Babanch Aaipn books and stories free download online pdf in Marathi

बाबांच आईपण

*बाबांचं आईपण*
आजही आठवतो तीला  १८ जून ९५ चा रविवार.सकाळचे सात वाजले होते.बेटा खुप डोकं दुखतय गं!थोडं डोकं दाबुन देते का? म्हणून मारलेली आजारी आईची हाक.तीने आईचं डोकं मांडीवर घेतलं अनं डोकं दाबते तोच आईचे प्रश्न सुरू झाले.मला भेटायला आज काका येणार होता ना?आला का नाही गं?शेवटचा श्वास मोजणा-या आईला आता सगळी उत्तर होकारातच द्यायची म्हणून हो निघालाय येईलच १०वा.असं सांगून तेवढ्या पुरती वेळ तीने मारून नेली.मुला प्रमाणे धाकट्या दिरावर प्रेम करणारी माऊली दिराची वाट बघत होती.
एक काका शिक्षक रविवारी शाळेला सुट्टी असूनही वहिनींना भेटायचं म्हणून काकूला घेऊन आला.काकाला बघताच तु ऊठ त्यांना चहा नाष्टा दे म्हणून आग्रह करणा-या आईचा आग्रह तीला मोडवेना.तोपर्यंत काका तीच्या आईचं डोकं मांडीवर घेऊन बसला अनं डोकं दाबत होता.काकू काका ताई सगळ्यांनी डोकं दाबुन झालं होतं.गप्पा मारणं चालु असतांना अचानक तीच्या विवाहीत ताईला आई ने विचारले तायडे येवढा अंधार का गं आज.लाईट गेले का.लावा की लाईट.जवळ बसलेल्या सर्वच नातेवाईकांना कळलं होते आईचे डोळ्यातले प्राण गेले आहेत.लख्ख प्रकश असतांना तीच्या आईला अंधार दिसत होता.जवळ बसलेल्या सगळ्यांच्या मांडीवर डोकं ठेऊन आईने डोकं दाबुन घेतलं होतं.
आईने पुन्हा तीला हाक मारली अगं दे गं तुझी मांडी ठेऊ दे डोकं जरा.तेव्हा सकाळचे ९:३० वाजले होते.किती वाजले म्हणून आईने तीला विचारले .तर दहा वाजायला अजून अर्धा तास आहे .का गं तर म्हणते कशीतु बोललीस ना दहा वाजता काका येतोय म्हणजे तो येईलच ना आता.
मोठ्या आजाराने जर्जर झालेल्या आईला भेटण्यासाठी केवळ काकाच नव्हे तर तीचे मामा मावशी आजी आजोबा आत्या सगळेच नातेवाईक रविवारची सुट्टी म्हणून भेटी साठी येत आहेत असा निरोप तीला आला होता.आईचं डोकं तीच्याच मांडीवर होतं घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसा आईचा श्वास कमी कमी होतांना जाणवत होता.तीच्या छातीची धडधड वाढत होती.आईला दिसत नव्हतं आईचे प्राण डोळ्यातून जात होते.पण आई हुशार होती.खोटं बोललं तरी तीच्या लक्षात येत.काकाची वाट बघत होती .सहजच ती आईला म्हणाली अगं दहा वाजायला बराच वेळ आहे.आई म्हणते खोटं बोलू नकोस गं.आता बराच वेळ नाही राहीला आईच्या  ह्या शब्दाने तीच्या डोळ्यातून अश्रृंचा बांध फुटला.आईच्या गालावर वाहू लागला...
ए वेडाबाई का रडते गं?नको रडू मी सोडली का तुझी मांडी ?तु रडली तर मी पण रडेल.आई रडू नाही म्हणून ती पण अश्रृंवर आवर घालते १० वाजत आले .आई ज्या दिराला मुलगा मानत होती त्या काकाने दारात पाय ठेवला वहिनी म्हणून हाक मारली .आले का म्हणून तीच्या आई ने विचारलं अनं प्राण सोडले.
सगळ्याच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली .तीच्या मांडीवर आईचं डोकं अनं जवळच तीचे बाबा बसले होते.आईचे प्राण गेले बाबांनी मनावर आवर घातला जणू त्यांना मुलांचं भविष्य समोर दिसू लागले होते.खुप भरून येत होतं पण आतल्या आत आवंढा गिळत होते .कुणाच्या समोर नाही पण कोप-यात जाऊन रडत होते.त्यावेळी तीचे वयस्क आजोबा,काका-काकु अनेकांना जपायचं होत.का अशी वेळ यावी असा ती विचार करत होती.आईची सर्व क्रिया पुर्ण झाली जो तो जिकडे तिकडे निघून गेले.घरात तिचे काका काकू भाऊ बहिण होते .संध्याकाळी तीचे बाबा त्यांच्या वाड्यात एकटेच एका खुर्चीत जाऊन बसले.आता बाबांची काळजी घेणं,त्यांच्या तब्बेतीवर लक्ष ठेवणं हेच तीचं लक्ष होतं .घरात बाबा दिसत नाही कुठे गेले असतील म्हणून ती तीच्या बाबांना शोधत होती.पुढच्या वाड्यात अंधारातच एकटेच बसले होते त्याच्या पायाजवळ ती जाऊन बसते.तोंडातून फक्त बाबा शब्द काढताच सकाळपासून आवर घातलेला बाबांच्या अश्रृंचा बांध फुटला.किती प्रयत्न केले गं आपण पण काहीच का यश येऊ नाही म्हणत तीला कवटाळत तीचे बाबा खुप रडले.तेव्हा पासून  आई अनं बाबा ह्या दोन्ही भूमिका त्यांनी निभवल्या.तीला अनं तीच्या भावंडांना काय हवं ते सगळच बाबा पुर्ण करू लिगले.आईच्या निधनानंतर तीच्या ताईला मुलगी झाली.त्या बाळासाठी आपण काय काय करू शकतो हा विचार त्यांनी केला आणि त्या बाळासाठी ऑलिव ऑईलने मसाज,अलमन्ड ऑईल पजले.बाळाला खेळणी आणणे,फिरायला नेणे ,तीचा घोडा होऊन तीला खेळवणे अगदी एखादी आई करेन तसं सगळं त्यांच्या बाबांनी केले.अगदी सणावाराला लेकींच्या घरी आई खाऊ पाठवते तसा खाऊ पाठवला.
तेव्हा जाणवलं एखादे बाबा सुद्धा आई होऊ शकते.हे तीच्या बाबांकडे पाहून जाणवले.लेकीचे आणि बाबांचे नाते ह्या जगात किती वेगळे असते ना.
हाच अनुभव  आमच्या ज्ञानदा कडून मला मिळाला.दि १७|६ रोजी Fathers Day त्याची तयारी आदल्या दिवसा पासूनच सुरू होती.तीच्या बाबांसाठी,मोठ्या पप्पांसाठी पितृतुल्य काकांसाठी काहीतरी लिहून द्यावं म्हणून कागद फाडत होती.म्हणजे मोठ्या कागदाचे चार समान भाग करत होती.पसारा करू नकोस म्हणून मी तीच्यावर ओरडली तर हळूच आवाजात म्हणते....माॅ... अगं मी पसारा नाही करत.उद्या Fathers Day आहे.सगळ्यांसाठी मला ग्रिटिंग्स तयार करायचे.मी पटकन तिला जवळ घेतलं आणि तीची माफी मागितली.
आज तीने मला माझ्या बालपणात नेऊन पोहचवले.ज्ञानदाने न कळत प्रत्येकाच्या बेडरूम च्या दाराला Fathers Day  चे ग्रिटिंग्स लावले म्हणजे सकाळी सगळे वाचतील.तिने दिलेल्या शुभेच्छांचं सगळ्यांनाच कौतुक वाटलं.खरचं किती छान असतं ना लेकीचं अनं बाबांचं नातं.
आपल्याला आईबाबा नाही याचं दुःख आपल्या लेकी हिरावुन घेतात.
बाबांबरोबर लेकी देखिल आईपण निभवतात.
*पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आणि स्वर्गा पेक्षा उंच बाबा असतात*
©सौ.माधवी महेश पोफळे.

इतर रसदार पर्याय