नितळ
परशुराम माली
श्वेता आणि दिपाली लहानपणापासून मैत्रिणी अगदी जीवाला जीव देणाऱ्या. एकमेकींपासून काहीही लपवून ठेवायच्या नाहीत. कुठेही जायचं झाल तरी नेहमी एकत्रच जाणाऱ्या, एकमेकींपासून क्षणभरही दूर रहायला घाबरणाऱ्या या जिवलग मैत्रिणी होत्या. एकमेकींशिवाय दोघींनाही करमत नव्हते.आयुष्यातील प्रत्येक प्रसंग एकमेकींना सांगणाऱ्या आणि एकमेकींच दु:ख वाटून घेणाऱ्या या मैत्रिणी होत्या.एखादा महत्वाचा निर्णयही एकमेकींच्या सल्ल्यानेच घेत असत.
कॉलेजमधील सर्वजण त्यांना दोस्ताना म्हणून चिडवायचे.मैत्रीला दृष्ट लागावी असच काहीस त्यांच्या बाबतीत घडल. दिपाली सुरज नावाच्या एका मुलावर खूप प्रेम करत होती. ती नेहमी दिवस रात्र त्याचाच विचार करायची, त्याच्यासाठी ती वेडी झाली होती. कॉलेजमध्ये नेहमी त्याचीच वाट पहायची.सुरजसाठी काहीही करण्याची तिची तयारी होती. कुणालाही न सांगण्याच्या अटीवर श्वेताजवळ दीपालीने सुरजला प्रपोज करण्याची इच्छया बोलून दाखवली. अशा कठीण प्रसंगी श्वेताशिवाय आधार देणार असं कुणीच नव्हत.
दीपालीची होणारी घालमेल श्वेताला पाहवत नव्हती. श्वेताने दीपालीला साथ देण्याचे ठरवले आणि श्वेता दीपालीला म्हणली, असं मनात ठेवून झुरत बसण्यापेक्षा एकदाच मन मोकळ कर. दिपाली घाबरत – घाबरत म्हणाली, पण त्याने नकार दिला तर त्यावर श्वेताने दीपालीला धीर दिला आणि म्हणाली तुझ प्रेम निस्वार्थी आणि सच्चे आहे असं काही होणार नाही. मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस, यामुळे दीपालीला धीर आला.एकदाच दीपालीने सुरज जवळ मन मोकळ करायचं ठरवलं सोबत श्वेता होतीच.
दीपालीने सुरजला एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. त्या दिवशी दिपाली थोडी उदास दिसत होती. एकदाचे तिघे कॉफी शॉपमध्ये आले. कॉफी झाल्यानंतर सुरजने घाईघाईने दिपालीला विचारले...
का बोलावले मला? काही प्रॉब्लेम आहे का? तसा सुरज आमचा पहिल्यापासूनचा चांगला मित्र होता त्यामुळे त्याला भेटताना दोघीनाही अवघडल्यासारखे वैगेरे होत नव्हते पण भीती नक्कीच होती कारण विषयच तसा होता.
दिपाली अडखळतच म्हणाली मला थोड बोलायचं होते. त्यावर सुरज अधीर होऊन म्हणाला, बोल लवकर काय बोलायचे ते मला उशीर होतोय.त्यावर दिपाली म्हणाली, सुरज मी तुझ्यावर खूप प्रेम करते.तू मला खूप आवडतोस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.दिपाली हे सर्व पट्कन बोलून गेली. एका क्षणाला सुरजला काय करायचे तेच कळेना. थोड्याच वेळात स्वतःला सावरत सुरज दीपालीला म्हणाला, मला माफ कर दिपाली, तुझे प्रेम मी समजू शकतो पण माझ प्रेम एका दुसऱ्याच मुलीवर आहे. सूरजच्या मुखातून हे शब्द येताच दीपालीला आभाळ कोसळल्यागत झाले,काय करायचे तेच कळेना, दीपालीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.श्वेता पूर्ण हताश झाली होती. समुद्राच्या वाळूने नाव कोरावे आणि लाटांनी ते नाव पुसावे असेच काहीसे दिपाली बरोबर झाले होते.
श्वेताने दीपालीला धीर दिला आणि श्वेता सुरजला रागारागाने म्हणाली,कोण आहे ती मुलगी? यावर सुरज म्हणाला, श्वेता तूच ती मुलगी आहेस, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. त्या क्षणी दीपालीला धक्काच बसला आणि श्वेताला आश्चर्य वाटले. श्वेता स्वत:ला सावरून रागारागाने सुरजला म्हणाली, तू काय बोलतोयस ते तुला काही कळतय का? तुझे डोके ठीकाण्यावर आहे का ? तू हे खूप चुकीचे केलेस, खरे प्रेम करणाऱ्या व्यक्तीला लाथाडले आहेस हे विसरू नकोस असे म्हणताच, सुरज तिथून रागारागाने निघून गेला. श्वेता दीपालीला घेवून तिथून निघुन आली. दिपाली चार- पाच दिवस या धक्क्यातून सावरली नव्हती. तिकडे श्वेताचे मनही श्वेताला खात होते.
दीपालीचा गैरसमज तर होणार नाही ना...? मी तिला फसवले असे तर तिला वाटणार नाही ना...? या आणि अश्या प्रश्नांनी श्वेता घायाळ झाली होती. खर तर श्वेताचे सुरज बरोबरच्या मैत्रीच्या नात्यापलीकडे असे कोणतेच नाते नव्हते पण सुरज श्वेतावर एकतर्फी प्रेम करत होता हे ना श्वेताला कळाले ना दीपालीला.
मी या दोघांच्या नात्यामध्ये आल्यामुळेच या दोघांचे नाते तुटले, असे श्वेताला वाटू लागले.श्वेता दिपालीशी नजरही मिळवू शकत नव्हती. ती स्वतःला अपराधी मानु लागली. स्वतःला मी कधीही माफ करू शकणार नाही. असा दोष श्वेता स्वतःला देवू लागली.
काही दिवस श्वेता दीपालीला टाळत होती. ही गोष्ट दीपालीच्या लक्षात आली. दीपालीने श्वेताला रस्त्यात अडवले आणि दिपाली श्वेताला म्हणाली तुझी काहीच चूक नसताना तू मला का टाळण्याचा प्रयत्न करतेस? यात तुझा काय दोष? प्रेम हे कोणावरही होऊ शकते. दोघींनीही एकमेकाला मिठी मारली आणि रडू लागल्या.
श्वेता रडत रडतच दीपालीला म्हणाली, तू माझ्याबरोबर असलेली मैत्री तोडणार तर नाहीस ना...? मला सोडून तर जाणार नाहीस ना...?
दिपाली श्वेताला सावरत म्हणाली अगं वेडे आपली मैत्री इतकी नाजूक आहे का? आपली मैत्री कुणाच्याही येण्या- जाण्याने थोडीच तुटणार आहे? असे अनेक सुरज मी तुझ्यासाठी कुर्बान करेन. तू मनाला लावून घेवू नको. आजपासून आपल्यासाठी सुरजचा विषय संपला आहे. या सर्व प्रसंगातून दिपाली आणि श्वेता यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. एकमेकींच सुख – दु:ख हे एक झाल होत. दोन शरीर एक जीव अस नात या दोघींचं झाल होत. अशाच आणखी एका घटनेने श्वेता आणि दिपाली खूपच जवळ आल्या
एक दिवस दिपाली आजोबांना पेपर वाचून दाखवत होती. ती पेपर वाचता वाचता थांबली तिला काहीच कळले नाही. तिने श्वेताच्या बाबांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि सुन्न झाली. श्वेताच्या बाबांवर चोरीचा आरोप झाला होता.दिपालीने लगेच श्वेताला फोन केला पण तिने तो उचला नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.सर्व लोकांच्यात कुजबुज सुरु झाली होती.त्यामुळे श्वेता कॉलेजला आली नव्हती.
तिची विचारपूस करण्यासाठी दिपाली तिच्या घरी गेली.दीपालीला पाहून श्वेताला रडू कोसळले. हि खरी दिपालीच्या आयुष्याची कसोटीची वेळ होती. दिपाली श्वेताला शांत करत तिला धीर देवू लागली. अलीकडे श्वेताने कॉलेजला येणेही बंद केले होते. दीपालीने श्वेताला तिची शपत घातली आणि कॉलेजला येण्यासाठी आग्रह केला. मी असल्यावर तुला चिडवायची आणि त्रास द्यायची कोणाचीही हिम्मत नाही. माझ्या मैत्रिणीच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. तू काळजी करू नको आणि स्वताला एकटी समजू नको.मी तुझ्या सोबत आहे. असा धीर दीपालीने श्वेताला दिला.
हे सर्व ऐकून श्वेताला गहिवरून आले. दिपाली श्वेताला म्हणाली हे बघ श्वेता जेव्हा माझ्या आयुष्यातून माझी आवडती व्यक्ती गेली त्यावेळी त्या धक्क्यातून तू मला सावरलीस, तू आधार दिलास तुझ्यामुळे आज मी सुरजला विसरू शकले तसेच तुझ्या कठीण प्रसंगी मी तुला साथ देणे हे माझे कर्तव्यच आहे.जगाची पर्वा करू नको तुझे जसे ते बाबा आहेत तसे माझेही आहेत तू उद्या कॉलेजला येशील, मी वाट बघेन. दिपाली श्वेताचा हात हातात घेवून म्हणाली. श्वेताचा होकार येताच दिपाली आनंदाने घरा बाहेर पडली.अस हे दीपालीच आणि श्वेताच सुख दु:खात एकमेकाला साथ देणार नितळ मैत्रीच नात निरंतर तेवत आहे.
***