निर्भया - part -7 Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्भया - part -7

निर्भया- ७

"आई-बाबांच्या मर्जीविरुद्ध तुझ्याशी लग्न करणार नाही;" असं राकेशने दीपाला सांगितलं होतं. पण तिच्याशी लग्न न करण्याचं मुख्य कारण त्याने तिला सांगितलंच नव्हतं. पाशवी अत्याचारांमुळे तिचं कायमस्वरूपी नुकसान झालं होतं. ती कधीच आई बनू शकणार नव्हती. त्याच्या घराला ती कधी वारस देऊ शकणार नव्हती ; त्यामुळे तिच्याशी लग्न न करण्याचा निर्णय त्याने स्वतः घेतला होता. पण हे कारण तो दीपाला कधीच कळू देणार नव्हता. तिच्या अपेक्षेप्रमाणे त्याचं हृदयपरिवर्तन होणं कधीच शक्य नव्हतं.

***

राकेशच्या गोरेगावच्या फ्लॅटवर आठवड्यातून एकदा भेटायला त्यांनी सुरुवात केली. सावधगिरी म्हणून दीपाने, तिची मानसिक स्थिति नीट होईपर्यंत स्पर्श न करण्याची अट घातली होती; ती पाळणं राकेशला जड जात होतं, याची दीपाला कल्पना नव्हती. ती आपलं घर असल्याप्रमाणे तिथे जाऊन घर सजवीत होती. त्यातच आपला संसार थाटल्याचा आनंद तिला मिळत होता. काही दिवसांनी राकेश पुर्वीसारखा होईल आणि तो लग्न करायला तयार झाला, की आईच्या डोक्यावरील खूप मोठा भार हलका होईल, असं भोळं स्वप्न ती पहात होती. हा क्रम तीन चार महिने चालला. दीपाने आईला अजून काहीच सांगितलं नव्हतं. ना महेश आणि त्याच्या मित्रांविषयी, ना राकेशबरोबर झालेल्या तडजोडीविषयी! राकेश जेव्हा लग्नाला तयार होईल, तेव्हा आईला सुखद धक्का द्यायचा असं तिने ठरवलं होतं. पण बाळबोध संस्कारांची दीपा, हे जग आपल्याला वाटतं तेवढं सरळ नाही, ही गोष्ट विसरली होती.

***

स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न दीपा करत होती पण आजूबाजूची माणसं तिला सुखी पहायला तयार नव्हती. तिने शांत समाधानी दिसणं हा जणू मोठा गुन्हा आहे, तिने यापुढे कायम दु:खीच दिसलं पाहिजे. एवढी मोठी घटना घडूनही ही आनंदी कशी राहू शकते?-- हे प्रश्न गेले अनेक दिवस त्यांच्या डोळ्यात तिला दिसत होते. काही मैत्रिणी तिने आनंदी रहावं, म्हणून प्रयत्न करत होत्या, पण ती हसली- बोलली, की तिच्याकडे विचित्र नजरेने पहाणारेही अनेकजण होते. दीपा अशा लोकांना फार महत्व देत नव्हती. जर या वाईट मानसिक अवस्थेतून बाहेर पडायचं असेल, तर वरकरणी तरी प्रसन्न रहाणं गरजेचं आहे हे तिला माहित होतं. शिवाय हाॅस्पिटलमध्ये पेशंटसाठी आणि घरी आई आणि नितिनसाठी चेहरा आनंदी ठेवणं आवश्यक होतं. पण एक प्रसंग असा झाला, की तिचा स्वतःवरचा ताबा सुटला.

***

त्या दिवशी हाॅस्पिटलच्या एका नर्सचं लग्न होतं. ती दीपाची चांगली मैत्रीण असल्यामुळे तिने आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. मनात नसूनही तिचं मन राखण्यासाठी दीपाला लग्नाला जावं लागलं. डाळिंबी रंगाच्या जरीच्या साडीत दीपा अतिशय सुंदर दिसत होती. तिच्याकडे मत्सराने पाहात हाॅस्पिटलच्या दोन नर्स कुजबुजत होत्या, " या मुली अशा नटून थटून मुलांना भुरळ पाडतात आणि त्यांचा संयम सुटला की त्यांनाच दोष देतात. एवढा वाईट अनुभव येऊनसुद्धा ही दीपा सुधारतेय का बघा! हिला लाज कशी वाटत नाही? "

तेवढ्यात एकीचं लक्ष दीपाच्या रडवेल्या चेह-याकडे गेलं, आणि तिने त्यांना गप्प रहाण्यासाठी खुणावलं. लग्नाला आल्याचा आता दीपाला पश्चाताप होत होता. "माझ्या जगण्याला आता काय अर्थ राहिलाय? मला प्रत्येक नजरेत माझ्याविषयी तिरस्कार दिसतोय. जणू काही मीच मोठा गुन्हा केलाय असा भाव प्रत्येकाच्या नजरेत दिसतोय; माझ्यावरच्या त्या अत्याचारात माझा मृत्यू झाला असता, तर मेणबत्त्या घेऊन मोर्चे निघाले असते. सहानुभूती दाखवण्यासाठी आणि गुन्हेगारांचा निषेध करण्यासाठी परिसंवाद रंगले असते, प्रत्येकजण माझ्यासाठी हळहळला असता; पण माझा जीव चिवट निघाला आणि मी जगले, तिथेच सगळं चुकलं! आता सगळे माझ्याकडे मी एखादी कुलटा असल्याप्रमाणे बघतायत. देवाने मला एवढ्या मोठ्या आपत्तीतून जिवंत ठवलं. पण मला मात्र हे बदनाम आयुष्य जगणं भाग पडतंय. माझं जिणं सुसह्य व्हावं असं कोणालाच वाटत नाही. या जगाला जिवंत माणसाची कदर नाही. हे नामुश्कीचं जिणं जगण्यापेक्षा हे जीवन संपवलेलं बरं!" अपमान सहन करण्यालाही काही मर्यादा असते. दीपाच्या सहनशीलतेचा त्या दिवशी अंत झाला. स्वतःला संपवण्याचा निश्चय तिने केला होता. पण कसं? या प्रश्नाचं उत्तर तिला अचानक् मिळालं.

दुस-याच दिवशी एका तरूणाला हाॅस्पिटलमधे अॅडमिट करायला काही लोक घेऊन आले होते. त्याचा प्रेमभंग झाला होता म्हणून त्यानं विष घेतलं होतं, ती विषाची बाटलीही ते लोक बरोबर घेऊन आले होते. त्याच्यावर वेळेवर उपचार झाले, आणि तो वाचला पण या गडबडीत त्या बाटलीकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्या बाटलीतला थोडा द्रव दीपाने दुस-या बाटलीत काढून घेतला, आणि बाटली जागेवर ठेवून दिली. दुस-या दिवशी त्या तरूणाच्या नातेवाईकांनी डाॅक्टरना आणि पोलीसांना गुन्हा न नोंदवण्याची विनंती केली. जर केस रजिस्टर झाली, तर त्याला शिक्षा होईल आणि त्याच्या करीयरचं नुकसान होईल, हे लक्षात घेऊन डाॅक्टर आणि पोलीसांनीही त्याचं थोडं बॊद्धिक घेऊन त्याला सोडून दिलं. ती विषाची बाटली बेसिनमधे ओतून टाकायला ते विसरले नाहीत.

"उद्या राकेशला भेटायला त्याच्या घरी जायचं गेल्या आठवड्यात ठरलंय. त्याला एकदा शेवटचं भेटून हे कलंकित जीवन संपवून टाकेन.त्याची माझी आज शेवटची भेट. आता माझा निर्णय अंमलात यायला जास्त दिवस लागणार नाहीत." पर्समध्ये बाटली आहे, ही खात्री करून घेत दीपा मनाशी म्हणत होती. गेले काही दिवस राकेशचं वागणं पाहून त्याचं आपल्यावर प्रेम आहे, हा गोड गैरसमज तिने करून घेतला होता.

दुस-या दिवशी दीपा हाॅस्पिटलमधून लवकर निघाली. राकेशच्या घराची शेवटची साफसफाई केली. ही राकेशबरोबरची शेवटची भेट असल्याची जाणीव होत होती तसे तिचे डोळे भरून येत होते.

ती आता राकेशबरोबर निरोपाचे शब्द बोलू लागली. पण झालं उलटंच!

***

राकेशच्या मनात दीपाविषयी जराही सन्मान नाही हे बोलण्याच्या ओघात तिच्या लक्षात आलं. त्यानं नयनाशी लग्न करणार असल्याचं सांगितलं. इथपर्यंत ठीक होतं, पण त्यापुढे तो जेव्हा म्हणाला की, "जरी मी नयनाशी लग्न केलं तरी आपले संबंध असेच रहातील," तेव्हा तिच्या मनात संताप दाटून आला. तो किती नीच पातळीवर जाऊन विचार करणारा माणूस आहे, हे प्रथमच तिला कळलं. तिला कळून चुकलं, की तिच्याशी लग्न न करण्याचा निर्णय त्याने स्वतः, अगदी विचारपूर्वक घेतला होता. त्याच्या दृष्टीने ती आता त्याच्या हातातली कठपुतली होती, त्याला जसं हवं तसं तो तिला वागवू शकत होता.

"या स्वार्थी माणसाच्या मूर्खपणामुळे माझ्या आयुष्याची परवड झालेलीच आहे. आता जीव देऊन आईला आणि नितीनला मी दुःखी का करू? खरं म्हणजे हा राकेशच जगण्याच्या लायकीचा नाही. नयनाशी लग्न करून माझ्याशीही संबंध ठेवणार म्हणतोय! म्हणजे नयनाला दावणीला बांधून स्वतः बाहेर मजा मारायचा प्लॅन आतापासूनच चाललाय! आणि मला तरी काय सन्मानाचं आयुष्य देणार होता हा ? आता आहे, त्यापेक्षाही लाजिरवाणं आयुष्य मिळालं असतं मला! आईला तर जगात मान वर करायलाही जागा उरली नसती. मी मृगजळाच्या मागे लागले होते. बरं झालं याचा खरा चेहरा वेळ निघून जाण्यापूर्वीच समोर आला." आता तिला राकेशचा तिरस्कार वाटू लागला होता,

"हा माणूस नाही! हा सुद्धा त्या तिघासारखाच राक्षस आहे. माझ्या असहायतेचा फायदा घ्यायला बघतोय! नाही! मी आता आत्महत्या करून आईला अधिक दुःखी नाही करणार. जगाशी दोन हात करत जीवनात यशस्वी होईन. उलट हाच जगायच्या लायकीचा नाही. याच्या बेजबाबदार वर्तनाची शिक्षा याला मिळालीच पाहिजे." त्या क्षणी क्रोधाने तिच्या विचारशक्तीवर ताबा मिळवला होता. आता ती नेहमीची समतोल निर्णय घेणारी दीपा राहिली नव्हती.

राकेशची नजर चुकवून तिने पर्समधून विषाची बाटली काढली, राकेशच्या ग्लासात ओतून तो सरबताचा ग्लास राकेशकडे दिला, आणि तिथून बाहेर पडली. शेजारचे कदमकाका जेव्हा तिला राकेशवर वचक ठेवायचा सल्ला तिला देत होते, तेव्हा ती मनाशी म्हणत होती,

" उद्यापासून राकेश मित्रांशीच काय? कोणाशीच बोलू शकणार नाही."

***

Contd ... part- 8.