पत्र Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

पत्र

पत्र..

सकाळी सकाळी आई चुलीवर भाकरी करत होती . गरम भाकरीवर तूप आणि मीठ लावून खायला मला आवडत , म्हणून आई शेजारी बसून मी खात होते . तेवढ्यात एक आजी आमच्याकडे आल्या . ७०- ७५ वर्षाच्या आहेत . बऱ्याच थकलेल्या आहेत . काबाड कष्ट करून पाठीवर कुबड निघालं आहे . सुरुवातीपासूनच त्यांची परिस्थिती जेमतेम . दोन मुलं. घरी शेती नव्हती . दुसऱ्याच्या शेतात रोजान जाऊन घर भागवायचे . मुलांना शिकवण्याची दोघा नवरा बायकोला फार हौस होती . मुलांना शिकवण्यासाठी पैसे कमी पडू लागला म्हणून दोघांनी इतरांच्या शेतातील , रस्त्यावरील शेण गोळा करायचे , त्याच्या गौर्या लावून , त्यांचा खत बनवून ते विकत असत . त्यातून मिळणार पैसे त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी वापरला . त्यांना लहानाचा मोठा केला . आज त्यांची दोन्ही मुले सरकारी ऑफिसर आहेत . पण ; दोघेही पुण्याला असतात . त्यांनी तिकडेच प्रेमविवाह केला . आई वडिलांनी नाराजी न दाखवता भरभरून आशीर्वाद च दिले . अशा या आजी जवळ येऊन बसल्या .

' लय दिवसांनी येन केलं आजी .. बसा !' माझी आई हसत म्हणाली . आजी बसल्या . आजीच्या हातात एक कोर पत्र होत. ते पत्र पुढं करून , चष्मा थोडासा वरखाली करून त्या माझ्याशी बोलल्या , ' माय एवढं पत्र लिहून फायजे व्हतं ...पोराला पाठवायचं पुण्याला .. दिती का लिव्हून ?' ' हो आजी देते ना .. ' म्हणत मी पत्र घेतलं आणि घरातून पेन आणला . आणि आजी ला विचारलं , ' सांगा आजी काय लिहायचं ?' त्यावर थोडस घुटमळत , चाचरत त्या बोलल्या , " बाळा तू कसा हाईस.. समदे पैसे संपल्यात .." एवढ्या दोन ओळी बोलून आजी शांत बसल्या . ' आजी पुढं काय लिहायचं ? ' मी विचारलं . त्यावर आजी हसून म्हणाल्या , एवढंच लिहायचं . ' मग एवढं मोठं पत्र कशाला आणलं आजी .. ते छोटं आणायचं ना .. ' त्यावर आजी चे उत्तर ऐकून मी सुन्न झाले. ' माय माझा ल्योक लै मोठा हाफिसर हाय ... त्येच हाफिस लय मोठं हाय .. तिथं त्याच्या हाताखाली ५-५० मानस कामाला हैत . तिथं म्या छोटं पत्र पाठवलं तर काय वाटलं ? अन ते बी उघड असतंय..ते कुणी बी वाचल.. अन माझ्या ल्योक्या बद्दल काही बी इचार करील . म्हणून हे मोठं आणलं , हे बंद असतंय .. कुणी वाचत न्हाय .' हे ऐकून विचारातच पडले . जिने जन्म देऊन मोठा केला , तिची काळजी मुलाला नाही पण ल्योक्याची इज्जत जाऊ नये म्हणून हातात पैसे नसताना महागडं पत्र आणणारी माय .. तिला त्याची काळजी आहे .

मी आजीला म्हंटल , ' आजी हक्कानं पैसे पाठव असा आदेश द्या मुलाला , तुमचा हक्क आणि त्यांचं कर्तव्य आहे ते . ' त्यावर आजी म्हणाल्या , ' नकु माय .. कधी कुणासमोर हात पसरला नाही . पोरग पोटाचं असल म्हणून काय झालं ? पैसं संपल्यात एवढं लिव्ह .. त्याच्याकडे असले तर दिइल पाठवून नाहीतर न्हाय ! ' ' अन हो हाफिस च्या पत्त्यावर पाठव बार माय .. घरी त्याची बायकू त्याला दिवू देत न्हाय ..!' ऐकून मनात कालवाकालव सुरु झाली . ' आज्जी तुमचे पोर तुम्हाला भेटायलायेतात का ? ' मी विचारलं . त्यावर आजी खिन्नपणे म्हणाल्या ' न्हाई माय .. पर एकदा आमचं म्हातारं गेलं होत नातवाला बघायला ... तर आमच्या ल्योकाला लाज वाटली बापाची , हाफिस च्या लोकाला सांगितलं शेतातला गाडी हाय म्हणून . म्हातारं पहिल्यांदा ढसाढसा रडलं . २ दिवस आन खाल्लं नाही त्यानं !.' आजीने पदर डोळयाला लावला . विचारांनी माझ्या डोक्याचा भुगा झाला होता . तेवढ्यात माझी आई बोलली , ' गपा आजी .. रडू नका .. चला गरम गरम भाजी भाकरी खा . ' आजी नको नको करत होती पण आईने पण ताट वाढलंच. आज्जीने अर्धीच भाकरी खाल्ली आणि अर्धी म्हाताऱ्या नवऱ्यासाठी पदरात बांधून घेतली . ' सारखं सारखं दुसऱ्याच खायचं बी मला बरं वाटत नाही व्ह..! ' आजी डोळे पुसत बोलली . ' पत्र पाठिव बरं माय .. ' म्हणत आजी काठी टेकत टेकत निघून गेली .

आज्जीकडे बघून माझं विचारांचं वादळ उफाळून येत होत . आई वडील मुलांना जन्म देतात , त्यांचं बोबडं बोलणं , हागणं - मुतणं , रडणं हसणं सर्व गोंजारतात . त्यांचं बालपण एखाद्या गोड अनुभवासारखं जगतात . पाहिलं पाउल टाकण्यासाठी आधार देतात . बाळ अचानक रात्री उठून रडत , तेव्हा आई वडील त्याच्यासाठी रात्र रात्र उभी जागून काढतात . त्याच्या छोट्या मोठ्या चुका पदरात घालतात . ते शिक्षित होऊन स्वावलंबी होईपर्यंत सांभाळतात . मग आई - वडिलांचं म्हातारपण मुलं सुद्धा एक अनुभव म्हणून का जगत नाहीत ? त्यांच्या थरथरत्या हातापायांना आधार का देत नाहीत ? लहान मुलांच्या बोबड्या बोलांचं कौतुक जस केलं जात तसच म्हातारपणामुळे होणाऱ्या आई वडिलांच्या वायफळ बडबडीचं कौतुक का केलं जात नाही ? त्यांच्याकडून वयामुळे होणाऱ्या लहान सहान चुका का सांभाळून घेतल्या जात नाहीत ? त्यांच्या आजारपणात का कुणी रात्र रात्र जागत नाही ? विचारांचं वादळ वाढतच गेलं . आजी निघून गेल्या होत्या . त्यांच्या २ ओळी सोबत मी बरंच काही त्या पात्रात लिहिलं आणि पत्र बंद केलं .

- साधना वालचंद कसपटे .