निर्भया -( part -1 ) Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्भया -( part -1 )

निर्भया - १

" माझ्याशी लग्न करू शकत नाहीस असं म्हणालास पण निदान आयुष्यभर एकत्र राहायला तयार झालास हे सुद्धा माझ्यासाठी खूप आहे . तुझ्या आई--बाबांनी अगोदर आपलं लग्न ठरवलं आणि नंतर ते मोडलं. मी त्यांनाही दोष देत नाही. दोष माझ्या नशिबाचा आहे." दीपा दोघांसाठी टीपाॅयवर सरबताचे दोन ग्लास तयार करताना बनवताना अतिशय भावनाविवश होऊन बोलत होती. ती पुढे बोलू लागली,

" मला तर हे जगणं नकोसं वाटतंय! लोकांच्या नजरेत मला कधी करुणा दिसते ; तर कधी उपहास! समाजात मी सन्मान गमावून बसलेय. तुझ्याबरोबरचे हे काही क्षण माझ्यासाठी खूप मॊल्यवान आहेत. कधी कधी असं वाटतं, की तू जवळ असतानाच या जीवनाचा अंत व्हावा." तिच्या या गूढ बोलण्याकडे राकेशने विशेष लक्ष दिलं नाही. त्याला वाटत होतं की दीपा त्याला भावनेत गुंतवायचा प्रयत्न करतेय. तिला जणू झटकून टाकायच्या अविर्भावात तो म्हणाला,

" अशा कधीतरी भेटण्यावर कोणी आयुष्य काढू शकणार आहे का? तुझी गोष्ट वेगळी आहे. नाहीतरी तुझ्याशी लग्न करायला कोण तयार होणार आहे? जर शक्य असतं तर मी नसतं का तुझ्याशी लग्न केलं? "

दीपाला राकेशकडून या शब्दांची अपेक्षा नव्हती. ती अवाक् होऊन त्याच्याकडे पाहू लागली. राकेशने बोलणं पुढे चालू ठेवलं.

" आता तर आई-बाबा लग्नासाठी माझ्या मागे लागले आहेत. श्रीमंत घरातली, सुंदर मुलगी सांगून आली आहे. जरी तू आयुष्यभर लग्नाशिवाय माझ्याबरोबर रहायला तयार असलीस तरीही कुटुंब तर लागतंच ना? तू माझ्यावर प्रेम आहे म्हणतेस, पण नेहमीच मला दूर ठेवतेस. तुला माझा स्पर्शही झालेला चालत नाही. पुरुषाच्या स्पर्शाची किळस येते; असं तू म्हणतेस. तुझ्या मनावर झालेला आघात कधी पुसला जाणार आहे, हे तू सुद्धा सांगू शकणार नाहीस. शिवाय तू माझ्या घराला कधीच वारस देऊ शकणार नाहीस. अशा त-हेचं विरक्त आयुष्य काढणं कोणाला तरी शक्य आहे का?"

तो असं काही बोलतोय यावर दीपाचा विश्वास बसत नव्हता. ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पहात होती. पण तिच्या भावनांना राकेशच्या दृष्टीने काहीही किंमत नव्हती. त्याने तिची नजर चुकवत बोलणं पुढे चालू ठेवलं,

" बहुतेक पुढच्या महिन्यातच मला नयनाबरोबर लग्न करावं लागेल. फार दिवस मी टाळाटाळ करू शकणार नाही. शेवटी आई - बाबांच्याही काही इच्छा असतात." अत्यंत भावनाशून्य शब्दांमध्ये राकेश आपलं म्हणणं मांडत होता. दीपाचा पडलेला चेहरा पाहून तो पुढे म्हणाला,

" घाबरू नको. मी नयनाशी लग्न केलं, तरीही आपले संबध असेच रहातील."

तो जणू काही नफ्या - तोट्याचा एखादा व्यवहार तिला समजावून सांगत होता. दीपा किती दुखावली जातेय; याला त्याच्या दृष्टीने काहीही महत्व नव्हतं. त्याचं बोलणं ऐकून दीपाचा चेहरा रागाने लाल झाला होता.

" लग्नाशिवाय एकत्र राहू असं मी म्हटलं, ते अशा पद्धतीने रहाण्याविषयी नव्हतं राकेश! एकमेकांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहूया असं म्हणायचं होतं मला! " शेवटी न रहावून ती म्हणाली.

" पण मला आईबाबांना दुखवून चालणार नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मी! पण मी लग्न केलं, तरी तुला कधीही भेटता येईल अशी व्यवस्था करणार आहे. मी शेअर बाजारात माझे होते नव्हते ते सर्व सेव्हिंग्ज गुंतवलेयत. लवकरच शेअर्सच्या किमती वाढल्या की इथे गोरेगावमध्येच एक फ्लॅट घेऊन नयनाबरोबर -माझ्या बायकोबरोबर रहायला येईन, नंतर तू इथेच येऊन रहा. म्हणजे तुझ्या शिफ्टप्रमाणे जेव्हा हवं तेव्हा आपल्याला इथे भेटता येईल. मी दररोज इथे येत जाईन." राकेश त्याचे पुढचे बेत अभिमानाने सांगत होता.

यावर दीपा काही बोलली नाही. पण तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिला आठवत होतं, याच राकेशने तिचं मन जिंकण्यासाठी किती आटापिटा केला होता! त्यात तो यशस्वीही झाला होता. शेवटी दीपाने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला लागला होता. इतक्यात लग्न करायचं नाही असं तिने ठरवलेलं असूनही त्याच्या प्रेमाखातर ती लग्नालाही तयार झाली होती. त्याच्या आईबाबांना ती सून म्हणून इतकी आवडली होती, की त्याने तिच्याशी लवकर लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते.

आज सगळी परिस्थिती बदलली होती. ती या सगळ्यांनाच नकोशी झाली होती. राकेश इतका स्वार्थी असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. आता त्याचे हे विचार ऐकून त्याच्याविषयी घृणा वाटू लागली होती.

दीपा काही न बोलता एका ग्लासातलं सरबत स्वतः घेऊ लागली, आणि दुसरा ग्लास राकेशकडे दिला. " मला आता निघावं लागेल. बरीच रात्र झाली आहे." सरबत पिता पिता ती म्हणाली.

" दीपा ! तू नेहमी जायची घाई करतेस. इथे आलीस तेव्हा पाच वाजले होते.आल्यापासून. घर आवरण्यातच तुझा सगळा वेळ गेला. माझ्याशी बोलायलाही तुला वेळ नव्हता. आता कुठे दहा वाजतायत. तू थोडा वेळ थांबू शकतेस. ही मुंबई आहे. गाव नाही! पाहिजे तर मी माझ्या गाडीतून तुला घरी सोडतो." राकेश नाराजीच्या स्वरात म्हणाला.

" तरी मी आज अर्धा दिवस रजा घेऊन इथे आलेय, म्हणून एवढा वेळ मिळाला, एरव्ही तर मी एक- दोन तासच थांबू शकते. मी आठवड्यातून एकदा येते; पण मधल्या काळात तू मित्रांना घेऊन कधीना कधी इथे येतोस, तुम्ही घरात एवढा पसारा करून ठेवता, की इथे आल्यावर माझा सगळा वेळ घर आवरण्यात जातो." दीपा हसत म्हणाली.

"पण मला चांगलं माहीत आहे, की घर आवरणं हा तुझा मला टाळण्यासाठी केलेला एक बहाणा आहे. " तिच्या सुंदर चेह-याकडे लालसेने पहात राकेश थोडा रागाने म्हणाला.

"आता असं म्हणतोयस, पुढच्या महिन्यात लग्न झालं की तुझ्याकडेच माझ्यासाठी वेळ नसेल." दीपा कसंनुसं हसत म्हणाली.

राकेश तिच्याकडे लक्ष नव्हतं, कारण तेवढ्यातच फोनची घंटी वाजली; आणि तो घाईघाईने दिवाणखान्यातील टेबलावर ठेवलेल्या फोन जवळ गेला.

"सुरेशचा महत्त्वाचा फोन येणार होता." तो दीपाला म्हणाला. सुरेश राकेशचा शेअर बिझनेसमधील पार्टनर होता.

"बोल सुरेश, तुझ्या फोनची कधीपासून वाट पहातोय. काय म्हणतं आजचं शेअर मार्केट?" हातातला सरबताचा ग्लास टेबलावर ठेवत त्याने उत्सुकतेने चौकशी केली.

आता त्यांची वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सवरची रटाळ चर्चा चालू होणार हे लक्षात येताच दीपा निघायच्या तयारीत उभी राहिली.

"मी निघते! घरी जायला उशीर होतोय. सरबत घ्यायला विसरू नको." ती पर्स उचलून तिथून निघण्यासाठी दरवाजाजवळ जात म्हणाली.

सेफ्टी डोअर उघडून ती बाहेर फ्लॅटच्या बाहेर पडली. शेजारचे कदम काका रात्रीचा फेरफटका मारून नुकतेच आले होते. बाजूलाच असलेल्या त्यांच्या फ्लॅटच्या समोर पत्नीने दरवाजा उघडायची वाट पहात उभे होते. सेफ्टी- डोअर मधून राकेशला फोनवर बोलताना पाहून ते हसत म्हणाले,

"राकेश कोणाशी एवढा फोनवर बोलतोय? तू निघालीयस, तिकडेही लक्ष नाही त्याचं! लग्न झालं की त्याच्या मित्रमंडळींवर वचक ठेवावा लागेल तुला!" यावर दीपा फक्त हसली. समोरच्या फ्लॅटमधे मराठेकाका आरामखुर्चीत बसले होते; त्यांना तिने हात केला. लिफ्टकडे वळताना तिने राकेशच्या फ्लॅटकडे पाहिले. तो तिला हात करत होता.त्याला 'बाय' करून ती लिफ्टमध्ये चढली.

तासाभरात ती तिच्या घराजवळ होती. जवळच्या चावीने लॅच उघडून ती आत गेली. तिने पाहिलं, निर्मला - तिची आई शांतपणे झोपली होती. तिचा धाकटा भाऊ नितिन अभ्यास करता - करता टेबलावर डोकं ठेवून झोपला होता. तिच्या उशिरा येण्याची आईला संवय होती हाॅस्पिटलमधे नर्सची नोकरी करणारी दीपा नेहमीच उशिरा घरी येत असे. कधी कोणी नर्स गैरहजर असेल, तर कधी घरी यायला सकाळ होत असे. इतर वेळीही काही कारणास्तव फार उशीर झाला, तर तिथेच राहून सकाळी घरी येण्याची सक्त ताकीद निर्मलाताईंनी तिला दिली होती, त्यामुळे त्या निर्धास्त होत्या. दीपाने कपडे बदलले, आणि झोपण्याचा प्रयत्न करु लागली. पण तिला काही केल्या झोप येईना. तिला आठवत होता दोन वर्षां पूर्वीचा राकेश!

Contd.... part II