Baba books and stories free download online pdf in Marathi

बाबा

बाबा

"हॅलो बाबा,

काय करतोयस रे ? इकडं येत का नाहीस तू ? आई म्हणते खूप काम असत तुला आणि काम पूर्ण करावंच लागत नाहीतर तुझे साहेब ओरडतात तुला, आमच्या बापट मॅडमसारख्या, पण त्या साहेबाना एवढं कळत नाही का रे कि त्या कामामुळं मला तू कित्येक दिवस दिसलेलाच नाहीयेस ते. असं करत का कुणी ?

माझ्या सगळ्या फ्रेंड्स कायम आपापल्या बाबांना घेऊन येतात आणि मी मात्र सारखं आईलाच घेऊन जायचं होय रे ? बाकीच्यांना त्या रोलर कोस्टर ride मध्ये बसता येत कारण बाबा असतो त्यांच्याकडं, आपली आई किती घाबरते माहितीये ना तुला त्या ride ला मग मला फक्त बघत बसावं लागत ते दंगामस्ती करत असतात ते आणि तिकडं कुणी तुला सांगत नाही का रे कि तुम्ही कधी जाणार आपल्या मुलांकडं ? तुम्ही लवकर जावा तुमची वाट बघत असतील असलं काही ? सांगत असतील न ? तूच ऐकत नसशील हो ना ? हट्टी कुठला

आई म्हणते तिकडं खूप जंगल असत आणि खूप थंडीपण असते म्हणून मी तिकडं यायचं कॅन्सल केलं नाहीतर मी तुला इकडं घेऊन यायला येणारच होते. ए बाबा, तुला जंगलात वाघ सिंहाची भीती नाही का वाटत ? म्हणजे असं आपल्या समोर येतील आपल्याला खाऊन टाकतील अशी ? तू शूर आहेस माहितीये मला, त्या आपल्या दंगेखोर काणे काकू तर पळूनच जातात तुला पाहिलं कि !

तुला माहितीये, आपली प्रिया ताई परवा तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तिचे आई आणि बाबा तर कित्ती रडत होते, तिला असं मला तू जवळ घेतोस तस तिचे बाबा जवळ घेत होते पण तिनं ऐकलंच नाही, ती गेली तशीच त्याच्या गाडीत बसून.मला रागच आला तिचा, पण आई म्हणली तुलापण असंच जायचंय एकदिवस नवऱ्याबरोबर. बाबा मी नाही जाणार मी इथंच थांबणार वाटल्यास त्याला पण आपण ठेवून घेऊ पण बाबा तू येशील ना तोपर्यंत तरी ?

बाबा आई म्हणते तू ना तिकडे जाऊन सगळ्यांची शत्रूंपासून रक्षा करतोस आणि तू तिकडं गेल्यामुळं मग कुणाला भीती वाटत नाही पण आईला घरी यायला उशीर झाला तर मलापण भीती वाटते मला नाही आवडत असं एकटं घरात बसायला मग तेव्हा माझ्यासोबत का नसतोस तू ?

ए बाबा, Love You म्हणजे काय रे ? आपला दादा सारखा सारखा फोनवर बोलताना म्हणत असतो तस कुणालातरी.

बाबा तू कधी येणार ?

बापट मॅडम म्हणतात मी जर तुझी आठवण काढली नाही तर सगळे मला brave म्हणतील मला नाही व्हायचंय brave मला तू हावाय्स फक्त....

आपली किती किती काम राहिलीयेत ना अजून ?

मला आई एक्सट्राची पाणीपुरी देत नाही, लेट नाईट ला ice cream खाल्लं कि मी सापडते, आईनं मला किती वेळ झाला तरी नवीन गेम घेतलेला नाही, मला ती फुटबॉल खेळायलापण जाऊन देत नाही, आपण किती दिवसात running race ला गेलेलो नाहीये ते श्रावणीचे बाबा म्हणतात मला रेस लावूया म्हणून, मला नाही जायचं कुणासोबत मला तूच पाहिजेस....बाबा कधी येणार तू ?

बाबा तू शिकवलंयस तस मी आई रडायला लागली कि तिचे डोळे पुसून तिला सांगते कि तू लवकर परत येणारेस पण कधी कधी आईनं मारलं कि मला तुझीच आठवण येते आणि मग खूप खूप रडायला येत..

मी तुझ्याकडं गेमचा हट्ट नाही करणार, शाळेतपण रोज जाईन, सकाळची शाळा असली तरी चुकवणार नाही, रोज व्यायामपण करिन, looser सारखं कधीच नाही रडणार, सगळ्यांशी दोस्ती करिन, माझ्या बॅटने कुणालाच नाही मारणार, अभ्यासपण करिन पण बाबा ये ना...

बाबा आपला दादा ते तुझ्यासारखे कपडे घातले ना कि सेम तुझ्यासारखा दिसतो त्याचीपण बॉडी तुझ्यासारखीच आहे आणि यावेळी पंजा Fight ला मी त्याचा टीम मधून असणार हां तू उगाच रागावू नकोस...तो म्हणतो तो तुझ्यासारखाच होणारे आणि तुझ्या जवळ येणारे पण एवढी बॉडी करुन पण तो कधी कधी 'छोटू' असल्यासारखा रडतो अरे !!

बाबा, हे सगळं तू आईला सांगू नको हां ती मला ओरडेल तुला त्रास दिला म्हणून...तिला तुला त्रास दिलेला आवडत नाही कारण तिचापण तू फेवरीट आहेस जसा माझा आहेस तसा !

बाबा ऐकतोयस ना....कितीवेळा सांगू रे तुला...तू गेल्यापासून मला बबडी कुणीच नाही म्हणत ....बाबा ये रे...."

"काय ग रश्मी, इथं अंधारात काय करतीयेस ?"

"अगं, नाही काही नाही, माझा कप्पा आवरत होते, उद्या सकाळी परत गडबड होईल ना"

"हो ना, उद्या चांगलीच गडबड असेल, त्याचा फोन आला का ग ? आजचीच रात्र मध्ये उद्यापासून तू त्याच्याच घरी जायचीस ! काय मग कस वाटतंय मॅडम ? मन में लड्डू वगैरे हा...?"

"आणि तुम्ही डायरेक्ट मुंबई ला निघणार का ग कि आहेस पुण्यात काही दिवस ?"

"आता असं कस सांगेल ती त्याला विचारावं लागेल ना !"

ती बडबड चालूच राहिली,

तिचं लक्ष मात्र त्या जुन्या चिट्ठीकडं आणि भिंतीवरून काढून बॅगेत ठेवलेल्या तिच्या बाबाच्या फ़ोटोकडं होत..…

***

इतर रसदार पर्याय