ek ase badal books and stories free download online pdf in Marathi

एक असे वादळ

नमस्कार,

एक लेखक म्हणून मी माझे हे पहिलेच पुस्तक वाचकांसमोर सादर करत आहे. मला वाचनाची आवड ही फार पूर्वी पासून होती. पण लिहण्याची ईच्छा आज पूर्ण करू शकलो त्याचे श्रेय मी स्वतःला देतोय कारण जे पहिले ते आत्मसात करून मी कागदावर उतरवतोय आणि स्वतःला लेखक या नावाच्या यादीत शामील करून घेण्याचा छोटासा प्रयत्न कारतोय.

मातृभारती पब्लिकेशनच्या माध्यमातून माझे हे पहिले पुस्तक मी ऑनलाईन तुमच्या पर्यंत पोहचवू शकलो त्यासाठी मी मातृभारतीचेही आभार मानतो.

धन्यवाद !!

***

प्रस्तावना :

आई-बापाचे उपकार कदाचित या जगात तो परमेश्वर हि फेडू शकत नाही. आपण तर एक साधारण माणूस आहोत. आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात आणि आपल्या मुला-बाळांना मोठे करतात, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा न ठेवता फक्त सुखाने, आनंदाने राहण्याचे स्वप्न ते पाहतात. पण ज्यावेळी त्यांची ती स्वप्न अशाप्रकारे कोलमडून पडतात की पुन्हा कोणाचा आधार ते घेऊ शकत नाही. त्यावेळीची त्यांची हि अवस्था कशी झाली? का झाली ? ते कोणत वादळ होत की, ज्याने त्यांच स्वप्न, आनंद आणि सुख हिरावून घेतले याचे उत्तर कदाचित त्यांच्याकडे पण नसते. अशाच एका प्रसंगरुपी वादळाचे वर्णन मी करणार आहे.

या पुस्तकाला आधारित माझ्या “आसवे” या कवितेतील चार ओळी मी सांगत आहे..

लोचनातील आसवे आता गालावरती सुकली आहेत,

... चेहऱ्यावरच्या सुखाची जागा आता दुःखानीं व्यापली आहे....

थकलोयरे आता आम्ही आणि झुरत आहोत आतून,

.... अश्रूही महाग झालेत आणि कंठ आलाय दाटून....

नको तुझी दौलत आम्हा नको आहे संपत्ती,

.... प्रेमाने बोल आई-बाबा हीच करतोय विनंती.....

धरु नको अबोला आता करू नको हट्ट,

....या वृद्धांना पाहिजे फक्त तुझीच मिठी घट्ट..... फक्त तुझीच मिठी घट्ट…..

लेखक : प्रवीण गावणकर

***

एक असे वादळ

(भाग १)

पहाटेचे साडे पाच वाजले होते, अचानक खणखणून जागा करणाऱ्या त्या घड्याळावर धडपडत मी हाथ ठेवला. रात्री घरी उशिरा आलो होतो म्हणून डोळ्यावरची झोप मात्र अर्धवट वाटत होती. तसाच जागा झालो, आंघोळ करूण कामासाठी घराबाहेर निघालो, सायकलचे लॉक उघडून त्यावर स्वार झालो. ऐरवी थोडीफार मंद वाटणारी पहाट आज मात्र जणू अंधाराची चादर घेऊन गाढ झोपेत आहे अशी जाणीव करुण देत होती. अंधारी पहाट असल्यामुळे धुक्यांचे प्रमाण कमी होते आणि जवळ-जवळ दूरवर रम्य ती शांतता पसरली होती.

पहाटेची शांतता आणि माझ्या मनातील वादळ यांचा जर मी ताळमेळ केला तर ते मनातील वादळ हे कितीतरी पटीने त्या पहाटेच्या शांततेला भंग करणारे होते. हो तेच वादळ ज्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. भले हि घडलेली घटना माझ्या आयुष्यातील नव्हती पण ती कोणाच्या तरी जीवनातील होती ज्याने मला आपले कोण आणि परके कोण याची जाणीव करून दिली होती. "हो हे तेच वादळ होते ज्याने कोणाचे तरी स्वप्न भंग केले होते". "हो हे तेच वादळ होते ज्यामुळे कदाचित कोणाचा तरी परमेश्वरावरून विश्वास उडवला होतो". "हो हे तेच वादळ होते ज्यामुळे कोणाचा तरी कंठ दाटून आला होता आणि कोणाला तरी अश्रूही महाग झाले होते". "हो हे तेच वादळ ज्यामुळे कोणाचे तरी आयुष्य उध्ववस्त झाले होते". हो हे तेच वादळ !

नेहमी प्रमाणे विमान-तळावरील माझे कामाचे तास संपवून साधारण चारच्या सुमारास मी घरी जायला निघालो, नेहमी लोकांची ये-जा असणाऱ्या त्या विमान-तळावर आजही तशीच ये-जा होती. पण त्या वर्दळीमध्ये एक वृद्ध जोडपे एक कोपऱ्यावरील आसनावर बसून कोणाची तरी वाट बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी उदासीनता वाटत होती आणि एका नवीन जागेवर आपण आलो आहोत अश्या प्रकारे ते प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. मी त्यांना पहिले आणि पुढे निघालो.

कामाच्या बदलीमुळे दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण दोनच्या सुमारास मी कामावर पोहचलो. दिवसभर काम केले आणि रात्री दहा वाजता घरी येण्यासाठी निघालो. घाई-घाईत निघताना अचानक मी थांबलो आणि मागे वळून पहिले, मागे पाहिल्यावर माझ्या पायाखालची जमीन थोडीशी सरकली असा भास झाला. कारण काल ज्या वृद्ध-जोडप्यानां मी पाहीले होते ते अजून तिथेच बसून होते. चेहरा थकलेला अवस्थेत ते डोक्यावर हात ठेऊन बसले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहून मला राहीवले नाही आणि मी त्यांच्या जवळ गेलो आणि समोर उभा राहिलो. मला समोर पाहताक्षणी ते थोडे दचकले आणि माझ्याकडे पाहत राहिले. मी म्हटले कि, “तुम्ही घाबरू नका पण मी काही विचारू का तुम्हाला ?" असा प्रश्न केला. "मी तुम्हाला काल पासून बघतोय तुम्ही इथेच बसला आहात. तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का ? तुम्हाला कोठे जायचे आहे का ? " माझ्या या प्रश्नावर ते वृद्ध जोडपे घळा-घळा रडू लागले. क्षणभर मी भांबावून गेलो कि नक्की काय झाले ? मी त्यांच्या बाजूला बसलो आणि धीर देत त्यांना विचारू लागलो कि "तुम्ही का रडता आहेत ?" त्यावर ते वृद्ध झोडपे म्हणाले "कि गेले दोन दिवस आम्ही या विमान-तळावर उपाशी बसलो आहोत. पोरा आमच्यावर एक उपकार कर आम्हाला खायला देऊ नकोस पण आम्हाला आमच्या गावाला नाहीतर कुठल्यातरी वृद्धाश्रमात घेऊन चल, तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, आमचे इथे आता कोणीच राहिले नाही. ज्या स्वप्नांवर विश्वास ठेऊन आम्ही हात धरून इथे आलो ते स्वप्नच आमचे भंग झाले आहे. काहीही कर आम्हाला इथून घेऊन चल बाळ". क्षणभर मीच भांबावून गेलो काय बोलू काही सुचेना. मनात अनेक प्रश्न निर्माण होत गेले, काय झाले असेल या वृद्धांबरोबर ? का ते रडता आहेत ? का ते वृद्धाश्रमात जाण्याचा हट्ट करत आहेत ? अचानक माझ्या पायाला त्या वृद्धांचा स्पर्श झाला आणि मी शुद्धीवर आलो. मी लगेच त्यांचे हात धरले आणि धीर देऊ लागलो. पण त्यांच्या चेहऱ्यावर रडू कोसळत होते, तोंडातुन शब्दही अडखळत बाहेर पडत होते. काहीहि सांगण्याच्या मनःस्थितीत ते कदाचित नव्हते. त्यांची ती अवस्था माझ्यानी पाहवली नाही. त्यांना त्यांचे नाव, गावचे नाव आणि गावचा पत्ता विचारले. अडखळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. "दिगंबर... दिगंबर सुर्वे" माझे नाव आणि हि माझी बायको रुक्मिणी सुर्वे" आम्ही कोकणातील मंडणगड येथे राहणारे. एवढे बोलून ते थांबले. पण त्यांचा पडलेला चेहरा कदाचित त्यांचा संपूर्ण वाईट प्रसंग दाखवत होता. त्यांच्या या अवस्थेवर मला फार दया आली. त्यामुळे त्या क्षणी जे सुचले ते मी केले. त्यांना आश्वासन दिले कि तुम्हाला तुमच्या गावी सोडतो मी, पण त्याआधी काहीतरी खाऊन घ्या. त्यांना एसटी चे तिकीट काढून दिले आणि पोटभर जेवण देऊन त्यांना मी एसटी मध्ये बसवले. माझ्या या उपकाराची परत फेड म्हणून जणू, माझी त्या परमेश्वराबरोबर तुलना करून ते देत होते. एसटी मध्ये बसल्यावर ते माझ्याकडे एकटक पाहत राहिले आणि म्हणाले तुझ्या सारखे बाळ परमेश्वर या जगातील प्रत्येक आई-बापाला देवो. त्यांना हात जोडून मी तेथून निघालो.

शांतता हि दोन प्रकारची असते. एक तर वादळ येण्यापूर्वीची आणि दुसरा म्हणजे वादळ गेल्या नंतरची. पण दिगंबर सुर्वे आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरची निरागस शांतता हि नक्कीच वादळ गेल्या नंतरची होती एवढे तर खरे. पण असे का झाले असेल ? काय कारण असेल या पाठीमागचे ? असे अनेक प्रश्न मला शांत बसून देत नव्हते. पण काही केल्या या प्रश्नांची उत्तरे शोधून मला काढायची होती. दिगंबर सुर्वे आणि रुक्मिणी सुर्वे यांच्या आयुष्यात असे कोणते वादळ आले कि उरलेले त्यांचे आयुष्यच उध्दवस्त झाले. या उतार वयात त्यांची हि अवस्था ? प्रश्न गंभीर होता पण उत्तर शोधायचेच होते. काही केल्या मला राहवले नाही तशीच सायकल रेल्वे स्थानकाजवळ जवळ थांबवली आणि तिकीट खिडकीजवळ जाऊन एक मंडणगडच तिकीट काढले आणि दिगंबर आणि रुक्मिणी सुर्वे यांना भेटायला निघालो.

दुपारच्या दरम्यान मी मंडणगडला पोहोचलो. पत्ता शोधत शोधत दिगंबर सुर्वे यांच्या गावाच्या सीमेवर आलो. तेथे आल्यावर एका गावातील व्यक्तीला दिगंबर सुर्वे यांचे घर कुठे आहे असा प्रश्न केला ? पण गेल्या पंधरा दिवसा पूर्वीच त्यांनी आपले गावाचे घर आणि जमीन विकून निघून गले. असे उत्तर माझ्या कानावर पडले. कुठे गेले ? का गले ? या प्रश्नाचे उत्तर त्या व्यक्तीकडे नव्हते. एवढे सांगून तो तेथून निघून गेला. मी थोडा विचार करू लागलो कि दोन दिवसापूर्वी मी त्यांना त्यांचे गावचे तिकीट काढून दिले होते. पण ते गावात नाही तर कुठे आहेत ? कुठे शोध घेऊ त्यांचा मी ?

जवळ जवळ दिड ते दोन मैल मी चालत-चालत त्यांचा शोध घेत होतो. दिवसभर चालल्याने शरीरामध्ये थोडा थकवा जाणवला, तहान लागली होती म्हणून गावामधील एका घराजवळ गेलो आणि आवाज दिला. "कोणी आहे का ? लगेच घरातून एक साधारण साठी गाठलेला व्यक्ती बाहेर आला. "कोण पाहिजे तुम्हाला" ? असा त्याने प्रश्न केला. मी म्हटले कि, "थोड पाणी मिळेल का प्यायाला". "हो पाणी ना मिळेल कि, बसा इथे" असे म्हणून तो पाणी आणायला गेला. पाण्याचा तांब्या माझ्या हातात देत तो माझ्याबरोबर खाली बसला. माझे पाणी पिऊन झाल्यावर माझी चौकशी करू लागला. कोण तुम्ही ? कुठून आलात ? कोणाला भेटायचे आहे तुम्हाला या गावात ? असे एक पाठोपाठ त्याने जणू प्रश्नांची रांगच लावली. पाण्याचा तांब्या जमिनीवर ठेवत मी त्यांना माझा परिचय दिला. "मी मुंबईवरून आलो आहे". मुबईवरून...? मुंबईवरून आमच्या मंडणगड गावात कश्यासाठी ? असे त्या व्यक्तीने मला परत प्रश्न केला. मी म्हटले कि, "मी या गावात सहसा कोणालाच ओळखत नाही". मी पहिल्यांदाच या गावात आलो आहे. आणि त्या पाठीमागचे कारण म्हणजे कोणाचा तरी शोध घेत. शोध ! कोणाचा शोध ? असे त्याने मला विचारले. दिगंबर सुर्वे आणि रुक्मिणी सुर्वे यांना भेटण्यासाठी मी येथे आलो आहे. पण इथे आल्यावर मला समजले, की ते गावात राहत नाही. "तु...तु.. तुम्ही दिगंबर सुर्वेना भेटायला आला आहात" ? तुम्ही कसे काय ओळखता त्यांना ? असे अडखळत त्याने मला प्रश्न केला. मी म्हटलं" का ? तुम्ही ओळखता त्यांना. तो म्हणाला "हो" मी ओळखतोना त्यांना. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर माझा जणू थकवाच दूर झाला. कारण इथे येण्याचा माझा हेतू वाया गेला नाही.

मी त्यांना म्हटले कुठे आहेत ते ? मला त्यांना भेटायचे आहे ? तो म्हणाला, "आहेत ते याच तालुक्यात. गावापासून काही अंतरावर राहतात. मीच दिले त्यांना तेथे राहायला. गावापासून काही अंतरावर राहतात. तर ते या गावात राहत नाही का? मला तर दुसराच पत्ता सांगितला होता त्यांनी, असे मी बोललो. हो, त्यांनी तुम्हाला बरोबर पत्ता दिला होता. पण आता ते तेथे राहत नाही, असे त्या व्यक्तींने मला सांगितले. पण का ? मी परत प्रश्न केला. त्यावर तो व्यक्ती असा म्हणाला कि, देव माणूस आहे तो खरंच !, पण फार बिकट परिस्थिती आली होती “हो” त्या माणसाची. दोन वेळच्या जेवणाची टंचाई होती, राहायला घर नव्हते. सगळी संपत्ती सगळं ऐश्वर्य एका क्षणात त्या वादळा बरोबर उध्दवस्त झाल होत. "वादळ ! कोणते वादळ" ? मी त्यांना विचारले. हो पोरा तेच वादळ जे दिसायला खूपच शांत असत पण त्याचा परिणाम इतका घातक होईल याची कल्पना त्या म्हातारी आणि म्हाताऱ्याला नव्हती. पण अस काय झाले दिगंबर सुर्वेंच्या आयुष्यात कि एका क्षणात परिस्थिती इतकी बिकट झाली ? मी परत प्रश्न केला की, मला सांगा कोणते वादळ ते ? नक्की झाले तरी काय ? माझ्या या प्रश्नावर त्याने दिगंबर सुर्वे आणि रुक्मिणी सुर्वे यांच्या भूतकाळाबद्दल मला सांगायला सुरवात केली.

प्रेमाला डोळे नसतात ते आंधळ असत, मग ते प्रेम बोलक्या माणसांच असो नाहीतर मुक्या जनावरांच असो. असच प्रेम हे दाम्पत्य आपल्या पोटच्या एकुलत्या एका मुला बरोबर करत होते. विकास होत त्यांच्या मुलाचे नाव. आपलं पोर हे नावाप्रमाणे विकास करेल अशी त्यांची गोड समजूत होती. म्हणतातना ! की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात, म्हणजे मोठेपणी तो कसा असले याची कल्पना पाळण्यात असल्यावर आई-बाबा करतात. त्यात यांनीही तशी कल्पना केली.

दिगंबर सुर्वे आणि त्याच कुटूंब हे मुळात मंडणगडचे राहणारे आहेत. साधारण पंचवीस वर्षाआधीची हि गोष्ट आहे. गावात अचानक दुष्काळ पडला होता. पाण्याची टंचाई इतकी होती की, गुर-ढोर पाण्याविणा तडफडत होती. शेती करपली होती, पाण्याबरोबर दोनवेळच्या अन्नाचीही टंचाई झाली होती. अश्या परिस्थितीत जो-तो रोजगारासाठी आणि पोटासाठी गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला. त्यात हे सुर्वे परिवारही गावची वाट सोडून आपल्या एकुलत्या एका तीन वर्ष्याच्या मुलाला घेऊन मुंबईला रवाना झाले. खिशात मोजकेच पैशे घेऊन घराबाहेर निघून एका परक्या शहरात शून्यातून विश्व् कसे उभे करावे जर याचे उत्तम उदाहरण कोणी असेल, तर हे दिगंबर सुर्वे आणि रुक्मिणी सुर्वे.

मुंबईचा प्रवास त्यांच्यासाठी काही साधा नव्हता. काही दिवस नाही तर महिने त्यांनी फुटपाथवर काढली. काही दिवस तर उपाशी राहूनही काढली. तरीही ते जगात होते कारण त्यांना नेहमी चिंता असायची ती त्यांच्या मुलाच्या भविष्याची. मुंबईत गेल्यावर या नवरा-बायकोनी पडेल ते काम करायला सुरवात केली. दिवस रात्र काबड कष्ट ते करू लागले. कारण मनात एकच ध्येय होत की, आपण जी परिस्थिती पहिली ती आपल्या मुलाला नको. आपण अडाणी, आपल शिक्षण जेम-तेम दुसरी-तिसरी, पण आपल पोर हे शिकल पाहिजे. त्याने नाव कमावले पाहिजे आणि आपल्या उतरत्या वयात आपला आधार झाला पाहिजे. बस हि एकच इच्छा होती या दोघांची. पण नियतीला काही वेगळेच करायचे होते. दिवसा मागून दिवस गेले. दिगंबर एका कारखान्यात कामाला लागला रुक्मिणी सुद्धा धुनी-भांडी करु लागली. छान चालले होते त्यांचे. हळू हळू त्यांचा मुलगा विकास, हा शाळेत जाऊ लागला. आपल्या मुलाला शिक्षणात काही कमी पडू नये म्हणून इंग्रजी शाळेत त्याचे शिक्षण या आई बापाने सुरु केले. विकासही अभ्यासात फार हुशार होता. तोही मन लावून अभ्यास करे. अभ्यासाबरोबर इतरही कार्यक्रमात शाळेमध्ये त्याचा सहभाग असे. शाळेमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये त्याचे नाव नेहमी असे. मुलाची अशी प्रगती पाहता त्या दांपत्यांना आपल्या भविष्याची जणू आता चिंताच मिटली आहे असे वाटे.

हळूहळू अजून काही वर्षे गेली, दिगंबरचीही कामात प्रगती होत गेली, थोडाफार पैसे अडका त्याने जमा केला. मुंबईत स्वतःचे चाळीमध्ये एक सोडून दोन घरे घेतली. गावाला येऊन नवीन घर बांधले, स्वतःच्या जमिनीत झाड - माड लावली. विकासही अभ्यासात हुशार होता. एकदम सगळं छान अस चालले होते. कोणाचीही नजर लागावी त्या चिमुकल्या परिवाराला असं ते लहाणस परिवार होत.

विकास आपल्या अभ्यासात हुशार असल्यामुळे आई-बापाचा पैसे कधी मात्र वाया गेला नाही. त्याची दहावी झाली, पोराने डिग्री घेतली आणि डिग्री नंतर पुढचं शिक्षण तो घेत होता. त्याच्या या प्रगतीवर दिगंबर मात्र मागे-पुढे न बघता दिवस रात्र कष्ट करून वाटेल तसा पैसे खर्च करत होता. रुक्मिणी नेहमी त्याला सांगायची की थोडाफार पैसा आपल्या उतारवयात तरी सांभाळून ठेवा. तर त्यावर दिगंबराचे एकाच वाक्य असे माझी संपत्ती माझा विकास आहे. विकास सारखा हुशार मुलगा असताना आपल्याला उतारवयाची काय चिंता. तो दिवस मला आजही आठवतोय ज्यावेळी विकास ने त्याची इंजिनीरिंगची ची डिग्री पाहिल्या वर्गात पास केली होती. आभाळ ठेंगणं झालं होत रे त्या मात्या-पित्यांसमोर. मी स्वतः होतो त्यांच्या घरी त्या आनंदाच्या क्षणी. "पोर इंजिनीयर झाल आता आमचं स्वप्न पूर्ण झाल" अस अश्रू ढाळत दिगंबर बोलत होता. खूप आनंदी होता तो आणि रुक्मिणी तर विकासची सारखी नजर काढत होती. असा तो क्षण होता जो कधीतरी पाहायला मिळतो.

इंजिनीरिंग झाल्यावर विकास एका खाजगी कंपनी मध्ये कामावर रुजू झाला. दिवसक्रम छान चालू होता. पोरालाही आई बापाने चांगले संस्कार दिले होते. म्हूणन आई-बापाला नमस्कार करून पोर कामाला जात होता. पहिला पगार झाला तेव्हा विकास आई-बापाला नवे कपडे घेऊन आला होता. खूप खुश झाले होते दिगंबर आणि रुक्मिणी तेव्हा. दिवसेन दिवस विकासची कामत प्रगती होत होती. पोरग मुळातच हुशार असल्यामुळे नावाप्रमाणे विकास करत गेला. त्या दिवशीची ती आनंदाची बातमी. हो ! आनंदची बातमी होती ती. पण ! विकाससाठी, कारण कंपनी मधून त्याची बदली बाहेरगावी म्हणजे अमेरिकेला होणार होती. विकासला या संधीचा फायदा सोडायचा नव्हता. पण आई बाबांना कोण समजावणार असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला? पण हि संधी गेली कि पुन्हा कधी संधी मिळेल ते माहित नाही आणि खरोखर मिळेल याची शाश्वती नव्हती. म्हणून विकास मन धीट करून आई-वडिलांसमोर गेला. आणि म्हणला "आई-बाबा, मला परदेशात जाण्याची खूप मोठी संधी मिळाली आहे." चांगला पगार, मोठा हुद्दा सगळं काही एकदम छान आहे. फक्त तुमची परवानगी हवी आहे. दे... देता का परवानगी? असं अडखळत तो विचारू लागला. शेवटी बाप हा बाप असतो वाघाचं काळीज असत त्याच आपला पोटचा पोरगा आपल्यापासून लांब जातोय हे ठाऊक आहे तरीही तो मन धीट करून त्याच्या पाठीशी उभा राहतो. पण आई ही खूप कोमल हृदयाची असते. कस आपल्या पोटच्या गोळ्याला ती आपल्यापासून दूर ठेवेल !

असच काही झालं त्या दिवशी. विकासने आई वडिलांना ती आनंदाची बातमी सांगितली क्षणभर त्या माता-पित्यां समोर तर आभाळ ठेंगणं झालं होत. पण थोड्यावेळाने रुक्मिणीने तर हट्टच लावला, "विकास तू आम्हाला सोडून कुठेच जायचे नाही. यासाठीच का आम्ही तुला लहानाचा मोठा केला. तु आमचा आहेस आणि आमच्या पासून दूर जायच नाही". असे विव्हळत ती बोलत होती. दिगंबर तिला समजावत होता, "काय झालं पोर परदेशात गेल तर ? आपल्यासाठी तर अभिमानाची गोष्ट आहे. सुर्वे खानदानात कोणी तरी पहिल्यांदा अमेरिकेला जात आहे.आणि तु अशी रडतेस". अरे ! मी, तर गाव भर पेढे वाटेनं.

रुक्मिणीला धीर देत दिगंबर म्हणाला, "रडू नको रुक्मिणी, आपल्या विकासच भविष्य आहे ग ते. त्याच स्वप्न पूर्ण होतंय". "असं आड नाही यायचं. आणि तो का कायमचा थोडी जातोय परदेशात येत जाईल तसा अधून-मधून आणि काही वर्षांनी आपण जाऊ त्याच्याबरोबर अमेरिकेत विमानांन", हो! की, नाही विकास.. दिगंबर विकास कडे बघत बोलला. विकासनेही हसता हसता मानेने होकार दिला आणि तिघे पण हसू लागले. शेवटी विकासाला परदेश्यात जाण्याची परवानगी मिळाली. सगळं काही ठरल्या प्रमाणे झाल. कंपनीमधून विकासचे पासपोर्ट, विमानाचे तिकीट आल. अमेरिकेला जाण्याची तारीख ठरली. पण पोराला परदेशात जाण्याची परवानगी देणारे दिगंबर आणि रुक्मिणी मात्र आनंदाच्या क्षणातही बेचैन होते. कारण मनात एक प्रकारची भीती वाटत होती. कसली भीती? कोणती भीती? याची कल्पना नव्हती, पण मन मात्र हे मान्य करायला तयार नव्हते कि आपण विकासला परदेशात पाठवावे. पण पोराच्या भविष्यासाठी त्या आई-बापानं हा कठोर निर्णय घेतला.

आज विकास अमेरिकेला जाणार होता. सगळी तयारी झाली होती. दिगंबर - रुक्मिणी पोराला डोळेभरून बघत होते कारण पुन्हा कधी भेट घडेल हे माहित नव्हते. पण रुक्मीणी मात्र रडून रडून अशक्त झाली होती. दिगंबर सारखी तिची समजूत काढत होता. विकासने आई-बापाला नमस्कार केला आणि म्हणाला मी रोज फोन करेण आणि लवकरच तुम्हाला पण घेऊन जाईन अमेरिकेत आणि आपण छान पैकी राहू तिथे एवढे बोलून विकास घराबाहेर निघाला. विकासला दुरून पाहताना दिगंबरलाही अश्रू आवरले नाही आणि त्याचेही डोळे पाण्याने भरले. आपल पोटच एकुलता-एक पोर आपल्यापासून दूर परदेशात राहायला गेल. का? खरच जेवण गोड लागेल कोणत्या आई- बापाला. अशीच परिस्थिती होती त्या दोघांची. घर नुसतं स्मशानासारखं वाटत होत त्यांना. पण तरीही ते दोघे एकमेकांची समजूत काढून एकमेकांना आधार देत होते.

एके दिवशी शेजाऱ्यांच्या फोन वर विकासचा फोन आला. रुक्मिणी आणि दिगंबर आनंदाने धावत धावत फोन जवळ गेले. पोट भरून पोराजवळ बोलले. पोर आता अमेरिकेत ठीक आहे, त्याच्या कामापासून ते राहण्यापर्यंत सगळं काही ठीक चालले आहे. हे ऐकून त्यांना फार आनंद झाला. असाच विकासचा फोन आठवडयांनी येत होता. आई-बापाची चौकशी पोर सारखी करत असे. असेच दिवसामागून दिवस जात राहिले. पण काही दिवसांनी विकासचे फोन येणे बंद झाले. त्याने दिलेल्या नंबरवरही फोन लागत नव्हता. जवळ जवळ सहा महिने झाले पण विकासचा काहीच पत्ता नाही. आई-बाप दोघेही काळजीमध्ये होते. जेवण गोड लागत नव्हते त्यांना. एक-एक दिवस म्हणजे डोंगरा एवढा वाटत होता. काय करावे? कुठे शोधावे पोराला? याच विचारामध्ये ते होते. रोज दारात बसून दिगंबर आणि रुक्मिणी उघड्या डोळ्यांनी पोराची वाट बघत होते. जणू त्यांच्या जीवनात सूर्य हा उशिरा उगवत होता आणि दिवसही कधी संपत नव्हता अशी परिस्थिती होती. असेच दिवस जात होते आणि एकेदिवशी अचानक त्यांचा दरवाज्यावर टक-टक असा आवाज आला. दिगंबर दरवाज्याजवळ गेला आणि दार उघडले आणि पाहतो तर काय समोर विकास उभा होता.

....क्रमश

इतर रसदार पर्याय