Ctrl-Undo-Redo books and stories free download online pdf in Marathi

Ctrl-Undo-Redo

Ctrl-Undo-Redo

By: ऋतुजा उमेश फडके

Email Address: phadkerutu26@gamil.com

Ctrl-Undo-Redo

स्वराने डोक्यावरची ओढणी झपकन काढली. घड्याळ पाहिलं. बापरे केवढा हा उशीर? पण असं फक्त मनानेच म्हटलं. शरीर घाई करायला तयारच नव्हतं. तिने जरा हालचाल केली तेव्हा तिला कळलं की तिचं अंग जरा आखडलय. मान गोल गोल फिरवताना तिला जाणवलं की ती खुर्चीवर बसल्या बसल्या झोपली होती. कुणाचीतरी वाट बघत होती. मग हळू हळू तिला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागयला लागला. तिने चटकन mobile हातात घेतला, तर mobile वरही कुठल्याच message चा pop-up नव्हता. तिला प्रचंड चीड आली स्वतःचीच. तिने लगेच तिच्या contact list मध्ये जाऊन ‘त्याचा’ नंबर delete केला आणि net off करून टाकलं. तिला कुणाशीच बोलायचं नव्हतं. एकटं राहायचं होतं,तिच्या जगात. तिने एकदा घराकडे कटाक्ष टाकला. घर तसच सजलेलं होतं. तिच्या मनासारखं आणि त्याला आवडतं तसं.

समोरच्या टेबलावरच सुंदर फुलांनी सजलेला फ्लॉवर पॉट ठेवलेला होता. सगळी फुलं कोमेजलेली होती; पण त्यांचा सुगंध तसाच होता. सोफ्याची कव्हरं, पडदे सगळं तसच होतं कालच्यासारखं; पण काल जसं ताजं-तवानं दिसत होतं तसं आज दिसत नव्हतं. समोरचं show-case तसचं होतं लावलेलं, नेटकं पण रात्रभरात त्यावर धूळ साठली की काय असं उगीचच वाटत होतं. air-freshner चा सुंगंधही मंदावला होता. सगळं तसच होतं. पण एका दिवसात कोमेजलेलं. स्वराच्याही मनाची काहीशी तशीच अवस्था झाली होती...काल तीही सजलेली होती;पण आज पूर्णपणे कोमेजलेली होती. तिच्या मनावर धूळ साचली होती. भीतीची. भिंतीना मिठी का मारता येत नाही? याचं तिला आजच्या इतकं दु:खं कधीच झालं नव्हतं. दु:ख कुरवाळत बसण्यात काही अर्थ नाही असा विचार करून ‘त्याचा’ काही message आलाय का बघायला म्हणून तिने पुन्हा net on केलं. whats-app वर धडाधड messages धडकले. मघाशी एकही pop-up नव्हता आता ५ मिनिटांमध्ये एवढे messages? तिच्या आशा पल्लवित झाल्या. तिने सवयीने त्याचेच असतील म्हणून पटकन फोन हातात घेतला. अर्थात व्यर्थ. बॉस... आजच्या कामाचं schedule.

स्वरा पेशाने पत्रकार होती. सतत कशाचा न कशाचा तरी शोध घेत असायची. सगळ्याच शोधात सत्य शोधत असायची. विखुरलेल्या गोष्टी सावरायची तिला सवय. नोकरीतही ती सवय फार उपयोगी पडली. कामासाठी खूप माणसांच्या भेटी व्हायच्या. माणसांचा संग्रह तसा बराच होता. त्या संग्रहातही ती चोखंदळ. पडखर,सडेतोड ; पण आज तिला तिच्या स्वभावातलं काहीच आठवेनासं झालं होतं. ३-४ ताप उतरल्यावर कसं गळल्यासारख होतं तसं काहीसं तिला होत होतं. घश्याला कोरड पडली होती;पण पाणीही घशाखाली उतरत नव्हतं. त्यात बाहेर जोरदार पाऊस पडायला लागला...काल रात्रीही पाऊस पडत होता;पण तो तिला हवाहवासा वाटत होता...आज अगदी नकोसा वाटत होता...तिने उठून आधी खिडकी बंद केली. नको असलेल्या गोष्टी मुद्दाम झाकायच्या ठरवल्या ना की त्या मुद्दाम आपल्या समोर येऊन मनाला चटका लाऊन जातात. खिडकीपाशी तिने मोगऱ्याचे गजरे ठेवले होते. पानात बांधून. ते गजराही वाळला होता. तिने पुन्हा खिडकी उघडली,पावसाचे चार थेंब त्या गज-यांवर शिंपडले. नासलेल्या दुधात कितीही साखर घातली तरी ते गोड लागेल का? ती हताश होऊन पुन्हा येऊन खुर्चीवर बसली. एकटेपणा अंगावर येत होता तिच्या. सत्य पचवणं महाकठीण हेच खरं. पुन्हा तिने mobile हातात घेऊन बघितला पण व्यर्थ. बरं काम करणं भाग होतं. नाहीतर पैशाशी पंगा. जगाची उलथापालथ झाली तरी ‘पैशाशी’ पंगा घेणं तिला परवडणारं नव्हतं. एकटी राहत होती. स्वःताचा खर्च स्वतःलाच भागवायचा होता. शेवटी सगळी officeची तयारी करून ती कशीबशी त्या सजलेल्या घराला कुलूप लावून घराबाहेर पडली. सजलेल्या घरासोबत काल रात्री सजलेली स्वरा सुद्धा आतच अडकून राहिली. तिला बाहेर पडायचं होतं तिची खूप घुसमट होत होती. काल सुट्टी टाकल्यामुळे कामाचा ढीग असणार यात काही शंकाच नव्हती. कामाचा विचार करत करत तिने ट्रेन पकडली. कामाच्या व्यापात क्षणभर ती ‘त्याला’ विसरली होती. बसायला छान खिडकी जवळची जागा मिळाली. कानाला head-phones लावून स्वर छान टेकून बसली. नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे खिडकीतून गार वारा येत होता. पाऊस आणि वारा कलंदर. तो आपल्याला वेळेला कोसळत असेल आणि वाहत असेल हो; पण आता स्वराची मनस्थिती बघता, गार वारा पुन्हा दुःखाचं सावट घेऊन येणार यात शंका नव्हती. वा-याच्या पहिल्या स्पर्शाबरोबर तिला त्याचा आवाज आणि शब्द आठवले

“ स्वरा...येतोय मी...आज...तुझ्या घरी...निवांत बोलू...सगळ्या प्रश्नांचा सोक्ष-मोक्ष लावून टाकू. एका सुंदर आयुष्याला सुरुवात करू.”

कसलं सुंदर आयुष्य? आणि प्रश्नांचं म्हणाल तर त्याने न येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली होती. सगळ्याचाच सोक्ष-मोक्ष लावला होता. सगळं अर्धवट टाकून निघून गेला होता. इतक्यात FM वर गाणं लागलं... ‘ उसे मुक्कमल कर भी आओ...वो जो अधुरीसी बात बाकी है...वो जो अधुरीसी याद बाकी है...फिर ले आया दिल..’ स्वराच्या अंगावर सरकन् काटा आला. गाणं ऐकता ऐकता तिने ‘त्याचा’ delete केलेला नंबर पुन्हा save केला. फरक इतकाच होता,आता तो नंबर त्याच्या आडनावासकट save होता. खरतर ‘त्याचा’ नंबर तिला पाठच होता;पण save असेल तर whats app वर जाऊन त्याचा status चेक करण्याची, ‘तो आपल्या तर लागू होत नाही ना?’ हे बघण्याची तिला खोड होती. नंबर पुन्हा save करताना तिच्या मनात खोलवर कुठेतरी गलबललं. आजची मनाची तगमग आणि कालची मनाची तगमग यात किती फरक होता?

तिची आणि त्याची फारशी ओळख नव्हती. वर्षभराची ओळख. तेवढ्या ओळखीत सगळं बदलेलं होतं. अर्थात् त्यांनी लग्नाचा निर्णय अजून घेतलेलाच नव्हता. स्वराच्या एका assignment साठी त्यांची भेट झाली होती. तो चित्रकार होता. खूप सुंदर चित्र काढायचा. त्याच्या मनातले सगळे विचार त्याच्या चित्रात दिसायचे, जिवंत व्हायचे. त्याने तिलाही चित्रातूनच मागणी घातली होती. त्याच्या विचारांवर आणि चित्रांवर तिचं प्रेम जडलं होतं. assignment च्या नावाखाली भेटी वाढत गेल्या. त्यामुळे तिने एका सुंदर चित्रासारखं स्वतःचं आयुष्य त्याच्यासोबत रंगवलं होतं; पण काहीसं चित्र अर्धवट होतं तेच कदाचित आज पूर्ण होणार होतं. त्यांच्यात स्पष्ट बोलणं असं काहीच होत नव्हतं आणि तेच आज होणार होतं. तो त्याच्या मनातलं आणि ती तिच्या मनातलं सगळं...एकमेकांना सांगणार होते. काल तिचं मन मुळीच स्थिर नव्हतं. ‘तो’ घरी येणार या आशेवरच तिचं मन हिंदोळे घेत होतं. घर लावताना आमच्या दोघांचही असच घर असेल ते आम्ही ‘दोघेच’ कसं सजवू? त्यात मी काय काय कुठे कुठे ठेवेन? सगळं सगळं ती तिचं घर आवरताना ठरवत होती आणि ती तिच्या मनातलं ‘त्याला’ कसं सांगेल? यांची ती वारंवार practise करून बघत होती...स्वतःशीच बडबडत होती. स्वतःच धुंदीत घर आवरता ती जोरदार भितीला आपटली...स्वराने स्वतःला सावरलं आणि खुर्चीत बसून ‘तो’ येणाऱ्या क्षणाची आणि त्याची वाट बघत राहिली.

सहा महिन्याच्या काळात बरंच काही घडून गेली होतं. खुर्चीवर बसल्या बसल्या ती त्या काळात गेली. त्याने त्यांच्यात काही नसताना सुद्धा एकदा तिच्याकडे पैसे मागितले होते. तिने मागचा पुठचा विचार न करता त्याला ते देऊनही टाकले होते वर ‘त्याच्याजागी कुणीही असता तरी मी हेच केलं असतं’ हे उत्तरही. ती चूक त्याच्या लक्षात येऊन त्याने तिची त्याबद्दल माफीही मागतली होती. स्वराचं मन पुन्हा विचार करायला लागलं त्या घटनेवर. ‘का मागितले असतील त्याने पैसे? त्या अशी सवय आहे का लोकांकडे पैसे मागायची? की त्याला खरच त्या वेळेला गरज असेल पैशांची? मग त्याने मला मी कारण नंतर सांगेन असं का बरं म्हंटल असेल? हां..म्हणा त्याने मला सांगितलंही होतं कारण..त्यावर माझा विश्वासही बसला नव्हता खरा... मग मी का दिले पैसे त्याला? आमचं लग्न झालंच समजा उद्या आणि ह्याने कुणाकडे पैसे मागितले तर चालतील माझ्यासारख्या स्वाभिमानी मुलीला?’

स्वराने आपण नंतर भेटू...असा message करायला तेव्हा फोनही घेतला होता हातात पण ‘नंतर भेटू’ च्या जागी ‘कुठेस ?’ असा message पाठवला गेला. का? तिला नक्की काय हवं होतं ? त्याच्यावर विश्वास नव्हता असं नाही पण होता असही नाही. त्याच्यासोबत assignment करताना त्याचा स्वभाव ती पडताळून पाहत होती ; बरेच काटे कुटे होते,तिला न आवडणा-या गोष्टी होत्या. त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याचं ‘फक्त स्वतःपुरत जगणं.’ तिचा स्वभाव मुळीच असा नव्हता आणि आवडलेली म्हणजे त्याची चित्र आणि त्याचे विचार...विचारांनी तिला जिंकला होतं...ते चित्रापुरातेच मर्यादित होते हे तिला माहित नव्हतं.

त्याची वाट बघता-बघता तिला गाढ झोप लागली. जाग आली तेव्हा १२ वाजले होते आणि तरीही ती एकटीच होती. तिने mobile चेक केला..’कुठेस?’ हा message टाकून ही बरेच तास उलटून गेले होते. टेबलावर मांडलेलं जेवणही गार झालं होती. बरं तो बेल वाजवून वाजवून थकून परत जाणंही शक्य नव्हतं कारण तिची झोप सावध होती आणि आज नेहमीपेक्षा जास्त सावध. तिने फोनचा सपाटा लावला. पण फोन switched off. तिला काही सुचेनासं झालं. शन्नांच्या गोष्टीतल्या प्रियकारासारखा ‘ रात्र वेडी असते शहाणी असते ती सकाळ’ असा विचार करून तो सकाळी येईल असं तिला वाटलं. म्हणून ती पुन्हा खुर्चीवर झोपून गेली. झोपण्या आधी त्याच्या मित्रांना message करून ठेवले. सकाळी जाग आली तरी हा नव्हताच. आता घरात अडकलेली स्वरा होती. सगळा प्रकार आठवून स्वराच्या पापण्या पाणावल्या. अश्रू ओखळत नव्हते कारण ते गोठले होते त्या सजलेल्या घरात. वरकढी त्याच्या मित्राचा message – ‘अगं, तो आणि मी काल एका पार्टीला गेलो होतो एका lounge मध्ये. त्याने सांगितलं नव्हतं का तुला?’ स्वराचा संताप वाढला. कारण कळत नव्हतं तोपर्यंत ती बरी होती. हे कारण खोटं असावं तिला सारख वाटतं होतं;पण दुर्दैवाने तसं नव्हतं. ‘त्याच्या’ या व्यसनाबद्दल तिला ‘त्याने’ सांगितलेलं होतं; पण मी occasionally घेतो असं सांगितलं होतं. त्याचे occasions सारखे सारखे येतात हे तिला आजच कळलं होतं. त्याहूनही आपली कुणीतरी आतुरतेने वाट बघतय त्याहीपेक्षा पार्टी ‘त्याला’ महत्वाची वाटते याचंही आश्चर्य वाटत होतं. तिला स्वतःचीच लाज वाटत होती; पण मन स्वतःला मूर्ख म्हणायला तयार होत नव्हतं.

ट्रेनने स्टेशन बदललं तसं हिने ‘त्याचा’ no. पुन्हा delete केला. तो फोन मध्ये block झाला;पण मनातून विचार जात नव्हता...आपण अशा माणसावर का प्रेम केलं असावं? त्याचा बेजाबदारपणा माहित असूनही? सगळ्यांना कुणीतरी आहे म्हणून? की स्वतःचं आयुष्य secure व्हावं म्हणून? की फक्त दाखवायला मला पण कुणीतरी आहे. आपण इतके बेधडक असूनही अशा माणसाच्या मोहात का पडलो? मी इतकी काम्कुवात झालीये का की मला कुणाच्यातरी आधाराची गरज आहे? पण असा मुलगा माझा आधार होऊ शकतो असा मी विचारच कसा केला? माझं मन मला सांगत होतं, ‘स्वरा कुठेतरी काहीतरी चुकतंय’ हे ही आपण न ऐकावं? मुळात त्याच्या प्रेमात पडलो की त्याच्या चित्रांच्या? वय अल्लड? त्याच्या बद्दलची प्रत्येक गोष्ट स्वरा मूर्ख आहे हेच सिद्ध करत होती; पण स्वरा स्वतःला मूर्ख म्हणूच शकत नव्हती. ट्रेन थांबली. स्वराची उतरायची वेळ झाली. उतरता उतरता तिला त्याचाही बेजाबदारपणा ठळकपणे दिसायला लागला. तेव्हा सहज तिने स्वतःला मूर्ख म्हणून स्वतःच्याच डोक्यात टपली मारली.

तिला प्रत्येक गोष्टीत स्वतःला निरखून बघण्याची खूप सवय होती. ती सवय आजही तिने आजमावली. ‘नशीब सगळं आत्ताच कळलं...लग्नानंतर कळलं असतं तर?’ या भावनेने जखमेवर फुंकर घातली. स्वतःला थोड्या शिव्या घालत थोडी शाबासकी देत स्वरा office च्या गेटवर पोहोचली. आत्ता सजलेलं घर आपण पुन्हा आहे त्याच्यापेक्षा छान सजवू या विश्वासानिशी तिने कॅबीन चा दरवाजा उघडला. तर समोर ‘तो’ दत्त म्हणून उभा. त्याची नेहमीची सवय होती. असं काहीतरी विचित्र वागायचं आणि मग भेटून, गोड बोलून सगळ्याची सारवासारव करायची आणि स्वराला पुन्हा भुरळ घालायची. पण आज स्वराला सगळं माहित होतं ती त्याच्या कुठल्याही बोलण्याला भुलणार नाही अशी तिने मनाची तयारी केली. क्षणभर तीही ‘त्याला’ बघून बिचकली;पण तिने स्वतःला सावरलं. त्याचे डोळे बरंच काही सांगत होते;पण तिला ते पहिल्यांदाच वाचता येत नव्हतं. किंबहुना वाचण्याची इच्छाही नव्हती. तिने ‘त्याच्या’ समोरून जाऊन टेबलावर हातातलं सगळं सामान ठेवलं. बॉस ला नेऊन दाखवायची file उचलली आणि कॅबीन मधून निघून आली. ‘तो’ फक्त हाका मारत उभा होता. स्वराच्या मनात मात्र दुसर-या सजलेल्या घराची स्वप्न रंगत होती. त्याच्या चित्रापेक्षाही सुंदर.

ऋतुजा उमेश फडके phadkerutu26@gmail.com

इतर रसदार पर्याय