घुसमट ... Sadhana v. kaspate द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घुसमट ...


मिनलसाठी स्थळ बघणे चालु होते. आठवड्यातुन दोन - तिन मुल पाहुन जात असतं. आजही एक मुलगा पाहायला येणार होता , म्हणुन घरात लगबग सुरु होती. आई स्वयंपाक करत होती. तर वडिल हाँलमधील टेबल आवरत होते. मिनलचा मोठा भाऊ सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता. छोट्या बहिणी मिनलपेक्षा सुंदर असल्यामुळे , त्यांना शेजार्यांकडे पाठवल होतं. वडिल टेबलवरील सामान व्यवस्थीत लावत होते , तेव्हा अचानक धक्का लागुन २-३ वह्या आणि एक डायरी खाली पडली. फँनच्या हवेने डायरीची पाने काहीवेळ फडफडली आणि एक पान स्थिर झालं. त्या स्थिर पानावर वडिलांची नजर पडली. ती डायरी मिनलच्या मधव्या बहिणीची होती. त्यात तिने तिच्या आई वडिलांस एक पञ लिहीले होते. ते असे होते.
प्रिय आई -बाबा ,
खुप दिवस झाले , एक गोष्ट तुम्हाला सांगेन म्हणते पण हिम्मतच होत नाही. मुलींच्या लग्नाचा एवढा बाऊ का बनवला जातो ? मिनलताईचे वय २३ असले तरी एवढे जास्तही नाही की तिचे लग्न याच वर्षी केले जावे. तिच्या लग्नाची घाई तुमच्यापेक्षा आपल्या शेजार्यांनाच जास्त आहे. ताई सुट्टीला घरी आली की पहिले शेजारचे येवुन विचारतात , ' मग लग्न कधी ? ' आजुबाजुचे विचारतात म्हणुन तुम्हीही स्थळ बघायला चालु केलतं. लोक बोलतात म्हणुन लग्नाची घाई करण योग्य आहे का ? काकुंचा डायलाँग ठरलेला असतो. ' तुझ्या शाळेतील सर्व मैञिणींचे लग्न झाले हो मिनु ...आता फक्त तुच राहीलीस !' यात ताईचा काय दोष ? वर आजी - आजोबा फोन करुन म्हणतात , ' आमची शेवटची ईच्छा आहे मिनुच लग्न बघणं ! तेवढ बघीतल की आम्ही मरायला मोकळे ! ' जणुकाही अक्षता टाकल्या की लगेच जीव सोडणार आहेत. त्यांच्या इच्छेपायी ताईच्या इच्छांचा विचारच तुम्ही सोडुन दिला आहे. तीची स्वप्न इतर मुलींपेक्षा वेगळी आहेत. तिला अजुन थोडा वेळ हवा आहे. नुसतच म्हणतात स्ञी - पुरुष समानता. कुठे आहे समानता ? याच ठिकाणी मुलगा असता तर त्याचे करियर होवुन तो सेटल होईपर्यंत लग्नाचा विचार सुद्धा केला नसता. पण ताई मुलगी आहे. ती दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे त्यामुळे तिच्या स्वप्नांना दुय्यम स्थान मिळत आहे. मुलीच लग्न वयातच व्हायला पाहिजे. मुलांनी तिशीनंतर केल तरी चालतं. मुलाकडचे शिकवायला किंवा नोकरी करु द्यायला तयार आहेत मग लग्न करुन टाकु. पण ; बाबा लग्न झाल्यावर मुलगी ही ' स्ञी' नावाच्या पाञात अडकते. कधी सुन , कधी बायको तर कधी दुसऱ्या नात्यात तीला स्वतः ला झोकुन द्याव लागतं. तिथे ती फक्त ' ती ' उरत नाही. तिथे ती तिच्या स्वप्नांसाठी जबाबदाऱ्या झिडगारु शकत नाही.
परवा तुम्ही आत्याला म्हणालात मिनलच उरकल की बाकीच्या दोघींच एकञ उरकुन टाकायला मी मोकळा होईल. केवळ बाकीच्या दोघींच लवकर करता याव म्हणुन तिच लग्न लवकर उरकण हे योग्य आहे का ? दादा मोठा असुन ,फक्त लोक काय म्हणतील म्हणुन तो ताईच आधी लग्न करतोय. हे खरच योग्य आहे का ? कोणीही कसलीही स्थळ सुचवतं. पाहुण्यांच मन कस दुखवायच म्हणुन , किमान दाखवण्याचा कार्यक्रम करुन नंतर नकार कळवता. पण ; त्यामुळे रोज साडी घालुन , नटुन पाहुण्यांसमोर जाताना ताईची मनस्थिती कशी होत असेल याचा कधी विचार केला आहात का ? ताई विश्वसुंदरी नाही पण म्हणुन काय डांबरा सारखा काळाकुट्ट ज्याचे सोडुन काहीच दिसत नाही असा मुलगा फक्त श्रिमंत आहे म्हणुन तिने हो म्हणावं अशी अपेक्षा का ? परवाचा मुलगा जास्तच टकला होता म्हणुन ती नाही म्हणाली , तर मावशी म्हणते कशी , ' नंतर काही वर्षाने टक्कल पडणारच आहे.. तर आत्ता असलेल काय वाईट?' मामांनी आणलेला मुलगा तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता. विचार जुळणार नाहीत म्हणुन तिने नकार दिला. मामांना त्यांचा अपमान केल्यासारखं वाटलं आणि ते ताईला खुप बोलले. ' बघु कुठला हिरो आणतेस ते..!' तिला हिरो नकोय बाबा . पण ; जोपर्यंत एखाद्या मुलाकडे बघुन तिला वाटत नाही की , ' हाच आपला जोडीदार ' तोपर्यंत तिच्या होकाराचा अट्टाहास का ? बाबा एक वर्ष झाल तिला सतत मुल बघायला येत आहेत. रोज साडीच घालं , मेकअप हलकाच कर , केस मोकळे सोडु नको , जास्त गच्च ही बांधु नको, पदर सांभाळ , आत जाताना उजवाच पाय टाक , मुलाने प्रश्न विचारल्यावर वर बघु नको. हळु आवाजात उत्तर दे, हसु नको. उठताना सर्वांच्या पाया पड. वजन वाढेल इतक खावु नको. बारीक झाली तर.. म्हातारी दिसतेस जरा तेज वाढव. मुलं आधि एकटे बघायला येतात , नंतर पुर्ण कुटुंब घेवुन येतात. कधि ड्रेसवर बघायच म्हणतात, कधी साडीवर. कधी पिंप्लसमुळे नकार , कधी आवाज घोगरा वाटला म्हणुन नकार. कधी उंची मुळे नकार , कधी शिक्षणामुळे . पायाच्या नखापासुन डोक्याच्या केसापर्यत निरखुन बघतात. बाबा ती मुलगी आहे , शोभेची बाहुली नाही. ती कधीच बोलुन दाखवणार नाही , पण ; ती पुर्णतः कोलमडुन गेली आहे. तीचा आत्मविश्वास खचुन गेला आहे. जमल तर तीची होणारी ' घुसमट ' एकदा जाणुन घेण्याचा प्रयत्न करा.
हे पञ वाचुन वडिलांचे मन सुन्न झाले. ते तिथुन तडक मिनलच्या रुम मध्ये गेले. मिनल तयार झाली होती पण चेहऱ्यावर कसलच तेज आणि प्रसन्नता नव्हती. वडिल तिच्या जवळ गेले. तिचा हात हातात घेत , डोळ्यात पाहुन म्हणाले , ' बेटा तुझ लग्न एक वर्ष पुढे ढकलुया का ? तुला ते फाईन आर्ट का काय करायच आहे ना ? '. मिनलच्या अंगात काहीतरी संचारत होते. आश्चर्याने ती फक्त पाहत होती. ' बाळा लोक काय म्हणतील यापेक्षा , माझ्या मुलीला काय वाटत हे महत्त्वाच आहे. मागचा एक वर्ष तु फार सोसल आहेस. तुझी घुसमट आज दिसली. बाहेर पड या घुसमटीतुन, माझ्यासाठी !' दोघांचेही डोळे डबडबले होते. सुकलेल्या फुलावर पाण्याचा शिडकावा केल्यावर फुल ज्या प्रमाणे खुलत त्याप्रमाणे मिनल खुलली होती. तीने वडिलांचे अश्रु पुसले आणि घट्ट मिठी मारली.
- साधना वालचंद कस्पटे