या.
"आता प्रश्न चूक कोणाची याचा नाही."
"प्रश्न त्या पोटातल्या जीवाचा आहे."
सावित्रीबाईंनी डॊळे पुसले. त्या श्रीजाजवळ आल्या.
श्रीजाने पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं.
"तू आनंदी आहेस का श्रीजा ?"
तो प्रश्न ऐकून श्रीजाची नजर नकळत शिवांशकडे गेली. श्रीजाने डोळे पुसले. काही क्षण ती शांत राहिली.
"माहीत नाही आजी."
ती हळू आवाजात म्हणाली.
"इतक्या कमी वेळात सगळंच बदललंय."
"पण एक गोष्ट नक्की आहे."
तिची नजर पुन्हा शिवांशकडे गेली.
"आज मी इथे उभी आहे... ती एकटी नाही."
दिनेश, सारिका, दिक्षा सगळे तिच्याकडे पाहत होते.
"जे झालं त्यापासून दूर जाणं शिवांशसाठी खूप सोपं होतं."
पहिल्यांदाच शिवांशच्या चेहऱ्यावर हलकी अस्वस्थता उमटली.
"पण त्यांनी तसं केलं नाही."
श्रीजाचा आवाज कापत होता.
"पण आज जे काही आहे... त्याला मला एकटीला तोंड द्यावं लागत नाहीये."
"त्यांच्या घरातल्या लोकांचा राग त्यांनी माझ्यासाठी सहन केला. पण मला आणि माझ्या बाळाला सुरक्षित भविष्य देण्यासाठी ते उभे आहेत."
श्रीजाचा आवाज थांबला.
दिनेशची नजर शिवांशकडे गेली.
पहिल्यांदाच त्यांनी त्याच्याकडे रागाच्या पलिकडे जाऊन पाहिलं.
सावित्रीबाईंनी श्रीजाला जवळ घेतलं.
"रडणं थांबव आता."
"तुझ्यासाठी नाही... त्या पोटातल्या जीवासाठी."
त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
मग त्या दिनेशकडे वळल्या.
"दिनेश, मुलं चुकली आहेत."
"चूक खूप मोठी आहे."
"आणि बाप म्हणून ती समजून घेणं तुला कठीण जातंय, हेही मला कळतंय."
"तुझा रागही चुकीचा नाही."
"पण त्याने आता परिस्थिती बदलणार आहे का?"
"त्या येणाऱ्या जीवासाठी तरी राग बाजूला ठेव."
त्यांची नजर शिवांशकडे गेली.
"या मुलाला आपल्या मुलीला फसवणं शक्य होतं."
"पण त्याने तसं केलं नाही."
"आजही तो तिच्या पाठीशी उभा आहे."
"कितीतरी मुली अशा वेळी एकट्या पडतात."
"देवाची कृपा समज की आपल्यावर ती वेळ आली नाही."
त्यांचा आवाज भरून आला.
"मी तुझी आई म्हणून सांगते..."
"काही झालं तरी माझ्या नातीला अंतर द्यायचं नाही."
दिनेश काही क्षण शांत बसून राहिले.
"राग गेला असं नाही आई."
त्यांचा आवाज अजूनही जड होता.
"आणि इतक्या लवकर जाणारही नाही."
त्यांनी श्रीजाकडे पाहिलं.
"पण आज तू इथून जाताना आमचं तुझ्याशी नातं संपणार नाही."
श्रीजाच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं. सारिकाने तिला जवळ घेतलं. कित्येक मिनिटं कुणीच बोललं नाही. महेंद्र उठले. त्यांच्यासोबत सुषमाही उभी राहिली.
सारिका पुढे आली. तिचे डोळे अजूनही लाल झाले होते.
"माफ करा."
ती हळू आवाजात म्हणाली.
"तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात..."
"आणि मी साधं चहापाणी सुद्धा विचारलं नाही."
तिचा आवाज भरून आला.
सुषमा पुढे झाली.
"असं काही मनाला लावून घेऊ नका."
तिच्याही डोळ्यांत पाणी होतं.
"आज परिस्थितीच तशी आहे."
सावित्रीबाई शिवांशजवळ आल्या.
"जावई..."
त्यांच्या आवाजात मायेचा ओलावा होता.
"श्रीजाची काळजी घ्या."
त्यांनी बोलताना हात जोडले. त्यांचे डॊळे भरून आले होते.
शिवांशने त्यांचे हात धरून खाली घेतले.
"आजी हात नका जोडू प्लीज. मी घेईन तिची काळजी."
सावित्रीबाईंनी समाधानाने मान डोलावली.
दिक्षा श्रीजाच्या गळ्यात पडली. दिनेशने तिच्या डोक्यावर फक्त हात ठेवला आणि ते बाजूला झाले. सारिकाने सुषमा आणि श्रीजा दोघींनाही हळदकुंकू लावलं....
सगळ्यांचा निरोप घेऊन श्रीजा शिवांशबरोबर निघाली.
To be continued.....
*******************