द लास्ट ट्रेन Sadhana v. kaspate द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

द लास्ट ट्रेन


द लास्ट ट्रेन..


पुणे स्टेशन वरुण रात्री 12 वाजता मुंबई –लातूर एक्सप्रेस ही ट्रेन होती. मी व बहीण स्टेशन ला 11 वाजता पोहचलो. प्रचंड गर्दी , कलकल आणि त्यात माझा मूड खराब त्यामुळे वाट बघून वैताग आला होता. माणूस जेव्हा अपयशी होतो , तेव्हा अपयशाचे खापर एकतर इतरांवर फोडतो किंवा देवाला दोष देवून मोकळा होतो. त्यावेळी माझ्या मनाचीही अवस्था काहीशी अशीच होती. मी पूर्ण प्रयत्न करूनही का असं झालं ? सतत अपयश.. काय या जगण्याचा अर्थ ? माझ लक चांगलं नाही. असे विचार मनात कल्ला माजवत होते.
लेडिज डब्बा सर्वात शेवटी असतो म्हणून आम्ही प्लॅटफॉर्म वर सर्वात शेवटी जावून थांबलो. तेवढ्यात 12 वाजून 45 मिनिटाला ट्रेन आली. आणि जे दृश्य पाहिले ते अतिशय धक्कादायक होते. ज्या प्रमाणे साखरेच्या कणाला मुंग्यांचे झुंड लटकलेले असतात , अगदी तसेच लोक ट्रेन ला लटकलेले होते. प्लॅटफॉर्म वरील लोक धडाधड सामान आत भिरकावत होते. काहींचे सामान चुकून आत जात होते मात्र बर्‍याच जणांचे तेवढ्याच स्पीड ने बाहेर फेकले जात होते. ट्रेन चा एकही डब्बा असा नव्हता ज्याच्या दरवाज्याला लोक लटकत नव्हते. तेही 1-2 नाही तर 10 ते 20 लोक लटकत होते. दरवाजा दिसतच नव्हता. जिथे जागा आहे तेथील लोक जाणून बुजून दरवाजा बंद करून घेत होते. ट्रेन ची गती जशी जशी कमी होत होती तसेच प्लॅटफॉर्म वरील लोकांची गती वाढत होती. बंद दरवाजावर लोक लाथा मारत होते. दरवाजा उघडण्यासाठी आई बहिणीवरून शिव्या देत होते. आणि फायनली ट्रेन थांबली. मी बहिणीचा हात पकडला. आणि लेडिज डब्बा पाहिला. नकळत तोंडातून वाक्य बाहेर पडलं “आई शप्पथ.. !” तेवढा मोठा लेडिज डब्बा, मला त्यावेळी खेळण्यातील गाडीचा सर्वात छोटा डब्बा वाटत होता. दारात 10-12 बायका लोंबकळत होत्या. आत बर्‍याच बायका उभ्या होत्या. दाराची पायरी सुद्धा दिसत नव्हती. सर्व कन्नड बायका आणि इतर बायका यांची इतकी जोरात भांडण सुरू होती की ट्रेन चा भोंगा सुद्धा त्यापुढे फिका वाटत होता. आता मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मी बहिणीचा हात धरला आणि आत चढण्याचा निरर्थक प्रयत्न केला. त्या क्षणाला अस वाटलं की आम्ही दोन मुंग्या आहोत आणि समोर 10-12 हत्ती आहेत. त्यामुळे आपण आपली शक्ति पणाला न लावलेली बरी. आता काय करायचं ? सर्वत्र तशीच परिस्थिति . वापस येण ही शक्य नव्हतं , कारण रात्रीचे 1 वाजले होते. त्यावेळी लोकल आणि बस दोन्ही उपलब्ध नसतात. काही सुचेना... ट्रेन सुटणार होती , ट्रेन चा आवाज सुरू झाला. लेडिज डब्ब्या शेजारी अपंगांचा डब्बा होता. पण आपण तर धडधाकट आहोत.. कस चढणार ? चुकीच आहे. हो... नको.. हो.. नको. हो.. हो... ट्रेन सुटली आणि मी बहिणीचा हात धरून त्यात चढले. आणखी एक मुलगी चढली.
आतून एक मुलगी आली आणि उतरा म्हणाली. काय बोलावे काही कळेना. ‘जागा नाही मग कुठे चढणार.. ? आम्ही नाही उतरणार’ दुसरी मुलगी म्हणाली. त्यावर अपंग मुलगी म्हणाली ठीक आहे , दरवाजा लावून घ्या. आम्ही दरवाजा लावण्यासाठी दरवाजा ढकलला आणि तेवढ्यात बाहेरून 7-8 माणसांचा ग्रुप आला आणि दरवाजा ढकलायला सुरुवात केली. आम्ही खूप घाबरलो. आम्ही तीन सुकड्या मुली आणि ते सात आठ तीशीच्या पुढील माणस. दरवाजाची कडी बसेना . तस एका दृष्टीने आम्ही चढण हा गुन्हाच होता , आणि त्यांना चढू न देण्याचा आम्हाला काहीच अधिकार नव्हता. पण मजबूरी होती. आम्ही इतका जोर लावला की त्यांना हार मानवी लागली. ट्रेन गती घेई पर्यन्त आम्ही जोर लावला. बाहेरून माणस ओरडत होती.. ‘ ये उघडा रे.. च्या मायला.. एवढा जोर लावतेत.. ही अपंग नाहीत.’ शेवटी ट्रेन ची स्पीड वाढली आणि ती माणस झपाझप मागे निघून गेली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
आम्ही तिघी पटकन दरवाजाला टेकून खाली बसलो. आणि डोळे उघडले. माझ्या तर अंगावर काटाच आला. काय होत ते ? इतका घाण डब्बा. सर्वत्र घाणेरडा वास. मी एक अतिशय स्वच्छ व्यक्ति असल्यामुळे मला घाणीची फार किळस येते. मी नाकाला स्कार्फ बांधला. आम्ही बसण्यासाठी डब्ब्यात गेलो. कुठेच जागा नव्हती. सर्व सीट आणि खालील जागा यावर लोक पांघरून घेऊन झोपले होते. आम्ही परत दाराजवळ आलो. मला तर अजिबात बसण्याची इच्छा नव्हती. पण छोट्या बहिणीसाठी मला बसावच लागणार होत. मी बॅग मधून न्यूज पेपर काढले आणि खाली अंथरले. माझी बहीण आणि ती मुलगी दोघीही बसल्या पण मला अजिबात इच्छा होत नव्हती. पुणे ते लातूर अंतर कमी असत तर मी नक्की उभारून गेले असते पण 6-7 तास उभे राहणं शक्य नव्हतं. मी बसले. मला फार वाईट वाटंत होतं की माझ्यामुळे माझ्या बहिणीचे हाल होत आहेत. तिने माझ्या मांडीवर डोक टेकवलं व झोपली. मी मात्र झोपणं अशक्य होत. समोरच्या दारात एक माणूस झोपला होता. थंडीच्या दिवसामुळे हवा जोरात होती... हवेने त्या माणसाच्या चेहर्‍यावरील शाल थोडी खाली सरकली. आणि माझ्या काळजात धस्स झालं. त्या माणसाचा चेहरा पूर्ण जळलेला होता. मान आणि छाती एकमेकांना चिटकली होती. ओठ आणि हनुवटी एकच वाटंत होती. डोळे बाहेर लोंबत होते. आयुष्यात पहिल्यांदा अशी व्यक्ति पाहिली होती. खूप भीती वाटत होती, पण कशाची ते माहीत नव्हतं. मी घट्ट डोळे मिथुन घेतले. कदाचित माझ्या मनातील भावना त्या व्यक्ति पर्यन्त पोहचल्या असतील.. त्याने हळूच पांघरून घेतलं. आणि मी पुन्हा डोळे उघडले. बहीण आणि ती मुलगी दोघींनाही चांगली झोप लागली होती. पण मी मात्र डोळे उघडे ठेवून मांडी घालून ताठ बसून होते. मी माझी पाठ ट्रेन ला टेकवली ही नाही , इतकी घाण मला वाटत होती.
मी विचार करत होते, की का आले ? उद्या ही जावू शकले असते. मन खूप बोचत होत. सर्व डब्ब्यात भयाण शांती पसरली होती. सर्वजण झोपले होते. फक्त ट्रेनचा आवाज. मी मात्र पापणी ही हलवत नव्हते. तेवढ्यात पावलांचा आणि काटीचा आवाज आला. मी पहिलं तर आणखी एक विचित्र माणूस. हाफ पॅंट आणि पांढरा आखूड बाहयांचा शर्ट. पाठीवर 4-5 किलोचा मांसाचा अनावश्यक गोळा. त्यामुळे मान पुढील बाजूस झुकलेली. दोन्ही डोळे आंधळे. हातात काठी घेवून तो बाथरूम साठी निघाला होता. चुकून त्याचा एक पाय जळालेल्या माणसाच्या पायावर पडला.. तसा तो कळवळला. आणि हा माणूस दिशा बदलून माझ्या दिशेने येवू लागला. आता हा आपल्याला तुडवणार . माझ्या तोंडातून आवाजाच येत नव्हता. तेवढ्यात एक मुलगी आली आणि त्याच्या हाताला धरून त्यांना बाथरूम मध्ये पाठवलं आणि तिथेच थांबली. तिने चेहर्‍याला स्कार्फ बांधला होता. फूल बाहयांचा ड्रेस , हातात मोजे घातले होते. तळपाय सोडलं तर काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. आवाज स्पष्ट येत नसल्यामुळे तिने स्कार्फ थोडा खाली ओढला. आणि मी पुन्हा तोंडावर हात ठेवला. त्या मुलीच्या चेहर्‍यावर खूप मोठे मोठे काळे चट्टे होते. बोट ठेवण्या इतपत ही स्कीन चांगली नव्हती. ती साधारण माझ्याच वयाची होती. तिने लगेच स्कार्फ वर घेतला. मी दुसरीकडे नजर वळवली. आता मात्र माझ्या मनात चित्र विचित्र शंका येत होत्या. ह्या डब्ब्यात झोपलेली सर्व माणसे अशीच तर नाहीत ना ? मी माझी नजर सर्वत्र फिरवली. कधी एकदाची सकाळ होतेय आणि मी घरी जातेय असं झालं होतं. टाइम बघितला फक्त 2 वाजले होते. 7 वाजण्यासाठी अजून 5 तास होते. त्या विचारानेच मला असहाय्य वाटू लागलं. तो कोंदट वास.. मी स्कार्फ अजून आवळला. त्यामुळे माझ्या श्वासांची गती वाढत होती. माझ्याच श्वासांचे सुसकारे मला ऐकायला येत होते. मी खाली मान घालून विचार करू लागले. भयाण शांती.
आता 3 वाजले होते. कधीच कुठल्याच गोष्टीची एवढ्या आतुरतेने वाट बघितली नव्हती जेवढी 7 वाजण्याची मी वाट बघत होते. वेळ माझी परीक्षा पाहतोय अस वाटंत होत. तेवढ्यात पुन्हा खडखड झाली. मी हळूच माझे डोळे त्या दिशेला वळवले. एक पाय पूर्णतः निकामी , डोळ्यांना दृष्टी नाही आणि चेहर्‍यावर भज्यांप्रमाणे विविध आकृती लोंबणारे त्वचेचे गोळे. विठ्ठला.. पांडुरगा काय दाखवतोस हे.. का ? का या ट्रेन मध्ये आले मी ? असा प्रश्न राहून राहून मनात येत होता. तो माणूस चाचपत चाचपत बाथरूम ला गेला. तेव्हा एक गोष्ट निदर्शनास आली ती अशी की अपंग व्यक्तिंना दर तासाला बाथरूम ला जावे लागते. किंवा त्यांची ती सवयच असते. आता मात्र मला सहन होत नव्हतं. स्वतःचाच राग येत होता. 4 वाजत आले होते. डोळे फुटतील की काय असं वाटंत होत. तरीही मला झोपायचं नव्हतच . मी ठरवलं की ते करतेच. कानात हेडफोन टाकून गाणे ऐकणे ही बोर झाले होते. मी पुन्हा विचार करू लागले. आणि या वेळी जे पाहिल त्याने तर भडकण उलटी करावी आणि चालत्या ट्रेन मधून खाली उडी मारावी वाटली. दोन्ही हात पाय वाकडे , दृष्टी ही जवळ जवळ नव्हतीच. एक पाऊल टाकण म्हणजे दिव्यच . स्कार्फ वाली मुलगी आणि एक आजी यांनी त्यांना बाथरूम मध्ये सोडलं. आणि दरवाजा ओढून घेतला. थोड्याच वेळात आत धापकन पडल्याचा आवाज आला. आज्जी ने लगेच दरवाजा उघडला आणि त्यांना ओधुन बाहेर काढलं. त्यांच्या अंगावर जागोजागी घाण लागली होती. पाय भरला होता. मला ते पाहून मळमळ होत होती. मला हे किळसवानं जगणं नकोस झालं होतं. त्या आज्जी पाण्याने साफ करत होत्या. मी थांबण आता अशक्य होतं. मी बहिणीला आणि त्या मुलीला उठवलं आणि धाडकन दरवाजा उघडला. बाहेर कडाक्याची थंडी होती. अंगाला वारा रपरप लागत होता. अजून थोडा वेळ थांबले तर माझी त्वचा थंडीने फाटली जाईल असं वाटंत होतं पण मला त्याची परवा नव्हती. माझा श्वास कोंडत होता. समोर दिसणारा काळाकुट्ट अंधार आणि त्या अंधारात वीरलेलं आकाश बघून मला चालत्या ट्रेन मधून उडी मारावी आणि पक्षाप्रमाणे दूर उडून जावं असंच वाटंत होतं. का आले मी ? का ? असा विचार करत होते. आणि अचानक माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कदाचित मला माझ्या प्रश्नाच उत्तर सापडलं होतं. या सर्व अपंग लोकांना पाहून मला वाटलं की मी किती लकी आहे... मला देवाने इतकं सुंदर शरीर दिलयं. सृष्टीचे सौंदर्य बघू शकणारे हे सुंदर दोन डोळे ,धडधाकट दोन हात , पाय. मनगटात बळ, धमन्यांमध्ये सळसळत रक्त , सतत धडकणार सदृढ हृदय , उत्तम रित्या काम करणारा मेंदू आणि जगाकडे बघण्याची वेगळी दृष्टी ‘लेखन’. आणि तरीही मी दुःखी आहे. का तर फक्त एक अपयश... ? आणि ही अपंग माणस , या परिस्थिति त ही जगण्यासाठी धडपडतात. जिवनावर भरभरुन प्रेम करतात. जसे आहोत तसे स्वतःला स्विकारतात. शरिराच्या अपंगत्वापेक्षा विचारांचे अपंगत्व जास्त वाईट. मला माझ्याच विचारांची कीव येत होती. काही वेळा पूर्वी मी देवाला दोषी मानत हे विचारत होते की काय दिलंस तू मला ? पण मला माझ उत्तर मिळालं होतं... जगण्याच बळ आणि स्वातंत्र्य दोन्ही दिलय त्याने. एक परिपूर्ण माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे लागत ते सर्व दिलयं... आणि मी त्याची ऋणी आहे. कदाचित मलाच माझं महत्व कळावं म्हणून त्याने मला या ट्रेन मध्ये या अवस्थेत पाठवलं असावं.. असा मी अंदाज लावला. आणि इथून पुढे कधीच निराश नं होण्याचे ठरवले. देवाने मला काय दिल या पेक्षा , वर गेल्यावर जर देवाने मला विचारलं की त्याने दिलेल्या जीवनाच मी काय केल ? तर आयुष्य भरभरून जगले आणि धमन्या मध्ये रक्त असे पर्यन्त काम केलं हे सांगता यावं.. असं काम करण्याचे ठरवले.
विचार करत करत 6 वाजले होते. एक एक जण उतरत होते. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की डब्ब्यत 5-6 जण सोडले तर कोणीच अपंग नव्हते. सर्वजण धडधाकट होते. शेवटी लातूर स्टेशन आले आणि मी धाडकन उडी मारली. एखाद्या जेल मधून अनेक वर्षाने सुटका व्हावी अगदी तसंच वाटलं. वळून त्या डब्ब्याकडे बघितलं आणि ठरवलं की पुन्हा या ट्रेन ने यायचं नाही. धिस विल बी माय लास्ट ट्रेन ! आणि मी पुन्हा वळून त्या ट्रेन कडे बघितलं नाही. पण त्या ट्रेन ने मला खूप काही शिकवलं. शब्दात नं मांडता येण्यासारख.
- साधना वालचंद कस्पटे ©
sadhana.kaspate99@gmail.com