Fulke - Bampi Rides - 1 books and stories free download online pdf in Marathi

फुलके - बम्पी राइड - 1

“अरे बॅग भरलीस का? आता बाबा येतील आणि निघायची घाई करतील. तुझ्यामुळे उशीर झाला तरी बोलणी मात्र मलाच बसतील.” आई म्हणाली.

तिचा स्वर निर्वाणीचा इशारा द्यावा तसा होता. त्यामुळे प्रकरण आता गंभीर झाले आहे हे समजून मी नाराजीने हातातले ‘कॉमिक्स’ बाजूला ठेवले आणि कपाट उघडून बॅग भरायला घेतली.

तसे बॅग भरणे आता मला सवयीचे झाले आहे, कारण तसे महिन्यातून एकदा तरी आम्ही प्रवासाला जात असतो. त्यामुळे नेहमी लागणार्‍या वस्तू, स्वत: पुरते दोन तीन दिवसाचे सामान भरण्याची माझी ही सातवी किंवा आठवी वेळ असावी.

पण आज खरच उशीर झाला आहे. ते पुस्तक वाचताना वेळ कसा गेला कळले नाही. मी आपली घाई घाईने बॅग भरली आणि आईसमोर नेऊन ठेवली. आईने मग तिच्या सवयीप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती केली. मी सर्व प्रश्नांना समर्थपणे उत्तरे दिली, त्यामुळे मी बॅग व्यवस्थित भरली आहे असे तिचे समाधान झाले. आता आम्ही दोघं तयार होऊन बाबांची वाट बघत होतो.

तासभर तसाच गेला. बाबांना आज चांगलाच उशीर झाला होता.

“आता येतील बघ.” असे म्हणून आई माझी समजूत घालत होती की स्वत:लाच समजावत होती हे मला कळत नव्हते, कारण तिच्या नजरेतील काळजी स्पष्ट जाणवत होती. बाबांनी प्रवासाला जायच्या दिवशी इतका उशीर कधी केला नव्हता.

‘असा उशीर माझ्यामुळे झाला असता तर आई मला जेवढी ओरडली असती त्याच्या निम्मे तरी ती बाबांना ओरडेल का?’ असा खट्याळ विचार मा‍झ्या मनात येऊन गेला.

आई बाबांना ओरडते आहे हे चित्र मा‍झ्या मनात रेखाटल्यामुळे मा‍झ्या गालावर नकळत हसू उमटले आणि – “अजून बाबा आलेले नाहीत आणि हसतोस कसला मेल्या...” या आईच्या खरडपट्टीने, क्षणातच ते विखुरले देखील गेले.

तसे स्टेशनावर वेळेत पोहोचलो नाही तर गाडी चुकायची किंवा बसायला जागा न मिळण्याची भीती होती. असे आज पर्यंतच्या प्रवासात एकदा दोनदा झाले होते. पण अशावेळी थोडावेळ उभे राहीले की कोणीतरी सज्जन गृहस्थ आईला जागा देत आणि मग मी तिच्या मांडीत बसत किंवा झोपत असे. त्यामुळे उशीर होण्याची काळजी माझ्यापेक्षा आईलाच जास्त असणे साहजिक होते.

प्रवास म्हणला की स्टेशन वरची लगबग, गाडी फलाटावर आली की धक्का बुक्की करणारी माणसे, गाडीत हवी तशी जागा मिळवण्याचा आनंद, कधी जागेवरून होणारी इतरांची भांडणे अशा सर्व गोष्टींचे मला फार अप्रूप वाटत असे.

या सर्व गोष्टी मी निरागस भाव चेहर्‍यावर ठेवून अनुभवत असे. मनात मात्र या सर्व गोष्टींची मजाच वाटायची. वयच तसे होते ते.

एवढ्यात बेल वाजली. बाबा आले होते. आईने दर उघडले, बाबांचे चहा-पाणी झाल्यावर आम्ही तिघे रिक्षेनी स्टेशन वर गेलो. गाडी नुकतीच लागली होती. म्हणावी तशी गर्दी नव्हती. आम्हाला बसायला जागा मिळाली, आम्ही स्थिर स्थावर होतो तोच गाडी निघाली.

“आज गाडीला गर्दी कमी वाटते...” बाबांनी तिकिटासाठी आलेल्या कंड‍क्टरला विचारले.

“गेला आठवडाभर रस्ता खोदून ठेवला आहे, कसले तरी काम सुरू आहे. चांगला तासाभराचा रस्ता त्यामुळे कच्च्या रस्त्यावरून जावे लागते, म्हणून गावातली लोकं सध्या या गाडीने येत नाहीत, रेल्वेने जातात.” कंड‍क्टरने सगळी हकीकत संक्षिप्त रुपात सांगितली होती.

कच्च्या रस्त्याचे नाव ऐकून आईचा चेहरा गर्भगळित झाला होता, तर हे नवीन प्रकरण अनुभवायला मिळणार म्हणून मी अधिक अप्रूपतेने वाट बघत होतो.

माझा धीर पूर्ण सुटला होता. मी बाबांना सारखे विचारात होतो “कच्चा रस्ता कधी सुरू होणार?”

“अरे कच्चा रस्ता म्हणजे त्यावर डांबर नाही. भरपूर खड्डे, कधी चिखल, कधी गाळ कशाचीही खात्री नाही. गाडी अडकली नाही तरी भरपूर हादरे बसतात आणि जास्त वेळ प्रवासामुळे कंबर दुखायला लागते.” बाबांनी मा‍झ्या मनातील बऱ्याच शंकांचे निरसन एका वाक्यात केले होते. आईचा चेहरा गर्भगळित का झाला होता याचे रहस्यही उलगडले होते.

अजून थोडावेळ प्रवास केल्यावर गाडी मुल रस्ता सोडून कच्च्या रस्त्याला लागली. खड्डे चुकवण्यासाठी गाडी कधी अचानक डावीकडे तर कधी अचानक उजवीकडे वळत होती. आई बाबा बसले होते. मी त्यांच्या मध्ये उभा राहिलो, आणि गाडी जशी वळेल त्याप्रमाणे कधी आईच्या तर कधी बाबांच्या अंगावर स्वत:ला झोकून देऊ लागलो. गाडी कधी खड्ड्यातून जात असे, कधी दगड चाकाखाली आला तर किंचित उडत असे. त्या वेळी मी उंच उडी मारण्याचा आनंद घेत असे. एकंदरीत गाडी जरी सावकाश चालली असली तरी माझा दंग मात्र जोरात सुरू होता. चांगला रस्ता लागेपर्यंत मी असाच दंगा केला.

आता आम्ही गावी उतरलो होतो, इतर प्रवाशांप्रमाणे आई-बाबा दोघेही थकले होते. पण मी मात्र मा‍झ्याच आनंदात होतो, कच्च्या रस्त्याच्या नवीन अनुभवामुळे.

मा‍झ्या आनंदाचे बाबांना वाटणारे कौतुक त्यांच्या डोळ्यातून मला काळात होते. म्हणुनतर इतके थकले असतानासुद्धा त्यांनी मला खांद्यावर बसवून घरापर्यंत नेले होते.

- क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED