अलवणी - ८ Aniket Samudra द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अलवणी - ८

हवेतील वाढलेल्या गारठ्याने अस्ताकडे जाणार्‍या सुर्याची सर्वांना जाणीव झाली.

काय करायचं? कसं करायचं? ह्यावर सर्वांची, मतं, शंका ह्यावर चर्चा चालल्या होत्या. जयंता आणि आकाशने त्यांना इंटरनेटवर सापडलेल्या आपल्या मिठाच्या शोधाची कल्पना दिली होती आणि ’करुन पहायला काय हरकत आहे?’ म्हणुन सर्वांनी ती कल्पना उचलुन धरली होती. परंतु वातावरणात वाढत चाललेल्या अंधाराने सर्वजण सावध झाले.

“काका.. अंधार वाढत चालला आहे. रात्र वैर्‍याची असते काहीतरी पावलं उचलायलाच हवीत”, जयंता म्हणाला.

“मला वाटतं तुम्ही सर्व इथेच थांबा, मी एकटा तळघरात जाऊन पाहुन येतो, कदाचीत काहीतरी मार्ग सापडेल..”, रामुकाका म्हणाले.

“पण रामुकाका????….”, सर्वजणं एकसुरात ओरडले..

“तुम्ही माझी काळजी करु नका. तो कर्ता करवीता भगवंत माझ्या पाठीशी आहे, जर त्याने एकदा मला वाचवलं असेल, तर तो मला पुन्हा नक्की वाचवेल..” आपल्या मतावर ठाम रहात रामुकाका म्हणाले.

सकाळी येताना रामुकाकांनी आणलेलं मांजर एव्हाना चुळबुळ करु लागलं होतं. इतक्यावेळ मुक्तपणे हुंदडणारं ते मांजर रामुकाकांना बिलगुन बसलं होतं.

“हे कुठुन मिळालं तुम्हाला?”, मांजराकडे बोटं दाखवत शाल्मलीने विचारले.

“गावातुन आणलं ह्याला.. रस्त्यावर फिरत होतं..”, मांजराच्या डोक्यावरुन हात फिरवत रामुकाका म्हणाले..”हे आपलं दिशादर्शक यंत्र आहे…”

“दिशादर्शक यंत्र?? म्हणजे? कळालं नाही!”,शाल्मलीने प्रश्नार्थक नजरेने विचारले.

“सांगतो. पाळीव प्राण्यांची इंद्रीय मानवापेक्षा कित्तेक पटीने सक्षम असतात. ज्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत त्या त्यांना जाणवतात.”,रामुकाका

“पण.. म्हणजे आपण ह्याचं करायचं काय?”, आकाशने विचारले.

“तुम्हाला तळघराचा दरवाजा माहीती आहे कुठुन आहे?”, रामुकाकांनी विचारले.

सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या.

“चला शोधु आपणं”, असं म्हणुन रामुकाका उठले, त्यांनी मांजराला खांद्यावर घेतले आणि ते व्हरांड्यातुन पुढे निघाले. त्यांच्यामागोमाग बाकीचे लोकं जाऊ लागले.

रामुकाका सर्वप्रथम वरच्या खोलीत गेले त्यानंतर ते खालच्या दिवाणखान्यात, मग त्या लसणांच्या माळा लावलेल्या खोलीत गेले. मांजर मात्र शांतपणे रामुकाकांच्या कुरवाळण्याचा आनंद घेत होते.

“एव्हाना तुम्ही ओळखलं असेलच ही खोली त्रिंबकलालची होती. जेंव्हा त्याला तळघरातुन वर आणले आणि त्याची तब्येत, त्याचे विचीत्र वागणं पाहुन त्याला भूतबाधा तर झाली नसावी ह्या विचारांनी त्याच्या खोलीत ह्या लसणाच्या माळा बांधुन ठेवल्या होत्या. असं म्हणतात की काही आठवडे त्याची तब्येत सुधारली सुध्दा होती.”, रामुकाका म्हणाले.

सर्वांना डोळ्यासमोर त्या अंथरुणावर खिळलेला त्र्यंबकलाल दिसु लागला, तर जयंत आणि आकाशच्या मनात आदल्या रात्रीच्या त्या भयानक आठवणी जागा झाल्या.

रामुकाका मांजराला घेउन बाहेर व्हरांड्यात आले आणि मग ते माजघरातुन स्वयंपाकघराकडे जाऊ लागले तसं तसे ते मांजर अस्वस्थ होऊ लागले. रामुकाकांनी एकवार सर्वांकडे पाहीले.

शाल्मलीच्या अंगावर एक सरसरुन काटा आला. तिची नजर भिंतींच्या कोपर्‍यात काही दिसते आहे का ह्याचा शोध घेत होती.

रामुकाकांच्या हातात मांजर बसणं अशक्य झालं तसं रामुकाकांनी मांजर खाली सोडुन दिले. ते मांजर धावत धावत स्वयंपाकघराच्या कोपर्‍यात गेले आणि तेथे मोठमोठ्यांदा गुरगुरु लागले.

सर्वजणं धावतच त्या मांजराच्या मागे गेले आणि तेथे त्यांना एक भले मोठ्ठे दार दिसले. एका मोठ्ठ्या कुलुपाने आणि मोठ्ठ्या फळीने ते दार बंद केले होते.

रामुकाकांनी एकवार सर्वांकडे पाहीले आणि मग ते म्हणाले, “संपूर्ण बंगल्याला कोठेही इतके मोठ्ठे दार किंवा इतक मोठठं कुलुप लावलेलं नाही, मग इथंच का? असं काय मौल्यवान वस्तु त्या तळघरात असणार आहे की जी सुरक्षीत रहावी म्हणुन इतका बंदोबस्त केला गेला असावा?”

“काका, मला वाटतं मौल्यवान वस्तु तळघरात नाही तर तळघराच्या बाहेर होती.. ही माणसं, आणि त्यांचे जिव. तळघरातल्या कोणापासुनतरी जिव वाचावा म्हणुन तळघर इतकी कडी-कुलुपं लावुन बंद केलेली असावीत..”, जयंता म्हणाला.

“चला, उघडुयात हे दार….”, असं म्हणुन रामुकाका दाराची फळी सरकवायला पुढे सरसावले.

पाठोपाठ जयंत आणि आकाशसुध्दा रामुकाकांच्या मदतीला धावले.

शाल्मली भिंतीला टेकुन घाबरुन उभी होती. शेजारीच मोहीतही आईचा हात धरुन काय चालले आहे हे समजावुन घेण्याचा प्रयत्न करत होता.

इतकी वर्ष झाली तरी दाराला लावलेली ती फळी फारच घट्ट बसली होती. ४५ मिनीटांच्या अथक प्रयत्नांनंतर कुठे ती फळी बाजुला सरकवण्यात त्यांना यश आले.

दमुन घाम पुसत तिघंही जणं जमीनीवर बसले. त्या फळीने अक्षरशः सर्वांचा जिव काढला होता. थोड्यावेळाच्या विश्रांतीनंतर वेळ होती ती कुलुप तोडण्याची. तसा जयंता म्हणाला, “बाहेरच्या तुटलेल्या कुंपणाच्या लोखंडी सळया वापरुन बघायचे का कुलुप उघडते का?”

इतरांनी त्याला संमती दर्शवली तसा तो धावत बाहेर गेला.

एव्हाना बाहेर जवळ जवळ काळोखच पसरला होता. जयंता काही क्षण दरवाज्यातच घुटमळला. त्या अंधारात जायला त्याचे मन धजवेना. शेवटी त्याने मनाचा हिय्या केला आणि तो ४-५ मोठ-मोठ्या ढांगा टाकत कुंपणापाशी पोहोचला. लोखंडी खांब अगदीच खिळखीळे झाले होते. थोड्याफार प्रयत्नातच ते जमीनीतुन निघाले तसे जयंता एक मोठा लोखंडी खांब घेउन परत तळघराच्या दरवाज्यापाशी पोहोचला.

तिघांनी मिळुन तो खांब कुलुपाच्या गोलात अडकवला आणि नंतर त्याच्यावर प्रहार करुन ओढुन कुलुप तोडण्याचे प्रयत्न चालु केले. जुन्या काळचे ते पौलादी कुलुप तुटता तुटेना. अखेर २५-३० मिनीटांच्या प्रयत्नांनंतर ठ्ण्ण.. आवाज करत ते कुलुप तुटुन खाली पडले.

…………. त्या दाराला लावलेली सर्व मानवनिर्मीत बंधन गळुन पडली होती………………………………

तिघांनी जोर लावुन तो दरवाज्या आतल्या बाजुला ढकलला. कर्र,,,,,,…… आवाज करत तो दरवाजा उघडला गेला. त्या आवाजाने कित्तेक वर्षांच्या दबल्या गेलेल्या आठवणी जागा झाल्या. कित्तेक गोष्टी गेली कित्तेक वर्ष त्या बंद दरवाज्यामागे अडकुन होती.. आज तो दरवाजा उघडल्याने त्या गोष्टी मुक्त झाल्या होत्या..

आतमध्ये जे काही होतं, ते सर्वार्थाने आता मोकळं होतं.

थंडगार हवेचा एक झोत बाहेरुन सर्वांच्या अंगावर आला, जणु काही एखादा एअर कंडीशनरच लावला असावा.

“आकाश… आपण जाउ यात का इथुन? मला भिती वाटते आहे…”, शाल्मली म्हणाली.

पण आकाशचे तिच्याकडे लक्षच नव्हते. दरवाज्यापाशी उभे असलेले रामुकाका, आकाश आणि जयंत अंधारलेल्या तळघरात डोळे फाडुन काही दिसते आहे का पहाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु काळोख एवढा होता की दोन फुटांवर जरी कोणी उभं असलं तरी दिसण्याची शक्यता नव्हती.

रामुकाकांनी हातातली बॅटरी चालु केली आणि एकवार मागे वळुन बघीतले.

“मला काही झालं तर हे दार पुन्हा पहील्यासारखं घट्ट लावुन घ्या आणि इथुन निघुन जा, पुढे जे काही होईल ते देवाच्या हाती..”, असं म्हणुन त्यांनी तळघरात पहीलं पाऊल टाकलं.


तळघराच्या पायर्‍या बर्फासारख्या थंड होत्या. रामुकाकांच्या अंगावरुन एक शिरशीरी येऊन गेली. त्यांनी दोन क्षण वाट पाहीली पण काही झालं नाही. रामुकाकांनी दुसरा पाय टाकला आणि मग एक एक करत पायर्‍या उतरून खाली जाऊ लागले.

बॅटरीचा प्रकाश काही इंच पुढंपर्यंत जाऊन अंधारात लुप्त होत होता. रामुकाकांच्या दृष्टीने फक्त तेवढे काही इंचाचेच जग होते, बाकी सगळा अंधार. त्या अंधारात कोण होते, काय होते, काय करत होते ह्याची यत्कींचीतही कल्पना कोणाला नव्हती.

नारायण धारप ह्यांनी त्यांच्या एका कथेत ह्या परीस्थीतीचे फार छान वर्णन केले आहे. ते म्हणतात, “शेवाळ्याने भरलेल्या पाण्यात जेंव्हा तुम्ही उतरुन पुढे पुढे जाऊ लागता तेंव्हा काय होते? पाय टाकला की शेवाळे तात्पुर्ते बाजुला होते आणि पाणि दिसु लागते, परंतु जसजसे तुम्ही पुढे जाऊ लागता, तसं तसे ते बाजुला झालेले शेवाळे पुन्हा एकत्र होते, पाण्याला आच्छादुन टाकते…. तुमच्या मागे तुमचा मार्ग बंद झालेला असतो…………………….”

रामुकाकांचे तसेच झाले होते, दिव्याचा प्रकाश पुढे गेल्यावर, क्षणभरापुर्वी दिव्याच्या प्रकाशाने उजळलेल्या त्या पायर्‍या पुन्हा अंधारात बुडुन जात होत्या.

साधारणपणे २५-३० पायर्‍या उतरल्यावर सपाट जमीन लागली. आतमध्ये भयानक हाडं गोठवणारी थंडी होती. रामुकाकांनी नकळत एका हाताने गळ्यातली रुद्राक्षाची माळ घट्ट पकडली.

तोंडाने सतत देवाचे नामःस्मरण चालु होते –

ॐ गोविंदाय नमः॥। ॐ विष्णवे नमः॥। ॐ मधुसूदनाय नमः॥।
ॐ त्रिविक्रमाय नमः॥। ॐ वामनाय नमः॥। ॐ श्रीधराय नमः॥।
ॐ उपेंद्राय नमः॥। ॐ हरये नमः॥। श्री कृष्णाय नमः॥


तळघरात विचीत्र शांतता होती, जणु काही सारा आसमंत ’आता काय होणार?’ ह्याची वाट पहात चिडीचूप बसुन होता. रामुकाकांना त्यांच्या छातीचे ठोके स्पष्ट ऐकु येत होते.

थोडे अंतर आत गेल्यावर रामुकाकांना डाव्या हाताला ती छोटी खोली दिसली जेथे काही दिवस त्र्यंबकलालने स्वतःला बंद करुन घेतले होते. रामुकाका सावकाश चालत त्या खोलीपाशी गेले आणि बंद खोलीचे दार सावकाश आत ढकलेले. दार उघडेच होते.. पुन्हा एकदा तो विकृत किर्र… आवाज करत दार उघडले गेले. त्या विस्तीर्ण तळघरात दरवाज्याचा उघडण्याचा तो आवाज घुमुन राहीला.

रामुकाकांनी खोलीच्या अंतःर्भागात बॅटरीचा प्रकाश टाकला. खोली मोकळीच होती. एकदा खात्री झाल्यावर रामुकाकांनी बॅटरीचा प्रकाश भिंतींवर आणि खोलीच्या छताकडे टाकला, परंतु सुदैवाने तेथे कोणीच नव्हते.

रामुकाका खोलीत शिरले आणि अत्यंत घाणेरड्या वासाचा भपकारा त्यांच्या नाकात शिरला. रामुकाकांच्या एका हातात बॅटरी होती आणि दुसर्‍या हाताने रुद्राक्षाची माळ घट्ट पकडली होती त्यामुळे त्यांना नाक झाकणे शक्यच नव्हते. रामुकाका त्या वासाची पर्वा न करता दोन पावलं टाकुन अजुन आतमध्ये आले.

अवकाशाच्या पोकळीत, जेथे हवा नाही, पाणी नाही, गुरुत्वाकर्षण नाही.. आणि सगळ्यात मुख्य जेथे जिवन नाही तेथे कसे वातावरण असेल? तसेच वातावरण खोलीच्या आतमध्ये होते, रामुकाकांची कसोटी लागत होती, त्यांच्या छातीवर प्रचंड दडपण आले होते, त्यांना श्वास घ्यायला स्वच्छ हवा मिळत नव्हती. परंतु रामुकाकांचा निर्धार पक्का होता. रामुकाकांनी बॅटरीचा प्रकाश सावकाश खोलीतुन फिरवायला सुरुवात केली. जमीनीवर एका ठिकाणी त्यांना नखांचे अनेक ओरखडे दिसले. कोणीतरी असहाय्य पणे, उद्वीगतेने आपला संताप, आपली बेचैनी त्या जमीनीवर उतरवली होती. रामुकाकांचा शोध सुरु होता आणि त्यांना खोलीच्या दुसर्‍या कोपर्‍यात जे अपेक्षीत होतं ते दिसले. रामुकाकांच्या चेहर्‍यावर एक विजयी हास्य पसरले.

रामुकाका ’त्या’ दिशेने जाऊ लागले आणि खोलीतला गारवा अचानकपणे वाढला तसा रामुकाका सावधं झाले. त्यांच्या अंतःर्मनाने त्यांना धोक्याची सुचना द्यायला सुरुवात केली. खोलीत नक्कीच कोणीतरी आले होते. रामुकाकांनी माघारी वळवुन पाहीले, पण बॅटरीच्या प्रकाश झोतात त्यांना कोणीच दिसले नाही. रामुकाकांनी पुन्हा एकदा बॅटरीचा प्रकाश भिंतीवरुन छताकडे न्हेला आणि त्यांना ’ती’ नजरेस पडली.

छताला हाताचे तळवे आणि गुडघे टेकवुन उलटी होऊन नेत्रा रामुकाकांकडे तुच्छतेने बघत होती. तिच्या डोळ्यांतुन संताप, तिरस्कार आग ओकत होता.

“काय रे म्हातार्‍या, मला शोधतो काय?”, दात विचकत नेत्रा म्हणाली

रामुकाका काहीच बोलले नाहीत. खरं तर त्यांची भितीनी वाच्चता बंद झाली होती. हातापायातली शक्ती गेली होती. परंतु रामुकाका तरीही धीर एकटवुन तिच्याकडे बघत उभे होते.

“अरं जगायचंस नव्ह का थोड्यावेळ, काय घाई एवढी मरायची?”, छद्म्मीपणे हसत नेत्रा म्हणाली.

“रांडीचे, तुला काय वाटलं, चार-दोन फालतु जादुचे प्रयोग तु करुन दाखवलेस म्हणजे आम्ही तुला घाबरु होय? तुला यमसदनी पाठीवल्याशिवाय हा म्हातारा मरणार नाय…”, उसन्या अवसानाने रामुकाका म्हणाले.

“अस्सं! तु मारनार व्हयं मला???”, असं म्हणुन नेत्रा सात मजली हसली. तिच हासणं सर्व तळघरात दुमदुमले. नेत्रा भिंतीवरुन हळु हळु सरकत खाली येऊ लागली. रामुकाकांचे हात-पाय गोठले होते, परंतु सर्व शक्ती एकटवुन त्यांनी आपल्या खिश्यातुन एक तांबडे पुस्तक बाहेर काढले आणि ते नेत्राच्या समोर धरले.

ते पुस्तक पहाताच नेत्रा क्षणभर जागच्या जागी थांबली आणि मग भराभर दोन-चार पावलं मागे सरकली.

“का गं भडवे, घाबरलीस नव्हं? बापाला घाबरलीस का नाय? अं? कळलं न हे काय आहे? गरुड-पुराण..! ऐकले असशीलच तु नाही का?????”, रामुकाका म्हणाले.

हातात धरलेल्या त्या पुस्तकाने त्यांच्या अंगात चांगलाच जोश संचारला होता.

नेत्रा जळफळत, डोळे विस्फारुन तिथे उभी होती.

“एक पाऊल पुढे येशील तर तुझी राख होईल इथंच..”, रामुकाका ते पुस्तक पुढं धरत म्हणाले… “आन तु रे त्र्यंबकलाल, तिथं दबा धरुन काय करशील.. तुला कळत नाय, माझ्या हातात काय आहे ते?? चलं ये इथं समोर माझ्या…”

रामुकाका खोलीच्या दुसर्‍या कोपर्‍यात बघुन बोलत होते.

त्याचबरोबर भिंतीचा तो काळा, अंधारलेला कोपरा सजीव झाला आणि तो अंधार हळु हळु पुढे सरकत नेत्राच्या खाली जाऊन उभा राहीला.

“मादरचोद!”, रामुकाक ओरडले..”स्वतःच्या बायका पोरांना सोडुन ह्या रांडेच्या मागे लागला तु.. अन ति मेल्यावरपण तिला जिता ठेवलास.? हे हे.. पिंड.. इथं लपवुन ठेवलं होतंस व्हय??”, खोलीच्या त्या कोपर्‍यात त्या गोलाकार, जळमट लागलेल्या भाताच्या गोळ्यांकडे बोटं दाखवत रामुकाका म्हणाले.

तो अंधार रागाने थरथरत होता, संतापाच्या ज्वाळा त्यातुन बाहेर पडुन रामुकाकांना गिळंकृत करु पहात होत्या.

रामुकाकांना कल्पना होती ते फार काळ ह्या दोघांना थोपवुन ठेवु शकणार नाहीत. दोघांपैकी कोणीही बेफाम होऊन पुढे सरसावले असते तरी परीस्थीती हाताबाहेर जाऊ शकली असती.

रामुकाका सावकाश मागे न वळता मागे सरकु लागले.

नेत्रा आणि त्र्यंबकलालच्या नजरा रामुकाकांकडे लागल्या होत्या.

रामुकाका मागे मागे सरकत दारापाशी आले आणि अचानक त्यांचा पाय एका लाकडी पाटात अडकला. अडखळुन ते खाली कोसळले. त्यांच्या हातातले ते पुस्तक दुर फेकले गेले. केवळ तो एक क्षण आणि त्याचवेळी त्या अंधाराने रामुकाकांकडे झेप घेतली.

आपला मृत्यु अटळ आहे हे समजुन रामुकाकांनी डोळे घट्ट मिटुन घेतले आणि त्याचवेळी त्यांच्या कानावर त्र्यंबकलालची वेदनेने भरलेली किंकाळी ऐकु आली. रामुकाकांनी डोळे उघडुन बघीतले. भिंतीच्या कोपर्‍यात त्र्यंबकलाला थरथरत उभा होता, रामुकाकांनी मागे वळुन दाराकडे पाहीले. दारात जयंता मिठाचा पुडा घेऊन उभा होता…

“रामुकाका, चला, उठा लवकर…”, असं म्हणुन त्याने रामुकाकांना हात धरुन उठवले आणि त्यांना धरुन जणु ओढत ओढतच तो तळघरातुन बाहेर पडण्याच्या जिन्याकडे धावला………………………


[क्रमशः]