अस्वस्थ parashuram mali द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अस्वस्थ

अस्वस्थ

अनेक वर्षे समर्पित वृत्तीने सेवा बजावणारे राजाभाऊ सर्वांमध्ये प्रिय असणारे व्यक्तिमत्व होते. अलिकडच्या काळातील वाढते आधुनिकीकरण आणि बदललेली शिक्षण पद्धती यामुळे ते अस्वस्थ होते. तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करत आहेत; पण हा वापर कशासाठी आणि किती प्रमाणात याचे उत्तर देणे कठीण आहे. आजची मुले दिवस रात्र टी.व्ही.समोर बसून असतात. बघेल त्यावेळी मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो.

आजच्या विद्यार्थ्यामधील थोरा-मोठ्याबद्दल संपलेला आदर आणि बेशिस्त यामुळे राजाभाऊ उदास झाले होते. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये राजाभाऊ प्रमुख भूमिका बजावत. वेगवेगळ्या सभा- संमेलनामध्ये मुलांमधील बदलणारे संस्कार, पालकांचे अतिलाड,टी.व्ही आणि मोबाईलचा अतिवापर याबद्दल ते आपले मत व्यक्त करत होते. हे सगळे घातक बदल त्यांना मान्य नव्हते.

राजाभाऊ स्वेच्छ्या सेवा निवृत्ती घेत आहेत हे कळाल्यानंतर अनेक वर्षे घरगुती संबंध असणारा आणि ज्याला राजाभाऊ आदर्श शिष्य मानत होते;

असा राजाभाऊंचा माजी विद्यार्थी विनयला ही बातमी बातमी समजल्यानंतर विनय राजाभाऊंच्या भेटीसाठी आला होता.

राजाभाऊ पुस्तक वाचत खिडकीजवळ बसले होते. विनय येत आहे हे त्यांनी पाहिले. पुस्तक ठेवून राजाभाऊ बाहेर आले. पुन्हा आत जाऊन विनयसाठी पाणी घेवून आले. विनयला पाणी देवून न बोलताच गडबडीने पुन्हा गुरुजी आत गेले. विनय फक्त पाहत होता. त्याला काहीच कळत नव्हते. गुरुजी बाहेर आले.

चहा ठेवून आलो रे, बोल कसा आहेस,

घरी सर्वजन कसे आहेत.

हो बरा आहे. घरचेही बरे आहेत.

मी येणार होतो तुझ्याकडे पण तब्बेत थोडी बरी नव्हती, त्यामुळे आलो नाही. दोन दिवस मुलीकडे जाऊन आलो. नातीचा वाढदिवस होता. लेकीन निरोप दिला म्हणून गेलो होतो; पण लेकीशिवाय कोण बोलतं या म्हाताऱ्याबरोबर. मोबाईल आणि टी.व्ही. मध्ये सगळ्यांची डोकी घुसलेली.गुरुजी अस्वस्थ झालेले पाहून विनयला काय बोलायचे हे समजत नव्हते.

गुरुजी आजची पिढी बदललेली आहे. आम्हा विद्यार्थ्यांचा आणि तुमचा काळ वेगळा होता. आज सगळ्या सुख-सोयी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची किंमत नाही. आज जग खूप जवळ आले आहे. घरबसल्या सर्व गोष्टी मिळायला लागल्या आहेत;त्यामुळे कष्टाची कामे कमी झाली आहेत. सोशल मिडीयाचा अतिवापर बदललेली जीवनशैली यामुळे माणसातलं माणूसपण हरवत चाललेलं आहे.

गुरुजी चहा घेवून आले. चहा पिऊन झाल्यानंतर विनय म्हणाला, गुरुजी तुम्ही असा अचानक स्वेच्छया निवृत्तीचा निर्णय का घेतला?

तु आता जे विचार मांडलास याच होणाऱ्या बदलामुळे मी अस्वस्थ आहे.आणि यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे.

परिस्थिती बदलली आहे; परिस्थितीनुसार बदल होणे साहजिक आहे. आपण काय करू शकणार आहे? विनय गुरुजींना म्हणाला तसे गुरुजी उत्तरले; विनय,परीस्थिती बदललेली आहे हे खरं आहे. यंत्रांमध्ये जसा बदल होतो;तसा मानवी शरीरयंत्रणेमध्ये तरी बदल झालेला नाही ना! हातानेच खातो आणि पायानेच चालतो ना आपण! संगणकाला माणसाने आज्ञा केल्याशिवाय ते काम करत नाही हे ही सत्य आहे; जरूर आपण एकविसावे शतक हे संगणकाचे शतक आहे असे म्हणतो;पण याचा शोध कुणी लावला? माणसाशिवाय त्याचा वापर शक्य आहे का?

हे बघ,विनय बदल वगैरे काही नाही रे, आपण या सगळ्याच्या आहारी गेलो आहोत. आपल्याला या सगळ्या गोष्टींच व्यसन लागले आहे. प्रत्येक गोष्टीच्या वापराला मर्यादा असतात त्या मर्यादा आपण तोडत आहोत आणि यामुळेच आपली वाटचाल ही विनाशाकडे होत आहे. आज सर्वांना मेहनत न करता सर्वकाही हवं आहे. आज समाजामध्ये चोरी, दरोडे, बलात्कार, खून यांचे प्रमाण वाढले आहे. हे कशामुळे? आज टी.व्ही.वर किती भडक दृश्ये दाखवली जातात हे तर तुला माहीतच आहे. सगळ्या गोष्टींच फक्त आणि फक्त अंधानुकरण आजची पिढी करत आहे.

सर, नका वाईट वाटून घेऊ. विनय कापऱ्या स्वरात म्हणाला.

विनय, तीस – पस्तीस वर्षे मी शिक्षक म्हणून काम करत आहे; पण आजकाल माझ मनच रमत नाही. पूर्वीच्याकाळी शिक्षक आणि पालकांचा विद्यार्थ्यांमध्ये धाक होता त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली शिस्त होती. शिक्षक आणि पालकांबद्दल आदरयुक्त भीती होती;पण आज विद्यार्थी अतिशय लाडावलेले आणि उर्मठ वागतात.कुठेतरी संस्काराची उणीव मला त्यांच्यामध्ये जाणवते,पालकांचे अतिलाड मला दिसतात.

संवाद हरवत चाललेला आहे. आज मुलं कुणाशीही मनमोकळेपणाने बोलत नाहीत. शिक्षक असोत अथवा पालक आजची मुले कुणाचंही ऐकत नाहीत. एखादा सल्ला जरी द्यायला गेला तरी मुलांचा अहंकार दुखावला जातो. यामुळेच आपापसातील प्रेम,आपुलकी,जिव्हाळा,आत्मियता संपत चालली आहे. मीच शहाणा, माझच खर! अशी मनोभूमिका असणारी मुलं देशाच भवितव्य कसे घडवणार याचीच मला चिंता वाटते.

पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये मान वर करून बोलायचेही धाडस होत नव्हते;पण आज-

गुरुजी बोलता-बोलता गलबलून गेलेले पाहून विनय म्हणाला;

गुरुजी, आपल्या सेवेची चारच वर्षे राहिली आहेत. माझी मनापासून इच्छा आहे कि, तुम्ही स्वेच्छया निवृत्ती घ्यायला नको.

माझा स्वाभिमान मारून आणि लाचार मनान मला सेवा करायची नाही. पण गुरुजी असं काय झालं? विनय गुरुजींना म्हणाला-

विद्यार्थ्यांच्या सततच्या उर्मठपणाने दिल्या जाणाऱ्या उत्तरांनी मी तुटून गेलोय. स्वाभिमानान आयुष्याची तीस-पस्तीस वर्षे सेवा केली. कधी कुणापुढ लाचार झालो नाही.आजच्या मुलांची बेशिस्त पाहिल्यानंतर कुठतरी माझ मन दुखावलं जात. माझ्या स्वाभिमानाला हे पटणार नाही.आजवर इतकी सेवा झाली;पण कुठल्याही विद्यार्थ्याच उलट उत्तर आणि उर्मठपणा मी पाहिला नाही.

गुरुजी अस्वस्थ झालेले पाहून,विनयला काय बोलायचे कळत नव्हते.गुरुजींचा स्वभिमानी आणि कणखर बाणा विनय लहानपणापासून पाहत होता. निर्भीड बाण्याचे गुरुजी कुणापुढेही झुकणारे नव्हते. विनय काहीतरी बोलणार इतक्यात गुरुजी म्हणाले...

पूर्वीच्या विद्यार्थ्यांना कुठलीही कडक शिक्षा दिली तर; पालक कधीही जाब विचारायला आले नाहीत.शिक्षकांना स्वायत्तता होती;पण आज सगळी उलटी परिस्थिती आहे. अभ्यास का केला नाही म्हणून, परवाच एका विद्यार्थ्याला ओरडलो तर त्याने पालकांजवळ तक्रार केली. दुसऱ्यादिवशी पालक मला जाब विचारायला शाळेत आले.पालकांना मी त्याच्या प्रगतीबद्दल सांगितले त्यावर ते म्हणाले आमचा मुलगा शिकू दे अगर नाही शिकू दे! त्याला हात लावायचा तुम्हाला काय अधिकार? पालकांचा समजूतदारपणा आणि शिक्षकांबद्दलचा विश्वास आणि आदर कमी होत चालला आहे.एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून छडी जरी मारली तरी तो पालकांना तक्रार करतो.

पालक शाळेत येऊन शिक्षकांवर पोलीस केस करण्याची भाषा बोलतात.

विनयला आपल्या शाळेचे दिवस आठवले. एकदा विनयचे बाबा शाळेत आले असताना गुरुजींना म्हणाले होते, गुरुजी आता याला आपल्या ताब्यात दिलेला आहे. हवी ती शिक्षा करा, छड्या द्या, कान पकडा, पायाचे अंगठे धरायला सांगून उभे करा आमची काहीही हरकत नाही पण याच भलं होऊ दे, चांगली प्रगती होऊ दे! असा विश्वास ठेवणारे पालक आता दुर्मिळ झालेले आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही.

विनय जागेपणी स्वप्न तर पाहत नाहीस ना?

नाही गुरुजी!

मग मी बोलतोय त्याच्याकडे लक्ष आहे का? कुठे भटकतो आहेस?

मी जी वस्तुस्थिती सांगतोय ती कदाचित तुला पटत नसेल.

गुरुजी शंभर टक्के मला पटतंय. आजची स्थिती आणि पूर्वीची स्थिती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.

म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे?

गुरुजी, आजच्या पालक आणि विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही सांगत असताना माझ्या बाबांचा चेहरा आणि बाबांनी माझ्या प्रगतीसाठी हवं ते करा. असे सांगून तुमच्याबद्दल दाखविलेला आदर आणि विश्वास मला आठवला. बोलता-बोलता विनयच्या डोळ्यातून अश्रू तरळांयला लागले. गुरुजी, मी तुमच्या भावना समजू शकतो,तुमच्यासारखे निस्वार्थी भावनेने सेवा करणारे शिक्षक मी पाहिलेले नाहीत. परिस्थिती बदललेली आहे आणि परिस्थितीबरोबर माणूसही बदलला आहे पण माणसाने आपली नितीमुल्ये बदलायला नकोत.तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमांचा वापर वाढला आहे पण माणसाने संस्कार का विसरावेत?

गुरुजी स्तब्ध होते. मनावर झालेले घाव विसरता येण्यासारखे नव्हते.पण पुन्हा-पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता. विनय आज चांगल्या पदावर काम करत होता. त्याचा सुखी संसार आणि आनंदी आयुष्य पाहून गुरुजींना समाधान वाटत होते. न राहून गुरुजी विनयला म्हणाले, विनय आज तुझ्या यशस्वी जीवनाचा मला हेवा वाटतो. अनेक विद्यार्थी होऊन गेले पण तुझ्यामध्ये मी जे वेगळपण पाहिलं ते कुणामध्ये नाही.

घरची गरिबीची परिस्थिती असतानाही तू जिद्दीने शिक्षण घेतलस याचा मला अभिमान वाटतो.

गुरुजींनी विनयला जवळ घेतले आणि म्हणाले...

विनय तुला माझ्यामुळे खूपच उशीर झाला.मला माफ कर.

नाही नाही गुरुजी असं काही नाही.

तुम्ही मोकळे झालात तुमचे मन हलके झाले याचा मला आनंद आहे.

माझ्याजवळ हलके होणार नाही तर कोणाजवळ...?

विनय गुरुजींचा निरोप घेवून घरी गेला...

गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते...

----------------------------------------------------------------