पण हे हेरायचं राहून गेलं....!!! Rutuja Umesh Fadke द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पण हे हेरायचं राहून गेलं....!!!

पण हे हेरायचं राहून गेलं....!!!

By : ऋतुजा उमेश फडके

Email Address : phadkerutu26@gmail.com

पण हे हेरायचं राहून गेलं...!!!

“मी श्री.जोशी यांना व्यासपीठावर आपला सर्वोत्कृष्ट हेर यासाठी मिळालेला बहुमानीय पुरस्कार स्विकारण्याकरिता पाचारण करतो.”

टाळ्यांचा कडकडाट आणि वाद्यांचा ताल या सगळ्यांसकट ते वाक्य पुनश्च कानात घुमत होतं. व्यासपीठाची प्रत्येक पायरी आयुष्याच्या पाय-यांची आठवण करून देत होती. तेव्हा मिळालेलं मानपत्र मी पुन्हा पुन्हा वाचून बघत होतो. अभिमानाने उर भरून आला होता. हे मी केलंय किंवा हा पुरस्कार मला मिळालाय यावर खरंतर विश्वासच बसत नव्हता. सगळीकडे कौतुक होत होतं. सगळी प्रसारमाध्यमं सुद्धा याच बातम्यांनी भरलेली होती. पुरस्कार सोहळा संपला आणि मला घरपर्यंत सोडायला गाडी आली. मी मानाने गाडीत बसलो. मला हा मान खरतर नको होता. माझ्या कामाची कुणीतरी दखल घेतली यातच मी भरून पावलो होतो. गाडी भरधाव वेगाने धावत होती तसं माझ्या मनात आठवणींनी पिंगा घालायला सुरुवात केली.

पंतप्रधानांचा मी मुख्य हेर. या हेरपदी निवड होणं हेच मुळात कर्मकठीण. त्यासाठी माझी परीक्षा घेतली गेली. आता ही परीक्षा म्हणजे ती ‘परीक्षा ‘ आहे याची पूर्वकल्पना न देताच ती घेतली जाते. अचानक आपल्यासमोर एक परिस्थिती उभी केली जाते आणि त्या परिस्थितीला आपण कसे वागतो त्यावरून आपली पात्रता ठरवली जाते. त्यात मी म्हणजे अगदीच सामान्य माणूस. विदर्भात राहणारा त्यामुळे सुखाची कधीही झळ न लागलेला. दुःखासोबात पाण्याची सुद्धा किंमत असणारा. शिक्षण बेताचच. शेती तर शहाण्या माणसाने करूच नये आणि त्याहूनही विदर्भात. पैसे कमाविण्याचा काहीच पर्याय सुचत नव्हता. त्यातून काही शिक्षण हातात नव्हतं ना कुठला जातीचा दाखला. नोकरी देणार कोण? आई वडिलांना वाटलं संसाराची जबाबदारी अंगावर पडली की मुलाला अर्थार्जनाची सोय करावीच लागेल. पोटाला चिमटा बसला की मग हात पाय हलवेल. म्हणून त्यांनी माझं लग्न लावून दिलं. झालं. माझ्यासोबात आता तिचीही जबाबदारी अंगावर पडली. पोटाला अनेक चिमटे बसले. आई वडिलही पैसे देईनासे झाले. त्यांच्याकडे तरी कुठे होते म्हणा? अख्या घराची भिस्त माझ्या खांद्यावर. वर्षभर खूप प्रयत्न केले; पण कुठेच यश येईना. अक्षरशः अन्नानदशा. शिक्षण नसल्यामुळे फॅमिली प्लानिंग वैगरे काही माहितीच नाही. त्यामुळे एक मुलंही वर्षभरात पदरात पडलं. बायको एक शब्दही बोलत नव्हती. सगळं मुकाट्यान सहन करत होती. मलाच तिची अवस्था बघवेना.

स्वतःचाच राग आला. पोराच्या नाजूक स्पर्शाने तर काळजालाच हात घातला. पुठच्या क्षणी पोर भुकेने कासाविस झाला. मला आवाज ऐकवेना. मी उठलो आणि घराबाहेर पडलो. आज नोकरी मिळवून यायची असा मनाशी पक्का निर्धार केला आणि भटकत राहिलो. थोड्या वेळाने गावातल्या सरपंचांची निवडणुकीच्या प्रचाराची गाडी येताना दिसली. पांढरे शुभ्र कपडे त्यावर सोन्याच्या असंख्य साखळ्या, हातात वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या. गळा, हात न्याहाळत जेव्हा कपाळावरच्या लांब कुंकूवाकडे पोचलो तेव्हा कळलं तो आमच्या दुसरीतल्या वर्गातला दामू होता. मनात जरा शिव्या घातल्या. त्याने दुसरीतच शिक्षण सोडलं होतं. हा गावाचा सरपंच? त्याने मला बघितलं तसा तो गाडीतून खाली उतरला. मला मिठी मारून म्हणाला “ मला मत दिलंस तर नोकरी देईन.” मला नोकरीची गरज होती. माझं मत त्यालाच गेलं. माझ्या एकट्याच्या मतानं काहीच होणार नव्हतं. पण त्याला बघून राजकारणात जायची दांडगी इच्छा मात्र मनात निर्माण झाली. कर्मधर्म संयोगाने तो निवडणूक जिंकला. मी गेलो त्याच्याकडे. आमच्या भेटीबद्दल सांगितलं. तो म्हणाला नोकरीसाठी मुंबईला जावं लागेल. मी त्यासाठीही तयार झालो. माझा संसाराचा डाव अर्ध्यावर टाकून मुंबईला निघालो. मी निघायच्या आदल्या दिवशी मात्र बायको माझ्या कुशीत खूप रडली. त्या दिवशी ठरवलं हिच्या या अश्रूंना आनंदाश्रूत बदलायचं. निघालो. मुंबईमध्ये येऊन दाखल झालो. नगरसेवकाच्या बॉडीगार्ड पासून सुरु झालेला प्रवास पंतप्रधानांच्या बॉडीगार्ड पर्यंत येउन थांबला. इतक्या वर्षाच्या प्रवासात कधीही चोरी केली नाही की खोटं बोललो नाही. प्रामाणिकपणे काम केलं. मिळालेले पैसे घरी पाठवत होतो. मुलगा शाळेत जायला लागला होता. सुट्ट्यांचा तसा तुटवडाच होता. कधीतरी घारी जायला मिळत होतं; घराची अन्नानदशा नाहीशी झालेली बघून जरा सुटकेचा निश्वास टाकीत होतो.

असाच रोजच्यासारखा सकाळी उठून साहेबांच्या घराबाहेर येऊन उभा राहिलो. तेवढ्यात बातमी आली की विधानभवनामध्ये बॉम्बस्फोट झालाय आणि ५० जण मृत्युमुखी पडले. आम्हाला घटनास्थळी काही जाऊ दिलं नाही. तिथे जाण्याची वेगळ्या माणसाची व्यवस्था केली गेली. मी हादरलोच होतो. लगेचच आम्हा सगळ्या बॉडीगार्डस् आणि नेत्यांची मिटिंग घेण्यात आली. जवळजवळ सगळे नेते होते पण आमचे साहेब नव्हते. थोड्या वेळाने कळलं की साहेबांना मुद्दामच बोलावणं धाडलेलं नाही. एका अधिकाऱ्याने धक्कादायक बातमी दिली की या स्फोटात पंतप्रधानांचा हात आहे आणि ही सभा त्यांना अडकविण्यासाठी भरविण्यात आलेली आहे. त्यामुळे जो यासाठी तयार असेल त्यांनीच इथे थांबावं जो तयार नाही त्याने नोकरी सोडून द्यावी.

मला ब्रह्मांड आठवलं. मी गेली ६-७ वर्ष साहेबांसोबत काम करत होतो. भवनामध्ये शिरताना त्यांनी माझ्याकडे बघून केलेलं हास्य मला आठवत होतं. माझ्या प्रत्येक अडचणीला ते धावून आलेले होते. इतकं मोठं पद हातात असून सुद्धा माझ्यासारख्या माणसाला त्यांनी वेळोवेळी मदत केलेली होती. अशा माणसाशी प्रतारणा करणं मला पटत नव्हतं. तरीही दुसरा प्रश्न होताच की बॉम्बस्फोट घडवून आणणा-या अतिरेक्याला असं मोकाट सोडावं? साहेबांना मी जितका ओळखतो त्यावरून त्यांनी हे करणं शक्यच नव्हतं. ज्या हातांनी त्यांनी लोकांचं कल्याण केलं त्याच हातांनी ते लोकांना मारतील? अशक्य. पण कोण जाणे कुणाची मति केव्हा फिरेल? पैशाच्या आमिषाने तर नव्हे? बुद्धी मनाशी भांडत होती. कुठेतरी ऐकलं होतं की मन नेहमीच योग्य सल्ला देतं. मनाचं ऐकायचं ठरवलं. सगळा धीर एकवटून उभा राहिलो आणि सांगितलं ‘मी नोकरी सोडायला तयार आहे.’ त्यानुसार माझी नोकरी गेली. आता काय करावं? घरातल्या सगळ्यांचे चेहरे दिसायला लागले. बायकोच्या अश्रूंमुळे ओला झालेला शर्ट आणि माझ्या तान्ह्या मुलाचा पहिला स्पर्श...सगळं सगळं आठवलं. अंगावर काटा आला; पण काहीच करू शकत नव्हतो. विचार करत झोप लागली. दुस-या दिवशी फोनच्या रिंगने जाग आली. साहेबांचा फोन होता. त्यांच्याकडून बोलावणं आलं होतं. अरे बापरे! आता आपण हे बाहेर कुठे सांगू नये म्हणून हे आपल्याला मारणार की काय? पोटात मोठा गोळा आला. कसाबसा साहेबांच्या केबिन मध्ये घुसलो.

त्यांनी बसायची खूण केली. मी बसलो. अंग थरथरत होतं. साहेबांनी ड्रोवर उघडला. मला वाटलं पिस्तुल काढतायत ;पण साहेबांनी एक पाकीट बाहेर काढलं. मी न राहून लगेच उघढून बघितलं. तर माझी त्यांचा मुख्य हेर म्हणून नेमणूक झाली होती. मी चमकलो आणि हा सगळा काय प्रकार आहे हे विचारल्यावर ते म्हणाले बॉम्बस्फोट झालाच नव्हता. हे सगळं मुद्दाम घडवून आणलेलं होतं. ही हेर नेमण्याची पद्धत आहे.

तर तेव्हापासून ६-७ वर्ष साहेबांचा हेर म्हणून काम केलं. संसाराकडे दुर्लक्ष झालच. माझा आणि तिचा संवाद खुंटला. सगळी साधनं होती ; पण त्यांचा वापर करायला वेळच नव्हता. पुरस्कार मिळाला त्या दिवशी वटपौर्णिमा होती गावात सगळ्यांप्रमाणे हिनेही व्रत ठेवलं होतं. माझा व्रतवैकल्यांवर फारसा विश्वास नव्हताच ; पण मी तिला कधी अडवलं नाही. तर तिने माझ्यासाठी आजही व्रत केलेलं असणार हे माहित होतं. गाडी घराजवळ पोचली. मनात चलबिचल चालू झाली. या व्रतांची पूर्ती कशी करावी? मी लायक आहे का या अशा व्रतांसाठी? काय म्हणून हिच्या समोर जाऊ? इतक्यात मी दाराशी पोहचलोच. स्वागतासाठी खूप लोक होते. माझ्या हातात पुरस्कार होता आणि तिच्या हातात आरतीचं ताट. तिच्या व्रतांचं हे फळ होतं यात काही शंकाच नाही. मला तिने मनोभावे ओवाळलं. ओवाळताना तिच्या डोळ्यातले आनंदाश्रू मी पहिले आणि क्षणभर सुखावलो त्या दिवशीच्या तिच्या रुपावरही भाळलो. मला तिची माफी मागायची होती. मनात म्हंटल, ‘सगळं हेरलं पण तुझं मन मात्र हेरायचं राहून गेलं...’ तिला बहुतेक माझ्या मनीचे भाव पोहोचले. हातातलं तामण आईच्या हातात देऊन तिने मला वाकून नमस्कार केला. तिचा अश्रू माझ्या पावलावर ओघळला. माझा खरा पुरस्कार मला मिळाला.

  • ऋतुजा उमेश फडके