स्वराज्यसूर्य शिवराय - 3 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यसूर्य शिवराय - 3

॥॥ स्वराज्यसूर्य शिवराय ॥॥

भाग तीन

माता जिजाऊ

निजामशाह असो, आदिलशाही असो की, मुघलांची राजवट असो यांची सर्वांची शक्ती म्हणजे मराठे सरदार आणि मराठी शिपाई. त्याकाळी निजामशाह यांचेकडे एक वजनदार, भारदस्त, महापराक्रमी असे एक सरदार होते ते म्हणजे शिंदखेडचे सरदार लखुजी जाधवराव! या जाधवरावांना एक अतिशय गुणी, सुंदर, हुशार, चपळ, नाजूक, प्रसन्न मुलगी होती तिचे नाव जिजाऊ! अतिशय खेळकर परंतु तितकीच विचारी अशी जिजाऊ सर्वांची आवडती, लाडकी होती. ती स्वभावाने करारी होती. मालोजी भोसले असतानाची गोष्ट. लखुजी जाधव यांच्याकडे दरवर्षी होळीच्या निमित्ताने एक छान कार्यक्रम आयोजित होत असे. सर्व सरदार, महत्त्वाची व्यक्ती यांना आमंत्रण जात असे. आमंत्रित व्यक्तीही मोठ्या उत्साहाने, आनंदाने जाधवांच्या घरी उपस्थिती लावत असत. त्यावर्षीही सालाबादप्रमाणे जाधवांनी रंगपंचमीच्या सणानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वत्र आमंत्रणे गेली होती. वेरूळचे मालोजीराजे भोसले यांनाही निमंत्रण गेले होते. त्यानुसार मालोजीराजे सभारंभाला उपस्थित झाले. त्यांच्यासोबत लहानगे शहाजी हेही आले होते. सारे एकत्र बोलत बसले होते. सर्वत्र आनंदाचे, उत्सवाचे आणि उत्साही वातावरण होते. मालोजीराजे यांनी एक गोष्ट हेरली. त्या कार्यक्रमात त्यांचे लक्ष एका तीन वर्षाच्या चुणचुणीत मुलीकडे गेले. चौकशी केली असता त्यांना समजले की, ती गोड मुलगी लखुजी जाधवांची कन्या आहे. मालोजीराजे यांच्या शेजारी बसलेला धष्टपुष्ट, दिसायला सुंदर असा शहाजीही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होता. गप्पांच्या ओघात लखुजीराव अचानक तीन वर्षे वय असलेल्या जिजाऊकडे बघून गमतीने म्हणाले,

"काय म्हणता जिजाऊ, हे शहाजीराजे मला जावाई म्हणून पसंत आहेत. तुम्हाला पती म्हणून कसे वाटतात? " जाधवांचे हे शब्द सर्वांना ऐकू गेले. सर्वांनाच तो प्रस्ताव आवडला. अनेकांनी त्याला आनंदाने संमती दर्शवली. कुणी उघडपणे म्हणाले,

"व्वा! जाधवराव, अगदी योग्य निवड आहे. जोडा एकदम छान आहे."

दुसरीकडे मालोजीराजांनाही अतिशय आनंद झाला. ते आनंदी स्वरात म्हणाले,

"जाधवराव, माझ्या मनातले बोललात. आपण आता व्याही झालो आहोत."

अशाच आनंदी वातावरणात, गप्पांच्या ओघात तो कार्यक्रम संपला. इतरांप्रमाणे मालोजीराजे यांनीही लखुजींचा निरोप घेतला. वेगळ्याच उत्साहाने ते वेरूळ मुक्कामी परतले. तिकडे सिंदखेड येथे वेगळेच काही घडले. आपल्या पतीने वेरूळच्या भोसले घराण्याशी नातेसंबंध जोडण्याचा घेतलेला निर्णय जाधवांच्या पत्नीला आवडला नाही. ती उघडपणे पतीला म्हणाली,

" तुम्ही हा निर्णय घेतलाच कसा? आपली आणि भोसले घराण्याची बरोबरी आहे का? अशा कोणत्या धनदौलतीची, भोसल्यांच्या संपत्तीची भुरळ तुम्हाला पडली? सोयरीक नेहमी आपल्याला साजेल अशा घराण्याशी करावी. तुमचा हा निर्णय मला मुळीच आवडला नाही."

त्यावर लखुजी म्हणाले,"अहो, नाराज होऊ नका. मी कोणताही शब्द दिला नाही. समोर शहाजी आणि जिजाऊ बसले होते त्यांना पाहून मी सहज म्हणालो. तुमची इच्छा नसेल तर मी नकार कळवतो." असे म्हणून जाधवरावांनी मालोजीराजेंना निरोप पाठवला,

"मालोजीराव, मी सोयरीकीबाबत सहज बोललो होतो. परंतु इकडे कोणालाही हे नातेसंबंध मान्य नाहीत. तेंव्हा हे लग्नसंबंध होणार नाहीत."

जाधवांचा निरोप ऐकून मालोजीराजे प्रचंड नाराज झाले. जाधवांच्या मानाने आपल्याकडे तेवढी संपत्ती नाही म्हणूनच त्यांनी नकार कळवला हे मालोजींनी ओळखले. मालोजीराजे ज्यावेळी खूप उदास होत तेंव्हा ते शेतात एकटेच विचार करत बसायचे. त्यादिवशीही जाधवांकडून आलेल्या नकारामुळे उद्विग्न अवस्थेत शेतात जाऊन बसले होते. त्यांच्या मनात असंख्य विचार थैमान घालत असताना त्यांना वाटले, 'हा माझा फार मोठा अपमान आहे. सर्वांसमोर जाधवरावांनी तो निर्णय सांगितला होता आता हे लग्न होणार नाही हे मी कुण्या तोंडाने सांगू? काय म्हणतील लोक? जाधवांची कन्या माझ्या घरी सून म्हणून येता दुसऱ्याच्या घरी गेली तर मग माझी छी थू होईल त्याचे काय? हा अपमान सहन करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे...' विचार करता करता खूप वेळ निघून गेला. आणि एक आश्चर्य घडले. प्रत्यक्ष देवीमातेने त्यांना दर्शन दिले म्हणाली,

'अरे, असा नाराज होऊ नकोस. भलतासलता विचार मनात आणू नकोस. तुझी भक्ती अगाध आहे. मी प्रसन्न आहे. तुझ्या वंशात प्रत्यक्ष श्री शंकर भोलेनाथ अवतार घेणार आहे. महापराक्रमी, दीनदयाळ जनतेचा उद्धार करणारा म्हणून नाव मिळवणार आहे. धर्मरक्षक म्हणून काम करणार आहे.'देवीचे ते बोल ऐकून राजे अतिशय आनंदी झाले. तिकडे रात्रीचे बारा वाजले तरीही मालोजीराजे घरी परतले नाही म्हणून चिंतेचे वातावरण पसरले. उमाबाईंनी विठोजीच्या कानावर ही गोष्ट घातली. विठोजी तत्परतेने भावाला शोधत शेतात आले. तिथे मालोजीला सुखरूप पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. विठोजीला पाहताच मालोजीराजेंनी आनंदाने तो दृष्टान्त सांगितला. दोघेही आनंदाने घरी परतले....…

मालोजीराजे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हळूहळू दिवस जात होते. शहाजीराजे ह्यांच्याकडे निजामशाहीने दिलेली जहागीर होती. उमाबाईंना शहाजींचे लग्न करावे असे वाटत होते. त्यांनी तशी चर्चा विठोजीरावांजवळ केली. त्यांनाही अत्यंत आनंद झाला. त्यांनी शहाजींच्या जिजाऊ सोबतच्या लग्नाचा प्रस्ताव लखुजीराव जाधवरावांकडे पाठवला. त्यांनी तो प्रस्ताव पत्नीसमोर मांडला. यावेळी मात्र जाधवांच्या पत्नीने अत्यंत आनंदाने जिजाऊ-शहाजी यांच्या लग्नाला संमती दिली. शहाजीसारखा पराक्रमी, सर्वगुणसंपन्न सरदार आपला जावाई होतोय हा आनंद त्या लपवू शकत नव्हत्या. विठोजी भोसले यांना जाधवांनी होकार कळवला. भोसल्यांच्या घरी जिजाऊसारखी कुलवान, सुसंस्कृत, स्वस्वरुप, सुकोमल कन्या सून म्हणून आपल्या घराचे माप ओलांडून येणार म्हणून अत्याधिक आनंद, समाधान, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उमाबाईंचा आनंद तर गगनात मावत नव्हता कारण त्यांच्या पतीची इच्छा त्यांच्या पश्चात का होईना पूर्ण होत होती हा आनंद जास्त सुखावणारा होता.

दोन्ही घरी म्हणण्यापेक्षा दोन्ही जहागिरीत या लग्नाची अधिक उत्सुकता होती. दोन्ही घराणे सर्वच बाबतीत तुल्यबळ होती. लगोलग लग्नाची तयारी सुरू झाली. ब्राह्मणास बोलावून लग्नाचा योग्य मुहूर्त काढण्यात आला. आणि मग सुरु झाली लगीनघाई. लांबच्या लांब हिरवेगार मांडव पडले. दरवाजे, खिडक्या पानाफुलांच्या तोरणांनी लक्षवेधक झाल्या. नवरदेव, नवरी दोघांनाही सजविण्यात आले. दृष्ट लागू नये म्हणून दोघांचीही दररोज दृष्ट काढली जाऊ लागली. दोघांनाही काळी तीट लावून वाईट नजर पडू नये, बाधू नये म्हणून काळजी घेतली जात होती. लग्नाचा दिवस उजाडला. धावपळीने कळस गाठला. लग्नाची वेळ होत आलेली असताना अत्यंत आनंदाने, समाधानाने, उत्साहात नवरदेव-नवरी दोघांनीही बोहल्यावर आणण्यात आले. अक्षता वाटण्यात आल्या. मंगलाष्टके झाली. आंतरपाट दूर झाला. शहाजी-जिजाऊ हे दोघे एकमेकांना हार घालत असताना टाळ्यांचा कडकडाट झाला. तोफा-बंदुका यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमून गेला. लग्नाचे धार्मिक विधी एका मागोमाग पार पडत असताना शेवटी वऱ्हाड निघण्याची वेळ आली. नववधू कावरीबावरी झाली. प्रत्येकाचा भरल्या डोळ्यांनी निरोप घेऊ लागली. आईसमोर येताच दोघींच्याही मनाची कालवाकालव झाली. थोपून धरलेल्या आसवांनी बांध फुटल्याप्रमाणे निर्बंधपणे धावायला सुरुवात केली. शेवटी तो क्षण आला. जिजाऊ सजवलेल्या पालखीत बसली जणू एखादी लक्ष्मी ! ...…

शहाजीराजे आणि नववधू जिजाऊ ह्यांना घेऊन सारे वेरूळला आले. वेरूळ ! जिजाऊंचे सासर, हक्काचे घर! तिथली लगबग, धावपळ, घाई काय वर्णावी. लक्ष्मीच्या रुपाने, सजलेल्या जिजाऊने माप ओलांडून भोसले घराण्यात प्रवेश करताना जणू ग्वाही दिली, विश्वास दिला की, 'मी आजपासून या घरची सून झाली आहे. हे घर माझ्यासाठी केवळ घर नाही. माझे सर्वस्व आहे. हे घर माझ्यासाठी एक पवित्र मंदिर आहे. या घराचे पावित्र्य मी जीवापाड जपेन. या घरच्या साऱ्या परंपरा, रीतीरिवाज, नियम, धार्मिकता आणि माझी सारी कर्तव्ये डोळ्यात प्राण आणून जपेन. मोठ्यांचा आदरसत्कार करण्यात मागे हटणार नाही. भोसले घराण्याची जनतेपोटी जी कर्तव्ये आहेत त्या आड मी येणार नाही...' अशाच काहीसा विचार करत जिजाऊने माप ओलांडून घरात प्रवेश केला. त्यावेळी उपस्थित सर्वांना खूप खूप आनंद झाला असला तरीही एक बोचणी सर्वांनाच लागली असणार ती म्हणजे तो अत्युच्च आनंदाचा क्षण पाहायला, मुलाला-सुनेला आशीर्वाद द्यायला मालोजीराजे नव्हते परंतु उमाबाईंना दिलासा देणारी, उभारी देणारी एक गोष्ट मात्र नक्कीच जुळून आली होती ती म्हणजे मालोजीराजेंची जिजाऊ सून म्हणून भोसल्यांच्या घरी यावी ही इच्छा त्यांच्या पश्चात का होईना पूर्ण झाली होती. त्यामुळे सुनेच्या आगमनाला इच्छापूर्तीच्या समाधानाचे तेजस्वी वलय लाभले होते. सुस्वरुपी, सुंदर, लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या सुनेला पाहून उमाबाईंनी अत्यानंदाने जिजाऊला कवेत घेतले. दोघींचेही डोळे पाणावले असतील.…

जिजाऊ विचारी होत्या. सर्वांशी छान वागत होत्या. परंतु त्यांना एक कोडे पडले होते. मराठी सरदार आणि शूर सैनिकांचे. त्याचबरोबरीने शत्रूच्या सैनिकांचेही. का ही मंडळी असे वागत असतील? कुण्या परक्या, तिसऱ्या माणसाच्या फायद्यासाठी आपल्याच सोयऱ्याधायऱ्याच्या जीवावर उठत असतील? आपल्याच नात्यातील, भाऊबंदकीतील महिलांचे कुंकू पुसत असतील. लहानपणापासून जिजाऊ सातत्याने लढाया, कधी मुघलांच्या तर कधी आदिलशाही, निजामशाहीच्या क्रुरततेचे, जुलुमांचे, दहशतीचे वर्णन ऐकत होत्या, कधी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवत होत्या. परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडत नव्हती, मिळत नव्हती, कुणी देत नव्हते.

जिजाऊचे लग्न झाले. जाधव, भोसले घराणे अधिक जवळ आले. परंतु नियतीला ते पाहवले नाही. एका साध्या कारणामुळे मेहुणे-मेहुणे, जावाई-सासरे यांच्यामध्ये वितुष्ट आले. दोन्ही घराणे एकमेकांच्या जीवावर उठली. एकमेकांना रक्ताने आंघोळ घालताना परस्परांचे जीवही घेते झाले. काय घडले असे? का दोन घराणी एकमेकांचे कट्टर शत्रू झाले?.…

त्याचे असे झाले, त्यादिवशी नेहमीप्रमाणे निजामशाही दरबार भरला होता. निजामशाहने काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली. उपस्थितांना सूचना केल्या, आदेश दिले. दरबार संपला. सारे सरदार आपापल्या जहागिरीच्या दिशेने प्रस्थान करण्यासाठी दरबाराबाहेर आले. त्यांना घेण्यासाठी त्यांची माणसे उपस्थित होती. कुणी घोडे घेऊन तयार होते, कुणी घोडागाडी घेऊन तयार होते, कुणासाठी पालख्या तयार होत्या तर कुणाची वाट हत्ती पहात होते. ज्याच्या त्याच्या रुतब्याप्रमाणे, पदाप्रमाणे वाहनरूपी प्राणी तयार होते. सारे एकदाच जमल्यामुळे भरपूर गर्दी झाली. वाहनांची आणि प्राण्यांचीही. सेवक आपल्याला धन्याला लवकरात लवकर घेऊन जाण्यासाठी उतावीळ झाले. ज्याला स्वतःचे वाहन सापडत होते तो लगोलग वाहनावर बसून मार्गस्थ होत होता. लखुजीराव जाधवही त्यांच्या खास वाहनात बसून सिंदखेडकडे रवाना झाले.. गर्दी-गोंधळाला मागे टाकून. तितक्यात काय झाले ते कुणालाही समजले नाही. अचानक फार मोठा गोंधळ माजला. आरडाओरडा सुरू झाला. लोक पळत सुटले. खंडागळे या सरदाराचा हत्ती अचानक बेभान झाला, बिथरला. हत्तीच तो, मुका प्राणी बिचारा. मानवाची विनातक्रार सेवा करणारा. जिथे साधी गोष्ट बिनसली तर मानवासारखा विचारी प्राणी बिथरतो तिथे मुक्या जनावराचे काय? खंडागळ्यांच्या चवताळलेल्या, रागावलेल्या अवाढव्य हत्तीने रणकंदन माजवले. स्वतःची अजस्त्र सोंड भयानक वेगाने तो फिरवू लागला. त्या सोंडेचा फटका ज्याला बसे तो दूर जाऊन आपटताना विव्हळू लागला. जीवाच्या आकांताने ओरडू लागला. हत्ती रागाने सैराट होऊन धावत असताना जो दिसेल त्याला पायाखाली तुडवू लागला. काही क्षणात सैनिकांनी स्वतःचे भाले, तलवारी काढून हत्तीवर हल्ला सुरू केला. हत्तीवर बसलेला माहूत त्याला आवरण्याचा खूप प्रयत्न करीत होता. हत्तीच्या गंडस्थळावर तो माहूत घाव घालीत होता. परंतु हत्ती कशालाही जुमानत नव्हता. रक्ताचा सडा पडत होता. माणसे मरत होती. काय करावे हे कुणाला समजत नव्हते, लक्षात येत नव्हते. त्या धुमश्चक्रीत लखुजीराव जाधवांचा मुलगा आणि शहाजीराजेंचा मेहुणा दत्ताजी जाधवाने आपल्या घोडेस्वारांना आदेश दिला की, जा. पळा. भाले मारा, तलवार चालवा काहीही करून हत्तीला आवरा. घोडेस्वारांच्या बरोबरीने दत्ताजी स्वतः हत्तीवर चालून गेले. पण हत्ती कुणालाही जुमानत नव्हता. जो समोर येईल त्याला एकतर सोंडेने उचलून आपटत होता किंवा मग पायाखाली चिरडत होता. दत्ताजी जाधवांचे अनेक सैनिक धारातीर्थी पडले. बाकीचे सैन्य हत्तीचा रौद्रावतार पाहून घाबरले आणि माघारी पळत सुटले. हा पराभव, एका हत्तीने आपल्या सैन्याचा पराभव करावा ही गोष्ट दत्ताजींच्या जिव्हारी लागली, भयंकर अपमानास्पद वाटली. त्याने निर्णय घेतला. काही झाले तरी या पिसाळलेल्या हत्तीला जिवंत ठेवायचे नाही. असे मनोमन ठरवून दत्ताजी जाधव हत्तीच्या दिशेने तळपती तलवार घेऊन निघाले. ही गोष्ट विठोजी भोसल्यांच्या मुलाने म्हणजेच शहाजींच्या चुलतभावाने संभाजीने हेरली.तो जोराने ओरडला,"अहो, दत्ताजी राजे, थांबा जरा. हत्तीला मारू नका." परंतु दत्ताजी चवताळले होते, खवळले होते. ते हत्तीवर चालून गेले. तिकडे हत्तीही सैनिकांच्या वाराने जागोजागी जखमी झाला होता. त्याच्या महाकाय शरीरावर जखम झालेली पाव इंच एवढी जागा दिसत नव्हती. सारे शरीर लालभडक, लालेलाल झाले होते. दत्ताजी हत्तीवर वार करताहेत हे पाहून हत्तीला त्यांच्यापासून वाचवण्यासाठी म्हणून संभाजीराजे, त्यांचा भाऊ खेळोजीराजे आणि स्वतः खंडागळे धावून गेले. दत्ताजी एकामागोमाग एक असे घाव हत्तीवर घालत होता. त्यांच्या एका वाराने हत्तीची सोंड धडापासून वेगळी झाली. हत्तीच्या वैभवावर तो वार पडला. तुटलेल्या सोंडेतून जणू रक्ताचा धबधबा वाहू लागला. हत्ती चिरकू लागला. त्याला त्या वेदना सहन होत नव्हत्या. दत्ताजीच्या डोक्यात वेगळीच नशा शिरली होती. त्याची तलवार दांडपट्टा फिरावा तशी फिरताना समोर येईल त्यांना सपासप कापू लागली. त्या बेभान अवस्थेत त्याच्यासमोर संभाजी आला. युद्धाची एक वेगळीच कैफ असते, न्यारीच धुंदी असते. त्या धुंदीत समोर आलेला संभाजी आपल्या जवळचा सोयरा आहे, आपल्या बहिणीचा दीर आहे हेही तो विसरला. दत्ताजी आणि संभाजी समोरासमोर आले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध माजले. दोघेही एकमेकांवर जोर लावून तलवारीचे वार करू लागले. समोरच्या योद्ध्याचे वार स्वतःच्या ढालीने अडवू लागले. ते आवाज इतरांना भयभीत करु लागले. आपापल्या नायकाच्या मदतीला त्यांचे सैन्य धावून आले. काही क्षणांपूर्वी हत्ती चवताळण्याआधी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून मजेत हिंडणारे वीर परिस्थितीने वेगळे वळण घेताच एकमेकांचे गळे कापायला निघाले. खुद्द शहाजीराजे आपल्या भावाच्या मदतीला म्हणजेच स्वतःच्या मेहुण्यावर धावून गेले. समोरचा वीर आपल्या बायकोचा सख्खा भाऊ आहे हेही ते विसरले.तुंबळ युद्ध सुरू झाले. त्या खडाजंगीमध्ये, एकमेकांचा जीव घेण्याच्या निर्धराने लढतांना संभाजीच्या तलवारीने दत्ताजीच्या शरीराचा वेध घेतला. घाव एवढ्या ताकदीचा होता की, दत्ताजी खाली कोसळले. झाले. ती बातमी वाऱ्याप्रमाणे, वणव्याप्रमाणे सर्वत्र पोहचली. लखुजीराव जाधव आपल्या जहागिरीच्या दिशेने दौडत असताना पाठीमागून जणू वादळ आले. त्यांचा लाडका, धाडसी, शूर, बलवान मुलगा मारला गेला ही बातमी समजली. मारणारा दुसरा कुणी नसून आपल्या जावयाचा भाऊ असून जावयाच्या साक्षीने आपल्या मुलाला मारण्यात आले ही बातमी जाधवांची तलवार संतापाने म्यानाबाहेर येण्यासाठी पुरेशी ठरली. डोळ्यात रक्त उतरले, संतापाने शरीर थरथरले, संतापाचे गोळे जणू तोंडावाटे बाहेर पडू लागले. त्यांनी सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. ज्या वेगाने ते दौडत होते त्याची तुलना कशाशीही करता येत नव्हती. तो आवेग दुःखाचा होता? बदला घेण्यासाठीचा होता? की अजून कशासाठी होता सांगणे कठीण होते परंतु एका तुफानी वेगाने लखुजीराव जाधव परतले तेच मुळी एका भयंकर अवतारात. तिथे दाखल होताच एका वेगळ्याच आवेगाने, त्वेषाने, जोमाने तलवार फिरवत सुटले. समोर येईल त्याचा शिरच्छेद करीत असताना लखुजींच्या नजरेस पडले ते शहाजीराजे! जावाई! मुलीचे सौभाग्य नि सर्वस्व परंतु जाधवांच्या दृष्टीने सारे गौण होते. अनाठायी होते. त्यांना दिसत होता केवळ आणि केवळ शत्रू. पोटच्या पोराच्या नरडीचा घोट घेणारा दुश्मन परंतु ते त्यावेळी हेही कसे विसरले होते की, जिजाऊ हीसुद्धा आपल्या पोटचा गोळा आहे. तिचे कुंकू आपण कसे काय पुसू शकतो. जिजाऊचा जन्मदाता आणि तिचा जन्मोजन्मीचा साथीदार एकमेकांच्या जीवावर उठले होते. दोघांपैकी विजय कुणाचाही झाला असता तरी वर्मी लागणारा पराभव मात्र जिजाऊंच्या नशिबी येणार होता. जिजाऊंना ना विजयोत्सव करता येणार होता, ना दुःखी होता येणार होते. परंतु बदला घेण्यासाठी पेटून उठणारांना नाती आठवत नाहीत, आपले परके असे काही ओळखू येत नाही. तशा परिस्थितीत लखुजीराव शहाजीराजेंवर वार करते झाले. डोळ्याला डोळा भिडला. दोन्ही डोळ्यांमध्ये जणू अग्नी थैमान घालत होता. समशेरी शरीराचा वेध घेतांना ढालींवर प्रहार करू लागल्या. डोळ्याचे पाते लवविण्याइतपत सवड नव्हती, मिळत नव्हती. तुफान वेगाने येणाऱ्या तलवारीच्या एका जोरदार घावाने शहाजी राजे मैदानावर कोसळले. ते पाहून जाधवरावांनी आपला मोर्चा संभाजीराजांकडे वळवला. पुन्हा घनघोर लढाई माजली. तलवारी,ढाली आणि मुखातून निघणारे विषारी फुत्कार इतरांच्या काळजाचे ठोके चुकवू लागले. तशात सर्व शक्तीनिशी जाधवरावांनी घातलेला एक घाव नेमका संभाजीच्या वर्मी लागला आणि संभाजी राजे तात्काळ गतप्राण झाले. आपल्या मुलाच्या वधाचा बदला लखुजीराव जाधवांनी ताबडतोब घेतला. वेदनेने तडफडणाऱ्या शहाजींनी स्वतःचा भाऊ आणि मेहुणा दोघेही एकाचवेळी गमावले होते. दैव बलवत्तर म्हणून स्वतः शहाजीराजे बेशुध्द झाल्यामुळे वाचले होते. दुसरीकडे निजाम दोन बलशाली सरदारांची लढाई बघत होता. रणकंदन थांबत नाही हे पाहून मात्र त्याने मध्यस्थी करून ते आपसातील युद्ध थांबवले परंतु तोवर कधीच भरून निघणारे, जिजाऊला आपल्याच माणसांपासून तोडणारे महाभयंकर नुकसान झाले होते. निमित्त झाले एक हत्ती पिसाळण्याचे मात्र त्यामुळे पिसाळलेल्या माणसांनी जणू स्वतःचेच गळे कापले होते..…

नागेश सू. शेवाळकर