अलवणी - ७ Aniket Samudra द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अलवणी - ७

त्या घटनेनंतर नेत्रा स्वतःहुनच गावाबाहेर निघुन गेली. गावाबाहेरच्या जंगलात एका झाडाखाली ती बसुन असायची. ती कधी कुणाशी बोलली नाही आणि कोणी तिच्याशी बोलायला गेले नाही. चार-पाच दिवसांनंतर गावातल्याच एका विहीरीत तिचा मृतदेह सापडला. नेत्राने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली होती.

नेत्राच्या मृत्युची बातमी समजताच त्र्यंबकलालचा धीर सुटला. तो अचानक वेड्यासारखाच वागु लागला. त्याने स्वतःच्या चुकीची कबुली आणि नेत्रावर केलेल्या खोट्या आरोपांची माहीती पंतांना सांगीतली. परंतु आता बोलुन काय फायदा होता? वेळ केंव्हाच निघुन गेली होती.

नेत्राच्या आईने नेत्राच्या देहाचा ताबा घेण्यास नकार दिला. आपल्या ह्या कुलक्षणी मुलीचे तिच्या मृत्युनंतरही तोंड बघायची त्यांची इच्छा नव्हती. शेवटी पंतांनी नेत्राच्या देहाला स्व-खर्चाने अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. तशी रीतसर परवानगी पंचायतीकडुन घेऊन त्याची एक लेखी प्रत त्यांनी गावातील पोलीस पाटलाकडे सुपुर्त केली होती.

जुजबी वैद्यकीय तपासणी आणि नेत्राचा खून नसुन आत्महत्याच आहे ह्याची खात्री पटल्यावर पोलीस पाटलांकडुन पंतांना नेत्राचा देह सुपुर्त केला जाणार होता. पंतांनी ब्राम्हणांना बोलवुन दशक्रियाविधीची तयारी करुन घेतली. दर्भाच्या जुड्या, हळद/कुंकु/गुलाल, सुगंधी उदबत्या, यज्ञासाठी लागणारे सामान हे सर्व तर होतेच, पण दोन दिवस मंत्र-पठण करवुन पंतांनी तांदळाचे, काळे तिळ घातलेले पिंड सुध्दा करवुन घेतले होते. पण आदल्या रात्रीच गुढरीत्या नेत्राचा देह पोलीस पंचायतीतुन नाहीसा झाला. पोलीसांनी सर्वत्र शोध घेतला परंतु हाती काहीच लागले नाही.


त्या रात्रीनंतर अजुन एक विचीत्र गोष्ट घडली. त्र्यंबकलालने स्वतःला ह्या बंगल्याच्या तळघरातील एका खोलीत कोंडुन घेतले. त्याने सर्वांशीच बोलणं तोडून टाकले. पहील्या-पहील्यांदा इतरांनी ह्या घटनेकडे दुर्लक्ष केले, परंतु दोन आठवडे उलटुन गेले आणि त्र्यंबकलालच्या खोलीतुन कुबट, कुजलेला वास यायला सुरुवात झाली तशी घरातल्या लोकांची चुळबुळ सुरु झाली.

घरातल्या लोकांना आधी वाटले की त्र्यंबकलालनेच स्वतःच्या जिवाचे काही बरे वाईट करुन घेतले की काय? परंतु जेंव्हा लोकं दरवाजा तोडायला आली तेंव्हा आतुन त्र्यंबकलालने ओरडुन त्यांना तसं न करण्याबद्दल ऐकवले. तसेच दार उघडले गेले तर तो खरंच स्वतःचं काही करुन घेईल अशी धमकी वजा सुचना सुध्दा त्याने केली. अनेकांनी त्याला समजावुन सांगायचा प्रयत्न केला, पंतांनी आवाज चढवुन पाहीले परंतु त्र्यंबकलालवर काडीचाही फरक पडला नाही.

त्र्यंबकलालसाठी खोलीच्या बाहेर ठेवलेले जेवणं, खाणं दिवसेंदिवस बाहेरच पडून राही. मधूनच कधी तरी दोन-चार दिवसांनी ताटातले अन्न संपलेले दिसे.

साधारण महीनाभरानंतर, एकदा तळघरातुन कुणाचातरी घसटत घसटत चालण्या/फिरण्याचा आवाज ऐकु येऊ लागला. तळघरात कोणी मांजर बिंजर अडकली की काय म्हणुन एक महीला तळघरात गेली आणि थोड्याच वेळात तीची एक जोरदार किंकाळी ऐकु आली.

घरातले सर्वजण धावत तळघरात पोहोचले. ती बाई अत्यंत भयभीत झाली होती. भितीने तिच्या सर्वांगाला काप सुटला होता, तिच्या तोंडातुन बारीक बारीक फेस येत होता. भेदरलेल्या नजरेने ती समोर बघत होती.

अंधुकश्या प्रकाशात घरातल्या लोकांना एक आकृती बसलेली दिसली. जवळुन पाहील्यावर सर्वांना धक्काच बसला. त्र्यंबकलाल खोलीच्या बाहेर येऊन बसला होता. त्याचा चेहरा पुर्णपणे बदलेला होता. चेहर्‍यावरचे तेज नाहीसे झाले होते. गालफडं खप्पड झाली होती, केस पांढरे फटक झाले होते, डोळे सुजुन खोबणीतुन बाहेर आल्यासारखे वाटत होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. त्याला धरुनही उभं रहावत नव्हते, जणू काही पायातला जोरच निघुन गेला होता. तो हळु हळु खुरडत खुरडत कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत होता.

त्या स्त्रीची नजर मात्र त्र्यंबकलालवर नाही तर दुरवर अंधारात कुठेतरी दुसरीकडेच लागली होती. सर्वांनी तिला आणि त्र्यंबकलालला उचलुन तळघराच्या बाहेर आणले.

बाहेर येताना ती स्त्री स्वतःशीच पुटपुटत होती.. ’अलवणी ….’… अलवणी ….


त्र्यंबकलाल अंथरूणाला खिळुन होता. वैद्य झाले, आयुर्वेदीक औषधं झाली, मंत्र/तंत्र झाले पण त्याच्या प्रकृतीवर यत्कींचीतही फरक पडला नाही.

बर्‍याच वेळ तो झोपुनच असायचा आणि जेंव्हा जागा असायचा तेंव्हा तळघराच्या दाराकडे पहात रहायचा. काही आठवड्यांनंतर त्याचे तळघराकडे बघणे बंद झाले आणि मग तो भिंतीकडे, छताकडे तासंतास पहात रहायचा. त्याचे डोळे अज्जीबात हालायचेपण नाहीत.

हा प्रकार साधारणपणे एक महीनाभर चालला आणि त्यानंतर त्र्यंबकलालची ज्योत मालवली. शेवटच्या दिवसांत तो फक्त “नेत्रा.. मला माफ कर.. नेत्रा मला माफ करं.. असंच म्हणत बसायचा.

त्र्यंबकलाल गेला आणि घरातली शांतताच जणू भंग पावली. लोकांना चित्र-विचीत्र भास होऊ लागले. कधी कुणाला रात्री घसटत चालण्याचा आवाज येई, तर कधी कुणाला तळघराच्या दाराशी नेत्रा दिसे. तसा नेत्राने कधी कुणाला त्रास दिला नाही, पण तिच्या नजरेला नजर देण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. स्वयंपाकघरात जावं, दिवा लावावा आणि समोर कोपर्‍यात डोळ्यांतुन निखारे घेऊन बसलेली नेत्रा दिसावी. कपाटाचं दार बंद करुन शेजारी बघावं तर संतापलेली नेत्रा नजरेस पडे. पहिल्यांदा हा केवळ मनाचा खेळ असेल असं समजुन दुर्लक्ष व्हायचे, परंतु जेंव्हा घरातले नोकरदार घरं सोडुन जाऊ लागले, बायका स्वयंपाकघरात, माजघरात एकट्या दुकट्याने जायला घाबरु लागल्या तेंव्हा मात्र पंतांनी बंगला सोडुन दिला आणि दुसर्‍या ठिकाणी आश्रय घेतला.

पंतांनंतर ह्या बंगल्यात कोणीच फिरकलं नाही. हळु हळु गावकर्‍यांनीसुध्दा त्यांचा जाण्या-येण्याचा रस्ता बदलला आणि तेंव्हापासुन अनेक वर्ष हा बंगला असाच, एकाकी उभा आहे…….


बोलुन झाल्यावर रामुकाकांनी सर्वांकडे आळीपाळीने पाहीले. सर्वजण आपल्याच विचांरात गुंतले होते.

रामुकाकांनी शेजारचा पाण्याचा तांब्या उचलला आणि दोन-चार घोटं पाणी तहानलेल्या घश्यात ओतले.

“आता बोला, कुणाला काही प्रश्न, शंका?”, रामुकाकांनी थोड्यावेळानंतर विचारले.

“मला आहेत…”, आकाश म्हणाला.. “सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात आली नाही ती म्हणजे, फक्त आणि फक्त त्र्यंबकलालच्या चुकीच्या आरोपामुळे नेत्रा अडकत गेली. तेंव्हाच जर त्याने नेत्राची बाजु घेतली असती, तिला आधार दिला असता तर कदाचीत पुढची वेळ आली नसती.

मग असं असताना नेत्राने तिच्या मृत्यु पश्चात त्र्यंबकलालचा सुड का नाही उगवला?”

“हो ना, आणि तिने घरातल्या कुणालाही कसं काहीच केलं नाही?”, जयंता आकाशच्या प्रश्नात आपला प्रश्न मिळवत म्हणाला.

“हम्म.. तो एक छोटासा, पण महत्वाचा भाग सांगायचा राहीला. विष्णूपंतांचा त्या गावात फार मोठा दरारा होता, सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती होती. नेत्रा सुध्दा त्याला अपवाद कसा असेल? पंतांनी तिचा सांभाळ केला होता, तिला ओसरी दिली होती हा एक प्रकारचा तिच्यावर केलेला उपकारच होता.

नेत्राच्या मृत्युनंतर जेंव्हा खुद्द तिच्या आईने नेत्राचा देह स्विकारण्यास, त्याला तिलांजली देण्यास नकार दिला तेंव्हा पंतांनी स्वतःहुन ती जबाबदारी स्विकारली होती. नेत्राच्या आईची सर्व व्यवस्थाही त्यांनी चोख प्रकारे लाऊन दिली होती. कदाचीत त्यामुळेच की काय.. नेत्राने पंतांच्या कुटुंबापैकी कुणाला हात लावला नाही.

त्र्यंबकलालचं म्हणाल, तर तो एक मोठा गुढ प्रश्न आहे. नेत्राच्या मृत्युनंतर तो खालच्या खोलीत काय करत होता हे कुणालाच ठाऊक नाही. त्र्यंबकलालला तळघरातुन वरती आणल्यानंतर कोणी खाली गेलेचं नव्हते त्यामुळे त्या खोलीत नक्की काय होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. तेंव्हा सर्वात प्रथम आपण त्याचा शोध लावणं गरजेचं आहे, कदाचीत त्यानंतरच ह्या प्रश्नाची उकल होऊ शकेल.

ह्या बंगल्याच्या बाजुला आलेल्या काही हौशी तरुणांनी त्याकाळी आपला जिव गमावल्याचेही लोकं बोलतात. पण काहींच्या मते त्यांच्यावर कोणा हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला होता, तर काहींची मतं थोडी वेगळी आहेत.”


“बरं रामुकाका, पण आता ह्यातुन बाहेर कसं पडायचं?”, शाल्मलीने विचारले.

“आपल्याला सर्वप्रथम नेत्रा किंवा वैज्ञानीक भाषेत बोलायचे झाले तर तिचा आत्मा अजुनही का भटकतो आहे ह्याचा छडा लावणं गरजेचं आहे. जर केवळं बदला, संताप म्हणुन ती इथं येणार्‍या प्रत्येकाचा जिव घेणार असेल तर… परीस्थीती थोडी कठीणच आहे…”, रामुकाका म्हणाले.

“पण म्हणजे नक्की काय करायचं?”, शाल्मलीने पुन्हा विचारले…

“… म्हणजे आपण तळघरात जायचं.. जेथे त्र्यंबकलाल इतके दिवस स्वतःला खोलीत बंद करुन बसला होता, तो तेथे नक्की काय करत होता ह्याचा शोध घ्यायचा, आपण तेथे जायचे, जेथे सर्वप्रथम त्या कामवाल्या बाईला तळघरात नेत्रा दिसली होती… हो.. आपण तेथे जायचे……”, रामुकाका कापर्‍या आवाजात म्हणत होते………………..

बराच वेळ शांततेत गेला. सर्वजण सुन्न होऊन बसुन होते.

“रामुकाका, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे, रहस्याची थोडीफार उलगड तळघरात होइल हे बरोबरच आहे…”, आकाश म्हणाला..”आणि खाली जायला भिती वाटते अश्यातला ही भाग नाही, कारण जिवाला धोका हा संपुर्ण बंगल्यातच आहे.. पण तरीही खाली अजुन काय असेल, काय पहायला मिळेल सांगता येत नाही. काही अनपेक्षीत घडलंच तर स्वतःचा जिव कसा वाचवायचा??”

“रामुकाका..”, जयंता म्हणाला..”त्या दिवशी.. म्हणजे तुम्ही बंगल्यातुन निघुन जायच्या आदल्या रात्री तुम्ही म्हणालात तुमच्या खोलीमध्ये कोणीतरी आलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने तुम्हाला काहीच केलं नाही. का? तुमच्याकडे काहीतरी असं होतं ज्याला बघुन ’ते’ तुम्हाला काहीही नं करता निघुन गेलं???”

“ते ’ते’ म्हणजे.. त्र्यंबकलाल होता तो..”, रामुकाका म्हणाले…”आपण हा जो इतिहास ऐकला, त्यावरुन शेवटच्या काही दिवसांत त्र्यंबकलालच्या पायातला जिव निघुन गेला होता, चालणं सोडाच, त्याला धड उभं ही रहाता येत नव्हत…”

“बरं, पण असं काय होतं तुमच्याकडे ज्याला बघुन त्र्यंबकलाल तुम्हाला काहीही नं करता निघुन गेला??”, आकाशने विचारले

आपल्या बंडीतुन रुद्राक्षाची माळ बाहेर काढत रामुकाका म्हणाले..”कदाचीत ह्याला…”

“म्हणजे रुद्राक्षाला ’ते’ घाबरतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”, आकाशने विचारले…

“कदाचीत…”, असं म्हणुन रामुकाकांनी मागील भिंतीकडे बोट दाखवलं…

सर्वांनी वळुन रामुकाका जिकडे बोट दाखवत होते तिकडे पाहीलं. भिंतीवर एक पुरुष उंचीचे तैलचित्र लावलेले होते.

रामुकाका पुढे म्हणाले…”हे चित्र पाहीलंत? विष्णूपंतांच चित्र आहे ते.. निट बघा ते चित्र..”

सर्वजण निरखुन ते चित्र बघु लागले..

“त्यांच्या गळ्यामध्ये बघा.. विष्णूपंतांच्या गळ्यामध्ये एक रुद्राक्षाची माळं आहे, आणि अगदी तश्शीच माळं माझ्या गळ्यामध्ये पण आहे.. त्र्यंबकलालला पहील्यापासुन विष्णूपंतांबद्दल भितीयुक्त आदर होता.. कदाचीत तो आजही कायम आहे. ह्या माळेने कदाचीत त्यामुळेच मला वाचवलं असेल…”, रामुकाका बोलत होते.

“पण काका, आपण सरळ इथुन निघुन गेलो तर? इथे थांबायलाच नको ना! काय करायचं आहे आपल्याला त्या तळघरात काय आहे? काय करायचं आहे आपल्याला नेत्राचं काय झालं?, त्रिंबकलालने काय केले? सरळ बॅगा भरु आणि निघुयात इथुन”, हायपर होतं शाल्मली म्हणाली

“हे बघ बेटा, आपण इथं का आलो? हे आपल्याच नशीबी का आलं? कदाचीत आपल्या हातुन काही घडणं नियतीने लिहुन ठेवले असेल. इतक्या वर्षात दुसरं कसं कोणी इथं नाही आलं? दुसर्‍या कुणाला हा अनुभव का नाही आला? आणि समजा, इथुन आपण निघुन गेलो तर ह्यापासुन आपली कायमची सुटका होईलच कश्यावरुन? परीस्थीतीला पाठ दाखवुन पळण्यापेक्षा परीस्थीतीला आपण सामोरं जावं.

अर्थात, मी सुध्दा परीस्थीतीला घाबरुन इथुन पळालोच होतो, पण मी परत आलो. का? कदाचीत माझ्या हातुन काही चांगलं कार्य घडणार असावं नाही का???”, रामुकाका

सर्वांपेक्षा वयस्कर असुनही रामुकाकांनी दाखवलेल्या धैर्याचे सर्वांना कौतुक वाटलं.

“पण आमचं बाकीच्यांच काय काका? माळ फक्त तुमच्याकडेच आहे! आणि नेत्राचं काय? कश्यावरुन ती सुध्दा ह्या माळेला घाबरेल?”, शाल्मलीने विचारले.

“हम्म.. ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र माझ्याकडे नाही. पण बोट बुडत असेल आणि समोर दिसणारा किनारा दिसत असेल तर पाण्यात उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. मग मध्येच बुडलो तर? शार्क माशाने खाल्लं तर ह्या गोष्टींचा विचार करत बसलो तर प्रयत्न न करताच मृत्यु अटळं…”, रामुकाका सर्वांकडे आळीपाळीने बघत म्हणाले.

[क्रमशः]