Aale Bhaktachiya Mana books and stories free download online pdf in Marathi

आले भक्तांचिया मना

आले भक्तांचिया मना ! - चंद्रसेन टिळेकर

कविवर्य कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की,'विश्वाचा आकार केवढा-तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा'!याच चालीवर असं म्हणता येईल की देवाचा अवतार कसा तर, ज्याच्या त्याच्या म्हणजे भक्ताच्या मेंदूच्या कुवती एवढा ! भक्त आक्रस्ताळी असेल तर तो देवाला मंदिरात तसाच उभा करील,म्हणजे त्याच्या हातात तलवार देईल,त्याला कुणाची तरी हत्त्या करताना दाखवील,तेवढ्यावरूनही एखाद्या भक्ताचं समाधान झालं नाही तर देवाच्या हातात नाही तर गळ्यात मुंडकं दाखविल,जेवढं म्हणून देवाला आसूरी दाखवता येईल तेवढं दाखवील,एवढच नव्हे तर इतरांनीही अशाच स्वरूपाच्या देवाला मानावं-भजावं अस अट्टाहास तो करील. जर कुणी सौम्य प्रकृतीच्या सुसंस्कृत भाविकाने देवाच्या स्वरुपाची वेगळी कल्पना केली तर त्या आक्रस्ताळी उग्र भक्ताला ते अजिबात मान्य होणार नाही,इतकंच काय पण आपल्या उग्र प्रकृतीला अनुसरून त्या सुसंस्कृत भक्तावर हल्लाही करील. सॉक्रेटिसची हत्त्या हे त्याचं ढळढळीत उदाहरण आहे सॉक्रेटिस काही देव मानीत नव्हता असं नाही,पण सामान्य कुवतीचे भक्त देवाची जी कल्पना करतात ते त्याला मान्य नव्हते. म्हणूनच तिथल्या निर्बुध्द शास्त्यांनी त्याला विष पाजून मारलं.

सॉक्रेटिसचं उदाहरण फार लांबचं-परदेशातलं झालं. आपण आपल्या देशातलं-आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण घेवूया ना. कोर्टानं पंढरीच्या विठोबाला बडव्यांच्या तावडीतून सोडवलं पण विठोबा भक्तांच्या भांडणात सापडले. भांडण सुरु झालं विठोबाला काय नेसवायचं त्यावरून. काही भक्त-भैरव म्हणत होते विठोबा म्हणजे देवाधिदेव. त्याचा पोशाख-पेहरावही तसाच पाहिजे,म्हणजे जरी-भरतारी! धोतर-बंडी रेशमी-मुलायामी!!तर दुसरे भक्ती-भैरव अडूनच बसले-नव्हे हट्टालाच पेटले. ते म्हणायला लागले,विठोबा हे गोर-गरिबांचे दैवत आहे,तेव्हा त्यांचे धोतर अजिबात भरतारी चालणार नाही तर ते भरताडच पाहिजे. म्हणजे देवाने काय नेसावे,कसे दिसावे हे सर्व भक्तांच्या मतानुसार-त्याच्या आवडीनुसार ठरणार. त्या बाबतीत प्रत्यक्ष देवालाही स्वातंत्र्य नाही. भक्तांचं हे देवावरच आक्रमण केवळ त्याने कसं दिसावं,काय ल्यावं इथंच थांबत नाही तर त्याने काय खावे आणि काय प्यावे हे देखील अनेक वेळेला आमच्या देशात भक्तच ठरवतात. भक्त शुध्द शाकाहारी असेल तर तो देवालाही शाकाहारी करून टाकील अन पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवील, पण तो अट्टल मांसाहारी असेल तर देवाला मटण-मच्छीचा नैवेद्य दाखवायला पुढे-मागे करणार नाही. जेजुरीच्या खंडोबाला गेलं कि खंडोबाला 'वशाट' [ Non-Veg ] चालतं नव्हे आवडतं असं स्वत:च ठरवून भक्त न चुकता बोकड-बकरू कापतात आणि स्वत:च चापतात पण नाव मात्र खंडोबाचं ! तसंच मराठी समाजातल्या काही जातीत लग्नानंतर गोंधळ नावाचा कार्यक्रम आयोजित केला जातो,त्यावेळीही देवाला ‘मटणा’चा नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्रातल्या किती तरी देवळात प्राण्याचा बळी दिल्यावर देवाच्या मूर्ती शेजारी त्या प्राण्याचं मुंडकं ठेवतात,जणू काही भूक लागल्यावर देव यथावकाश कृतज्ञता म्हणून ‘'वदनी कवळ घेता--नाम घ्या भक्ताचे'’ म्हणून ‘घास’ घेईल. मांढरगावच्या काळूबाईच्या आणि कलकत्त्याच्या कालीमातेच्या देवळा समोरून जो पर्यंत रक्ताचे पाट वाहिलेले दिसत नाहीत तो पर्यंत खऱ्या भक्ताला पूजा केल्यासारखे वाटतच नाही.

हे झालं देवाच्या दिसण्याबद्दल अन खाण्यापिण्याबद्दल ! पण देवाला भेटायला कुणी जायचं आणि कुणी जायचं नाही ते देखील देवाच्या हातात नसतं तर ते भक्तच ठरवतात.तुरुंगातल्या कैद्याला भेटायचं असेल तर जेलरची परवानगी घ्यावी लागते तसंच हे काही तरी असतं. काही देवळात स्त्रिया दर्शनाला आलेल्या कट्टर भक्तांना अजिबात चालत नाही, आवडत नाही. [ उदा शिंगणापूरचा शनि-देव, औरंगाबाद जवळचा घृष्णेश्वर, मारुतीची अन कार्तिकेयाची मंदिरं इ इ ] विवेकवादी संत म्हणून मान्य झालेल्या संत तुकोबाच्या जन्मगावी म्हणजे देहूलाही एका मंदिराबाहेर आजही तसा बोर्ड लावलेला आहे.

केरळ मधील एका मंदिरात स्त्रियांना मज्जाव असतो हे माहित असूनही आपण पहारेकऱ्यांची नजर चुकवून दर्शनाला गेलो होतो,असा गौप्यस्फोट एका अभिनेत्रीनं तब्बल दोन वर्षाने केला. सनातन्यांच्या मते हे मोठं पाप घडलं लगेच तिथल्या लोकांनी लाखो रुपये खर्च करून मंदिराचे शुद्धीकरण केले. भक्तांचं खाणं-पिणं अन पेहरावच भक्त देवावर लादतात असं नाही तर आपली दिन:श्चर्याही लादतात. म्हणूनच मग पुजाऱ्याचे यथेच्छ भोजन झाल्यामुळे डोळ्यावर पेंग आली कि तो मंदिराचे दार बंद करतो आणि त्यावर बोर्ड लावतो 'देव झोपला आहे '[ काही मंदिरात देवाला आंघोळ घातल्यानंतर आरसाही दाखवतात म्हणे,खरं-खोटं पंढरीचा विठोबा जाणे ]

हे सगळं पुरण लावायचं कारण म्हणजे केरळ मध्ये घडलेली एक घटना. झालं असं कि मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केल्यावर शीला दीक्षितांचे पुनर्वसन करायचे म्हणून केरळचे राज्यपालपद देण्यात आलं. नवीन पदावर आल्यावर निधर्मी राज्यातील राज्यकर्त्यांनी जसं देवाला जाऊन ‘धर्मपालन’ करायचं असतं तसं करायला त्या देवळात गेल्या. रितिनुसार त्यांनी चपला काढल्या पण पायाला खडे टोचू नये म्हणून पायात मौजे तसेच ठेवले. तिथल्या भक्तांनी एकच गिल्ला केला. शेवटी शिला दिक्षितांना मौजे काढावे लागले. या प्रकारावर लिहिताना गोव्यातल्या एका सनातनी दैनिकाने तर धर्म धोक्यात आल्याची आरोळी मारली. हा सारा प्रकारच हास्यास्पद आहे.अंगावर घातलेले कपडे चालतात तर पायातले मौजे का चालू नये ? खरी परिस्थिती अशी आहे की देऊळ दूर आहेच तोच भाविकांना चप्पल,बूट काढायला सांगितले जाते. परिणामी लांबवर तंगडतोड करीत जावे लागते. परिसर अर्थातच श्रद्धेने अस्वच्छ ठेवलेला असतो.उन्हाळ्यात फरशी विस्तवा प्रमाणे तापलेली असते.पायाला असह्य असे चटके बसतात स्त्रीया,लहान मुले यांचे तर अशा वेळेला हाल पहावत नाहीत.तरी देखील खोट्या भक्तीने बुध्दि बधिर झालेल्यांना दया येत नाही. एकीकडे देव दिनांचा कैवारी अन कनवाळू असल्याचा डंका पिटायचा अन दुसरीकडे भोळ्या भाबड्या जनतेला देवाच्या नावाखाली पिडा भोगायला लावायची ह्या अमानुषपणाला काय म्हणावे?कुठले असे आमचे देऊळ एवढे स्वच्छ असते कि पायताण घालून आत गेलं कि ते आणखी अस्वच्छ होईल? कुठल्या देवाने कुठं असा दम देवून ठेवलाय कि मला भेटायला येताना पायात पादत्राण काय पण मौजे देखील चालणार नाहीत ?चर्च मध्ये बूट ,चप्पल घालून गेलेलं ‘येशूला’ चालतं तर आमच्या देवाला का चालू नये?निदान पाय-मौजे तरी का चालू नये ?गाभाऱ्यात मौजे चालत नसतिल तर देवच गाभाऱ्याच्या बाहेर आणून शे-दोनशे भाविकांना एकाच वेळी दर्शन घेता येईल अशी व्यवस्था का करू नये ?

सगळे गाभारे म्हणजे अंधार-कोठड्याच आहेत. देवाला जर मोकळा श्वास घेऊद्याना !भाविकानाही त्या मूर्ती समोर बसून नाम-स्मरण म्हणा,चिंतन म्हणा शांतपणे करता येईल.त्यासाठी अर्थातच लहान-मोठ्या घंटांना नकारघंटा द्यावी लागेल.ज्याला मुंगीच्या पायातल्या पैंजणाचा झंकार देखील आवाज ऐकू येतो त्याला भक्ताच्या मनातील हुंकार येणार नाही का ?

केरळ मधील आणखी एका देवालयाची गंमत, खरं म्हणजे भक्तांच्या भक्तीची गंमत सांगण्यासारखी आहे.तिथे अल्लाप्पुझा गावामध्ये शिवपुत्र कार्तिकेयाचे खूप जुने मंदिर आहे. भाविक वर्षानू-वर्षे रीतीनुसार त्याला नैवेद्य अर्पण करीत होते. पण अचानक एका भक्ताने पुकारा केला कि ही मूर्ती बालपणातिल आहे. म्हणजे हा ‘बाल-मुरुग’ [कार्तिकेयाचे दुसरे नाव ] आहे.तेव्हा याला प्रौढ देवाचा नैवेद्य कसा चालेल?त्याला लहान मुलाचे खाद्य दिले पाहिजे. तो भाविक नुसतं बोलून थांबला नाही तर त्याने चक्क चॉक्लेट्सचा नैवेद्य दाखवायला सुरुवात केली. आज जो उठतो तो तिथे चॉक्लेट्स घेऊन जातो. मंदिराच्या दुतर्फा आता चॉक्लेट्सची दुकानं थाटली गेलीत.कुठे गेली परंपरा? आता नाही धर्म बुडाला तो? शेवटी देव हि मानवी उत्क्रांतीत मानवाने केलेली एक कल्पनाच आहे हे निदान किमान बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला पटायला हरकत नाहीं'. म्हणूनच संत म्हणतात 'देवाने नाही माणसाला जन्माला घातला तर माणसाने देवाला जन्माला घातलं. तेव्हा देव माणसासाठी आहे, माणसं देवासाठी नाहीत. मग देव दर्शनाला जाताना पायाला इजा होणार असेल तर पायात पादत्राण किंवा मौजे घालून गेलं तर देवाचा कोप होणार नाही की धर्म बुडणार नाही किंवा कसली जगबुडी होणार नाही.

देव जर फक्त भावाचा भुकेला असेल तर भक्ताने पायात काय घातलंय अन काय नाही याचा तो कशाला विचार करील? थोडक्यात काय तर, निर्बुध्द भक्तांनी आपल्या देवाच्या अन देव-भक्तीच्या कल्पना सुबुध्द भक्तावर लादू नये !!

इतर रसदार पर्याय