निर्भया - ११ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्भया - ११

                                   निर्भया- ११-
                                   --------------
    राकेशच्या फ्लॅटकडे  लक्ष  होतं,  हे  लक्षात  आल्यावर सुशांतला झालेला आनंद, त्यांच्या  पुढच्या उत्तराने विरून गेला. "दीपा गेल्यावर कोणी आलं  होतं  का? "  या त्यांच्या प्रश्नाला मराठेंचं उत्तर होतं,
 " कोणी आलं असेल तरी मला माहीत नाही. कारण   मी  पाच-दहा   मिनिटातच   पाय  मोकळे करण्यासाठी बाहेर  पडलो  आणि  अर्ध्या  तासाने परत आलो." मराठे म्हणाले.
     " बरोबर आहे! दिवसभर  त्यांच्यावर  लक्ष ठेवायचं होतं, त्यामुळे कुठे जाता आलं नसेल! म्हणून रात्री दहा वाजता हे पाय मोकळे करायला गेले." माने रणजीच्या कानात पुटपुटले. सुशांतने हसत हसत त्यांना गप्प राहण्याची खूण केली.
        " पलीकडे मोहिते राहतात ना? ते काही सांगू शकतील का?" सुशांतने विचारलं.
    " ते पंधरा दिवसांपूर्वीच बंगलोरला गेलेयत. पुढच्या आठवड्यात  येतील. सध्या त्यांचा फ्लॅट बंद आहे." मराठे म्हणाले.
     राकेशच्या  मित्रपरिवारापैकी कोणी  इथे कधी  येतात? कसे  आहेत ते? "   सुशांतच्या  या प्रश्नावर त्यांचा चेहरा असा   झाला, की  जणू  न आवडणारी गोष्ट सुशांत त्यांच्याकडून वदवून  घेत   होते
       "साहेब!  आठवड्यातून  एकदा  तो  मित्रांना घरी आणत  असे. त्यांच्या दारूच्या पार्ट्या होत. ते चांगले लोक नाहीत. अचकट्  विचकट् बोलत असत आणि निघताना सगळे झिंगलेले असत." ते म्हणाले.  त्यांनी   केलेला   पसारा  आवरण्यातच  दीपाचा सगळा वेळ जात असे. मात्र तिला राकेशचं    हे  रूप  माहीत  नसावं.  तिच्यासामोर   मात्र   तो  सज्जनपणाचा आव आणत असे." मराठेंनी माहिती पुरवली.
      " पण दारूच्या बाटल्या बघुन तर तिला कळले असेलच; की   राकेशची    मैत्री   कशा  प्रकारच्या लोकांसोबत आहे. तरीही  ती  शहाणी कशी   झाली नाही?" सुशांत जणू स्वतःशीच बोलत होते.
    "राकेश ती खबरदारी बरोबर घेत असे. सगळा पसारा तसाच असला; तरी  दुस-या दिवशी सकाळी सगळ्या बाटल्या तो कच-याबरोबर देत असे." मराठे म्हणाले.
     "कदम आहेत का? त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं." सुशांतना मराठेंच्या बोलण्याची पडताळणी करायची होती.
     "ते आज सकाळीच त्यांच्या मुलीकडे- नाशिकला गेलेयत. दोन दिवसांनी येतील." मराठेंनी माहिती पुरवली.
 "चला  माने! आता  आपण  निघूया !" सुशांत म्हणाले .
      व्हॅनमध्ये बसल्यावर ते मानेंना म्हणाले, राकेश श्रीमंत घरातला,पण  सरळ साधा नोकरी करणारा तरूण होता, हे आपलं त्याच्याविषयीचं मत चुकीचं होतं,  हे  तुमच्या  लक्षात  आलं  असेलंच. व्यसनी लोकांचे त्यांच्या  मित्रांमध्येच अनेक  शत्रू  असतात. या  त्याच्या  मित्रांचीही  माहिती   काढावी   लागेल. त्याच्या  व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्याच्या घरच्यांना आणि सुरेशला  भेटल्यावर  नक्कीच   उलगडतील  याची    खात्री  आहे मला! पण तो दीपाला  फसवत  होता,  यात शंका नाही.
                   ********
सुरेश राकेशसारखाच  सुशिक्षित-  रुबाबदार व्यक्तिमत्वाचा  तरूण   होता.  पण   तो  अतिशय निराश  वाटला. "काय  सांगू    साहेब    तुम्हाला? मी सुद्धा इंजिनिअर आहे. चांगल्या   पगाराची   नोकरी  आहे   मला ! दुर्बुद्धी झाली आणि  राकेशबरोबर भागीदारीमधे शेअरचा  बिझनेस  सुरू केला. कर्ज काढून पैसे  शेअर्समध्ये गुंतवले   मधल्या    काळात   शेअर्सच्या    किंमती  झपाट्याने    वाढत   होत्या, तेव्हा    झटपट    पैसे  कमवण्यासाठी राकेशचीच ही कल्पना होती. त्याचे  वडील  मोठे  उद्योगपती  आहेत, पण   गेले  काही  दिवस त्यांचा बिझनेस  तोट्यात    आहे. डोक्यावर  खूप  कर्ज आहे.   राकेशने  इंजिनिअर  झाल्यावर    नोकरी   करणे    पसंत  केलं     होतं. पण  श्रीमंती  मिळवायची  असेल  तर  उसळी   घेणा-या   शेअर- मार्केटमध्ये    पैसे  गुंतवल्यास  सहज   शक्य  आहे असं   त्याला  वाटत  होतं. तो त्याच्या वडिलांनाही  मदत  करू  शकला असता. यासाठी  मिळवलेली   सर्व  पुंजी  त्याने  शेअर्समधे  गुंतवली . पण  हर्षद  मेहताचा   बँक    घोटाळा  बाहेर     आला, आणि काल  शेअर्सचे  भाव घसरले. आम्ही   घेतलेल्या शेअर्सची  किंमत  शून्य  झाली. ही बातमी राकेशला देण्यासाठी  मी   काल  रात्री  त्याला  फोन   केला   होता."
     सुशांतच्या  लक्षात  आलं   होतं   की,  सुरेश खरं बोलत होता.
         सुरेश पुढे   बोलू लागला,
        " त्याला  एवढा  धक्का  बसेल  असं  मला  वाटलं नव्हतं. आता  असं  वाटतंय, की त्याला भेटून हे सांगायला हवं होतं. शाॅक  तर  मलाही  बसलाय.  एका  दिवसात  मी  सुद्धा  कफल्लक झालो. पण   बायको- मुलांचा  विचार करून स्वतःला सावरतोय. " सुरेश सांगत होता.
        राकेशला  अचानक्  हार्ट -  अटॅक  येण्याचं कारण सुशांतच्या आता  लक्षात  येत  होतं. एका क्षणात तो  राजाचा रंक  झाला  होता. आणि   हा  धक्का  तो पचवू न  शकल्यामुळे  त्याला हार्ट अटॅक आला होता.
              *********
 
          संध्याकाळी राकेश च्या घरी ते दोघे पोहोचले, तेव्हा विश्वासरावांनी -  राकेशच्या  वडिलांनी त्यांना  विनंती केली की,  "इन्स्पेक्टरसाहेब, शालिनी- माझी   पत्नी   अजून  धक्क्यातून  सावरली   नाही, प्लीज,  तिच्या  मनाला  त्रास  होईल   असं  काही विचारू नका."
     " आम्हीही नाइलाज म्हणून हे कर्तव्य पार पाडायला आलोय. त्यांना प्रश्न  विचारून  त्रास देणं  आम्हालाही  आवडत   नाही. पण काय  करणार? तुम्हा दोघांचे सहकार्य तपास कार्यात घेणं आम्हाला अनिवार्य   आहे."   सुशांतच्या  बोलण्यात  त्याला त्या  कुटुंबाविषयी  वाटणारी सहानुभूती ओतप्रोत भरलेली होती.
     राकेशच्या  वडिलांनी   होकारार्थी   मान हलविली, आणि पत्नीला  बाहेर  बोलावून  घेतलं.     
    " अलीकडच्या काळात तुमच्या राकेशचं कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का?" सुशांतने  विचारलं.   
    हे ऐकताच शालिनीताई परत हुंदके देऊ लागल्या
   " नाही इन्स्पेक्टर! आमचा  राकेश अत्यंत शांत   स्वभावाचा  होता. त्याला   विशेष    मित्रही नाहीत  आणि   शत्रूही  नाहीत.  अभ्यासात  खूप  हुशार होता. इंजिनियर झाला आणि  नोकरीसुद्धा  चांगली  मिळाली  होती. कुठून  दीपाच्या   प्रेमात पडला   आणि   सगळं   होत्याचं  नव्हतं   झालं." बोलताना शालिनीताईंचा आवाज थरथरत  होता. आपला मुलगा गोरेगावच्या फ्लॅटवर  मित्रांसोबत काय गोंधळ  घालत  होता यापासून त्या बहुतेक अनभिज्ञ होत्या.
        " पण तुम्ही त्यांच्या लग्नाला संमती दिली होती  असं मला  कळलं!  लग्नाची  तारीख  सुद्धा  ठरली होती. मग  नंतर असं  काय  झालं की त्यांचं  लग्न मोडण्याची वेळ आली?" मनाला कालपासून अस्वस्थ करणारा प्रश्न सुशांतने  विचारला.
 यावर विश्वासराव बोलू लागले,
" हो! आम्हाला ती पसंत होती. ती दिसायला सुंदर  आहेच पण  स्वभावानेही खूप चांगली  आहे. राकेशला  ती  सुखी  ठेवेल याची  आम्हाला  खात्री होती. पण अचानक् असं काही घडलं की आमच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडलं." ते  थोडा  वेळ  थांबले. बोलावं  की  नाही असा विचार ते करत  असावेत. नंतर त्यांनी पुढे बोलायला सुरूवात केली .
      " राकेश   आणि  दीपा    नववर्षाच्या    रात्री  चौपाटीला   गेली   होती.  तिथे  नको   तो   प्रसंग ओढवला. गुंडांनी निर्मनुष्य जागी  राकेशला  बेदम मारून बेशुद्ध    केला  आणि   तिच्यावर   अत्याचार    केला.  खूप  दिवस हाॅस्पिटलमध्ये होती. कशीबशी वाचली! आम्हालाही तिच्याविषयी सहानुभूती आहे,  पण   आम्हाला  सगळं   माहित  असताना आमच्या मुलाचं आयुष्याचं नुकसान आम्ही  करू शकत   नव्हतो.  आता   तुम्हीच.   सांगा,  जिच्या   चारित्र्यावर  असा  डाग  अाहे; अशी  मुलगी  सून  म्हणून आम्ही कशी  घरी   आणायची?  प्रतिष्ठित   कुटुंब आहे आमचं!  लोक  काय   म्हणाले असते आम्हाला?"  ते कारण सांगताना स्वतःची  बाजूही मांडत होते.

 आता राकेशची आई त्यांना दुजोरा देऊ लागली,
"  डॉक्टरनी स्पष्टपणे सांगितलं   की ती यापुढे कधीही आई    बनवू शकणार  नाही. ही गोष्ट राकेशने माझ्यापासून लपवून ठेवली नाही. फक्त ' तिच्या आईला- निर्मलाताईंना लग्न  सांगु नको, त्यांना मानसिक धक्का बसेल; अशी विनंती, दीपानं केलीय, '  हे त्याने मला  बजावून ठेवलं होतं. राकेश आमचा एकुलता एक मुलगा होता. तिच्याशी लग्न करून जर वंशवेल वाढणार नसेल तर ते कोणाला चालेल? आणि नंतर आम्ही लग्न  मोडलं, तर  ती   आमची  चूक  आहे  का?"  राकेशच्या आईने आपली  बाजू मांडण्याचा  प्रयत्न केला. 
    सुशांतला  मात्र  त्यांच्या या विचारांची कींव येत होती." तुम्ही त्या मुलीच्या  मनाचा थोडा  तरी विचार केला का? तिच्या नशिबी  हे  दुःख येण्यात तुमच्या  मुलाचाही  वाटा   होता. एवढ्या  रात्री  चौपाटीला  तोच  तिला  घेऊन गेला होता, हे तुम्ही सोईस्करपणे विसरून गेलात?" असं त्या दोघांना खडसावून विचारावं  असं  त्यांना  वाटत  होतं.  पण   त्यांच्यावर कोसळलेला दुःखाचा लक्षात घेऊन त्यांनी वादविवाद करणं टाळलं. 
         दुसरीकडे दीपाविषयी सुशांतच्या मनात अनुकंपा दाटून आली  होती.  किती  सोसलंय   त्या  मुलीने!  जेव्हा  तिला   आधाराची गरज  होती, तेव्हा  यांनी  तिला  हात   देण्याऐवजी  शाब्दिक  प्रहार केले. पण  यांच्या  विरुद्ध  एकही  वाईट  शब्द  तिच्या तोंडून निघाला  नाही.
    त्यांना  गप्प पाहून  राकेशची आई  पुढे   बोलू   लागली.  सुशांतसमोर  मन मोकळं केल्यामुळे त्यांच्या भावनांना  वाट  मिळाली  होती. त्याचबरोबर काही  प्रमाणात  दुःखाचाही  निचरा  होत होता. त्यामुळे  मनातलं   सगळं   बोलल्याशिवाय त्यांना   रहावत   नव्हतं.  
            " पण शेवटी व्हायचं ते नुकसान झालंच. त्यानंतर राकेश जास्त  वेळ घराबाहेर राहू लागला. त्यानं ऑफिसच्या कामात स्वतःला झोकून दिलं. त्याचं  लग्न    करून   दिल्यावर    कालांतराने  दीपाला विसरेल असा विचार करून,   एका सुंदर  मुलीशी- नयनाशी  त्याचं  लग्न   ठरवलं . जेव्हा  तो  नयनाला   बघून  मनापासून   लग्नाला तयार झाला, तेव्हा आम्हाला वाटलं, की  आता   सगळं  सुरळीत  होईल. पण  त्या  दिवशी  आम्हाला कळलं की, तो आमच्या दुस-या  घरात    अजूनही   दीपाला   भेटत   होता.  आणि  शेवटी   तिच्या   प्रेमानेच    माझ्या  मुलाचा जीव  घेतला." 

        ********* contd ...... part - 12