Wada books and stories free download online pdf in Marathi

वाडा

वाड्याचे दरवाजे उघडेच होते.… कोनाड्यातले दिवे टिमटिम करत जळत होते.. आता संध्याकाळ रात्रींकडे झुकत होती... सहसा असं होत नाही पण आज मला अवेळीच झोप लागली.. इतकी गाढ झोप मला लागत नाही आणि एरवी माझ्या पलंगाशिवाय मी झोपत नाही पण आज जाग आली तेव्हा चक्क माईच्या पलंगाशेजारी जमिनीवर पसरलेला होतो... सारवलेल्या जमिनीवर झोप छान लागते. ती फरशी वगैरेची सोय अगदीच नावापुरती वाटते... त्यापेक्षा आपली जमीनच बरी.. कमीतकमी १०० वर्षाचा आहे आमचा वाडा.. आत्ताही ठणठणीत आहे.. त्यावेळची बांधकामच तशी होती म्हणा...

आता शांतता असली तरी मागच्या १०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत वाडा कायम गजबजलेला असायचा... वाड्यातल्या सगळ्या बिर्हाडकरूंचं एकच अखंड कुटुंब होत ! आम्ही वाडा अगदी मागच्याच वर्षी सोडला.. सुस्थितीत असला तरी घरातल्या नव्या विचारांच्या लोकांना आता बदल हवा होता.. मग सगळ्यांच्या एकमतानं आमचं सामान मळ्यातल्या नवीन घरात हलवलं... पण मी आजही इथंच रमतो.. एकटा असलो तरी मला हा वाडा, इथल्या खोल्या, इथल्या आठवणी, इथलं आड, परसातली बाग, मंदिरातले दत्त महाराज, हे सगळे सोबत करतात ! आता घरातले, गावातले अनेकजण मागास, मागच्या पिढीचा असं बरंच काही म्हणतात पण मला इथलं वातावरण नाही सोडाव वाटत.. मग मळ्यातलं काम संपलं कि थेट इकडचं येतो... एकूण ११ खोल्यांमधल्या मागच्या दोन सोडल्या तर बाकी व्यवस्थित आहेत..

माझं खूप प्रेम आहे या वाड्यावर.. इथं आठवणी आहेत माझ्या.. तशा आमच्या घरातल्या प्रत्येकाच्याच आहेत पण ते कसे विसरलेत मला नाही माहिती.. सगळे रमलेत तिकडेच.. मळ्यात...

आज्जी गेली तेव्हा सगळा गाव लोटलेला इथे.. मोठी धैर्याची होती बाई.. आजोबा म्हणजे तिच्या भाषेत अगदी 'तुकाराम' होते ! त्यामुळं कधी कुणाला घरी जेवायला घेऊन येतील त्याचा पत्ता नसायचा.. आमच्याकडं रात्रीच्या जेवणाला दोघेतिघे तरी नवीन लोक असायचेच.. आजोबा शाळेत मास्तर होते. पण अगदी जगन्मित्र ! त्यांच्या घरी आमच्या आज्जीसारखी बाई होती म्हणूनच त्यांच्या नावावर थोडीफार शिल्लक पडली आणि इतक्या जणांचे संसार उभे राहिले..

आजोबा लवकर गेले... तसे वाड्यातले लोक कमीच झाले.. बाबांना लोकांची आवड असली तरी ते आधी शिक्षणामुळं आणि नंतर नोकरीमुळं बाहेरच जास्त राहिले.. गावाशी तसा कधी त्यांनी संपर्कच येऊ नाही दिला.. काकांना कधीच या वाड्यात राहायचं नव्हतं पण जोपर्यंत इलाज नव्हता तोपर्यंत ते राहिले.. त्यांच्या मित्रांची थोडीफार ये-जा असायची वाड्यात... पण मी शिकलो तर गावातच राहून शिकेन असा हट्ट केला आईबाबांकडं आणि मग इथंच राहिलो कायमचा !आज्जी भजनं फार छान म्हणायची... दिवसभर हुंदडून झाल्यावर संध्याकाळी हातपाय धुवून आम्ही मंदिरात आज्जीसमोर बसायचो.. शुभंकरोती, पर्वचा झाली कि आम्ही आज्जीच्या मागं लागून भजनं म्हणायला लावायचो ! तो आज्जीचा आवाज अजून घुमतोय कानात !

संध्याकाळ झाली कि आमचं मित्रमंडळ हजर व्हायचं वाड्यावर.. आमची गप्पा मारायची अगदी हक्काची जागा होती हि… आमचा अतुल साने म्हणजे सगळ्यात हुशार.. त्याच्या खालोखाल सुऱ्या पाटील, आणि मग आम्ही सगळे काठावरचे ! शाळेपासून ओळखतो आम्ही एकमेकांना.. शाळेत जायच्या वेळी सगळे अंगणात वाट बघत असायचे.. माझं कधीच शाळेच्या वेळेत आवरलं नाही.माझं आवरलं कि आमची फौज वाड्यातून बाहेर पडायची ! वाड्यावर जमायची ती सवय अजून आमच्या कळपाने कायम ठेवली होती.. संध्याकाळी मंदिरातली समई लावून सोप्यात आमची बैठक जमते... काहीजणं आता शहरात असतात.. पण सुट्टीला आले कि हमखास इकडं चक्कर मारतात..

आमच्या वाड्याची ओळख आजोबांमुळे, आज्जीमुळं आणि आमच्या दत्तमहाराजांमुळे आहे ! वाड्यातच काय पण गावातल्या कुठल्याही घरात काही शुभकार्य असलं कि पाहिलं आमंत्रण त्यांनाच जातं ! वाड्यात तर कुठलीही नवी वस्तू आणली कि ती पहिल्यांदा त्यांच्यासमोर ठेवून नमस्कार करायचा आणि मगच ती वापरायला सुरुवात करायची ! श्रद्धा-अंधश्रद्धा यातलं ते जे असेल ते असेल मला त्यात खोलात जायचं नाही पण मला वाटत कि ज्यामुळं कुणाचं वाईट होत नाही ती अंधश्रद्धा नव्हेच मुळी.माझी भक्ती फार ओसंडून वाहणारी नसली तरी बरं वाटतं तिथं जाऊन बसल्यावर.

आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा तुम्ही सगळ्यांना भेटूपण शकता आणि त्यांच्याशी बोलूपण शकता मग ती लोकं त्यावेळी या जगात नसली तरी.ती वेळ आलीये माझ्या आयुष्यात, मागच्याच महिन्यापासून. आज्जी, आजोबा, माझे सगळ्यात मोठे काका, सगळ्यांशी बोलतो मी, त्यांच्याकडेपण खूप आठवणी आहेत या वाड्याच्या !

ज्या दिवशी मला या सगळ्यांशी बोलता यायला लागलं त्यावेळी जमली होती बरीच माणसं इकडं... सगळ्यांच्या तोंडात माझंच नाव होतं ! माईच्या खोलीतून ते मलाच उचलून घेऊन जातायत असं वाटलं त्यांना... .पण मी कसला जातोय हा वाडा सोडून ! जे जळालं ते शरीर होतं... मी मागं उरलोच पुन्हा !

माणसं उगाच बोंबलतात या वाड्याबद्दल आणि इथल्या भुताटकीबद्दल वगरे पण एक कार्ट आलं होतं परवादिवशी अगदी जिन्यापर्यंत आलं होतं... मी हाकपण मारली त्याला पण मला बघून जे धूम पळत सुटलं कि काही बोलायला नको ! रात्री मळ्यातपण बोंब ठोकली एकानं !

मला लहानपणापासूनच या वाड्याबद्दल खूप कुतूहल होतं, आजही आहे म्हणजे बघा ना, कशी सुरुवात झाली असेल हि इतकी मोठी वास्तू बांधायला ? या इतक्या जाडजूड भिंती आहेत आणि सिमेंट न वापरता बांधलेल्या असूनपण अजून इतक्या भरभक्कम आहेत. दारात आड आहे, दत्तमंदिर आहे आजूबाजूला बरीचशी झाडं आहेत, जगायला लागत ते अगदी सगळंकाही आहे ! फक्त या सगळ्याला जिवंतपणा आणणारी माणसं मात्र चिऊकाऊसारखी भूर उडून गेलीत !

वाडा वाट बघतोय !

आणि मीपण !

इतर रसदार पर्याय