त्या दिवशीचा तो प्रवास मला आजही चांगलाच आठवतो. गावातल्या घरच्या अंगणात बसलो की अगदी काल घडल्याप्रमाणे तो प्रसंग माझ्या मनात येतो.
“अरे बॅग भरलीस का? चार वाजून गेलेत. उशीर होतोय. उद्या ऑफिसला दांडी मारणार आहेस का?” – बायको म्हणाली. दारातून ओरडलीच म्हणाना. तिचाही स्वर निर्वाणीचा इशारा द्यावा तसाच होता.
प्रकरण गंभीर आहे हे ओळखून मी हातातील चहाचा कप बाजूला ठेवून अंगणातील झोपाळ्यावरून उठलो. बायकोचा संवाद आणि स्वर नेहमीचाच ठेवणीतला असल्यामुळे नकळत गालावर हसू उमटले. ते आईने समोरच्याच आराम खुर्चीत बसून बरोबर हेरले आणि त्याच वेळी मी तिच्याकडे बघितल्याने आम्ही दोघे मोठ्याने हसणे आवरू शकलो नाही. हे पाहून बायको काहीतरी पुटपुटत आत गेली. परिस्थितीचे गांभीर्य मला परत एकदा जाणवले.
बायकोच्या म्हणण्यात तथ्य होते. चार वाजून गेले होते. आता आम्हाला निघायला हवे होते. जुन्या आठवणीत रमण्यासाठी फार वेळ नव्हता. तसे आता स्वत:च्या गाडीने आले होतो. आई आणि बायकोच्या हट्टामुळे ड्रायव्हरही केला होता. म्हणजे तसे बघितले तर लहानपणी जी घाई करण्याची कारणे होती ती आता राहिली नव्हती. गाडी किंवा गाडीत जागा पकडण्याची घाई नव्हती.
सोबत ड्रायव्हर होता, त्यामुळे गाडीत बसून झोप घेणे सहज शक्य होते, पण मुळात निघायला उशीर झाला तर शहरातील ट्रॅफिकमध्ये अडकण्याची शक्यता होती.
आज काही गावातून पाय निघत नव्हता. परतीची तयारी रटाळपणे सुरू होती. सर्व आवरून घरातून निघेपर्यंत सायंकाळचे सहा वाजून गेले. बायकोचा पारा अजून उतरला नव्हता. चिरंजीवांना कशाचे ढिम्म नव्हते. ते त्यांच्या मोबाइल मध्ये गेम खेळण्यात व्यस्त होते.
चालढकल करीत आम्ही तयार होऊन परतीच्या प्रवासाला लागलो. गाडीत ए.सी. सुरू होता. रेडीयोवर जुनी गाणी संथ आवाजात सुरू होती. वातावरण शांत होते. कोणीच कुणाशी बोलत नव्हते. मी माझे डोळे मिटून पुढच्या सीटवर बसून राहिलो. कधी झोप लागली कळलेच नाही, अचानक गाडी थांबली. मी तरीही अजून थोडे झोपावे असा विचार केला. ५-१० मिनिटे झाली तरी गाडी जगाची हालत नाही हे कळल्यामुळे मी उठलो. ड्रायव्हरला हकीकत विचारली. त्यालाही नीटसे माहिती नव्हते. गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली होती ट्रॅफिकपण पुढे सरकत नव्हते.
ड्रायव्हरने खाली उतरून परतीच्या वाहनांना चौकशी केल्यावर कळले की पुढे दोन गाड्यांची धडक झाल्यामुळे रस्ता जाम झाला आहे. दोन्ही वाहने बाजूला केल्याशिवाय वाहतूक पूर्ववत होणार नाही.
मी परत गाडीत बसलो सगळ्यांना हकीकत सांगितली.
“आपण परत गावाला जाऊ. उद्या पाहते परत निघू तो पर्यंत सर्व सुरळीत झाले असेल.” बायकोने प्रस्ताव मांडला. तरीही ‘मला घरी जाऊन ऑफिसची तयारी करायची आहे आणि रात्रीच घरी पोहोचणे अधिक सोयीचे राहील’ या माझ्या मताशी सर्व सहमत होते.
“पण ट्रॅफिक हलल्याशिवाय पुढे जाणार कसे?” ड्रायव्हरने एक अतिशय निरागस प्रश्न विचारला होता, आम्ही सगळे विचार करू लागलो.
लहानपणी प्रवास केलेला कच्चा रस्ता मला माहित होता. आताही तो आधी इतकाच खराब असेल अशी शंकासुद्धा माझ्या मनात आली नाही. मी ड्रायव्हरला गाडी वळवायला सांगितली, मीच त्याच्या शेजारी बसून त्याला रस्ता दाखवू लागलो. आता तसा रस्ता सुधारला होता, तरीही मुख्य रस्त्या इतका तयार नव्हता. मधे मधे खड्डे लागत होते. रात्रीची वेळ असल्यामुळे काही खड्डे ड्रायव्हरला चुकवता आले नाहीत. गाडी तशी सावकाशच पुढे जात होती.
बराच वेळ थांबूनही ए.सी बंद न केल्यामुळे गाडीतील पेट्रोल बर्यापैकी संपले होते. या कच्च्या रस्त्यावर पंप मिळण्याची शक्यता कमीच होती. म्हणून मी ड्रायव्हरला ए.सी. बंद करून खिडक्या उघडायला सांगीतले. आता रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भर म्हणून धुळी मुक्तपणे गाडीत येत होती. मनात मात्र मी लहानपणाची मौज आठवत होतो.
“मला भूक लागलीय, आणि धुळीमुळे डोळ्यांना त्रास होतोय.” चिरंजीवानी लडिवाळ तक्रार आईकडे केली. स्वर मात्र माझ्या कानांपर्यंत पोहोचतील याची काळजी घेतली. मी दुर्लक्ष केले, कारण दोन्हीही तक्रारींचे निवारण करणे कच्चा रस्ता संपेपर्यंत तरी मला शक्य नव्हते.
जाणार्या प्रत्येक क्षणाबरोबर मुलाचा हट्ट वाढत होता. बायकोही अधून मधून त्याच्या सुरात सूर मिसळत होती, आणि कच्चा रस्ता संपता संपत नव्हता. मला पेट्रोल पुरते की नाही अशी शंका येऊ लागली होती. आता मलाही थकवा जाणवू लागला होता. त्यात भर म्हणून मुलाची पिरपिर सुरू झाली होती. आता मात्र हद्द झाली होती. तो सतत रडत होता. बायकोही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती.
“अरे अजून थोडाच वेळ.” – मी माझे मौन सोडले आणि त्याला समजावण्याच्या स्वरात सांगीतले.
खरे तर आता मलाही, हा रस्ता कधी संपतो असे झाले होते. पण माझ्या अंदाजाने आम्ही अजून तरी निम्माच रस्ता पार केला होता.
“गेली वीस एक मिनिटे आई पण तेच संगती आहे. तुम्ही ए.सी पण बंद करून ठेवला आहे.” – मुलगा रडत रडत म्हणाला.
ए.सी. बंद करून मी त्याच्याकडील एखादी जीवनावश्यक वस्तू काढून घेतल्या प्रमाणे तो तक्रार करत होता.
“अरे ते गरजेचे होते म्हणून बंद केला आहे ए.सी. आणि एखादा दिवस ए.सी शिवाय जगू शकत नाहीस की काय तू?” – मी विचारले.
“नाही मला नाही आवडत, मला ए.सी पाहिजे आणि खायला पण हवाय. खूप भूक लागले आहे आणि धुळीमुळे त्रास होतोय.”
जर आम्ही मुख्य रस्त्याने जात असतो तर त्याच्या दोन्ही तक्रारींचे निवारण मी सहज करू शकलो असतो. पण सध्यातरी पर्याय नव्हता आणि मुळातच ए.सी. नाही ही गोष्ट सहन होत नाही ही तक्रार मला पटत नव्हती.
“वा! काय नखरे ते युवराजांचे, म्हणे ए.सी. नाही तर मला चालणार नाही. काही नाही, आईचे लाड आहेत नुसते, अरे आम्ही कधी गाडी आतून बघितली पण नव्हती आमच्या लहानपणी. सर्व प्रवास बसने असायचा आणि तो देखील या पेक्षा कितीतरी वाईट रस्त्यावरून. पण कधी तक्रार केली नाही वडीलांकडे. तुम्हाला अक्कल तर नाहीच नाही पण तक्रार करायला बरे जमते.......”
पुढची पाच एक मिनिटे मी बरीच बडबड केली. माझा आवाज भलताच चढला होता. पण मुलाच्या चेहर्यावर ढिम्म नव्हते. त्यालाही एक कारण होते, आमच्याकडे जो-तो ओरडायला लागला की त्याला असेच काहीतरी ऐकवत असे. तो दर वेळी हे सगळे निमुटपणे ऐकून घेत असे.
“पण बाबा तुम्हाला झालेले त्रास आम्हालाही व्हायलाच हवेत का? मग आपण प्रगती करायचीच कशाला, आणि असा विचार जर आपल्या पूर्वजांनी केला असता तर आजही आपण अश्मयुगातच असतो, एखाद्या गुहेमध्ये.” तो उत्तरला, त्याचे हे उत्तर पूर्णपणे अनपेक्षित होते.
आता माझा संताप अनावर झाला होता. मी उठलो, मागे वळून बघितले, “सट्टाक!!!!” माझी पाच बोटे त्याच्या गालावर उमटली. त्यालाही कदाचित माझे उत्तर अनपेक्षित असेल. तो रडू लागला.
“काही नाही, अति लाडाचे परिणाम आहेत हे. उलटी उत्तरे द्यायला शिकलेत. आम्ही साधी नजरेला नजर भिडवत नसू वडीलांच्या. थोडे सुद्धा कष्ट नकोत यांना, आई-वडीलांनी कष्ट करायचे, यांना सोयी-सुविधा पुरवायच्या, थोडी गैरसोय झाली की मात्र यांनी तोंड वर करून आम्हालाच शिकवण्या द्यायच्या.” – माझा आवाज भयंकर चढला होता. डोळे वटारले गेले होते. जर तो तावडीत असता तर त्याने बेदम मार खाल्ला असता हे माझ्या आवेशावरून स्पष्ट दिसत होते.
ड्रायव्हर काही ऐकलेच नाही असे भासवून गाडी चालवत होता. बायको एक टक खिडकीतून बाहेर बघत होती. आई शांत बसली होती आणि मी मुलावर नजर रोखून होतो. “आणखी काही तक्रार आहे का?” माझी क्रोधयुक्त नजर त्याला विचारत होती.
आणखी काही बोललो तर काही खरे नाही, हे त्याला कळून चुकले होते, त्यामुळे घाबरून तो आणखी जोरात रडू लागला. आईने त्याला जवळ घेतले. त्याची थोडीफार समजूत घातली, त्याने निमुटपणे सर्व ऐकून घेतले. आईच्या मांडीत डोके ठेवून तो अजूनही रडतच होता. परिस्थिती बदलली नव्हती. सर्व जण शांत होते. अशाच भयाण शांततेत पुढची १०-१५ मिनिटे गेली आणि आम्ही मुख्य रस्त्याला लागलो.