पश्चात्ताप
आकाशात ढग दाटुन आले होते. प्रकाश अंधारात विलीन होत होता. भयाण शांतता आणि एक प्रकारची रुकरूक लागली होती . अधुन मधुन भेडसावणारा वारा जोरात वाहत होता . आंबराई अंधारात गुडूप झाली होती. अधुन मधुन एखादं कुञ विव्हळत होत. दुर पाणंदीतून वाट काढत रवी एकटाच निघाला होता . शर्ट चे पहिले आणि शेवटचे बटण तुटलेले होते . त्यामुळे गोंगावणार्या वार्या मुळे त्याचा शर्ट एखाद्या फुग्याप्रमाणे फुगला होता . गरजेपेक्षा जास्त वाढलेले केस वार्यावर डुलत होते . ढगाआड लपलेला चंद्र मध्येच बाहेर डोकावत होता . अचानक कुठेतरी विज चमकत होती . एकदाचा रवि आंबराईत पोहोचला . एका आंब्याच्या बुडाला पाठ टेकवून तो बसला. तेवढयात त्याला पैंजणांचा आवाज आला. पण त्याच्या चेहऱ्यावर कसलच कुतुहल नव्हतं . रेखा आली.सर्वत्र नजर फिरवली हळूहळू घाबरल्या सारखे रडल्यासारखे करु लागली . कोणीतरी जबरदस्ती करत आहे असा अविरभाव करु लागली . हळुहळु तिचा आवाज वाढु लागला . तिच्या किंकाळ्या आंबराईत घुमू लागल्या . त्यामुळे रातपाखरं फडफडु लागली . तिच्या हात पाय आपटल्याने , निपचित निजलेली माती अस्ताव्यस्त होवू लागली . स्वतः चे कपडे ती स्वतः फाडू लागली . रवि माञ एखाद्या दगडाप्रमाणे शांत बसुन होता . त्याची नजर शुन्यात हरवली होती . पण तिच्या किंकाळ्या त्याच्या हृदयावर खोलवर तिक्ष्ण वार करत होत्या . तिच्या आवाजातील आक्रोश, विरोध , याचना , वेदना त्याच्या काळजाच पाणी पाणी करत होत्या . तो तसाच बसुन होता. आता तिच्या किंकाळ्या थांबल्या होत्या . ती थकली होती . सुकली होती . आता ती कण्हत होती . असाह्य पणे पडुन होती .
रवि उठला आणि तिच्या जवळ गेला . ती घाबरली . रविने मायेने तिच्या कपाळावर हात फिरवला . ती शांत झाली. त्याने तिला कपडे घातले . व तो तिला उचलुन आल्या वाटे परत निघाला . दार उघडून त्याने तिला घरात झोपवले. पांघरूण घातले . आणि दरवाजा पुढे करुन तो घराबाहेर चौकटीला लागुन असलेल्या पायऱ्यांवर बसला . राञ आणि रविच्या डोक्यातील विचारांचे काहुर संपता संपत नव्हते . काही दिवसांपुर्वी त्याच आंबराईत , त्याच दिवशी , त्याच ठिकाणी , त्याच वेळी गावातील एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. त्या मुलीने न्याय मागितला पण मिळाला नाही. शेवटी तिने जिव दिला.
रेखा अतिशय संवेदनशील आणि हळवी मुलगी. प्रत्येक गोष्ट मनाला लावुन घेण्याची सवय. तिची एकमेव जिवलग मैत्रीण राधा . तिच्या सोबत ही घटना घडली , तिला न्याय मिळाला नाही आणि तिने जिव दिला. हि गोष्ट रेखाला कळताच तिला धक्का बसला . मानसिक धक्का . आणि परिणामी ती स्वतः ला राधा समजु लागली . ठराविक त्या दिवशी घटनास्थळी जावुन तो अत्याचार स्वतः सोबत घडला आहे असे वागु लागली . आणि न्याय मिळविण्यासाठी धडपडु लागली. डाँक्टरांना दाखवले असता डाँक्टरांनी सांंगितले की तिला मल्टी पर्सनँलिटी डिसआँर्डर झाला आहे . त्या मुलीला न्याय मिळाल्याची खाञी जोपर्यत हिला होत नाही. तोपर्यंत काहीच होवु शकत नाही. डाँक्टरांचे हे शब्द रविच्या कानात घुमत होते. रेखाला वाचवण्यासाठी एकच उपाय होता. त्या नराधमांना पकडणे. रवि व्याकुळ झाला होता. त्याने हळुच दरवाजा उघडुन बहिणीचा आक्रसलेला,बालिश चेहरा पाहिला. कुठलाच गुन्हा नसताना भोगत असलेली ही नरक यातना पाहुन रविचे डोळे डबडबले आणि कोणितरी चप्पल थोबाडित मारावी तशी , त्याची मान खाली गेली. व स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी त्याचे पाय आपसुकच पोलिस - स्टेशनच्या दिशेने वळले.
- साधना वालचंद कस्पटे