Ekach Pyala - 3 books and stories free download online pdf in Marathi

एकच प्याला - अंक तिसरा

एकच प्याला

(मराठी नाटक)

अंक तिसरा

साहित्यिक = राम गणेश गडकरी

अनुक्रमणिका

१.अंक तिसरा

१.१प्रवेश पहिला

१.२प्रवेश दुसरा

१.३प्रवेश तिसरा

१.४प्रवेश चवथा

***

अंक तिसरा

प्रवेश पहिला

(स्थळ : सुधाकराचे घर. पात्रे- सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद्.)

सिंधू : हे काय हे असं? दुधाशीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्ण! धरू का चिमुकला कान एकदा? थांब बाळ, गाणं म्हणून तुला घास भरवते हं! ऐक नीट! गडबड केलीस तर नाही म्हणायची बरं का? आणखी घासाबरोबर दुधाचा एकएक घोटही घ्यावा लागेल.

(चाल- विडा घ्या हो नारायणा.) घास घेरे तान्ह्या बाळा। गोविंदा गोपाळा। भरवी यशोदामाई। सावळा नंदबाळ घेई॥ ध्रु.॥ घेई कोंडा-कणी त्रैलोक्याचा धणी। विदुरावरीचा। पहिलावहिला घास॥ 1॥ पोहे मूठभरी। क्षीराब्धीच्या हरी। मैत्र सुदामजीचा । आला दुसरा घास॥ 2॥ थाली एक्या देठी। घ्यावी जगजेठी। द्रौपदीमाईचा। आला तिसरा घास॥ 3॥ उरल्या उष्टावळी। फळांच्या वनमाळी। शबरीभिल्लिणीचा। घ्या हो चवथा घास॥ 4॥ टाकू ओवाळून। मुखचंद्रावरून। गोविंदाग्रजाचा। उरलासुरला घास॥ 5॥

हं, चला, झालं बरं आता! झाली पुन्हा दांडगाईला सुरुवात?वन्सं, सांभाळा बाई तुमचं रत्न हे! तुमची माणसंच भारी अचपळ! नाही तर थांबा. हे बघा गीताबाई, बाळाला पाळण्यात नेऊन निजवा बरं! (गीता येते.) हं, गीताबाईंना बघितल्याबरोबर लागला हसायला! गीताबाईंच्याबरोबर भटकायला सापडतंना इकडे तिकडे! (गीता मुलाला घेऊन जाते.) वन्सं, भाईला सकाळपासून दोन-तीन बोलावणी झाली. येतो येतो म्हणून म्हणतो, अजून का बरं येईना? वन्सं, मला आपलं भलतंच स्वप्न पडायला लागलं आहे.

शरद् : वहिनी, तुम्ही उगीच काळजी करता, झालं! कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसलं म्हणजे खाल्लेलं अन्नसुध्दा अंगी लागायचं नाही.

(राग: भीमपलास, ताल- त्रिवट. चाल- रे बलमा बलमा.) छळिती या हृदया अदया। भ्रांत मनोरचना कालगुणा॥ ध्रु.॥ मातृजीवना झिजवुनि जगती। अंती घेती तयासह त्या निधना॥ 1॥

सिंधू : काही म्हणा, काही सांगा. माझ्या मनाचा आपला धीरच सुटल्यासारखा झाला आहे. भाईची तार मिळाल्या दिवसापासून उरात धडकी बसून जिवाला काळजी लागली आहे-

(राग- काफी- जिल्हा, ताल- त्रिवट. चाल- इतना संदेश वा.) दहती बहू मना नाना कुशंका॥ ध्रु.॥ विपदा विकट घोर। निकटी विलोकी। मन कंप घेत। गणिते ना विवेका॥ 1॥

शरद् : पण अशी काळजी लावून घ्यायला तसं काही झालं आहे का? नुसत्या तर्कानं तर्कच वाढवायचे का? सगळं जिथल्या तिथं आहे, मग उगीच का असं आडरान प्यायचं?

सिंधू : वन्सं, आपदा चंद्रा सूर्यासारख्या वेळा सांगून का येत असतात. बरं व्हायचं ते जपातपानं होतं आणि वाईट मात्र झाल्यावर कळायला लागतं. फळ पिकण्यापूर्वी पाडानं रंगून जातं; पण पुरतेपणी कुजल्याखेरीज त्याला कधी घाण सुटली आहे का? एकेकाच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे जिवाला अगदी कसा चरका बसतो!

(राग: खमाज जिल्हा; ताल- पंजाबी; चाल- मै तोसे नाही बोलोरे) शंकाही नाही काली ज्या। दुर्गती जवे ये तदा॥ ध्रु.॥ धूर्त कपटी अरी। जैसा रण करी। तेवि विधा ही सदा॥ 1॥

शरद् : मन चिंती ते वैरी चिंतीना, तशातलं चाललं आहे तुमचं! वहिनी हे पाहा भाईसाहेब आलेच! (रामलाल येतो.) भाईसाहेब, या पाहा, वहिनी कशा एकसारख्या रडताहेत! त्यांना चार धीराच्या गोष्टी सांगून त्यांची समजूत करा पाहू!

रामलाल : (स्वगत) काल रात्री पाहिलेला प्रकार सिंधूला आता कोणत्या तोंडाने सांगू? कितीही टाळाटाळ केली तरी हे मरण काही टळत नाही!

सिंधू : भाई, कळलं नाही का तुला? काही भिण्यासारखं नाही ना? असा मुकाटयानं का उभा आहेस? काय झालं? सांग लौकर मला!

रामलाल : ताई, अशी घाई करू नकोस. लहान मुलं साखळीचा एक खेळ खेळतात. तो तू पाहिला आहेस ना? जसजसा खेळ वाढत जातो, तसतसा मुलाला मूल जोडून त्यांच्या साखळीला जलदीची चाल करता येत नाही. तसंच या संसाराचंही आहे. संसार वाढू लागला म्हणजे अडचणींमागून अडचणी वाढून जबाबदारीमुळं मन जडावत जातं, आणि बालपणीचा चंचलपणा टाकून देऊन मनुष्याला प्रत्येक बाबतीत धिम्या पावलानं चालावं लागतं.

सिंधू : भाई, असं का बोलायला लागलास? माझ्या अदृष्टात काय काय लिहिलं आहे, ते मला एकदम सांगून टाक.

रामलाल : सिंधूताई, उद्या काय होणार आहे हे आज कळलं तर संसार नीरस होईल. म्हणून विधात्यानं प्राणिमात्राचं अदृष्ट डोळयांला न दिसणार्‍या कपाळपट्टीवर लिहून ठेवलं आहे. सर्व विश्वाचा संहार ज्याला रुद्रशक्तीच्या जाणिवेनं करायचा आहे, त्या माहेश्वराला मात्र आपल्या ललाटीचा लेख वाचता यावा, म्हणून कपाळावर असलेल्या तृतीय नेत्राचा लाभ झाला आहे. हा त्रिकालज्ञ तृतीय नेत्र आम्हा मर्त्य जिवांच्या कपाळी नाही!

(राग: खमाज; ताल- पंजाबी; चाल- पिया तोरी.) गमे सारी। शुभदा प्रभूची मज योजना॥ ध्रु.॥ हे मनुजा। जाणुनि तयाला। गरल या न दिले प्रभुने ज्ञाना॥ 1॥

सिंधू : भाई, माझे प्राण आता कंठाशी आले आहेत रे! काय ऐकायचं असेल ते जितेपणी मला ऐकून तरी घेऊ दे!

(राग- जिल्हा-पिलू; ताल- कवाली. चाल- कनैया खेले होरी.) करि दया सांग वेगे। खसा ही पदी लागे॥ ध्रु.॥ क्षण एक अंती। विलंबी फुका जाता। दुर्बल हृदय हे भंगे॥ 1॥

रामलाल : ताई, तुला काय सांगू? आपल्या सुधाकरला एक व्यसन- एक फारच भयंकर व्यसन- (स्वगत) निष्ठुर दैव, काय सांगायचं हे माझ्या कपाळी आणलंस? दारू हा अमंगल शब्द या मंगलदेवतेपुढं मी कोणत्या तोंडानं उच्चारू? व्यसनी चांडाळांनो, तुम्ही आपल्या जिवलग मित्रांना कसल्या संकटात पाडता, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? परमेश्वरा, दारूनं भिजलेला हा वाग्बाण हिच्या हृदयावर रोखण्यापेक्षा एखाद्या विषारी बाणानं हिचा एकदम हृदयभेद करण्याचं काम माझ्याकडे का दिलं नाहीस? (उघड) सिंधू, सुधाकराला दारूचं व्यसन लागलं!

सिंधू : देवा, काय ऐकलं मी हे? (बेभान पडू लागते, शरद् व रामलाल तिला धरतात.)

रामलाल : ताई, सिंधूताई, सावध हो!

सिंधू : भाई, भाई- (घाईघाईने भगीरथ प्रवेश करतो.)

भगीरथ : भाईसाहेब, अनर्थ झाला. सुधाकर मद्यपान करूनच कचेरीत गेला, वाटेल त्याला वाटेल ते बोलू लागला व मुन्सफानं त्याची सनद कायमची रद्द केली.

रामलाल : अनर्थांच्या परंपरेला आता तुम्ही तयार असलंच पाहिजे. ताई, सिंधूताई- (तळीराम सुधाकरला घेऊन येतो.)

सुधाकर : काय रडारड आहे घरात? सनद गेली म्हणून कोण रडतं आहे? नामर्द बायको आहे. तळीराम, एकेकाला लाथ मारून ही गर्दी मोडून टाक. (खाली बसतो.)

रामलाल : शरद्, तळीराम, सुधाकरला आत नेऊन निजवा.

सुधाकर : सनद गेली तरी हरकत नाही. मी नामर्द नाही- हा रामलाल नामर्द आहे- सिंधू नामर्द आहे- सनद नामर्द आहे! (ते त्याला घेऊन जातात.)

रामलाल : ताई, अभागी मुली! चल. तुझं रडण्याचंसुध्दा समाधान येथून नाहीसं झालं (तिला जवळ घेऊन) बेटा, ही परमेश्वराची कृपा आहे. (तळीराम येतो.) तळीराम, असाच्या असा चालता हो. इत:पर या घरात पाऊल टाकशील तर खबरदार! सिंधूताई चल.

(राग- ललत, ताल- त्रिवट. चाल- पिया पिया) गमसि खरी हतभागिनी। जीवनमंगलहेतु तव जरी। स्वकरि लोटी तुज दुर्गतिदहनी॥ ध्रु.॥ रोदन हेचि जगी हतभागा। विश्रांतिसी चित्ताते जागा। तीसह पति करि तव हृद्भंगा। मंदभाग्य तू तुजसम भुवनी॥ (जातात.)

प्रवेश दुसरा

(स्थळ: तळीरामाचे घर. पात्रे: तळीराम आणि गीता)

तळीराम : घरात असेल ते सामान पुढे आण! मंडळाची वर्गणी द्यायची आहे आज. काय जे असेल ते आण.

गीता : आणायला आहे काय घरात कपाळ तुमचं? झाडून सारून घर स्वच्छ आरशासारखं करून ठेवलं आहे! सार्‍या घरात जिकडे तिकडे पाहाल तिकडे तुमच्या रूपाची अवकळाच दिसेल.

तळीराम : खोटं बोलते आहेस तू! दागदागिना काही काही नाही अगदी घरात!

गीता : अहो! नाही, नाही, नाही! आता काय कपाळ फोडून घेऊ तुमच्यापुढं!

तळीराम : पाहा, खोटे बोलू नकोस. काही नाही तुझ्याजवळ?

गीता : हे एवढं कुंकू कपाळावर तुमच्या नावाचं बाकी राहिलं आहे. (कुंकू पुशीत) हे एकदाचं घ्या- त्या कलालाच्या कपाळाला लावा, आणि घ्या शेवटचा घोट बायकोच्या आणखी संसाराच्या नावानं! म्हणजे तुम्ही सुटलात आणि मी पण सुटले!

तळीराम : काय बायकोची जात आहे पाहा! गीते, माझी अमर्यादा होते आहे ही!

गीता : अहाहाहा! मर्यादा ठेवायला काय गुणांचे दिग्विजयी लागून गेलात! स्वत:च्या संसाराचं वाटोळं केलंत, दुसर्‍याच्या संसाराचं वाटोळं केलंत! घरात चुलखंड थंडावले आहे. तिथं माझी हाडं लावू की तुमची?

तळीराम : काय बेमुर्वत बाजारबसवी आहे! घेऊ का नरडं दाबून जीव? मी दारू पितो म्हणून माझी अशी अमर्यादा करतेस? थांब, अशी पालथी पाडून तुलाही दारू पाजतो! चल, दारू तरी पी, नाहीतर घरातून चालती तरी हो! नाही तर जुन्या बाजारात नेऊन लिलाव पुकारून आडगि-हाइकाला फुंकून टाकीन!

गीता : हं! तोंडाच्या गोष्टी असतील अगदी! वरूनच उतरले पाहिजेत तुमचे! स्वत: खातेर्‍यात लोळता आहात ते थोडं नाही का झालं?

तळीराम : जातेस का पितेस? दादासाहेबांच्या तिथं लावालावी करून मला त्यांच्या घरी जायला बंदी करवलीस? चल, घे हा दारूचा घोट का घेऊ नरडीचा घोट? (तिला धरतो. दोघांची झटापट होते. ती त्याला ढकलून देते.)

गीता : देवा, नकोरे नको या घरात राहणं आता! (जाते.)

तळीराम : बेहत्तर आहे गेलीस तर! तुझ्या नावानं आंघोळ करून मोकळा होईन! आता पुन्हा घरात ये- जर उभी ठार केली नाही तर नावाचा तळीराम नव्हे. (जातो. पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

(स्थळ: रामलालचे घर. पात्रे: भगीरथ व शरद्)

भगीरथ : अगदी बरोबर आहे. हा लोकभ्रम निबंध, निबंधमालेतील एक अत्युत्कृष्ट म्हणून मानलेला निबंध आहे. ऐक पुढं... (स्वगत) वाचण्याच्या भरात मी काय वाचतो आहे आणि कोणापुढं वाचतो आहे, याचं मला भानच नाही! शास्त्रीबुवांचे कळकळीचे आणि प्रामाणिक हृदयाचे विधवांच्या स्थितीबद्दलचे हे करुणोद्गार मी वेडयासारखा या बालविधवेपुढं वाचीत सुटलो आहे! (उघड) शरद्, भाईसाहेब परत येण्याची वेळ झाली. आज आपण फार वेळ वाचीत बसलो, नाही? पुरे करावं नाही, मला वाटतं आता?

शरद् : (किंचित हसून) बरं, राहू द्या आता इतकंच आज.

भगीरथ : (स्वगत) हिनं हसून आम्हा पुरुषवर्गाचा चांगलाच उपहास केला म्हणायचा! या चतुर आणखी प्रेमळ मुलीपुढं मनाचे डावपेच मुळी चालतच नाहीत. (उघड) शरद्, तुझ्या हसण्याचा अर्थ मी समजलो. माझ्या मनातले विचार तू बरोबर ओळखलेस. शरद्, धर्मामुळं म्हण, रूढीमुळं म्हण, पुरुषांच्या स्वार्थबुध्दीमुळं म्हण, पण तुम्हा विधवांची हिंदू समाजात मोठी विटंबना चालली आहे, असं कोणत्याही प्रामाणिक मनुष्याला कबूल करावं लागेल.

शरद् : भगीरथ, संसारहानीच्या दु:खाबरोबरच या अपशकुनासारख्या गोष्टीच्या अपमानाचंही तीव्र दु:ख आम्हाला भोगावं लागतं-

(राग- बागेसरी; ताल- त्रिवट. चाल- गोरा गोरा मुख.) मानभंग दाही। मृतशा हृदया॥ ध्रु.॥ दग्ध वल्लरी जाळी चंचला अदया॥ 1॥ गतपतितांचे जीवन जगती वाया॥ 2॥

भगीरथ : अगदी खरं आहे हे. आम्ही पुरुष विधवांच्या बाबतीत अगदी विचारशून्य होऊन त्यांच्याबद्दलच्या वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होतो, आणि तू सांगितलेल्या दुहेरी दु:खात लोकनिंदेची आणखी भर घालतो. एखादी विधवा सदाचरणी आहे या अगदी सहज रीतीनं शक्य असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवताना आम्हाला आमच्यावर मोठं संकट पडल्यासारखं वाटतं. एखाद्या बालविधवेनं एखाद्याला नुसता रस्ता विचारला तर बघणार्‍याला असंच वाटतं की, ती पापाचाच मार्ग विचारीत आहे! फार काय सांगावं, पाण्यात बुडून असलेल्या बालविधवेला एखाद्यानं हात दिला तर तो तिला बाहेर काढण्याऐवजी नरकात ढकलीत आहे, इतकं मानण्याची आमच्या आर्य मनाची वृत्ती होऊन बसली आहे! आणि बालविधवांनी जितेपणी या नरकयातनांत तळमळत पडून आयुष्य कोणत्या सुखात कंठीत राहावं म्हणून विचारलं, तर पोक्तबुध्दीचे हे धर्मसिंधू लागलीच गंभीरपणानं म्हणतील, की आप्तइष्टांची मुलं खेळवीत बसल्यानं विधवांना जे सात्त्वि समाधान होतं, त्यापुढं वैधव्याच्या यातनांची काय प्रौढी आहे? असं जर असेल तर मी म्हणतो, या विवेकशाली महात्म्यांनी, आपली द्रव्योपार्जनाची लालसा शेजार्‍यांचे रुपये मोजून का भागवू नये? पोटाची खळी भागविण्यासाठी पंचपक्वान्नांकडे धाव घेण्याचं सोडून परक्याच्या पोटात चार घास कोंबून आपलं समाधान हे का करून घेत नाहीत?

(राग- काफी; ताल- त्रिवट; चाल- मोरे नाटके प्रिया.) सद्गुणा वधोनि हा! दंभ विजय मिरवी महा॥ ध्रु.॥ मोहपाशमेदना। ज्यांसि अल्पही शक्ती ना। विरतीसी भोगी स्तविती। तोचि; काय विस्मय न हा॥ 1॥

शरद् : जाऊ द्या- भगीरथ, आपल्या मन:क्षोभानं काय होणार? भगीरथ, आपला बरेच दिवसांचा परिचय आहे, म्हणून तुम्हाला मोकळया मनानं विचारते, आणि तेसुध्दा अलीकडे दादाची स्थिती पाहून माझी आशा सुटत चालली आहे म्हणून विचारते- या मद्यपानाचा मोह सुटणं शक्य असतं का?

भगीरथ : शरद्, या प्रश्नाचं अस्तिपक्षानं उत्तर देण्यासाठी, स्वत: माझंच उदाहरण देताना माझ्या मागच्या वर्तनामुळं जो मनाला ओशाळेपणा वाटतो, त्यापेक्षा आत्मस्तुतीच्या कल्पनेचा ओशाळेपणा जास्त वाटतो.

शरद् : तुम्हाला पुन्हा कधीही- संकोच कशाला ठेवू? मद्यपानाची पुन्हा आठवणसुध्दा झाली नाही?

भगीरथ : अगदी चुकूनसुध्दा नाही! आणि होणार तरी केव्हा? हल्ली माझा काळ इतका सुखात जातो आहे- एकीकडे भाईसाहेबांच्या सदुपदेशाचा दिनप्रकाश आणि एकीकडे तुझ्या सहवासाची शीतल चंद्रिका-

शरद् : शीतल चंद्रिका म्हणजे? (भगीरथ खाली पाहतो.)

भगीरथ : बोलण्याच्या भरात मी एखादा शब्द-

शरद् : खरं बोलण्याच्या प्रतिज्ञेवर शपथ घेऊन माझ्यापुढं तुम्ही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे नाही आहात! मीसुध्दा सहज विचारलं, रागानं नव्हे- (रामलाल येतो.)

रामलाल : शरद्, आताशा दोन-तीन दिवस सुधाकरनं तुमच्या घरात मद्यपानाचा अड्डा घातला आहे, हे तू मला सांगितलं नाहीस? आता गीता मला भेटली तिनं मला हा प्रकार सांगितला. याबद्दल सुधाकरजवळ गोष्ट काढायला मी गेलो, पण माझ्या सांगण्याचा काहीएक परिणाम झाला नाही. भगीरथ, पद्माकराला आणि बाबासाहेबांना आताच्या आता एक तार कर की असाल तसे निघून या म्हणून. त्यांच्या सांगण्याचा तरी सुधाकरावर काही परिणाम होऊन या भयंकर प्रकाराला आळा बसतो की काय, एवढीच आशा आता उरली आहे. आणखी शरद्, याच पावली तू घरी जा आणि गीता तुमच्या घरी गेली आहे, तिला आपल्या घरी ठेवून घे! तळीरामानं आपल्या घरातून तिला हाकलून दिली आहे. तुमच्या इथं तिला राहायचं नसेल तर माझ्याकडे पाठवून दे! जा बरं लवकर, ती बिचारी गरीब उगीच विवंचनेत पडली असेल.

शरद् : हो, ही मी निघालेच. (जाते.)

भगीरथ : तार आताच करून येऊ का?

रामलाल : इतकी काही घाई नाही. आणखी थोडया वेळानं केलीस तरी चालेल.

भगीरथ : मग भाईसाहेब, तितक्या वेळात कालचा विषय पुरा करून टाकानात? काल आपलं बोलणं मध्यंतरीच थांबलं. तेव्हापासून माझ्या मनाला सारखी उत्कंठा लागून राहिली आहे. लोककल्याणाचा मार्ग कोणता ते सांगितलं नाहीत-

रामलाल : भगीरथ, लोककल्याणाचा एकच राजमार्ग म्हणून दाखविण्याइतकं हिंदुस्थानचं भावी सौख्य आज एकदेशीय नाही. एकीकडे राजकीय सुधारणा आहेत, एकीकडे सामाजिक सुधारणा आहेत. इकडे धर्म आहे, इकडे उद्योग आहे, इकडे शिक्षण आहे. इकडे स्त्रियांचा प्रश्न आहे. इकडे अस्पृश्यांची बाबत आहे, तर तिकडे जातिभेदाचा गोंधळ आहे. अशा या चमत्कारिक प्रसंगी अमूक एकच मार्ग इतरांच्यापेक्षा चांगला आहे, असं सांगणं मोठं धाडसाचं आहे. परिस्थितीच्या अनुभवाप्रमाणं या विषयावर ज्याचे त्याचे विचार अगदी निरनिराळे झालेले आहेत. हजारो वर्षांच्या ओझ्याखाली तेहतीस कोटी जिवांच्या जडपणानं खालावत चाललेल्या आमच्या भरतभूमीला उचलून धरण्यासाठी जितक्या भिन्नभिन्न प्रकृतींच्या मूर्ती आम्हाला लाभतील तितक्या हव्याच आहेत. लोकहितात पडू पाहणार्‍या विद्यार्थ्याला कायावाचामनसा आधी हा धडा हस्तगत- नाही; अगदी जिवाशी- नेऊन भिडविला पाहिजे. आपल्याहून भिन्न रीतीनं लोकहिताचा प्रयत्न कोणी करीत असलं तर त्याच्याबद्दल सहानुभूती न दाखविणं, दुसर्‍याच्या प्रयत्नाबद्दल अनादर दाखविणं, देशहिताच्या बुध्दीतच स्पर्धा वाढवून एकमेकांना खाली पाडणं, या कारणांमुळे आज आमची जितकी अवनती होत आहे, तितकी दुसर्‍या कोणत्याही कारणामुळं होत नसेल. भगीरथ, मी लोकोत्तरबुध्दीचा एखादा महात्मा नाही; पण शक्य तितक्या शांतपणानं आणि समतोल मनानं सरळ गोष्टी पाहात असल्यामुळे माझे विचार असे होऊ लागले आहेत. राजकीय सुधारणेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गानं जाताना विधवांच्या दुबळया हृदयाच्या पायघडया तुडवीत जायला मागंपुढं पाहात नाहीत, केवळ सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते विधवांच्या कपाळी कुंकू लावण्यातच इतके रंगून गेलेले आहेत की, आपल्या भारतमातेच्या वैधव्याचा त्यांना विचारच करता येत नाही! आर्यधर्माचा भलता अभिमान धरणारे, आर्यधर्माची विजयपताका अधिकाधिक उंच दिसावी म्हणून धर्माभिमानाच्या भरात तिच्या उभारणीसाठी सहा कोटी माहारामांगांच्या हाडांच्या सांगाडयांची योजना करीत आहेत. नामशुद्रांचे आणि अतिशुद्रांचे वाली म्हणविणारे त्या वर्गाला उच्चपदी नेण्याऐवजी बिचार्‍या ब्राह्मणवर्गाला रसातळी गाडण्याचा अधम प्रयत्न करीत आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितकी मतं, आणखी मतं तितके मार्ग, असा प्रकार होऊन आज जबाबदार, आणि बेजबाबदार लोकांना सर्वांनाच बारा वाटा मोकळया होऊन बसल्या आहेत. त्रिसप्तकोटिकंठकृतनिनादकराले जननि इतक्या हाका आरोळयांच्या कल्लोळात तुझ्या नेमक्या हिताचा संदेश आम्हा पामर बाळांना कसा ऐकू जाणार? भगीरथ, व्यापक लोकशिक्षण, सार्वजनिक लोकशिक्षण हा तरी सध्या असा एक मार्ग दिसतो आहे की, जो एकटाच आम्हाला आत्यंतिक हिताला नेऊन पोहोचविणारा नसला, तरी इतर सर्व मार्गांवर आपला प्रकाश पाडणारा आहे खास. भगीरथ आर्यवर्ताच्या उदयोन्मुख भाग्याचा अचूक मार्ग सांगणार्‍या मंत्रद्रष्टा महात्मा अजून अवतरावयाचा आहे. मनुष्यस्वभावाला शोभणार्‍या आतुर आशेनं त्याच्या आगमनाची वाट पाहात बसणं हेच आज तुझ्या माझ्यासारख्या पतितांचं कर्तव्य आहे. सर्वच मार्ग स्वच्छ करून ठेवले म्हणजे त्या महात्म्याचा यांपैकी वाटेल त्या मार्गाने होणारा प्रवास तितका तरी सुखकर होईल. भगीरथ, आज आपल्याला खासगी कामं बरीच पडली आहेत. आणखी ती जरुरीची आहेत. पुढं केव्हा तरी या सार्वजनिक शिक्षणाचा माझ्या दृष्टीनं जो व्यापकतम प्रयत्न वाटतो तो तुला यथाशक्त्या सांगेन. चल भगीरथ, सध्या आपले दुर्दैव सुधाकराच्या व्यसनाशी संलग्न झालं आहे. मी लिहून देतो तेवढी तार पद्माकराला पाठीव. चल लवकर!

प्रवेश चवथा

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: तळीराम, सुधाकर, सिंधू, शरद्.)

तळीराम : असं आम्ही बोलू नये; पण दादासाहेब, आता बोलायची वेळ आली! अहो, या घरात तुमची काय किंमत आहे? तुम्ही कोण आहात? अहो दादासाहेब-

सुधाकर : तळीराम, तू मला अजून दादासाहेब म्हणतोस? दोस्त, मी तुझा साहेब का? अशा परकेपणानं मला का हाका मारतोस? मला सुधाकर म्हण- दादासाहेब म्हणू नकोस- सुधा म्हण-

तळीराम : दादासाहेब, तुम्हाला सुधा म्हणणारी माणसं निराळी आहेत. आम्ही काय दरिद्री माणसं! फार झालं तर तुमच्या जिवाला जीव देऊ एवढंच! आम्ही काय तुम्हाला सुधा म्हणावं? तुमची लायकी आम्हाला कळते. तुम्हाला सुधा म्हणणारे थोर लोक निराळे आहेत.

सुधाकर : कोण आहेत ते थोर लोक? मला सुधा म्हणणारा कोण आहे? माझ्या घरात मला अरेतुरे? प्रत्यक्ष माझ्या घरात?

तळीराम : तुमचं घर? दादासाहेब, हे घर तुमचं नाही. हे घर रामलालचं आहे!

सुधाकर : रामलालची काय किंमत आहे?

तळीराम : किंमत आहे, म्हणून तर त्यानं मला घरात यायची बंदी केली. आम्ही तुमचे जिवलग दोस्त- आम्हाला घरात यायची बंदी! रामलालनं बंदी केली मला!

सुधाकर : मी रामलालला बंदी करतो. घरात पाऊल टाकू नकोस म्हणून सांगतो. घर माझं आहे!

तळीराम : तुमचं ऐकतो कोण? बाईसाहेब त्यांना अनुकूल, शरदिनीबाई त्यांना अनुकूल! सगळयांनी संगनमत करून आज पद्माकराला तार केली आहे. तो येऊन तुमचा बंदोबस्त करणार! आता आम्हाला धक्का मारून घराबाहेर घालविणार!

सुधाकर : सगळे पाजी, चोर, हरामखोर लोक आहेत! येऊ दे, पद्माकर येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे! पद्माकर, त्याचा बाप, रामलाल, शरद्, सिंधू- एकेकाला लाथ मारून हाकलून देतो घराबाहेर!

तळीराम : ते लोक बरे जातील बाहेर? पद्माकर तर आता खर्च चालवितो तुमचा! तो कसा जाईल? घर त्याचं आहे. पैसा त्याचा आणि घरही त्याचं!

सुधाकर : मला कुणाची कवडी नको आहे! मी लाथ मारीन तिथं पाणी काढीन! मला कुणाचा पैसा नको आहे! मला थोडीशी दारू पाहिजे! आण थोडीशी!

तळीराम : या घरात तुम्हाला घेताना पाहिलं तर बाईसाहेब काय म्हणतील मला?

सुधाकर : काढ पेला! सिंधूच्या, शरद्च्या देखत भरून दे! कुणी एक अक्षर बोललं तर पाहतो! सिंधू, शरद्, सिंधू, चलाव! सगळे इकडे या- चलाव! सिंधू, शरद्! तळीराम, भर पेला! (सिंधू व शरद् येतात; तळीराम पेला भरू लागतो.)

सिंधू : तळीराम, तळीराम, काय करता हे?

सुधाकर : एक अक्षर बोलू नकोस! मुकाटयानं दोघी उभ्या राहा आणखी पाहा! तळीराम, आण इकडे तो पेला!

शरद् : तळीराम, तू अगदी नरपशू आहेस! दोन्ही डोळयांची भीडमुरवत, लाजलज्जा काहीतरी आहे का तुला?

(राग- सोहनी; ताल- त्रिवट. चाल- काहे अब तुम.) दुष्टपति सर्पा सदर्पा, कालकूटा वमसि भुवनासि अखिलाही तये जाळितोसि॥ ध्रु.॥ पितृमातृरुधिरी तृषित गमसि अति। कृतान्तासि भय निकट बघुनि तुजसि॥ 1॥

तळीराम : दादासाहेब, तुमच्या बायका आम्हाला शिव्या देतात; ऐका! (पितो.)

सुधाकर : सिंधू, शरद्, लाथ मारीन एकेकीला!

तळीराम : माझ्या बायकोच्या गळयातलं मी मंगळसूत्रसुध्दा तोडलं! पण दादासाहेब, तुमच्या बायकांनी आम्हाला खेटरं दिली, शिव्या दिल्या! बायकोच्या गळयातलं मंगळसूत्र तोडणारा मर्द मी!

सुधाकर : सिंधूच्या गळयातलं मंगळसूत्र तोड! ऊठ तळीराम, माझी तुला शपथ आहे! तू माझा दोस्त आहेस! जिवाचा कलिजा आहेस! माझा भाऊ आहेस! बाप आहेस! माझा देव आहेस! ऊठ, सिंधूच्या गळयातलं मंगळसूत्र तोड! शरद्च्या गळयातलं असेल ते तोड! ऊठ, मंगळसूत्र तोड आणि मग माझं जानवंही तोड! (तळीराम उठतो आणि सिंधू व शरद् यांच्याजवळ येऊन मंगळसूत्र ओढू लागतो.)

शरद् : दादा, दादा, काय हा अविचार? अरे हे तू-

सिंधू : देवा, भाई-

सुधाकर : हं, खबरदार, हलू नका जागच्या; नाहीतर मान कापीन! भाईचं नाव घ्यायचं नाही! हलू नका- तळीराम, बघतोस काय? तोड मंगळसूत्र! (तळीराम मंगळसूत्राला हात घालतो, तोच रामलाल, पद्माकर व बाबासाहेब येतात. पद्माकर तळीरामला लाथेने उडवितो. तळीराम रडू लागतो व पिऊ लागतो.)

तळीराम : दादासाहेब, आम्हाला लाथ मारली! पद्माकरानं लाथ मारली! रामलाल आहे! आम्ही पीत बसतो!

पद्माकर : बेशरम्, निर्लज्ज जनावरा, तुला उभा चिरून टाकतो!

रामलाल : सिंधूताई, हा तळीराम कसा आला घरात?

सुधाकर : तू कसा आलास घरात? चल, माझ्या घरातून चालता हो! पद्माकर, तू पण चालता हो! त्या थेरडयाला एक लाथ मार! चले जाव! तळीराम, लगाव लाथ एकेकाला! पाजी लोक!

पद्माकर : दादासाहेब, आपण हे मांडलं आहे तरी काय?

सुधाकर : चल जाव! पद्माकर, रामलाल, आधी तू नीघ! सिंधूशी संगनमत करतो माझ्या घरात?

तळीराम : तुमची सनद गेली त्या वेळी यानं बाईसाहेबांना मिठी मारली!

पद्माकर : हरामखोर! जिव्हा छाटून टाकीन एक अक्षर बोललास तर!

तळीराम : दादासाहेब, - म्हणून यानं मला परत घरात यायची बंदी केली?

सुधाकर : रामलाल, माझ्यासमोर उभा राहू नकोस! पद्माकर आधी घरातून बाहेर निघ! ए थेरडया चलाव!

पद्माकर : छे:, छे:, हा तर बेताल अनर्थ आहे! भाई, चल, इथं उभं राहण्यात अर्थ नाही! सिंधूताई, चल, याउप्पर तू या घरात राहणं योग्य नाही. हा शुध्द नरकवास आहे!

तळीराम : दादासाहेब, पैसा बोलतो आहे हा!

सुधाकर : चल जाव, सिंधू, तू पण चालती हो! शरद्, तू पण जा! मला कोणाची जरूर नाही!

पद्माकर : ठीक आहे. ऊठ सिंधू, या घरात पाणी प्यायलासुध्दा राहू नकोस! चल-

सिंधू : दादा, या घरातून कुठं जाऊ म्हणतोस?

पद्माकर : कुठंही! या नरकाबाहेर अगदी कुठंही!

सिंधू : हा नरक? हे पाय जिथं आहेत तिथं नरक? दादा, अरे, तू चांगला शहाणा ना? वेडया, हे पाय जिथं असतील तिथंच माझा स्वर्ग, तिथंच माझं वैकुंठ, आणि तिथंच माझा कैलास!

(राग- पहाडी- गज्जल; ताल- धुमाळी. चाल- दिल बेकरार तुने.) कशी या त्यजू पदाला। मम सुभगशुभपदाला। वसे पादयुग जिथे हे। मम स्वर्ग तेथ राहे॥ स्वलोकी चरण हे नसती। तरी मजसी निरयवसती ती॥ नरकही घोर सहकान्ता। हो स्वर्ग मला आता॥ 1॥

या पावलांविरहित मात्र मला देवादारीसुध्दा नरकवास घडेल! तुमच्या चौदाचौकडयांच्या राज्यात राहून रौरवाची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाची दासी होऊन दु:खात दिवस कंठीत मी या पायांजवळ अशी अष्टौप्रहर बसून राहीन. (सुधाकराच्या पायांवर मस्तक ठेवते; तो तिला लाथ मारतो.)

सुधाकर : अशी लाथ मारून तुला झुगारून देईन!

पद्माकर : पाहा, ताई, पाहा! अजून तरी या पायांचा मोह सोड!

सिंधू : दादा, मोह का सोडू? हेच पाय माझ्या कपाळी आहेत. अरे, देवानं पाठ पुरविली तर ज्या पायांच्या आश्रयानं उभं राहायचं, त्या पायांनी झुगारून दिलं तर कुठं जायचं? (सुधाकराला) का मला दूर लोटणं झालं? वैकुंठेश्वरा, माझ्या कपाळीच्या कुंकवासाठी या पायधुळीत मला राहायला नको का? आपल्या पायांपासून- दैवाच्या दैवतापासून- या दीन दासीला दूर लोटू नका!

(राग- पहाडी- जिल्हा; ताल- केरवा. चाल- मान नाही सैय्या.) लोटू नका कान्ता। अशी दूर कान्ता। केवि जगे दीना मीना। जललवरहिता॥ ध्रु.॥ हेचि चरण माझे। जीवन जगती। मृतचि गणा मज हे दुरी होता॥ 1॥

सुधाकर : सिंधू, तुला इथं राहायचं असेल तर या हरामखोरांचं नावसुध्दा घेऊ नकोस! या चोरांच्या घरातला एक पैसादेखील माझ्या घरात आणायचा नाही. असं असेल तर या घरात राहा!

तळीराम : शाबास, दादासाहेब! अशी शपथ घ्यायला लावा आणि मग या घरात राहायला परवानगी द्या! शपथ घ्यायला लावा!

सुधाकर : सिंधू, कबूल आहे तुला हे? नुसत्या तुझ्या गंगायमुना मला नकोत!

तळीराम : नुसते कबूल नाही! दादासाहेब, वाहत्या गंगेत हात धुवून घ्या! शपथ घ्यायला लावा- हॅम्लेटच्या बापासारखा तुम्हाला इशारा देतो आहे! बाईसाहेब, शपथ घ्या!

सुधाकर : (मोठयाने ओरडून) 'त्रस्त समंधा, शांत राहा!' सिंधू, आत्ताच्या आता शपथ घे, नाही तर घरातून चालती हो! कोणाचा पैसा, कोणाचे काही काही घरात आणायचं नाही!

सिंधू : आपल्या पायांवर हात ठेवून सांगते, आजन्म हाल सोशीन, काबाडकष्ट करीन, पण दुसर्‍याच्या कष्टाची कवडी म्हणून या घरात येऊ देणार नाही! आपल्या दोघांच्या कष्टाविरहित सगळया जगातील धनदौलत आजपासून मला शिवनिर्माल्य आहे!

(राग- काफी- जिल्हा; ताल- कवाली. चताल- कत्ल मुझे कर.) सत्य वदे वचनाला। नाथा। स्मरुनि पदाला या सुरविमला॥ ध्रु.॥ वित्त पराजित मानि विषसम। स्पर्शिन ना कधी मी त्याला॥ 1॥

बाबासाहेब : सिंधू, काय भलतीच शपथ घेतलीस ही?

पद्माकर : ताई, तू शुध्दीवर तरी आहेस का? या रौरवात राबून, अन्नाला मोताद होऊन, याच्या शिव्याशापात जळून उभ्या आयुष्याची राखरांगोळी का करायची आहे तुला?

सिंधू : राखरांगोळी काय म्हणून? माझ्या देवासाठी जळून गेले तर माझी राखरांगोळी होईल? देवाकारणी मातीची लंका जळाली, तिचंसुध्दा सोनं झालं! मग मी तर माणसासारखी माणूस आहे! दादा, बाबा, तुम्हाला वेडं तर लागली नाहीत? सुखाच्या संसारातसुध्दा चार दिवस माहेरी राहायचं आम्हा बायकांच्या जिवावर येतं आणि तुम्ही मला आता घर सोडायला सांगता? इकडची अशी अवस्था झालेली, घरात हा प्रकार; आता तर डोळयात तेलवात घालून मला बसायला पाहिजे! मला काही वेडंवाकडं झालं असतं, तर इकडून मला टाकणं झालं असतं का? माझ्याकरता आकाशपातळ एक करायचं झालं नसतं का? मग मला इकडच्या जिवासाठी पडतील ते काबाडकष्ट उपसायला नकोत का? आमच्या गरिबीसाठी मोलमजुरी करायला नको का?

पद्माकर : ताई, काबाडकष्ट उपसायचे आणि तेसुध्दा या महारवाडयात राहून?

बाबासाहेब : सिंधू, ज्या ठिकाणी तुला पोटापाण्याची पंचाईत पडावी, तिथं टाकून-

पद्माकर : ताई, तुला झालं तरी काय? तू काबाडकष्ट करणार? कुबेराला कर्ज देण्याइतका धनंतर हा तुझा बाप, कोसळत्या आकाशाला थोपवून धरणारा मी तुझा डोंगराएवढा भाऊ!- आणि तू एखाद्या दिवाण्या दारूबाजासाठी-

सिंधू : हा! दादा, या घरात, या पायांसमोर- माझ्यासमोर असं अमंगल मी तुला बोलू देणार नाही! पतिव्रतेच्या कानांची ही अमर्यादा आहे! जा- बाप, भाऊ, माझं या जगात कोणी नाही? पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते! देवाब्राह्मणांनी दिलेल्या नवर्‍याची ती बायको असते! बाबा, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी तुमची मुलगी तुमच्या घराला मेली आणि नव्या नावानं मी या घरात जन्माला आले. मुलीच्या लग्नाचा समारंभ आई बापांना सुखदायक वाटतो; पण मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तरक्रिया हे त्या बापडयांच्या ध्यानीमनीसुध्दा येत नाही. बाबा, कन्यादानासाठी इकडच्या हातावर तुम्ही जे उदक सोडलंत, त्यानंच माझ्या माहेरच्या नावाला तिलांजली दिलीत!

सुधाकर : सिंधू, हे हरामखोर इथं कशाला उभे राहिले आहेत? तुला राहायचं असेल तर या सगळयांना हाकलून दे!

सिंधू : दादा, बाबा, भाई, ऐकलंत ना हे? माझ्याबद्दलची माया-ममता सोडून आल्या पावली आता बाहेर चला! वन्सं, हात जोडून, पदर पसरून तुमच्याजवळ मात्र एवढं मागणं आहे की, तुम्ही मात्र आता या घरात राहू नका. नाही म्हणू नका- माझ्या गळयाची शपथ आहे तुम्हाला! तुम्हाला इकडल्याप्रमाणंच आपला भाई आहे! घरात असा प्रकार सुरू झाल्यावर तुमच्यासारख्यांना अब्रूनं दिवस निभावून नेणं मोठं कठीण आहे!

शरद् : वहिनी, माझ्या अब्रूचं बोलतेस आणि तुझ्या अब्रूचं मात्र-

सिंधू : या पायांच्या छायेत असले, म्हणजे माझ्या अब्रूला कळिकाळाचीसुध्दा भीती नाही.

सुधाकर : सिंधू, अजून- खोटी शपथ घेतलीस तू.

सिंधू : आता जर कुणी इथं थांबाल तर माझ्या गळयाची शपथ आहे! पंचप्राणांच्या परमेश्वरा, मी खोटी शपथ घेतली नाही. सिंधूचा सगळया जगाशी संबंध सुटला! आपल्या दोघांच्या कष्टाविरहितची एक कपर्दिकादेखील घरात आणीन तर आपल्या पायांचीच शपथ आहे-

(राग- पिलू; ताल- केरवा. चाल- डगमग हाले.) सकल जगाचा। संसृतीचा। पाश तोडी झणि॥ ध्रु.॥ पदि या सारा। वसत पसारा। त्रिभूवना संसाराचा। मम साचा॥ 1॥ (त्याच्या पायावर डोके ठेवते.)

सुधाकर : तळीराम, भर आता पेला राजरोस आणि दे मला!

तळीराम : आता कुठं आहे शिल्लक? (ओतून) हा एवढा एकच प्याला!

सुधाकर : किती का असेना? पण सिंधूच्या देखत घेणार! बस्स झाला तेवढा एकच प्याला!(पेला पिऊ लागतो. पडदा पडतो.)

अंक तिसरा समाप्त.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED