Fulke - Bampi Rides - 3 books and stories free download online pdf in Marathi

बम्पी राइड - भाग ३

आता गाडी वेगाने पुढे जात होती. ड्रायव्हरने पहिला पेट्रोल पंप बघितला आणि टाकी भरून घेतली. जवळच्याच एका ठीकठाक हॉटेल मध्ये आम्ही जेवून घेतले. कोणीही कुणाशी बोलत नव्हते. माही परत गाडीत बसलो. आता ए.सी. सुरू केला होता, रेडीयोवर जुनी गाणी परत सुरू झाली होती. पंपावर ड्रायव्हरने गाडी साफ करून धुवून घ्यायला सांगितली होती. त्यामुळे हीच गाडी आताच कच्च्या रस्त्यावरून आली आहे त्याचा मागमूसही राहिला नव्हता. प्रवास सुखकर चालू होता. सगळे थोड्याच वेळात शांत झोपले.

उर्वरित रस्ता कसा संपला आम्हाला कळलेच नाही. ड्रायव्हरने गाडी पार्किंग मध्ये लावली. मी सामान उतरवण्यास सुरुवात केली. ते तिघं अजूनही झोपलेच होते. मी मुद्दामचं कोणाला उठवले नव्हते. इतक्यात मुलगा उठला, गाडीतून उतरला, पळत येऊन मला बिलगला आणि रडू लागला.

“सॅारी,” तो रडत रडत म्हणाला.

“मी आज खूप त्रास दिला, आणि तुम्हाला उलटे पण बोललो.” – त्याचे ते निरागस भाव पाहून मलाच आता अपराध्यासारखे वाटू लागले होते. मी फक्त त्याची पापी घेतली.

“नेव्हर माइंड” मी त्याला म्हणालो. “आता आवरून झोप, उगाच गेम खेळत बसू नकोस.” मी त्याला समजावले.

तो दुडू दुडू पळत त्याच्या खोलीत निघून गेला. त्याला पाठमोरा जाताना पाहून माझे डोळे पाणावले. मी लगेच भानावर आलो, पुढची बॅग घेण्यासाठी मी गाडीकडे वळलो. आई आणि बायको दोघीही मागेच उभ्या होत्या. झाला प्रकार दोघींनी बघितला होता. आई गालातल्या गालात हसत होती तर बायको चिडल्यासारखी वाटत होती. मी काय बोलावे मला सुचत नव्हते.

पुढील संवाद टाळण्यासाठी मी पटकन दोघींना वळसा घालून गाडीकडे गेलो आणि उरलेले सामान उतरवून घेतले. सर्व सामान उतरवून प्रत्येकाच्या खोलीत नेले होते. मी बाहेरच्या खोलीत येऊन बसलो. आई जणू काही इतका वेळ माझीच वाट बघत असावी. कारण मी बसायला आणि ती उठायला एकच वेळ झाली.

“तूही तुझ्या बापासारखाच, दुसर्‍याच्या क्षमतेचा आणि मनाचा कधीच विचार करणार नाही. आपल्याला जमते म्हणजे इतरांना जमले पाहिजे ही तुमची भाबडी समजूत.

काय मिळाले तुला त्या लहान पोराला रडवून?” – या प्रश्नावर आईला उत्तर अपेक्षित नव्हते, कारण माझे उत्तर तयार नव्हते आणि ते जरी तयार असते तरी ते ऐकण्यासाठी आई तिथे थांबलीच नाही. ती तडक तिच्या खोलीत निघून गेली. (मा‍झ्या मनाला बोचणी लावून)

आई आत गेली आणि बायको बाहेर आली. ती कदाचित नंबर लावूनच उभी असावी अशी शंका मा‍झ्या मनात येऊन गेली.

“काय मिळाले रे त्या चिमुकल्या वर हात उचलून?” तिने विचारले, आणि या दिव्यातून आता लवकर सुटका नाही याची मला जाणीव झाली.

“त्याचे वय काय? होत असेल न त्रास त्याला, थोडी आणखी समजूत घातली असती तर काही बिघडले असते का? किती निरागसपणे सॉरी म्हणाला तो.....” बायको आणखी काही बरेच मनात घेऊन आली होती. पण मी तिला मधेच थांबवले.

मुलाच्या निरागस सॉरीने तो आता हीरो ठरत होता आणि मी व्हिलन, याची प्रकर्षाने जाणीव मला होऊ लागली. अर्थात त्याच्या माफी मागण्यामुळे माझा राग जसा गळून पडला तसाच तो इतरांचाही पडला असणार यात शंका नव्हती.

“ त्याने दिलेला त्रास आठवतो का तुला? एक दिवस गैरसोय झाली तर असे वागणे बरोबर नव्हे. पुढे आयुष्यात त्याला अश्याच अडचणी येतील तेव्हा त्याने असेच वागणे चालणार आहे का तुला?” – मी माझी (दुबळी) बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

“हे सगळे जरी बरोबर असले तरी तू आज मर्यादा ओलांडलीस. तू नाही का एखादा दिवस भाजीत मीठ कमी जास्त झाले की घर डोक्यावर घेत. त्याच्यावर हात उचलण्यात काहीच अर्थ नव्हता, झाला प्रकार अधिक उत्तम रीतीने तू हाताळू शकला असतास आणि त्याला तुझा मुद्दाही पट‍वून देऊ शकला असतास. “ सुप्रीम कोर्टाने निकाल द्यावा त्या आवेशात बायकोने आपला मुद्दा मांडला, आणि खोलीत निघून गेली.

मा‍झ्या मनात विचारांचे काहूर उठले. हात उचलायला नको होता हे मलाही पटत होते. पण तरीही काहीतरी सुटतंय हातात येत नाहीये अशी जाणीव होत होती.

इतक्यांत दारावरची बेल वाजली, झाल्या प्रकारामुळे बाबा आज उशिरा येणार आहेत हे मा‍झ्या ध्यानात राहिले नव्हते, त्यांचाही प्रवास फारसा सुखकारक नव्हता, टॅक्सी पण वेळेत मिळाली नव्हती. हे सगळे त्यांनी मला हसत हसत सांगीतले.

मी त्यांना सहजच विचारले - “एवढा त्रास होऊनही तुम्ही तक्रार कशी करत नाही?”

“मी फ्रेश होऊन येतो.” – एवढे बोलून ते निघून गेले.

पुढची दहा एक मिनिटे मी मा‍झ्याच विचारात घालवली. बाबा आता समोर येऊन बसले.

“काही तरी बिनसलेले दिसतंय.” – बाबांनी मला विचारले.

“तुम्हाला कसे कळले?” – मी बाबांनाच प्रतिप्रश्न केला.

“गधड्या बाप आहे मी तुझा, मला कळले. आता तू सरळ सरळ सांगतोस की कान धरून विचारू?” – अशा गंभीर प्रसंगी वातावरण हलके करण्याचे कसब बाबांकडे ठासून भरले होते. मी झाला सर्व प्रकार सांगीतला.

“माझे काय चुकले? शिस्त नको का लागायला मुलांना? आमच्या वेळी आम्ही असे वागत नसू. यांच्या पिढीला सगळे आयते मिळाले आहे म्हणून सोकावलेत नुसते.” - मी माझा मुद्दा मांडला. आता बाबांच्या उत्तराची वात बघत होतो.

एक दोन क्षण शांततेत गेले. बाबा गंभीरपणे विचार करत होते.

“आधी मी तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतो.” – बाबा म्हणाले

“आजचा प्रवास त्रासदायक झाला, नंतर टॅक्सी वेळेत मिळाली नाही, घरी आल्यावर घरचे वातावरण तापलेले, अशा वेळी मी शांत कसा? माझी काही तक्रार नाही का? हा तुझा प्रश्न रास्त आहे.

मला खरच आज खूप त्रास झाला, तसे बघितले तर. पण खूप वर्षांपूर्वीच मी मा‍झ्या मुलाकडून एक गोष्ट शिकलो.

तू तो गावाला जातानाचा प्रसंग सांगीतलास. खरच तो दिवस फार बेकार होता. ऑफिसात उशीर झालेला, त्यात गाडी कच्च्या रस्त्यावरून चाललेली, मान पाठ एक झाली होती प्रवासाने. गाडीमधील सर्वांची थोड्याफार फरकाने तीच अवस्था होती. २०-२५ लोकांच्या गाडीमध्ये फक्त एक जगा वेगळा मुलगा होता. त्याला तो प्रवास खूप आनंददायक होता, जणू काही तो रोलर-कोस्टरची राईडच अनुभवत होता. ते दोन तास त्याने खूप आनंदात व्यतीत केले. त्याच्याकडे बघून गाडीतील इतर लोकांप्रमाणेच माझाही प्रवास सुसह्य झाला होता.

तुला मा‍झ्या डोळ्यातील कौतुक आठवते, पण त्या दिवसानंतरचा माझ्यातील बदल कदाचित तुझ्या वयामुळे तू समजू शकला नाहीस.

त्या दिवशी मी शिकलो की – आयुष्य नेहमीच सुरळीत रस्त्याने जाईल असे नाही, खाच-खळगे येतील, वळणे येतील, पण आपण ते कसे हाताळतो ते अधिक महत्वाचे आहे.

Son that day you taught me, at times life is bumpy ride & we cant avoid it. The best we can do is drive as smoothly as we can & enjoy the ride.

त्यामुळे मा‍झ्या आयुष्यातला आजचा दिवस वाईट होता हे कबूल, पण त्यामुळे दु:ख करणे मी कधीच सोडून दिले आहे.

मात्र I can notice one thing my son, I get a feeling that you are loosing your habit of enjoying the bumpy rides. तसे नसते तर तूही आजचा दिवस आनंदात घालवला असतास. “ -

बाबांनी परत एकदा कठीण प्रश्नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत दिली होती. आता मला हलके वाटू लागले होते. जे काहीतरी सापडत नव्हते ते मला बाबांनी समजावून दिले होते.

“पण मग मा‍झ्या दुसर्‍या प्रश्नाचे काय? या नवीन पिढीला सगळे सहजच मिळते आहे त्याचे काय?” – मी परत विचारले.

“गधड्या बाप ना रे तू त्याचा, असा विचारच कसा करू शकतोस? आम्ही तुमच्या पिढीपेक्षा कठीण दिवस काढले. अथक परिश्रम केले कारण तेच दिवस तुला भोगायला लागू नयेत म्हणून.

तू कर्तबगार होतास, तू आणखी पुढे गेलास. पण तुझ्या उड्डाणासाठी लागणारी धावपट्टी हा मागच्याच कितीतरी पिढ्यांच्या कष्टायचे फलित आहे.

तूही तुझ्या मुलाकरिता अशीच धावपट्टी बनव की त्याचे विमान अधिक उंच जाऊ शकेल. बरोबरी कसली करतोस त्याच्या बरोबर.

त्यामुळे तुम्हाला झालेले कष्ट त्यांना भोगायला लागत नाहीत हे जरी खरे असले, तरी पण त्याच्या काळानुसार येणार्‍या अडचणींवर मात करण्याची धमक त्याच्याकडे असावी आणि त्याला तुझे खात्रीलायक पाठबळ असावे असे बघ.

देवाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे, प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. तू कच्चा रस्ता सहज हाताळतोस, कुठल्या संकटांमुळे विचलित होत नाहीस हा गुण मी त्या दिवशी हेरला होता. मी फक्त तुला मार्गदर्शन केले, तुझा रस्ता तूच बनवलास, याचप्रमाणे तुझ्याकडून काही गोष्टी मी देखील शिकलो. तुलाही आता तेच करायचे आहे.” बाबांनी सांगीतले

हे सगळे ऐकून मला मा‍झ्या खांद्यावरील जबाबदारीची जाणीव झाली, आणि त्याच वेळी बाबांविषयीचा आदरही वाढला. खरेच त्यांनी माझ्यावर हात उचलल्याचे आठवत नाही, पण दर वेळी योग्य रस्ता निवडण्यात खूप सूचक मार्गदर्शन केले होते आणि आताही तेच करत होते.

“Good night my son, and dont forget to enjoy the life even if it is bumpy ride at times.” – मी काही म्हणायच्या आत बाबा तेथून निघून गेले.

मी मात्र अजूनही मुलाचाच विचार करत होतो. कधी झोप लागली काही कळले नाही. माझी रात्र सोफ्यावरच व्यतीत झाली. सकाळी किचन मधील आवाज ऐकून जाग आली.

आई आणि बायको दोघीही आत काम करत होत्या. कालच्या प्रसंगाचे दडपण आजही दोघींच्या देह बोलीवरून जाणवत होते.

सर्वजण नाष्ट्यासाठी जमले होते. आई आणि बायको कालच्या प्रसंगातून अजून बाहेर आल्या नव्हत्या, माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होत्या. चिरंजीव अजून आले नव्हते. त्याच्याशी काय बोलावे, त्याला कसे समजवावे मला कळत नव्हते. निर्णय होत नव्हता.

“गुड मॉर्निंग, पापा” मुलाने बाहेर येऊन आवाज दिला. मग पळत येऊन मला बिलगला परत एकदा सॉरी म्हणाला आणि टेबलावर बसून नाष्टा करू लागला.

मी पण नाष्टा सुरू केला. त्याने त्याच्या शाळेविषयी माहिती सांगितली, यावर्षीच्या गॅदरिंगचे काय प्लॅन आहेत ते सांगीतले, माझ्याकडे क्रिकेटच्या मॅचला घेऊन जाण्याचे प्रॉमिसही मागीतले.

त्याच्या त्या बोलण्याने वातावरण शांत झाले होते. आई आणि बायको आनंदाने त्याला भरवत होत्या. मी मात्र त्याच्याकडे कौतुकाने बघत होतो. तो कालच्या धक्क्यातून फारच लवकर सावरला होता,

I could Sense his ability to get up and go on after failure, he was not afraid of failures. He even learnt quickly from his failures.

मलाही त्याच्यातील एक गुण समजला होता. आणि मी आता त्याच्या शिस्तीविषयी फारसा चिंतित नव्हतो.

मी माझा नाष्टा उरकला आणि आनंदाने नवीन ‘Bumpy Ride’ अनुभवण्यास तयार झालो.

Life is bumpy ride at times, all we can do is drive as smoothly as we can & enjoy the ride.

--Swapnil Tikhe

इतर रसदार पर्याय