Ekach Pyala - 5 books and stories free download online pdf in Marathi

एकच प्याला - अंक पाचवा

एकच प्याला

(मराठी नाटक)

अंक पाचवा

साहित्यिक = राम गणेश गडकरी

अनुक्रमणिका

१.अंक पाचवा

१.१प्रवेश पहिला

१.२प्रवेश दुसरा

१.३प्रवेश तिसरा

१.४प्रवेश चवथा

***

अंक पाचवा

प्रवेश पहिला

(पात्रे- भगीरथ व शरद्; शरद् रडते आहे.)

भगीरथ : (स्वगत) भाईसाहेबांचं माझ्याशी असं तुटकपणाचं वागणं का होतं याचं कारण आता माझ्या लक्षात आलं! हा रोगातला रोग, मनाला मारणारा, जिवाला जाळणारा, हा मत्सर आहे! प्रेमाच्या स्पर्धेत निराश झालेल्या दीन जिवांचा हा निर्वाणीचा मत्सर आहे. कडू काळाचा कडवटपणाही याच्यापुढं अमृतासारखा वाटेल! या वयात, अशा अपत्यस्नेहाच्या भरात, भाईसाहेबांच्या विवेकशाली पुरुषालासुध्दा प्रेमानं- हे प्रेम नाही; निराशेत सात्त्वि प्रेम करुणावृत्तीचं रूप घेतं- या कामानं- कदाचित ज्याचं त्याला कळल्यावाचूनही असं होत असेल. या स्पर्धेची जाणीव रामलालांना पहिल्यापासूनच- नको हा विचार! भाईसाहेबांच्या नावाचा अगदी अनुदार उल्लेख झाला आणि विचार तर अगदी भलता झाला! अरेरे! परमेश्वरा, किती दु:खप्रद प्रसंगात मला आणून ठेवलंस हे! भाईसाहेबांच्या मनोवृत्तीविषयी न्यायनिष्ठुर निर्णय देण्यासाठी या हतभागी भगीरथानं विचार करावा? त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आठवले म्हणजे माझ्या स्वत:चाही मला विसर पडायला हवा! दारूच्या नादानं जीवन्मृत झालेल्या भगीरथाला त्यांनी पुनर्जन्म दिला आणि त्यांच्या वर्तनाकडे त्या मीच अशा टीकादृष्टीनं पाहायचं? पित्याच्या पुण्यवृत्तीबद्दल संशय घ्यायचा, मातेच्या शुध्द शीलाबद्दल नीचपणानं चौकशी करायची, प्रत्यक्ष परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल तर्कवितर्क लढवायचे, तशातलंच हे अनन्वित पातक आहे! भाईसाहेबांनी आधीच आपल्या प्रेमाची रतिमात्र तरी कल्पना मला दिली असती तर शरद्च्या स्नेहभावाला प्रेमाच्या पायरीवर चढविण्याऐवजी मी केवळ परिचयाच्या उदासीन पदावर बसविलं असतं! पण त्यांनाच आधी त्यांच्या मनाची वृत्ती कळली नसेल! ते काही असो; माझ्या जीविताची वाटेल ती वाट लागली तरी भाईसाहेबांच्या सुखाच्या वाटेत मी कधीही आड येणार नाही. भगीरथप्रयत्नांनी शरद्च्या प्रेमाचा वेग भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे. (उघड) शरद्, अशा हृदयभेदक स्थितीतही तुझ्याशी निष्ठुरपणानं बोलतो याची मला क्षमा कर. आता तुझ्याशी असं बोलताना मला समाधान वाटत आहे असे मुळीच समजू नकोस. या विषारी विचारानं माझं हृदय आतल्या आत सारखं जळत आहे. अगदी उपाय नाही म्हणूनच मला असं बोलावं लागत आहे, त्याची क्षमा कर आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. शरद्, भगीरथाच्या सुखासाठी वाटेल ते दु:ख भोगायला तू तयार आहेस का? हं, अशी रडून मला निरुत्साह करू नकोस! संशयाच्या दीन दृष्टीनं पाहू नकोस! अशा प्रश्नाचं स्पष्ट शब्दांनी उत्तर देणं कोणत्याही बालिकेला, त्यातून तुझ्यासारख्या कोमल मनाच्या आणि आजन्म दु:खाग्नीत करपून निघणार्‍या बालविधवेला अगदीच मरणाहूनही अधिक आहे, हे मी जाणून आहे! पण आताचा प्रसंगच असा चमत्कारिक आहे, की स्पष्ट बोलल्यावाचून गत्यंतर नाही. कुलीनतेची मर्यादा आणि प्रायोजकता यांनाही आपण क्षणभर बाजूला ठेवलं पाहिजे. सांग शरद्, अगदी मोकळया मनानं सांग. भगीरथाच्या सुखासाठी तू वाटेल ते दु:ख भोगायला तयार होशील का?

शरद् : तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं कारणच नाही. जे तुमचं सुख ते माझं दु:ख असं कधी तरी घडेल का?

भगीरथ : प्रेमाच्या सहवासात राहताना भिन्न जिवांना जी एकरूपता मिळते तीच विरहाच्या चिरनिराश सृष्टीतही राखणे फार दुष्कर आहे.

शरद् : विरहाची सृष्टी! विरहाची कल्पना आपण आता-

भगीरथ : मनाचा धडा करून एकदाच, एकदम स्पष्टपणं काय ते बोलून टाकतो. शरद्, दुसर्‍या कशासाठी जरी नाही, तरी केवळ या भगीरथाच्या सुखासाठी- शरद्, क्षमा कर, हात जोडून हजार वेळा तुझी क्षमा मागतो- पण तुला भाईसाहेबांची विनंती मान्य करावी लागेल! रामलालशीच तुला पुनर्विवाह करावा लागेल!

शरद् : भगीरथ, भगीरथ, काय हो बोललात हे? खरोखरीच तुमचं हृदय पार जळून गेलं आहे का? अगदी विषाचा- भगीरथ, हृदयदाहक प्राणघातक विषाचा- वर्षाव केलात हो माझ्यावर!

भगीरथ : भगीरथाच्या हृदरोगावर हे विषच अमृतासारखं गुणकारी आहे! याच विषाच्या सेवनानं तुझ्या हृदयाच्याही वृत्ती मरून जाऊ देत!

शरद् : भगीरथ, तुमच्या चरणी वाहिलेले हे प्राण आता दुसर्‍याचे कसे हो होतील?

भगीरथ : रामलालच्या चरणांशी माझे प्राण गहाण पडले आहेत. तुझ्या प्राणांच्या विनिमयानंच मला माझ्या प्राणांची पुन्हा प्राप्ती होणार आहे! शरद्, माझ्या या कर्तव्याच्या स्वार्थवृत्तीची मला क्षमा कर!

शरद् : नका हो नका असं बोलू, भगीरथ! तुमच्या शब्दाशब्दानं माझ्या हृदयावर कसे विषारी घाव बसताहेत, याचा थोडा तरी विचार करा!

भगीरथ : कृतज्ञता विचारशील नसते! भाईसाहेबांचे आजवर माझ्यावर आणि तुझ्यावरही किती उपकार झाले आहेत त्यांची नीट आठवण कर! त्या उपकारांची फेड आपल्याला करायला नको का? देवदैत्यांनी समुद्रमंथन करून चौदा रत्नं बाहेर काढली; त्यात स्पर्शमात्रानं जीवनाश करणारी सुरा आणि स्पर्शमात्रानं चिरंजीवन देणारी सुधा अशी दोन परस्परविरोधी रत्नं सापडली. पापपूर्ण पृथ्वीवर पहिल्याचा पूर्णावतार झाला आणि दुसरं स्त्रियांच्या अधरामृताच्या रूपानं मनुष्यजातीच्या वाटणीला आलं. एका रत्नाच्या यातनामय तापातून ज्यांनी माझी सुटका केली त्यांच्याच सुखासाठी दुसर्‍या रत्नाच्या सुखाचाही मला त्याग केला पाहिजे. संसारात सुखदु:खाचं मिश्रण अभिन्नस्वरूपाचं आहे. काळोखाची एक रात्र काढून टाकली तर तिच्याबरोबरच प्रकाशपूर्ण दिवसाकडेही डोळेझाक करायला पाहिजे. दु:खाचा एक अंश टाळण्यासाठी त्याच्याशी संलग्न असलेल्या सुखांशालाही दूर करावं लागतं, हा ईश्वराच्या घरचा निष्ठुर न्याय आहे.

शरद् : भगीरथ, असे निर्दय कसे हो झालात?

(राग- जागी; ताल- त्रिवट. चाल- दिलभर जानुवे.) कृति अशी भीषणा। अन्य ना॥ ध्रु.॥ वितरिल मना। परमेशाच्या। यातना! ॥ 1॥ कोमलतरा । वनिताचित्ता। जाळी ना? ॥ 2॥

भगीरथ : भगीरथाच्या जगातली परमेश्वराची मूर्ती रामलालच्या रूपानं उभी आहे. आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, या आपल्या आर्यधर्माच्या अनुल्लंघनीय आज्ञा आहेत. भाईसाहेबांनी पित्याप्रमाणं मला पुनर्जन्म दिला. जगाच्या उपहासानं दु:खावलेल्या माझ्या मनोवृत्तीची मातृप्रेमानं जोपासना केली; भावी आयुष्याचं सार्थक होण्यासाठी महन्मान्य मार्गाचा मला गुरुपदेश केला; माता, पिता, गुरू, यांच्या या त्रिभूवनवंद्य त्रिमूर्तीला माझ्या दृष्टीनं परमेश्वराची पुण्यपदवी प्राप्त झाली आहे. या परमेश्वराच्या इच्छेसाठी सर्वस्वी आत्मयज्ञ करण्याला मला तत्पर व्हायला नको का? श्रीकृष्णपरमात्म्याच्या इच्छेसाठी मयूरध्वजराजानं आपलं अर्ध अंग करवतीनं कापून दिलं, त्याप्रमाणं माझ्या परमेश्वराच्या सुखासाठी माझ्या जिवापासून माझ्या भावी अर्धांगीला तोडणारी ही आकाशाची कुऱ्हाड- (स्वगत) पण नको. अशा अनुचित उद्गारांनी शरद्च्या मनात भाईसाहेबांबद्दल अनादर उत्पन्न होईल. दातृबुध्दीच्या श्रध्देप्रमाणंच दानवस्तूची पवित्रताही त्यागाला आवश्यक आहे.

शरद् : बोलता बोलता मध्येच थांबलात! तुमची ही निष्ठुरता तुमच्या हृदयालाही मान्य नाही. भगीरथ, दया करा, तुमच्या चरणी शरण आलेल्या प्रेमळ जिवाला असं दूर लोटू नका. शरद्च्या सुखासाठी, तुमच्या स्वत:च्या सुखासाठी, आपल्या दोघांच्या दुबळया प्रेमाला पायाखाली तुडवू नका.

(राग- भैरवी; ताल- त्रिवट. चाल- तुम जागो हा.) मजला वृथा। नाथा, का देता क्लेशा प्रखरा या॥ ध्रु.॥ चुरुनि प्रेमा। मम शुध्द कामा। हृदयांते का दहता उभयां॥ 1॥

भगीरथ : रामलालच्या सुखासाठी अखिल ब्रह्मांडही ब्रह्मार्पण करणं हा भगीरथाचा एकच धर्म आहे. रामलालचं सुख तेच भगीरथाचं सुख, हे मी तुला सांगतो. आणि भगीरथाचं सुख तेच शरद्चं सुख, हे तू मला सांगितलंस. आपणा तिघांनाही सुखी होण्याचा याखेरीज दुसरा मार्गच नाही. मी तुझ्याशी विवाह केला तर ऐन सुखाच्या भरातही भाईसाहेबांच्या निराशमुद्रेची करुणादृष्टी अष्टौप्रहर आपल्याकडे पाहात राहील! असमाधानाच्या मोलानं असं दुर्दैवी सुख मिळविण्यात काय अर्थ आहे? शरद्, आता विचाराच्या दृष्टीनं आपल्या भाग्यशाली दु:स्थितीकडे पाहा, तुझ्या प्राप्तीमुळे भाईसाहेब सुखात आहेत; त्यांच्या सुखाला साहाय्य केल्यामुळं माझी कृतज्ञता संतुष्ट झाली आहे; मला ऋणमुक्त करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केल्यामुळे तुला समाधान वाटत आहे! शरद्, हा मनोहर मनोभंग सुदैवानं आपणाला लाभणार आहे. भाईसाहेबांच्या उपकारांची फेड केल्यावाचून मिळविलेलं सुख केवळ अन्यायाचं होईल. शरद्, तुला निर्वाणीचं सांगतो, या आत्मत्यागाच्या ब्रह्मानंदापासून मला दूर केलंस तरीही यावज्जीव मी तुझ्याशी पुनर्लग्न करणं शक्य नाही. पुन्हा सांगतो, माझ्या उपकारकर्त्याशी कृतघ्नतेनं वागलो, तर ते अतिशय अन्यायाचं होईल.

शरद् : मनाचा कोंडमारा झाल्यामुळे अगदी निर्भीडपणानं बोलते- मी हिंदू समाजातली बालविधवा आहे. माझ्या निर्भीडपणाला जग अगदी निर्लज्जपणासुध्दा म्हणेल, पण भगीरथ, उपकारकर्त्याशी कृतघ्नपणानं वागणं हे अन्यायाचे आहे, तसंच प्रेमाशी विश्वासघातानं वागणं हे तरी अन्यायाचं नाही का?

भगीरथ : न्यायान्यायाचा त्रिकालबाधित निर्णय त्रिकालज्ञ ऋषींनासुध्दा करता आला नाही. आजची न्यायाची गोष्ट उद्या अन्यायाची ठरेल; कालचा अन्याय आज न्याय ठरत असेल; न्यायान्यायाची सारासारविवेकबुध्दी देशकालानुरूप बदलत असते. त्यातून पूर्वेचा पश्चिमेशी जो एकजीव संयोग होत आहे त्या कालात आपण जन्माला आलो आहोत. भारतवर्षाचा विवेकसूर्य चालू काली संक्रमणावस्थेत असल्यामुळे विचाराचे वारे नियमानं वाहात नाहीत. सुखाच्या तरुण इच्छा नव्या विचाराच्या आणि नव्या कल्पनांच्या एका पिढीच्या हृदयात उत्पन्न होतात, आणि त्या सुखांची साधनं पुरविण्याचं अगदी निराळया पिढीच्या हाती असतं. भिन्नसंस्कृतीच्या या संक्रांतीकालात आशेच्या पायावर उभारलेल्या आपल्या वाटेवरच्या इमारती ढासळू लागल्या तर तो कठोर काळाचा दोष आहे. वडिलांच्या मनाला न दुखविणारा त्यागधर्म आजच्या तरुण पिढीनं आचरणात आणला पाहिजे. शरद्, प्रेमळ मुली, आपला आजपर्यंतचा प्रेमळ सहवास हेच आपलं सुखसर्वस्व! तुझ्या-माझ्या सुखावर ही संक्रांत बसली तरी तीळमात्राच्या प्राप्तींनाही गोड बोलून आपण आजचा सण साजरा केला पाहिजे. शरद्, भगीरथाच्या सर्वस्वाची तुला शपथ आहे. मी तुझा त्याग करणं कितीही अन्यायाचं असलं तरी त्याला तू आपली संमती दे. अशा अडचणीच्या प्रसंगी या दोन अन्यायांतून एकाचा तरी मला अवलंब करावा लागणारच. कोणता तरी अन्याय करणं ज्या वेळी आवश्यक होऊन बसतं, त्या वेळी ज्या अन्यायामुळं अंत:करणाची जाणिवेनं तळमळ होत नाही तोच मनुष्यमात्राला क्षम्य आहे. शरद्, याच पावली भाईसाहेबांकडे चल, माझ्या मृत प्रेमाची अखेरची इच्छा म्हणून तुला सांगतो की, भाईसाहेबांच्या विनंतीचा- आणि आता ती माझीही विनंती आहे- या विनंतीचा अनादर करू नकोस. माझ्या जन्मदात्याला माझ्यामुळं दु:ख झालं तर यापुढं मी जगणं शक्य नाही. अजून रडतेस? वेडे, रडणं हे संसारात संकटाशी लढण्याचं हत्यार नाही! (स्वगत) हिच्या या रडण्यामुळं या त्यागाचा मला केवढा आनंद वाटत आहे! माझ्या विनंतीला ही चुकून तरी मनापासून रुकार देईल की काय अशी मनाला सारखी भीती वाटते. हिच्या इच्छेविरुध्द आणि केवळ माझ्या इच्छेमुळेच ही हा स्वार्थत्याग करीत आहे या कल्पनेतच माझ्या आनंदाचं रहस्य आहे. (उघड) शरद्, चल माझ्याबरोबर आणि आता यापुढं रडशील तर तुला माझ्या गळयाची शपथ आहे. (जातात.)

प्रवेश दुसरा

(स्थळ- तळीरामाचे घर. पात्रे- बिछान्यावर आसन्नमरण तळीराम, त्याच्या भोवती शास्त्री, खुदाबक्ष, डिसोझा, दादीशेठ दारूवाला, मन्याबापू मवाळ, जनूभाऊ जहाल, सोन्याबापू सुधारक, यल्लाप्पा वगैरे आर्यमदिरामंडळाचे सभासद.)

सोन्याबापू : शास्त्रीबुवा, कालची रात्र फारच जड गेली; वास्तविक काल रात्रीच तळीराम गार व्हायचा! पण आजचा दिवस आणखी दारू पिण्याचं याचं सद्भाग्य होतं म्हणूनच हा वाचला!

खुदाबक्ष : तशीच रात्र लांबलचक तरी किती वाटली! काही केल्या संपेना! तळीरामाच्या आयुष्यात आणि तिच्यात चेंगटपणाबद्दल जशी काय पैजच चालली होती!

सोन्याबापू : जितकी लांबलचक तितकीच भेसूर! आम्ही इतकी संध्या केलेली पण डोळयाला डोळा लावून पळभरसुध्दा ध्यान करण्याचा कोणाला धीर झाला नाही.

मन्याबापू : खरंच आहे; घडीभराच्या ध्यानानं कायमचा प्राणायाम व्हायचा एखादे वेळी! यमदुतांच्या स्वार्‍या येणार आहेत असं कळल्यावर झोपेनं मुडद्यासारखं पडायची कोण छाती करणार? तळीरामाऐवजी न जाणो ते आपल्यालाच चुकून न्यायचे ही प्रत्येकाला धास्ती वाटायचीच!

सोन्याबापू : तेवढी दिव्याची ज्योत काय ती संथपणानं तळीरामाची प्राणज्योती विझते की काय हे टक लावून पाहात होती!

विरूपाक्ष : ठीकच आहे. जन्ममरणाचा जिचा रोजचा रोजगार, तिला कसली भीती वाटणार? बरं, दिव्याची ज्योत जरी संथ असली तरी तळीरामाची धडपड सारखी चालू असेल, नाही?

मन्याबापू : मुळीच नाही! आज ही जी तळीरामाच्या देहाची यमराजाच्या विरुध्द नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ इतक्या हातघाईवर आलेली दिसते तिचा काल मागमूससुध्दा नव्हता! काल सारी रात्रभर तळीरामानं फक्त सनदशीर चळवळच चालू ठेवलेली होती. शरीराचा स्वामी स्थानभ्रष्ट होऊ नये म्हणून इमानी अवयवांनी इतकी जबाबदारी घेतली होती की डेक्कन सभेनेसुध्दा तिच्यापुढे हात टेकावेत! डोळयांत उरलेला प्राण तसाच निघून जाऊ नये म्हणून ती पापणीपासून दुर झाली नाही. त्याची झोप नेहमी म्हणजे इतकी जहाल असायची, पण काल रात्री तिच्यावर सभाबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यासारखं दिसत होतं! नेहमी वटवट करणारी जीभ आज अशी सरकारजमा का झाली हे पाहण्यासाठी एखादं कपोलकल्पित कारण सापडेना म्हणून दोन्ही गाल एखाद्या विरक्त साधूप्रमाणं अंतर्मुख झाले आहेत. नाकानं सुध्दा पंचप्राणांना बाहेर जाता येऊ नये म्हणून विश्वासातल्या वार्‍यालासुध्दा येरझार्‍या करता येऊ नयेत अशी कडेकोट नाकेबंदी केली होती. सारी रात्रभर असा निपचित पडला होता, की विलायतेतल्या कसलेल्या परीक्षकालासुध्दा छातीला हात लावून सांगता आलं नसतं, की हा तळीराम असा बेशुध्द पडला आहे तो मेल्यामुळं, झोपेमुळं, दारूमुळं-

सोन्याबापू : किंवा वैद्याच्या औषधामुळं म्हणून.

मन्याबापू : अरे खरंच, औषध देण्याची वेळ झाली! जागा करावा आता याला! तळीराम, ऊठ, औषध घेतोस ना?

तळीराम : मला नीट बशीव; आता मला औषध नको आहे. माझं मरण अगदी जवळ आलं आहे.

जनूभाऊ : तळीराम, असा धीर सोडतोस? भिऊ नकोस! आम्ही तुला मरू देणार नाही; अरे, ती दारूची बाटली याच्यापुढं आणून ठेव. डोळयासमोर दारूची बाटली असल्यावर हा कामयचे डोळे मिटील ही भीतीच सोड! जीव गेला तरी मरायचा नाही!

मन्याबापू : ऐका हो जनूभाऊ! शास्त्रीबुवा, बघा हो यानं जरा डोळे पांढरे केले हो!

विरूपाक्ष : अरे, अरे, अरे! अहो, कुणी गंगा इकडे घ्या बरं जरा! आणि तसंच तुळशीपत्रही आणा! तळीराम,

तळीराम, सावध हो. बाबा! वैद्याला, डॉक्टरला बोलावू का?

तळीराम : गंगा नको; तुळशीपत्र नको, काही नको! मला मरताना थोडीशी दारू पाजा म्हणजे झालं! तुळशीपत्राऐवजी तोंडावर एक बूच ठेवा म्हणजे ठसका लागला तरी तोंडातली दारू सांडणार नाही! आणा थोडीशी!

विरूपाक्ष : अहाहा, याला म्हणावं खरा दारूचा अभिमानी! पुढच्या जन्मी तू यापेक्षाही मोठा दारूबाज होणार! प्रत्यक्ष भगवंतांनीच गीतेत म्हणून ठेवलं आहे, की यं यं वाऽपि स्मरन् मावं त्यजत्यंते कलेवरं। तं तमेवैति कौंतेय सदा तद्भावभावित:॥ (त्याला दारू पाजतो.)

तळीराम : आणखी थोडी दे म्हणजे मला थोडासा थकवा येईल! मला तुम्हाला माझी अखेरची इच्छा सांगायची आहे! जरा आणखी दे पाहू!

मन्याबापू : आणखी दारूला तू सध्या पात्र नाहीस!

जनूभाऊ : पिऊ दे रे त्याला; या वेळी नाही म्हणू नकोस! (त्याला दारू पाजतात.)

तळीराम : अरेरे, मला दारूसुध्दा नीटशी पिता येत नाही! शास्त्रीबुवा, खुदाबक्ष, मी आता मरतो. माझं सांगणं लक्षात ठेवा. आधी त्या भगीरथाला सांगा, की तळीराम दारू पिता पिता मेला; अखेरपर्यंत प्रेमाच्या पकडीत सापडला नाही. सांगाल ना?

विरूपाक्ष : अगदी बजावून सांगू!

तळीराम : मी मेल्यावर, माझ्या घरात दारूचाच गुत्ता काढा! त्याचं नाव 'तळीराम मोफत मद्यालय' असं ठेवा. ते सारी रात्रभर उघडं ठेवण्याबद्दल खटपट करून परवानगी काढा! म्हणजे अडल्याबिडल्याची अडचण होणार नाही! त्या मद्यालयात आल्या-गेल्यांना, गोरगरिबांना, गोब्राह्मणांना फुकट दारू पाजा! विद्यार्थ्यांना निम्मे दरानं दारू विका! माझी खरी भिस्त तरुण पिढीवरच आहे! माझ्या घरातल्या रिकाम्या बाटल्या, ग्लासं एखाद्या कुटुंबवत्सल दारूबाजाला द्या! माझ्या वर्षश्राध्दाच्या दिवशी एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाला सडकून दारू पाजा! गोप्रदान करण्याऐवजी बुचांचा एक तराफा माझ्या नावानं नदीत सोडा म्हणजे मी त्याच्यावर बसून वैतरणानदी उतरून स्वर्गात जाईन! दोस्त हो! माझी ही इच्छा पुरी कराल ना? न केलीत तर माझी आशा गुंतून मी भूत होईन; मला मुक्ती मिळणार नाही!

मन्याबापू : आम्ही सगळेजण वाटेल ती मेहनत करून तुझी इच्छा पूर्ण करू! तू काही काळजी करू नकोस.

जनूभाऊ : तशातून तू भूत झालासच तरी तुझ्या भुताला आम्ही व्हिस्कीच्या बाटलीत भरून कोंडून ठेवू! आणखी काही इच्छा आहे!

तळीराम : आणखी काही नाही; वाटेल त्याच्या नादी लागून दारू सोडू नका! दारू न पिण्याची शपथ फार दिवस टिकत नाही; आपल्या आर्यमदिरामंडळाचा अभिमान धरा- काही झालं तरी संस्था बुडवू नका! आई आई गं! शास्त्रीबुवा, मला आणखी थोडी दारू द्या! आणि तुम्ही सारेही माझ्याबरोबर शेवटची घ्या! माझी हेल्थ- भरपूर ड्रिंक करा! (त्याला दारू देतात व सर्वजण मोठाले पेले भरतात.) स्वर्गात मला दारू मिळेल का रे?

सोन्याबापू : तळीराम, टु युवर हेल्थ! (सर्व पितात)

तळीराम : थोडी दारू! आणखी एकच प्याला! (मरतो.)

सोन्याबापू : अरेरे, आटपला बाजार! दारूच्या या जिवंत गुत्त्याचे एकदम साडेआठ वाजले!

शास्त्री : गेला, मदिरेचा खरा कैवारी गेला!

खुदाबक्ष : अभागी अर्यमदिरामंडळाचा खरा आर्य आधार तुटला!

जनूभाऊ : मदिरे, मदिरे, तुझी धुंदी उतरली! तुझ्या यशाचा वाटा इथंच राहिला! तुझ्या सौभाग्याच्या लाल तजेल्यावर प्रेतकळा आली! तुझी अडखळती चाल इथं कायमची खुंटली! तुझं बरळणं यापुढं बंद झालं!

शास्त्री : खरा खरा महात्मा दारूबाज आज आम्हाला सोडून गेला! असा दारूबाज पुन्हा होणं नाही!

खुदाबक्ष : ती गोष्टच काढावयाला नको! आपण सारेच पिणारे, पण तळीरामाची गोष्ट निराळी! पिताना कधी दिवस पाहिला नाही, की रात्र पाहिली नाही!

शास्त्री : आज बारा वर्षे झाली, केव्हाही तळीरामाच्या तोंडाची दुरूनच घपकन् घाण आली नाही असं झालंच नाही! असं खडतर व्रत एक पुरं तप चालविलं!

खुदाबक्ष : तपस्वीच तो! बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले! बारा वर्षे अडखळत बोलला, आणि अडखळतच चालला!

जनूभाऊ : स्वार्थत्याग तरी केवढा! दारूसाठी बायको सोडली; मग दुसर्‍या आप्तांची काय कथा!

शास्त्री : दारू पिणारालाच त्यानं आप्त केलं! हा मन्याबापू जरा नेमस्तपणानं घेणारा, म्हणून नेहमी त्याला आपल्या शेजारी यानं आग्रहानं पाजावी, तसाच मगनभाई, जरा भित्रा, पण त्यालाही-

मगन : (एकदम मुक्तकंठाने रडून) तळीराम, आता मला आग्रहानं कोण रे दारू पाजील? काटकसरीनं निशा चढविण्यासाठी, मिक्श्चर करण्याचा उपदेश कोण रे करील?

जनूभाऊ : शास्त्रीबुवा, अशा रडण्यानं या महात्म्याचा गौरव कसा होणार? याच्यासाठी उघडया मैदानात एक जंगी जाहीर सभा जरूर भरविली पाहिजे.

मन्याबापू : बेजबाबदार जंगी जाहीर सभा मुळीच नको! सनदशीर पध्दतीनं इथंच एक सभेची बैठक उठवूया आणि काय करायंच ते ठरवून टाकूया. एक छोटंसं कार्यकारी मंडळही नेमा पाहू-

शास्त्री : तुमचं म्हणणं उक्त आहे. तुम्हीच कार्यकारी मंडळाचे चिटणीस व्हा.

मन्याबापू : बरं, मग आधी अध्यक्ष निवडा! कोण होतो अध्यक्ष?

खुदाबक्ष : तसं कोण सांगणार? सगळयांचीच योग्यता सारखी वाटते.

जनूभाऊ : मग चिठ्ठया टाका!

यल्लाप्पा : दम खा! माझी अशी सूचना आहे, की मी अध्यक्ष होतो, तिला आपण सर्वांनी अनुमोदन द्यावं! कारण, अध्यक्षाला सभा संपेपर्यंत स्वस्थ बसून राहणं एवढंच काम करायचं असतं आणि मला इतकी जास्त झाली आहे, की थोडया वेळात माझा अगदी लोळागोळा होईल! तेव्हा सभेचे काम आटपेपर्यंत मी आपला प्रेत होऊन अध्याक्षांप्रमाणं पडून राहीन!

खुदाबक्ष : मग तळीरामाचं प्रेतच तुझ्यापेक्षा जास्त योग्य आहे.

जनूभाऊ : बरोबर आहे! शिवाय, हल्ली सभांतून, कामाच्या दृष्टीनं थोर माणसांच्या तसबिरा अध्यक्षस्थानी ठेवण्याची वहिवाट आहे. त्या दृष्टीनं तसबिरींपेक्षा प्रेत केव्हाही अधिक लायक! सबब तळीरामाच्या प्रेतालाच अध्यक्षस्थानी बसवावे!

खुदाबक्ष : अध्यक्षांची निवड झाल्यावर, मी आता सभेपुढं जोरानं पहिला ठराव असा आणतो, की आधी घरातली सगळी दारू पिऊन मग पुढं कार्याला लागावं. ठराव पसार! कार्यकारी मंडळाच्या उत्साही चिटणिसांनी सर्वांना पेले भरून द्यावेत अशी मी त्यांना जोरानं विनंती करतो.

शास्त्री : ज्याअर्थी सर्वांनाच चढत चालली आहे, त्याअर्थी यापुढं प्रत्येकानं बसूनच बोलावं, असा दुय्यम ठराव मी पुढं आणतो. माझे पाय लटपटताहेत- ठराव लवकर पसार करा!

मगन : (त्याला सावरून) या ठरावाला मी टेका देतो. ठराव पसार!

जनूभाऊ : तळीरामाच्या मरणानिमित्त शहरातील सर्व दारूची दुकानं दिवसभर बंद ठेवण्याची मक्तेदारांना विनंती करावी, असं या सभेचं ठाम मत आहे.

शास्त्री, खुदाबक्ष वगैरे : शेम! धिक्कार! नो, नो!

मन्याबापू : सन्मान्य सभासद जनूभाऊ यांचा ठराव पुष्कळशा सभेला मान्य नाही. मिस्टर विरुपाक्षशास्त्री, राजश्री खुदाबक्ष, श्रीयुत मगनभाई, व श्रीयुत मी या ठरावाबद्दल जोरानं खेद करतो. मृत महात्म्याच्या धोरणाकडे सभेचा कटाक्ष आहे. तळीरामाला दारूची दुकानं बंद झालेली खपत नसत; म्हणून सबंध दिवस दुकानं बंद ठेवण्याऐवजी सबंध रात्रभर दुकानं उघडी ठेवण्यासाठीच सभेनं खटपट करावी. ठराव पसार!

शास्त्री : सदरहू प्रेताची यात्रा वाजतगाजत काढावी!

मगन : दारूखेरीज अनाठायी खर्च न करण्याकडे तळीरामाचं धोरण होतं; म्हणून वाजंत्र्यांचा खर्च ही सभा करू इच्छित नाही! त्याच्या हातापायांच्या काडयांनीच पोटाचा नगारा वाजवावा, अशी माझी उपसूचना आहे. उपसूचना पसार! प्रेतामागं भाडोत्री रडण्यासाठी काही गुजराथी बायका आणण्याची मी खटपट करतो.

जनूभाऊ : शेम्! तळीरामाला बायकांच्या नावाचासुध्दा तिटकारा होता; म्हणून रडण्यासाठी, बायकांऐवजी मन्याबापू यांनी काही मवाळ मित्रच आणावे, अशी मी शिफारस करतो.

मन्याबापू : ही सभा या ठरावाचा निषेध करीत आहे. मी असं विचारतो की, जोरानं विचारतो- की, मृताच्या अंत्यविधींच्या वेळी, एक विशिष्ट ध्वनी करावा लागतो. त्यासाठी आपल्या जहाल जिवलगांना आणायला जनूभाऊ तयार आहेत का? मी स्पष्टच सांगतो, की नेमस्तांसाठी जर पितरपाकाचा रडका पंधरवडा असेल तर जहालांसाठी जोरकस तोंडसुखाचा फाल्गुनमास असता!

खुदाबक्ष : दोस्तहो, असे भांडून सभेत बखेडा घालू नका! ही काय देशातल्या दोन्ही पक्षांतल्या विद्वानांची सभा आहे, म्हणून तुम्ही असा धिंगाणा घालावा? मी ठासून सांगतो- कुत्सित कोटी मनात आणून कोणी हसू नये- मी म्हणून टाकतो की- मी दारू ठासून सांगतो की, ही आम्हा दारूबाजांची सभा आहे. वर्षातून तीन दिवस चढणारी ही देशभक्तीची निशा नाही; पण दिवसांतून तीन वेळा पचनी पाडलेली ही दारूची निशा आहे. तुम्ही देशभक्त आहात का? तुम्ही विद्वान आहात का? नाही! मग एकेरीवर येऊन सुरळीत सभा मोडण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? अशी एकमेकांवर आग पाखडण्यात काय अर्थ आहे? काम पुढे चालवा.

शास्त्री : मी असा ठराव पुढे आणतो, की तळीरामाचे प्रेत व्हिस्कीच्या बाटल्यांभोवती येणार्‍या पेंढयाच्या पिशव्यांनी जाळावं!

खुदाबक्ष : आर्यधर्माच्या दृष्टीनं हा भडाग्नि होतो. हा धर्मबाह्य ठराव आहे. या ठरावाला मी तळीरामाच्या वतीनं हरकत घेतो.

मन्याबापू : दोघेही श्रीयुत चुकताहेत! तळीरामाचा दारू पिणं हा एकच धर्म होता. सबब धर्माच्या दृष्टीनं पाहता तळीरामाला एखाद्या दारूच्या भट्टीत जाळावं, असा ठराव मी आणतो! पसार!

जनूभाऊ : मी असा ठराव आणतो, की आपण सर्व अगदी गाढव आहोत! प्रेतयात्रा कशी न्यायची हे ठरविण्यापूर्वीच आपण जाळायला आरंभ केला! मिरवणूकीच्या वेळी गाडीचे घोडे सोडून, आपण गाडी ओढून तळीरामाचा सन्मान करावा, अशी मी सूचना करतो.

मगन : या ठरावाला माझा असा वांधा आहे, की घोडे सोडून आपण गाढव गाडी ओढीत बसलो तर ते उलट अपमानकारक आहे!

मन्याबापू : आता फार महत्त्वाचा ठराव मी फारच जोरानं पुढं आणतो. तळीरामाचं काहीतरी स्मारक करायला पाहिजे; त्यासाठी 'तळीराम स्मारक फंड कमिटी' स्थापून तिच्यामार्फत फंड गोळा करण्याचं सभेनं ठरवावं! वर्गण्यांचे आकडे भराभर पडले पाहिजेत! आणि याच बैठकीत पडले पाहिजेत. आकडे मोठाले पण पाहिजेत! किमानपक्ष एकेकानं हजाराचा आकडा तरी घातलाच पाहिजे.

शास्त्री : लाखाची गोष्ट सांगितलीत! आपले श्रीमंत शेट मगनभाई यांच्यापासूनच शेज धरावी! शेटजींनी तोंड वाईट करण्याचं कारण नाही! हे आकडे वसूल करण्यात येतील अशी त्यांनी मुळीच भीती बाळगू नये! आजवर कोणत्या स्मारकसभेनं आकडे वसूल करून स्मारक केल्याचं कोणाच्या स्मरणात आहे? त्या वेळेपुरतेच पहिल्या उसळीच्या भरात हे दर्शनी आकडे टाकायचे असतात! पुढं सर्वांनाच त्या आकडयांसकट स्मारकाचाही विसर पडत जातो!

मगन : तत्राप मी लेखी गुंतायचा नाही; म्हणून या ठरावाला मी जोरानं-

खुदाबक्ष : हा, मगनभाई-

मगन : या ठरावाला मी जोरानं-

खुदाबक्ष : हा- हा-

मगन : या ठरावाला मी जोरानं काहीच करीत नाही!

शास्त्री : आता मृताचं प्रेत बाहेर काढावं असा माझा शेवटचा ठराव आहे. उठा सर्वजण, आधी प्रेत बाहेर नेऊन ठेवू! (सर्वजण उठतात व धुंद झालेल्या यल्लाप्पाच्या हातापायांची ओढाताण करतात.)

यल्लाप्पा : मला कोण ओढत आहे, असं ही सभा जोरानं विचारीत आहे.

शास्त्री : मेलेला मनुष्य काही विचारीत नाही, असं बहुमतानं सभेचं ठाम मत आहे.

यल्लाप्पा : मी मेलो नाही, असा एकमताने ठराव मी मांडतो.

खुदाबक्ष : मग कोण मेला आहे? कोणी तरी मेला आहे हे खास!

मन्याबापू : पुन: सभेत दंगा सुरू झाला! थांबा, खुदाबक्ष, शास्त्रीबुवा, सभेची जादा बैठक भरवा आणि कोण मेला आहे, हे शिरस्तावर ठरवा!

खुदाबक्ष : ठीक आहे! सभा अशी सूचना करीत आहे, की जो मेलेला असेल त्यानं हात वर करावा. (काही वेळ थांबून) कोणीच हात वर करीत नाही त्याआधी कोणीच मेलेलं नाही असं सभा प्रतिपादन करीत आहे! तळीरामसुध्दा मेला नाही, असं सभेचं ठाम मत आहे!

शास्त्री : याबद्दल सभेला फार आनंद होत आहे. या आनंदाच्या भरात तळीरामाच्या मृत आत्म्याला, तळीराम मुळीच मेला नाही, अशी स्वर्गात अभिनंदनपर तार पाठविण्याची ही सभा ठराव करीत आहे.

सोन्याबापू : अरेरे! फुकाफुकी सभेचा सारा समारंभ झाला म्हणावयाचा!

खुदाबक्ष : नाही. हा खटाटोप फुकट जाऊ द्यायचा नाही. या खटपटीचा उपयोग होण्याची वेळ येईपर्यंत, म्हणजे कोणीतरी मरेपर्यंत सर्वांनी मुडद्याप्रमाणं इथंच पडून राहावं असा ठराव मी पुढं आणतो. ठराव पसार! (सर्व अस्ताव्यस्त पडतात. पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

(स्थळ- रामलालचा आश्रम. रामलाल प्रवेश करतो.)

रामलाल : (स्वगत) माझ्या मनाचं घाणेरडं चित्र आता मला स्वच्छपणानं दिसायला लागलं! माझ्या अध:पाताला काही तरी सीमा आहे का? पित्याच्या दृष्टीनं शरद्कडे पाहताना मानीव नात्याच्या मोठेपणानं रक्तामांसाचं अंगभूत तारुण्य डोळयांतून मुळीच नाहीसं झालं नाही. शरदबद्दल मला जी सहानुभूती, भूतदया म्हणून वाटत होती, ती दुबळया मनाच्या हिंदू पुरुषाची पारावतवृत्ती कामुकता होती! गरीब गीतेला विद्यादान करताना, अनाथाला कल्याणाचा मार्ग दाखविल्यामुळंच आपल्याला हे समाधान होत आहे अशी माझ्या मनाची मी फसवणूक करीत आलो; पण ते तशा उदारपणाचं नव्हतं! गीतेला शिकताना पाहून, शरद्ला समाधान वाटत होतं, म्हणून मला त्या वेळी उत्साह वाटे! तोसुध्दा प्रियाराधनाचाच एक मार्ग होता!

(राग- भैरव; ताल- त्रिवट. चाल- प्रभू दाता रे.) मन पापी हे। करिते निजवंचन अनुघटिदिन॥ ध्रु.॥ उपशमपर मतिमेषज सेवुनि सुप्तियत्न करि, परि ते। विफल अंति सुविवेकभिन्न॥ 1॥

उपकारांच्या कृतज्ञतेमुळे बिचारा भगीरथ थोडयाच काळात माझ्याशी खुल्या दिलानं बोलूचालू लागला. तेव्हा त्याचा मला कंटाळा वाटू लागला. अधिक प्रसंगी मनुष्याची ती फाजील सलगी वाटून आपल्याला भगीरथाचा तिटकारा येत असावा अशी मी स्वत:ची समजूत करीत होतो; पण ते कंटाळण्याचं खरं कारण नव्हतं! भगीरथ आपल्याशी मनमोकळेपणानं वागल्याचं शरदनं वेळोवेळी सांगितल्यामुळेच, न कळत माझ्या मनात जागृत झालेला गूढ मत्सर हेच त्या कंटाळयाचं कारण होतं! त्या तरुण जिवांचा परस्परांकडे ओढा दिसू लागताच माझ्या प्रौढ मनात मत्सराची आग भडकली! तेव्हा- धिक्कार, शतश: धिक्कार असो मला! यात्किंचित् सुखाच्या क्षुद्र लोभानं पुत्राप्रमाणं मानलेल्या भगीरथाला दुखवून, कन्येप्रमाणं मानलेल्या शरद्च्या कोवळया हृदयावर रसरशीत निखारे टाकून माझ्या वयाच्या वडीलपणावर, नात्याच्या जबाबदारीवर आणि विचाराच्या विवेकवृत्तीवरही पाणी सोडायला मी तयार झालो, हा आमच्या आजच्या दुर्दैवी परिस्थितीचा परिपाक आहे. पराक्रमी पुरुषार्थानं मिळवलेली सत्ता मोकळेपणाच्या उदारपणानं मर्यादित करण्याचा आम्हाला सराव नसल्यामुळं दैवयोगानं प्राप्त झालेली अल्प सत्ता दुबळया जिवांवर आम्ही सुलतानी अरेरावीनं गाजवत असतो. आज हजारो वर्षे मेलेल्या रूढींच्या ठराविक ओझ्याखाली सापडून आमची मनंही मुर्दाड झाल्यामुळं आज आमच्यात वस्तुमात्रांतील ईश्वरनिर्मित सौंदर्य शोधून काढण्याची रसिकता नाही. असं सौंदर्य मिळविण्याची पवित्र अभिलाषबुध्दी नाही. त्या अभिलाषाची पूर्णता करणारी पुरुषार्थाची पराक्रमशक्ती नाही. आणि खरं कारण मिळताच जिवलग सुखाचाही त्याग करणारी उदार कर्तव्यनिष्ठा नाही! पूर्वजांनी तोंडावर टाकलेल्या अर्थशून्य शब्दांची विचारी वेदांताची वटवट क्षुद्र सुखाच्या आशेनंही ताबडतोब बंद पडते. विद्येनं मनाला उंच वातावरणात नेऊन ठेवलं तरी आमची मनं आकाशात फिरणार्‍या घारी गिधाडांप्रमाणं अगदी क्षुद्र अमिषानंसुध्दा ताबडतोब मातीला मिळतात. पाच हजार वर्षाचं दीर्घायुष्य मोजणार्‍या भारतवर्षरूप पुराणपुरुषा! तुझ्या विराट् देहासाठी हिमाचलासारखं भव्य मस्तक निर्माण केल्यावर गंगासिंधूसारख्या पवित्र ललाटरेखांनीही विधात्याला तुझ्या सुखाचा चिरकालीन लेख लिहिता येऊ नये का? सांग, हतभाग्या भारतवर्षा! भावी काळी या रामलालासारखी कंगाल पैदास आपल्या पोटी निपजणार, या कडू भीतीमुळं दक्षिण महासागरात जीव देण्यासाठी कमरेइतका उतरल्यावर कोणत्या पापांची प्रायश्चित्तं देण्यासाठी परमेश्वरानं तुला उचलून धरला? परमेश्वरा, माझ्या अपराधाची मला कधी तरी क्षमा होईल का? भगीरथ आणि शरद् यांच्याजवळ कोणत्या तोंडानं मी क्षमा मागू? नाही, मनाचा तीव्र आवेग आता मरणाखेरीज दुसर्‍या कशानेही थांबणार नाही. (भगीरथ व शरद् येतात.) हतभागी रामलाल, कृतकर्माची फळं भोगण्यासाठी दगडाचं मन करून तयार हो, आणि या दुखावलेल्या जिवांची क्षमा माग.

भगीरथ : भाईसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतला तर तुमच्या लाडक्या भगीरथाला तुम्ही क्षमा कराल का? आपल्या पायांजवळ एक विनंती करण्यासाठी मी आलो आहे.

रामलाल : भगीरथ, माझ्याशी बोलताना आजच इतकी औपचारिक वृत्ती का वापरतोस?

भगीरथ : भाईसाहेब, लोकसेवा करण्याची विद्या शिकण्यासाठी म्हणून मी आपल्या आश्रयाला उभा राहिलो आहे; पूर्वी सर्व विद्याप्राप्ती करून गुरूगृह सोडून जाताना गुरुदक्षिणा देण्याची वहिवाट होती; पण हल्लीच्या काळात दर महिन्याला अगोदर फी द्यावी लागते! भाईसाहेब, या नव्या पध्दतीला अनुसरून मी तुम्हाला गुरुदक्षिणा अर्पण करण्यासाठी आलो आहे. तिचा स्वीकार करून या आपल्या बाळाला आशीर्वाद द्या!

रामलाल : कसली दक्षिणा देणार तू?

भगीरथ : माझ्या स्वाधीन झालेल्या शरद्च्या प्राणांची! भाईसाहेब, आपल्या सांगण्याप्रमाणं आपलं सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करायला मी तयार आहे!

रामलाल : शरद्, भगीरथानं म्हटलं ते खरं का? (शरद् खाली पाहते.)

भगीरथ : संकोचवृत्तीमुळं या प्रसंगी ती काय बोलणार?

रामलाल : (स्वगत) हो, खरंच! याच काय, पण कोणत्याही प्रसंगी बिचारी हिंदू बालविधवा काय बोलणार? गाईला आत्मा नाही, असं ख्रिस्ती धर्माचं तत्त्व नव्यानं ऐकताच आम्ही आर्यधर्माभिमानी उपहासानं हसलो, पण माझ्यासारख्या जुलमी जनावरांच्या पशुवृत्तीनं या गरीब गाईंना आत्मा तर नाहीच पण जीभसुध्दा ठेविली नाही!

भगीरथ : शरद्, भाईसाहेबांना माझं म्हणणं खरं वाटत नाही; माझ्या शब्दासाठी तू-

रामलाल : थांब, भगीरथ, शरद्चा त्याग तू इतक्या सहजासहजी करायला तयार झालास हे तुझ्या प्रेमाचंच लक्षण समजू का? मला वाटतं, शरदवर तुझं मनापासून प्रेम मुळीच नव्हतं!

भगीरथ : असं आपल्याला वाटतं! सर्वसाक्षी सर्वेश्वराला काय वाटतं, ते- भाईसाहेब, क्षमा करा, शरदविषयी माझ्या तोंडचे असले उद्गार तिच्या माझ्या नव्या नात्याला कमीपणा आणतील! आपल्या पदवीला पोहोचल्यामुळं शरदबद्दल सलगीनं बोलण्याला मला अधिकार नाही!

रामलाल : (स्वगत) शाबास, भगीरथ, शाबास! तू जितका थोर आहेस तितकाच हा रामलाल नीच आहे! माझ्या मनाच्या हलकेपणामुळे बिचार्‍या शरद्च्या प्रेमाचे तुला मलाचे धिंडवडे निघाले. (उघड) अशा पवित्र प्रेमानं तिच्याशी वचनबध्द झाल्यावर तिचा त्याग करणं तुला उचित आहे का?

भगीरथ : एक वेळ नाही, पण हजार वेळ उचित आहे! ज्या कार्यासाठी आपण मला जीवदान दिलं, त्या कार्यासाठी मला हा मोह सोडायचा आहे! शरद्च्या लोभात मी सापडलो, तर आपला उपदेश मला साधणार नाही आणि भावी आयुष्याचा सन्मार्ग मला सापडणार नाही! समाजस्वरूप विराट्पुरुषाची सेवा करण्यासाठी, माझ्या देशाच्या कारणी पडण्यासाठी, आपल्या उपदेशासाठी, संसारसुखाचा आणि प्रेमाचा पाशबंध हा भगीरथ ताड्कन तोडून टाकीत आहे! आपल्यासारख्या थोर पुरुषाचा उपदेश-

रामलाल : भगीरथ, उपदेश करणं हे इतकं सोपं काम आहे, की त्यामुळं मला थोर म्हणणं केवळ हास्यास्पद आहे! उपदेश करण्यापेक्षाही उपदेश ऐकून मोहाला झुगारून देणाराच नेहमी श्रेष्ठ असतो. मोठया मनाच्या मुलांनो, त्यागधर्माच्या तेजोमय तत्त्वानं देदीप्यमान झालेल्या तुम्हा दोघांच्या मुखमंडलांकडे तोंड वर करून उघडया डोळयांनी पाहण्याची या क्षुद्र मनाच्या रामलालची योग्यता नाही! क्षणमात्राच्या पातकी मोहावेगाची मला क्षमा करा! बेटा शरद्, माझ्या अभद्र शब्दांची, पामर मनाची आणि या शेवटच्या पापस्पर्शाची मला एकदाच क्षमा कर! भगीरथ, शिष्यानं गुरूला आधी गुरुदक्षिणा द्यावी, हा जसा हल्लीचा परिपाठ आहे, त्याचप्रमाणं कुशाग्रबुध्दीच्या शिष्याला उत्तेजनासाठी पारितोषिक द्यावं, असाही नियम आहे. माझ्या उपदेशाचा पहिला धडा तू इतक्या हुशारीनं शिकला आहेस, की तुझा गौरव करणं माझं कर्तव्य आहे! उदार बाळा, हे आपलं सुंदर चित्र घेऊन जन्माचा सुखी हो!

(शरद्चा हात भगीरथाच्या हातात देतो.) (राग- देसकार; ताल- त्रिवट. चाल- अरे मन राम.) स्वीकारी रम्य अमल चित्रा या। योग्य तुला प्रतिफल घ्याया॥ ध्रु.॥ छात्रा पटु गुणी। अभ्यसनी। हे वितरित गुरुमाया॥ 1॥

भगीरथ, लोकसेवेचं खडतर व्रत आचरिताना कधी कधी पुढार्‍याला लोकापवादाला पात्र व्हावं लागतं, अशा वेळी निंदकांच्या वाग्बाणांनी दुभंगलेल्या हृदयाच्या जखमा बर्‍या करण्यासाठी शरद्च्या प्रेमळ अश्रूंची तुला भविष्यकाळी जरूर पडेल. रामलालचं हे रिकामं हृदय- (गीता रडत येते; तिला पोटाशी धरून) ये बाळ, ये! रामलालचं हे रिकामं हृदय तुझ्यासारख्या अनाथ जिवांसाठी अर्पण केलं आहे! तळीरामाच्या अकाली मृत्यूमुळं तुझ्यावर जो अनर्थ गुदरला त्यात तुला पैशाखेरीज काही उपयोगी पडणार नाही. माझ्या पोक्त वयातली काही वर्षे बाद करून स्वत: तरुण होण्याचा आणि त्यांची शरद्च्या कोवळया आयुष्यात बोजड भर टाकून तिला पोक्त करण्याचा नीच प्रयत्न करण्यापेक्षा तुझ्या वयातली काही वर्षे आपल्यासाठी घेऊन तुझ्यासारख्या कन्येशी पितृधर्मानं वागण्यातच या रामलालच्या वृध्दत्वाचं सार्थक होईल. माझ्या चुलत्याची मला मिळालेली सर्व संपत्ती मी तुला देत आहे! तीच तुझ्या कामी येईल! तुझ्यासारख्या कुरूप विधवेबद्दल सहानुभूती वाटण्याइतकी व्यापक सुधारणा अजून आपल्या समाजात जन्मली नाही! भगीरथासारखं अपवादभूत रत्न एखादंच सापडण्याचा संभव! बाकी बहुतेक समाज रामलालसारख्या मनाचाच आहे! माझ्या उदाहरणावरून मला वाटायला लागलं आहे की, आमची सुधारणेत बरीचशी आत्मवंचना आहे! अनाथ बालविधवेची दया येण्यालाही आम्हाला चांगल्या चेहेर्‍याचा आधार लागतो. आमची सुधारणा अद्याप डोळयांपुरतीच झालेली आहे! आमची विद्या अजून जिभेवरच नाचत आहे. जिभेचा शेंडा कापून टाकला तर आमच्यात संस्कृत व प्रौढ मानलेला सुशिक्षित कोणता हे देवालाही कळायचं नाही! इतका वेळ शरद्च्या प्रेमाला पात्र होत नव्हतो म्हणून मला खेद वाटत होता; पण प्रेमाला पात्र होणं हा मनुष्याचा धर्म असेल तर दया हा देवांचा गुण आहे! (पद्माकर येतो.)

पद्माकर : भाई, सुधाकरानं आपल्या मुलाचा खून केला आहे आणि ताईला घातक जखम केली आहे! त्याला फौजदाराच्या ताब्यात देण्यासाठी मी निघालो आहे- चल माझ्याबरोबर-

रामलाल : काय- म्हणतोस तरी काय हे?

पद्माकर : वाटेनं सर्व सांगतो; पण आधी लवकर चल; आणखी हेही सांगतो, की सुधाकराबद्दल या वेळी रदबदली करू नकोस. त्या नरपशूच्या मोहातून सुटली तर माझी अनाथ ताई अन्नाला तरी लागेल! चल, चल लौकर!

रामलाल : अरे, पण असा अविचार-

पद्माकर : माझ्या ताईनं भोगलेल्या हालअपेष्टांची शपथ घेऊन सांगतो, की सुधाकराला सरकारी शासन देवविल्याखेरीज मी आता थांबणार नाही! याला अविचार म्हण, सूड म्हण, काय वाटेल ते म्हण! चल लौकर!

रामलाल : भगीरथ, शरद् आणि गीता यांना घेऊन ये. सुधाकराकडे चल. (सर्व जातात.)

प्रवेश चवथा

स्थळ- सुधाकराचे घर. पात्रे- आसन्नमरण सिंधू; जवळ सुधाकर, पद्माकर, रामलाल आणि फौजदार)

पद्माकर : दादासाहेब, हे पाहा मेलेलं मूल; हे या हरामखोरानं ठार मारलं! ही पाहा माझी ताई! या दीनदुबळया देहाची या दारूबाज दुष्टानंच प्राणांतिक दुर्दशा केली आहे! असाच पकडा या नराधमाला-

फौजदार : भाऊसाहेब, असं रागावून काय होणार? थांबा, आपण बाईंना नीट विचारून पंचनामा करू.

पद्माकर : ताई, ताई, सिंधूताई-

रामलाल : भाऊ, थांब जरा; असा हातघाईवर येऊ नकोस! तिला जरा ग्लानी आली आहे!

पद्माकर : ही ग्लानी- ही ताई- हे सारं सारं- या दारूडया राक्षसाचं अघोर कर्म आहे! दादासाहेब, काय वाटेल ते करा, पण या काळतोंडयाला- ताईच्या पंचप्राणांवर दरोडा घालणार्‍या या दारूडयाला काही तरी भयंकर शिक्षा भोगायला लावा!

रामलाल : भाऊ, व्हायचं ते झालं; आता यांच्यावर राग धरून झाली गोष्ट पुन्हा येणार आहे का?

पद्माकर : भाई, माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नकोस! या चांडाळानं माझी सोन्यासारखी ताई अन्नावाचून झिजवून झिजवून मारली- काठया दगडांनी ठेचून मारली- कोळयामाळयांच्या तोंडी येणार नाहीत अशा शब्दांनी या मात्रागमनी नीचानं तिच्या काळजाला घरे पाडून मारली! दादासाहेब, तुमच्या पाया पडतो, काही झालं तरी याला मोकळा सोडू नका हो! बुध्दिपुरस्सर गुन्हा केला म्हणून तुरुंगात नेऊन घाला किंवा दारूनं माथं फिरलं आहे म्हणून वेडयाच्या दवाखान्यात नेऊन लोटा; अक्कलवान गुन्हेगार म्हणा, किंवा निर्बुध्द पशू म्हणा, पण याला कुठल्या तरी कोंडवाडयात घाला! याच्या मोहाला गुंतूनच- माझी ताई म्हणजे देवी आहे हो- नवरा म्हणून ठरलेल्या या जनावराच्या नावाची पंचप्राणांच्या पुष्पांनी पूजा करण्यासाठी ही इथं गुंतून राहिली आहे. देवमूर्ती म्हणून मानिलेला हा दगड एखाद्या नरककुंडात रिचवून हिच्या नजरेआड केला म्हणजे हिला घरी नेऊन हिच्या औषधपाण्याची तरी व्यवस्था करता येईल हो!

फौजदार : भाऊसाहेब, जरा शांत व्हा. आपण असे बोलू लागला-

पद्माकर : दादासाहेब, माफ करा. दगडाचा पुतळा असतो तरीसुध्दा सव्वा हात जीभ बाहेर काढून बोलायला लागलो असतो! मग आता तर चांगला रक्तामांसाचा- हिच्याच रक्तामांसाचा- तिचाच भाऊ आहे- काय सांगू हो, बोट करून दाखवायला तिच्या अंगावर रक्तमांससुध्दा राहिलं नाही,- तेसुध्दा या राक्षसानं गिळून टाकलं- दारूच्या घोटाबरोबर हिच्या रक्ताचा घोट घेऊन जित्या अंगातील मांसाचे लचके तोडून या पिशाच्चानं आहारून टाकले. चार गिरण्यांच्या मालकाची ही मुलगी, या शिकलेल्या दारूबाजानं आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता तिला जात्यावर दळायला लावलं. आमच्या घरी कुत्र्यांच्या पिलांना जे दूध मिळतं- मिळतं कसलं, त्यांना पाजताना हलगर्जीनं खाली सांडतं तितकंसुध्दा या गोजिरवाण्या बाळाला कधी लाभलं नाही! आमच्या घरी मोलकरणीनं उष्टंखरकटं टाकलं असेल, तितकं अन्न कधी हिला मिळालं नाही! याच्याकडे पाहिलं म्हणजे दयामाया पार जळून जातात! दगड असतो तर मनुष्य झालो असतो, आणि मनुष्य आहे, तरी दगड झालो आहे. याच्या गळयाला फास घालताना, ताईच्या गळयातील मंगळसूत्र तुटलं तरी चालेल! ताई, सिंधूताई, ऊठ बरं, बाळ! (तिला किंचित उठवून बसवतो.)

सिंधू : दादा, केव्हा आलास तू? भाई, तूही आलास? तिकडे कुणीकडे असायचं? दादा, ऊठ बरं, चुलीवर थोडा भात आहे; दोन तांबे अंगावर घालून चार घास खायला घाल! तिकडे कालपासून पोटात काही नाही!

पद्माकर : याच्या तोंडात चार घास घालण्यापेक्षा याच्या पिंडब्रह्मांडाचा एकच घास करून काळाच्या पोटात कोंबण्यासाठी मी आलो आहे! ताई, हे पाहा फौजदारसाहेब तुझा जबाब घेण्यासाठी आलेले आहेत. या खुनी दारूबाजानं काय काय केलं ते सगळं यांना नीटपणे सांग! दादासाहेब, विचारा तिला काय विचारायचं ते-

फौजदार : बाई, यांनी काय काय केलं ते सांगा बरं!

सिंधू : यांनी काही केलं नाही- कुणी सांगितलं आपल्याला हे?

फौजदार : मग मुलाला काय झालं? तुम्हाला हे कपाळावर लागलं कसं?

सिंधू : मी दोन दिवसांची उपाशी होते. मला राहूनराहून भोवळ येत होती. मुलाला घेऊन माळयावरून उतरताना मला घेरी आली; पडल्यामुळं मला कपाळावर खोक पडली! मूल माझ्या अंगाखाली चेंगरलं! इकडचा काही संबंध नाही त्यात!

पद्माकर : ताई, अगदी खोटं सांगितलंस! मग या काठीला रक्त कसं लागलं?

सिंधू : काठी टेकीत रक्तभरल्या हाती मी इथपर्यंत आले. तिकडचा काही संबंध नाही त्यात!

फौजदार : बाई, हे सारं खरं आहे का?

सिंधू : खरं- अगदी खरं आहे! माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा!

पद्माकर : नाही हो; दादासाहेब, उघड उघड हे खोटं आहे! ताई, तुला माझी, बाबांची, तुझ्या नवर्‍याची शपथ आहे. खरं सांग.

सिंधू : दादा, असा का अंत पाहतोस? मी सांगितलं ते खरं आहे अगदी!

पद्माकर : दादासाहेब, हे खोटं आहे हो! काय करावं आता?

फौजदार : भाऊसाहेब, काही करता येणार नाही आता! आपला राग कितीही अनावर झाला, तरी यांच्या पुण्याईपुढं तुमचं-आमचं काय चालणार? न्यायाचं शस्त्र कितीही तीक्ष्ण असलं तरी अशा पवित्र पतिव्रतेच्या पुण्याईची ढाल आड आल्यावर ते काय करणार?

पद्माकर : दादासाहेब! हिच्या खोटया बोलण्यामुळं या हरामखोराला मोकळा सोडता काय?

फौजदार : भाऊसाहेब, प्रत्यक्ष गंगाप्रवाहात पोहणारावर उगीच आग पाखडून काय होणार!

रामलाल : शाबास, सिंधूताई, शाबास! भाऊसाहेब, देवब्राह्मणांच्या सत्यतेपेक्षाही अशा पुण्यरूप सतीच्या असत्यालाच परमेश्वराच्या आशीर्वादाचं अधिक बळ असतं! भाऊ, जाऊ देत! झालं ते झालं! सिंधूताई, तू मात्र धन्य आहेस! तुझ्यासारख्या आर्या अजून आहेत, म्हणूनच या पुण्यभूमीला आर्यावर्त नाव शोभतं! भारतवर्ष साध्वीसतीचं माहेरघर आहे! सरकारनं सतीचा कायदा करून आमच्या साध्वींना सहगमनानं देह जाळून घेण्याची बंदी केली तर जितेपणीत आतल्या आत जळून नवर्‍याच्या नावासाठी या मंगलदेवता आत्मयज्ञ करीत आहेत! भाऊसाहेब, सिंधूताईच्या इच्छेसाठी तरी सुधाकरावरचा राग सोडून द्या!

सिंधू : दादा, इकडे ये, माझ्या शेजारी बैस असा! दादा, आपल्या माणसावर असा राग करून चालेल का? माझी जातीघडी सरत आली! बाबांच्याखेरीज आणि तुम्हा दोघांखेरीज तिकडे आपलं म्हणायला कोणी आहे का आता? असं रत्न मी मागे टाकून जाते, ती तुझ्या धीरावर ना? तूच आता त्यांच्या उन्हात तापल्या जिवावर पदर घालायला नको का? तुझ्या ताईचं सौभाग्य तूच आता जपून ठेवलं पाहिजेस. लहानपणी माझ्या कुंकवाला तजेला यावा म्हणून तू माझ्या करंडयात मृगाची इवलाली पाखरं आणून ठेवीत होतास, आठवतं का? मग आताच ती माया कुठे गेली? माझ्या सौभाग्याचं कुंकू तुझ्याच ठेवणीला देऊन मी जात आहे!

पद्माकर : छाकटया सैताना, ऐक, ऐक माझ्या लाडक्या ताईचा एक एक बोल! पण तुझे डोळे कुठले उघडायला? ताई, ताई, काय म्हणतेस हे तू?

रामलाल : भाऊ, फौजदारसाहेबांना जायला वेळ होत नाही का?

फौजदार : चला, भाऊसाहेब- पण केव्हा तरी तेवढी फिर्याद काढून घ्या म्हणजे झालं! (फोजदारांना पोहोचविण्यासाठी रामलाल व पद्माकर जातात.)

सुधाकर : (स्वगत) उघडले, भाऊसाहेब, माझे डोळे साफ उघडले! मात्र माझे डोळे असे उघडले आहेत तोवर या देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात या क्षणीच स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून ठेवतो म्हणजे मग भोवती काळाकुट्ट अंधार पडला आणि माझे डोळे कायमचे मिटले तरी दिशाभूल होण्याची भीतीच नको. (इकडे तिकडे पाहून व औषध उघडून) हं, हेच ते विषारी औषध! कुठं आहे ती जिवाला जाऊन भिडलेली साता जन्मांची वैरीण? (एका पेल्यात दारू व विष ओततो.)

सिंधू : ऐकलं का? जरा माझ्याजवळ यायचं होतं-

सुधाकर : तुझ्याजवळ येऊ? (तिच्याजवळ बसून) काय काम आहे?

सिंधू : माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवावं! आपला हात माझ्या हातात द्यावा-

सुधाकर : (तसे करून) सिंधू, सिंधू, देवतास्वरूप सिंधू! काय तुझी दुर्दशा झाली ही! सिंधू, या दारूबाज नवर्‍याच्या पायी तू बुडालीस! अपशब्दांनी तुझा अपमान केला! कधी तुला गोळाभर अन्न मिळालं नाही! पोटासाठी तुला दळायला लावलं! तुझे हालहाल केले! तुझ्या पोटचा गोळा तुझ्या डोळयांदेखत चेचून टाकला! देवी, संसाराच्या वनवासात फाटकं धोतर आड करून तुला वणवणायला लावलं! सिंधू, सिंधू, उदारहृदये सिंधू, शापाच्या एका शब्दानं मला जिता जाळून टाक! पदरीचं पुण्य खर्चून, खोटं बोलून या सुधाकराला कशाला वाचवीत बसलीस? तुझ्या पुण्याईनं स्वर्गाचा संसार सजवून साजरा करण्याची तुझी योग्यता; चौर्‍याऐंशी लक्ष जन्माची संचितं या जन्मी उभी राहिली आणि विधात्यानं 'सुधाकर' हे दारूनं ओथंबलेलं नाव तुझ्या फाटक्या कपाळी कोरलं! सिंधू, देवी, मला क्षमा कर! या अनंत अपराधी पातक्याला क्षमा कर!

सिंधू : आपण असा जिवाला त्रास का बरं करून घ्यायचा? मी फुटक्या कपाळाची का म्हणून? भरल्या हाती हळदीकुंकवानं, आपल्या मांडीवर मला मरणं आलं, याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला? माझं मंगल झालं! आपण मनाला त्रास करून घेऊ नये. माझ्या गळयाची शपथ आहे! आधीच प्रकृती अशी झालेली! उन्हाच्या वेळी संतापानं डोकं तापलं तर सुंठ उगाळून द्यायलासुध्दा कोणी नाही. आणखी माझं अखेरचं हात जोडून सांगणं आहे. आता आपल्या जिवाला जपणारं कुणी नाही. लोकं सारी ज्याची त्याला असतात. माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती,- आपण आता एकटे राहिला- आता पुढं तरी माझ्या रक्ताची शपथ आहे- आपण यापुढं कधी घेऊ नये! ऐकायचं ना माझं एवढं! एका थेंबालासुध्दा शिवायचं नाही-

सुधाकर : नाही, सिंधू, उभा जन्म तुझी पवित्र आज्ञा मोडण्यात घालविला! तुझी शेवटची आज्ञा तरी पाळण्याइतका हा पातकी सुधाकर भाग्यशाली नाही! हा शेवटचा एकच प्याला मला अजून घ्यायचा आहे. नको, दुर्दैवी जीवा, आता माझ्याकडे पाहू नकोस! या थिजत चाललेल्या डोळयांत अनाथ आशा अजून कशाला तळावते आहे. सिंधू, सिंधू, काय- रामलाल, धाव-

सिंधू : नाथ, जिवाला सांभाळा- सुधाकर! माझ्या सुधाकरांना, देवा- (सिंधू मरते. रामलाल येतो. सुधाकर पेला घेतो व उठून उभा राहतो. रामलाल सुधाकराच्या हातून पेला घ्यावयाला जातो, तोच तो झटकन विष पितो.)

सुधाकर : चांडाळा, ऐन वेळी असा घात करू नकोस!

रामलाल : सुधा, काय प्यालास हे?

सुधाकर : दारू! एकच प्याला!

रामलाल : अजून दारू! जिनं एवढा अनर्थ केला तीच दारू?

सुधाकर : होय, रामलाल, तीच दारू! जिनं माझ्या घरात एवढा अनर्थ केला तीच दारू! जिनं चारी खंडांत अनर्थांचं साम्राज्य चालविलं आहे ती दारू! कुबेराला भीक मागायला लावते ती दारू! भीमासारख्या वज्रदेही शरीराला बहात्तर रोगांचा दवाखाना बनविते ती दारू! शिकलेल्या शहाण्याच्या थोबाडाला शिमग्यातल्या शिव्याशेणांनी शोभा आणते ती दारू! महापतिव्रतांना नवर्‍याच्या हातानं बाजारात आणून बसवते ती दारू! जिवलग नात्याचे धागे कुजवून तडातड तोडते ती दारू! बापाला मुलाकडून, मुलाला बापाकडून ठार मारविते ती दारू! डुकराचं नावसुध्दा न घेणार्‍या पाक मुसलमानाला डुकरासारखं खातेर्‍यात लोळविते ती दारू! गायत्रीमंत्रानं पवित्र झालेल्या ब्राह्मणांच्या जिभेला गायत्रीच्या मांसाची चटक लावते ती दारू! एखाद्या पशूप्रमाणं पुत्राला मात्रागमन्याप्रमाणं प्रत्यक्ष जन्मस्थानी- अरेरे! बोलू नये ते बोलणं आलं! पण सुधाकराच्या ज्या जिभेनं दारूचा विटाळ मानला नाही, त्या जिभेला एक किळसवाण्या शब्दानं काय वाट लागणार! आणि समाजात ठिकठिकाणी शिकलेल्या संभावित गळयांतून जी दारूची गटारं वाहताहेत त्यात एका शब्दाची घाण वाहून जायला किती वेळ लागणार!- रामलाल, कान फोडून स्पष्ट ऐक- पुत्राला मात्रागमन्याप्रमाणं प्रत्यक्ष जन्मस्थानी लघुशंका करायला लावते ती दारू!- ती दारू मी प्यावी अं! आता तोंड वाईट करू नकोस! रागावू नकोस- तुला एकदा सांगितलं, आज शेवटचं सांगून ठेवतो, की दारूची सवय सुटण्याचा काळ ती लागण्यापूर्वी काय तो असतो! पहिला एकच प्याला घेण्यापूर्वी भावी मद्यप्याचा हात धरला तरच फायदा होईल! ज्यानं एकदा पहिला एकच प्याला घेतला त्याला हा शेवटचा असा एकच प्याला घ्यावाच लागतो! दारूबाज दारूतच मरायचा, हे ब्रह्मवाक्यच आहे! आणि माझ्यासारख्या एखाद्याला पश्चात्ताप झाला तरी हा एकच प्याला काही टळत नाही! मात्र जळफळीत औषधाला मारण्यासाठी त्यात जसं पुष्कळसं पाणी ओतावं लागतं, त्याप्रमाणं हा अखेरचा एकच प्याला घेताना, त्यातली दारूची जलाल आग मारण्यासाठी त्यात रसकापरासारखं एखादं विष बरंच घालावं लागतं!

रामलाल : काय? यात रसकापूर? आत्यंतिक घातक रसकापूर घातला आहेस? भयंकर विष प्यालास?

सुधाकर : विष पिऊ नको तर काय करू? ही पाहा- ही देवता मला सोडून गेल्यावर जगात माझं काय राहिलं आहे?

रामलाल : काय, ताई गेली? (सिंधूजवळ जाऊन बसतो.)

सुधाकर : हो, रामलाल, ती गेली! माझी सिंधू गेली! माझी पुण्याईची सिंधू आटली! माझी दयेची सिंधू, करुणरसाची सिंधू, काळ-सागराला मिळाली- नाही, या पातकी सुधाकरानं निर्मिलेल्या दारूच्या समुद्राला मिळाली. या सुधाकराचं जग दारूच्या एकच प्याल्यात बुडून गेलं!

(राग- भैरवी; ताल- दादरा. चाल- पिया सोने दे.) त्यजी देवा हतदैवा। जगी राही काय॥ ध्रु.॥ सिंधू सुखाचा। पुण्यांशाचा। सकळ आटे तापे मम। विशाल जरी हाय॥ 1॥

वामनअवतारी देवाला त्रिभुवनाचं माप घेण्यासाठी अवाढव्य त्रिविक्रमरूपानं तीन पावलं टाकावी लागली, पण या सुधाकराचं उभं त्रिभूवन या देवीच्या दोन पावलांपुरतंच होतं! त्याच पायांवर मस्तक ठेवलं असता मला मरण यायला पाहिजे. या देवतेचे पाय धरून असा हिच्याबरोबर मी गेलो तरच हिच्या पुण्यबलानं माझी पातकं जळून मला स्वर्गद्वारात प्रवेश करता येईल! गेली! दिव्यतपस्विनी मंगलनिधान पूण्यमूर्ती सिंधू गेली! रामलाल, तुझी ताई गेली आणि माझी मानलेली आई गेली! रामलाल, रामलाल, हा सारा अनर्थपात होण्याचं कारण मी पहिल्यानं घेतलेला दारूचा एकच प्याला! त्या दिवशी केलेल्या पातकानं भ्रष्ट झालेलं तोंड या देवीच्या रक्तानं- या मूर्तिमंत अमृतानं धुऊन टाकतो. (तिच्या रक्ताचे चुंबन घेतो.) म्हणजे माझा पवित्र देह स्वर्गाला पात्र होईल! रामलाल, असा भेदरून जाऊ नकोस, हा घे तो एकच प्याला! हा एकच प्याला नीट चव्हाटयावर मांडून सार्‍या जगाला दाखीव आणि आल्यागेल्याला, शिकलेल्याला- अडाण्याला, राजाला-रंकाला, ब्राह्मणाला-महाराजाला-म्हातार्‍याला आणि मुलाला, तुझ्या जिवाभावाच्या दोस्ताला आणि सात जन्मांच्या दुश्मनाला, हात जोडून कळकळीनं सांग, की सार्‍या अनर्थाचं कारण हा दारूचा पहिला एकच प्याला असतो! त्याच्यापासून दूर राहा! जो जो भेटेल त्याला त्याला सांग- सिंधूच्या पवित्र रक्तानं तोंड धुऊन मी सांगतो आहे- मला मोठयानं ओरडवत नाही- तू मुक्तकंठानं प्रत्येकाला सांग, की काय वाटेल ते पातक कर- पण दारू पिऊ नकोस! (सिंधूच्या पायावर डोके ठेवून मरतो.)

रामलाल : अरेरे, काय हा अनर्थ! एकदम तीन जिवांच्या तीन परी झाल्या! मूल गेलं, सिंधू गेली, सुधाकर गेला! घर बुडालं आणि वंश बुडाला! या जगात सुधाकराचं आता काय राहिलं आहे? सर्वस्वासह हे तीन जीव ज्याच्यात बुडाले तो तेवढा दारूचा हा एकच प्याला!!

ब्रह्मार्पण ब्रह्महविर्ब्रह्माग्ना ब्रह्मणा हुतम्। ब्रह्मैव तैन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना॥

- श्रीगीतोपनिषत्सु श्रीभगवान्

अंक पाचवा समाप्त.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED