paijan books and stories free download online pdf in Marathi

पैंजण..

पैंजण..

ढग दाटून आले होते . हवेने गव्हाची पाती चांगलीच डुलत होती. ज्वारी, गहू, ऊसाच्या पात्यांचा सळसळणारा आवाज. तो उनाड वारा कधी मातीच्या ढेकळांना तर कधी पटातील पाण्याला स्पर्श करून पळत होता. सार शेत कस हिरवगार दिसत होत. नंदू सोयाबीन च्या बणीम वर, दोन्ही हातांची उशी बनवून, त्यावर डोक ठेवून, एक पाय गुडघ्यात वाकवून त्यावर दूसरा पाय ठेवून.. मस्त दाटलेल्या ढगांकडे बघत झोपला होता. मधूनच इकडे तिकडे करणारा पाखरांचा थवा बघून नंदू च्या चेहर्‍यावर हलकस समाधान दिसे तेवढ्यात त्याच्या कानावर घंटी आणि चंगाळ्याचा आवाज पडला. आवाज ऐकताच नंदू खुश झाला. नंदू त्याच आवाजाच्या दिशेने पाहत राहिला.

दूरवर बांधावरून चालत येणारी ‘रमा’ त्याला दिसली. तिचा एक हात गायीच्या पाठीवर तर दूसरा बैलाच्या शिंगावर होता. दोन्हीच्या मधोमध ती चालत होती. कॉलेज चा नीळा- पांढरा पंजाबी, ओढणीला पिन अप केलेलं लांब दोन वेण्या, भुवयांच्या मधोमध छोटीशी काळी टिकली लावलेली रमा फार सुंदर दिसत होती. गायीच्या गळ्यातील घंटीचा टण.. टण.. असा आवाज येत होता. बैलाच्या गळ्यातील चंगाळ्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. गाय बांधावरील गवत खरडून खात होती. खाताना नाकाने धुतकारायची त्यामुळे गवतावर बागडणारी वेगवेगळी नखाएवढि बारीक फुलपाखर दूर उडायची आणि पुन्हा जागेवर बसायची.नंदुने रमा ला पाहून खाली उडी मारली. चालत चालत तो तिच्या समोर येवून थांबला. रमा त्याला बघून लाजली. नंदूने चारी बाजूला एक नजर फिरवली. खिशातून एक पत्र आणि पैंजण काढले. आणि रमाचा हात हातात घेवून त्यावर पत्र आणि पैंजण ठेवले. रमाने एकदम आनंदी आश्चर्याने पैंजणाकडे बघितले आणि नंदु तिच्या मोहक चेहऱ्याकडे बघण्यात गुंतला. जनावरे इकडे तिकडे जायला लागतात. बैल कॅरि बॅग खायला लागतो. तरी ह्या दोघांच लक्षच नसत. तेवढ्यात गीता रमा ची बहिण शेतात येते. ती दुरुनच बैल बघते. गीता रागाने ओरडते ,' ये रमे... अग बैल कागद खातोय अन तू काय करतीस ? '

गीता चा आवाज ऐकून रमा आणि नंदू भानावर येतात. रमा लगेच ते पत्र आणि पैंजण मातीत लपवते आणि खूण म्हणून त्यावर २-३ दगड ठेवते. नंदू बैल पकडतो आणि त्याला मुंगस बांधतो.

गीता, रमा आणि नंदुजवळ येते. गीता गाई चा कासरा धरत बोलते , तुला आई ने बोलावलय... जा !

नंदू ने बैल कोठयात बांधला. आणि निघून गेला. बिचारी रमा त्या दगडांकडे बघत होती. इच्छा नसतानाही तिला घरी जाव लागत. ती जाते. रमा दारातच थांबते. लगेच पाऊस सुरू होतो. रमाचं सार लक्ष त्या पत्र आणि पैंजणाकडेच असत. ती सारखे पाय पुढे घेते परत मागे घेते. सारखं चकचुक करते. व्याकुळं होवून जाते. शेवटी काहीतरी विचार करून ती हसते. तांब्या पाण्याने भरून घेते आणि दाराकडे बघते. आणि आईला सांगते , 'आई.. मी परसाकडे जावून येते.

आई चे उत्तर ऐकण्यापूर्वीच रमा ताड ताड निघून जाते.

रमा शेतात त्याच ठिकाणी जावून उभी राहते. सर्वत्र घोट्याएवढे पाणी जमा झाले होते. तिच्या डोळ्यातून अश्रु ओघळू लागले होते. ती वेड्यासारखी त्या चिखलात हात घालून पञ शोधू लागली. ती गुडघ्यावर टेकून बसली. हाताला काहीच लागत नव्हतं. तरीही ती शोधत होती. तेवढ्यात तिच्या हातात एक कागद आला. तिने तो कागद वर काढून पहिला. तो पूर्णतः फाटला होता. चिखलाणे माखला होता. त्यावरील सर्व अक्षर पुसली गेली होती. ते पाहून ती निमूटपणे अश्रु गाळत होती. तेवढ्यात त्या कागदावर कोणीतरी पैंजण टेकवले. रमाने आश्चर्याने वर पहिले. नंदू पत्र आणि पैंजण घेवून उभा होता. त्याच्याही डोळ्यात अश्रु होते.

ती पैंजण हातात घेते आणि आश्चर्याने नंदुला विचारते ,' हे तुझ्याकडे कस काय ? '

त्यावर नंदू लाडाने बोलतो आधीच आभाळं आल होत. पाऊस पडणार हे माहीत होत. म्हणून तू आणि गीता गेल्यावर मी ते काढून घेतलं होत. नंदू ने तिचे अश्रु पुसले.

आणि म्हणाला , 'रडू नको.. मला आवडत नाही तू रडलेल. '

या वाक्यावर ती त्याच्याकडे बघून हसते. एक क्षण दोघही एकमेकांकडे प्रेमाने बघतात.

दोघही हातात हात घालून चालायला लागतात. दोघांच्या हातातून पैंजण खाली लोंबतात. दोघही चिंब भिजत असतात. त्या पैंजणावरून पावसाचे थेंब ओघळतात. ते थेंब चिखलच्या पाण्यात टपटप पडतात आणि विरून जातात .नंदू बांधावरील केळीच एक मोठ पान तोडून घेतो आणि दोघांच्या डोक्यावर धरतो. ती त्याच्याकडे बघून हसते. तो पण हसतो.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED