Alvani - 10 books and stories free download online pdf in Marathi

अलवणी - १०

आकाश पुन्हा आपल्या खोलीत परतला. शाल्मलीचा नुकताच डोळा लागला होता, तर मोहीत ’मिकी माऊसचे’ जिग्सॉ-पझल जोडण्यात मग्न होता.

आकाशने खोलीत एकवार सर्वत्र नजर टाकली. आदल्या रात्री घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. शाल्मलीचा तो भेसुर चेहेरा आठवुन आकाशच्या अंगावर एक सरसरुन काटा आला. आकाशने घट्ट डोळे मिटुन घेतले आणि आपल्या कुलदैवतेचा फोटो डोळ्यासमोर आणला, मनोभावे हात जोडले आणि काही क्षण तो शांत चित्ताने तेथेच उभा राहीला.

सर्व वाईट विचार, वाईट आठवणी, भिती एक एक करत कमी होत गेले. आकाशला प्रसन्न वाटु लागले तसे त्याने डोळे उघडले, एक दीर्घ श्वास घेतला आणि तो आपल्या शोधकार्याला लागला.

जयंता वरच्या बेडरुममध्ये गेला. खोलीच्या खिडक्या बंद होत्या आणि पडदे लावून घेतल्याने खोलीत अंधार पसरला होता. जयंताने सावधानतेने खोलीत प्रवेश केला. त्याची नजर खोलीच्या अंतरंगात लागलेली होती. चाचपडत त्याने बटनांच्या दिशेने हात न्हेला आणि अचानक त्याला असे जाणवले कि त्याचा हात कोणीतरी घट्ट पकडला आहे. जयंताने झटका देऊन हात काढून घेतला.

तो भास होता का खरंच कोणी त्याचा हात धरला होता ह्यावर त्याचे एकमत होईना. जयंता थोड्यावेळ तेथेच अंदाज घेत उभा राहिला. परंतु खोलीतून कसल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता. धडधडत्या अंतकरणाने जयंता खोलीच्या आत गेला आणि त्याने दिव्याचे बटन दाबले. क्षणार्धात खोलीचे अंतरंग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाले.

जयंताने खोलीतून सर्वत्र नजर फिरवली. त्याच्या नजरेस दिसेल असे तेरी कोणीही त्या खोलीत नव्हते. जयंताने भिंतींच्या टोकाला असलेल्या कोपर्यांकडे बघितले. भिंतीच्या कोपर्‍यात मोडी लिपीमध्ये लिहीलेली ती अक्षरं खोलीत येणार्‍याचे लक्ष वेधुन घेत होती. जयंताने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि फारसा वेळ न दवडता तो सुध्दा आपल्या शोधकामात बुडुन गेला.

खोलीचे कोनाडे, कपाट, बेडखाली, पडद्यांच्या मागे, टेबलाचे खण, जयंताने सर्व काही पालथे घातले परंतु महत्वाचे असे काही हाती लागले नाही.

निराश होऊन जयंता मागे वळला आणि त्याच्या छातीत एकदम धस्स झाले, केवळ काही फुटांवर नेत्रा उभी होती. तिची जळजळीत, क्रोधीत नजर जयंताच्या नजरेचा वेध घेत होती.

जयंताला दरदरून घाम फुटला. नेत्रा त्याच्या आणि दरवाजाच्या मध्ये उभी असल्याने बाहेर पडायला कुठूनच मार्ग नव्हता.

नेत्राचे ओठ एकाबाजूने वर सरकले आणि एक कुचकट हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरले. मग सावकाश पावला टाकत ती जयंताच्या दिशेने येऊ लागली. ओरडण्यासाठी जयंताने तोंड उघडले, परंतु त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेनात. त्याची भीतीनी वाचा बसली होती.

प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे जयंता जस-जशी नेत्रा जवळ येऊ लागली तस-तसा मागे सरकू लागला.

शेवटी मागे सरकत सरकत तो भिंतीला येऊन टेकला. नेत्रा त्याच्या अगदी जवळ आली होती. तिने आपला उजवा हात पुढे केला आणि एखाद्या मरतुकड्या पक्ष्याची पकडावी तशी त्याची गळा-मान हातात धरली. तिच्या हाताच्या त्या थंडगार, निर्जीव स्पर्शाने जयंतच्या अंगावर एक काटा येऊन गेला. नेत्राने आपल्या हाताची पकड हळू हळू वाढवत न्हेली. जयंताला गळा आवळला जात असल्याची जाणीव होत होती, पण तो काहीच करू शकत नव्हता. हळू हळू त्याला श्वास घेणे अवघड होऊ लागले.

“पुनिंदा असा खोडसाळ पणा करू नगस..”, अत्यंत हळू परंतु तितकाच भेदक असा नेत्राचा आवाज जयंतच्या कानावर पडला…”नै तर तुम्हास्नी मराया मी पुर्निमेची पन वाट पहाणार नै.. जा सांग तुझ्या त्या म्हातार्‍याला..” असा म्हणून तिने आपला हाताची पकड ढिल्ली केली.

बोलताना नेत्राच्या ओठांमधून सापासारखी एक काळी जीभ आतबाहेर करत होती, जणू सैतानाचे दुसरे रूपच …

नेत्राने हात काढून घेताच जयंता खाली कोसळला तेंव्हा त्याला जाणीव झाली कि तो जमिनीपासून काही फूट वर उचलला गेला होता.

खाली पडल्यावर तो डोळे घट्ट बंद करून काही वेळ बसून राहिला. जेंव्हा त्याने डोळे उघडले तेंव्हा नेत्रा तेथून निघून गेली होती.


जयंता सावकाश उठला आणि खोलीतला दिवा मालवून खाली, व्हरांड्यात येऊन बसला. थोड्या वेळानंतर रामुकाका आणि आकाश पण तेथे येऊन बसले…

“जयंता.. अरे गळ्याला काय झाल तुझ्या?”, जयंताच्या गळ्याकडे बोट दाखवत आकाश म्हणाला, तसे रामुकाका सुध्दा आश्चर्याने काय झाल ते पाहू लागले.

जयंताने वर, खोलीत घडलेली घटना त्याना ऐकवली.

“पण, काही सापडले का तुला तिथे?”, आकाशाने विचारले..

जयंताने काही न बोलता नकारार्थी मान हलवली.

“.. आणि रामुकाका तुम्हाला?”, आकाशाने रामुकाकाना विचारले.

रामुकाकानी सुध्दा काही न बोलता नकारार्थी मान हलवली.

“मलाही काहीच नाही सापडले…” असे म्हणून आकाश व्हरांड्यातच फतकल मारून खाली बसला.

सर्व जण सुन्न होऊन बसून राहिले होते. तीन दिवसांमधला एक दिवस त्यांचा वाया गेला होता. कुणाच्याही हाती काही लागले नव्हतेच, उलट नेत्राने दिलेल्या धमकीमुळे त्यांच्या जीवाला असलेला धोका कित्त्येक पटीने वाढला होता.

बराच वेळ शांततेत गेला. सर्वांची तंद्री भंगली ते खोलीच्या दाराच्या आवाजाने.

सगळ्यांनी वळून दाराकाडे पाहिले. दारात शाल्मली उभी होती. आकाश काही बोलण्यासाठी उठणार तेवढ्यात रामुकाकानी त्याला हाताला धरून खाली बसवले.

आकाशाने प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे पाहिले. रामुकाकानी बोट तोंडावर ठेवून शांत रहायची खूण केली.

शाल्मली सावकाश चालत व्हरांडा ओलांडून बाहेर गेली, तिच्या लेखी जणू काही तिथे कोणी नव्हतेच. तिने एकावर वळूनही ह्या तिघांकडे पाहिले नाही.

शाल्मली चालत चालत बंगल्याच्या गेटपाशी गेली, तिने गेट उघडले आणि ती बाहेर पडली. ती थोडी पुढे गेल्यावर रामुकाकानी जयंता आणि आकाशाला हातानेच ‘चला’ अशी खूण केली, तसे ते तिघेही उठून शाल्मालीच्या मागे मागे जाऊ लागले.


शाल्मली तंद्रीत असल्यासारखी चालत होती. तिला वेळेच, काळाचे कश्याचेही भान नव्हते. पाला-पाचोळा, काटे-कुटे सर्वकाही तुडवत ती चालत होती. रामुकाका, आकाश आणि जयंताला तिच्या वेगात चालणे अवघड होत होते, परंतु शक्य तितक्या तिच्या मागे रहाण्याचा ते प्रयत्न करत होते.

बरेच अंतर गेल्यावर अचानक शाल्मली दृष्टीआड झाली. बराचवेळ शोधुनही सापडेना. आकाशला शाल्मलीची काळजी वाटु लागली होती, परंतु थोड्याच वेळात बाजुच्याच झाडीतुन त्यांना हलकीशी हालचाल जाणवली.

तिघेही जण दबकत त्या झाडीपाशी पोहोचले आणि डोकावुन आत पाहु लागले. शाल्मली त्यांना पाठमोरी बसुन काहीतरी करत होती.

आकाश हळु हळु पुढे जाउ लागला. रामुकाकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा हात बाजुला ढकलुन आकाश शाल्मलीच्या अगदी जवळ जावुन पोहोचला. शाल्मलीला त्याची मागे असण्याची यत्कींचीतही कल्पना नव्हती. निदान ती जे काही करत होती त्यात कणभरही फरक पडला नव्हता.

आकाश शाल्मलीच्या समोर जावुन उभा राहीला तसे शाल्मलीने मान वर उचलुन त्याच्याकडे पाहीले.

शाल्मलीच्या समोर केळीच्या पानावर पसरलेला, गुलाल, हळद-कुंकु वाहीलेला, लिंबाची फोडी ठेवलेला नैवेद्याचा भात ठेवला होता आणि शाल्मली तो भात अधाश्यासारखा खात होती. तिचा हात, तोंड सगळं भाताच्या शिताने भरलेले होते. गावातीलच कोणीतरी करणी, भुतबाधा उतरवण्यासाठी केलेल्या पुजेतील नैवेद्याचा तो भात गावाबाहेर आणुन टाकलेला होता.

आकाशला बघताच शाल्मली उठुन उभी राहीली. तिच्या तोंडातुन एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा गुरगुरण्याचा आवाज येत होता.

आकाशने दोन क्षण तिच्याकडे रोखुन पाहीले आणि सर्व शक्ती एकवटुन साट्कन तिच्या मुस्काटात लावुन दिली. तो प्रहार इतका जबरदस्त आणि अनपेक्षीत होता की शाल्मली दोन पावलं मागे हेलपांडली आणि मागच्या झाडावर आपटुन खाली कोसळली.

आकाश, रामुकाका आणि जयंता काही वेळ तेथेच पुढील हालचालीची वाट पहात तेथे थांबले, परंतु शाल्मली निपचीत पडली होती. मग तिघांनी मिळुन तिला उचलले आणि पुन्हा घरी घेउन आले.

मावळतीला जाणार्‍या सुर्याने त्यांच्या हातातुन निसटुन गेलेल्या एका दिवसाची जाणीव करुन दिली.


दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा सगळे व्हरांड्य़ात जमा झाले.

“रामुकाका, आज काय करायचे? काल तर काहीच आपल्या हाती लागलं नाही.”, आकाश म्हणाला

“काका, आपण आज खोल्या बदलुन घ्यायच्या का? पुन्हा एकदा खोल्या त्याच, पण लोकं वेगळी असे शोधुयात का? कदाचीत आपल्याला सापडले नाही ते दुसर्‍याला सापडेल?”, जयंताने विचारले.

“नाही…”, थोडा विचार केल्यावर रामुकाका म्हणाले..”आधी आपण सर्व खोल्या तपासुन पुर्ण करु, नाहीच काही सापडले तर मग हा पर्याय आहेच. अजुन माजघर, स्वयंपाकघर आणि ’ति’ खोली ज्यात मी पहील्या दिवशी राहीलो होतो….”

जयंता आणि आकाशने रामुकाकांच्या म्हणण्याला संमती दर्शवली.

“ठिक तर मग, मी त्या खोलीत जातो, आकाश तु माजघरात जा, आणि जयंता तु स्वयंपाकघरात…” असं म्हणुन रामुकाका त्या खोलीच्या दिशेने निघाले. पाठोपाठ आकाश आणि जयंता त्यांच्या तपास-खोलीच्या दिशेने निघुन गेले.

रामुकाका पुन्हा एकवार त्या खोलीत आले. खोलीतच्या प्रमुख भिंतीवर लावलेले त्या करारी पुरुषाचे तैलचित्र तेजाने झळकत, इतके वर्ष तग धरुन उभे होते.

रामुकाका त्या तैलचित्रासमोर जाऊन उभे राहीले. काही क्षण ते त्या चित्राकडे लक्ष विचलीत न होता पहात राहीले, मग त्यांनी सावकाश डोळे बंद केले, दोन्ही तळहात जोडले आणि ते म्हणाले.. “विष्णूपंत, आज ह्या बंगल्यात आम्ही महासंकटात सापडलो आहोत. त्या काळी जे घडले त्याच्याशी आमच्यापैकी कोणाचाही तिळमात्र संबंध नाही. कोण पापी?, कोण दोषी?, कोण चांगला?, कोण वाईट?, ह्याची आम्हाला काडीचीही कल्पना नाही.

त्याकाळी त्या घटनाक्रमात जे गुंतले होते ते केंव्हाच आपले भोग भोगायला निघुन गेले, त्यांचे कालावसान होऊनही अनेक तपं ओलांडली. मग आमच्यासारख्या पापभीरु लोकांनाच हा त्रास का?

पंत, तुमच्या कुटुंब कबील्याचे तुम्ही कर्ते पुरुष, आज आम्ही तुमच्याच बंगल्यात आहोत आणि आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे जसे संरक्षण केलेते तसेच रक्षण आमचे सुध्दा कराल अशी आशा आम्ही बाळगतो. आज तुम्ही हयात असतात, तर ही वेळ आलीच नसती, परंतु तुम्ही शरीराने इथे नसलात तरी तुमचा अंश, तुमचा आत्मा इथे येणार्‍या निरपराध लोकांचे संरक्षण करण्यास नक्कीच सक्षम आहे.

पंत, आमचे रक्षण करा, आम्हाला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा पंत……”

रामुकाका बर्‍याच वेळ डोळे मिटुन स्तब्ध उभे होते. बराच काळानंतर त्यांनी डोळे उघडुन समोर पाहीले.

सर्व खोली कसल्याश्या धुराने भरुन गेली होती. रामुकाकांनी डोळे चोळुन चोळुन पहाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांचा भास नसुन खरोखरच खोलीत सुवासीत धुर पसरला होता. त्या धुसर प्रकाशात रामुकाका आजुबाजुला पहाण्याचा प्रयत्न करु लागले.

दिवाणखान्याच्या दुसर्‍या कोपर्‍यातुन पेटी आणि सतार वादनाचा मंद आवाज येत होता.

रामुकाका आवाजाच्या दिशेने जाउ लागले. खोलीच्या दुसर्‍या भिंतीपाशी रामुकाकांना एक दार नजरेस पडले.

“खरं तर इतक्या दिवसांत हे दार कुणालाच कसे दिसले नसावे”, असा विचार रामुकाकांच्या मनात झळकुन गेला.

रामुकाकांनी हाताने ते दार हलकेच लोटले तसा आतुन येणारा तो आवाज अधीकच स्पष्ट झाला. त्या आवाजाला अजुन एका घनगंभीर, पुरुषी आवाजाची जोड होती…

’ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि
त्वमेव केवलं कर्ताऽ सि
त्वमेव केवलं धर्ताऽसि
त्वमेव केवलं हर्ताऽसि ’…..

कोणीतरी गणपती अथर्वशीर्ष म्हणत होते. रामुकाकांचे नकळत हात जोडले गेले. त्या धुसर प्रकाशात त्या छोट्याश्या खोलीच्या कोपर्‍यात एक व्यक्ति पाठमोरी बसलेली रामुकाकांना दिसुन आली.

पाठीचा कणा ताठ होता, अंगाला पांढरेशुभ्र वस्त्र गुंडाळलेले होते. दोन्ही हात जोडलेले दिसत होते.

रामुकाका काहीही न बोलता त्या व्यक्तीच्या मागे जाऊन बसले.

किती वेळ गेला असेल कुणास ठाऊक, रामुकाका अध्यात्मीक ध्यानात मग्न होऊन गेले होते.

समोरची आरती संपली तसे रामुकाका भानावर आले. त्यांनी कपाळाला हात जोडुन नमस्कार केला आणि ते उठुन उभे राहीले.

समोरच्या त्या व्यक्तीने शेजारच्या परडीतील फुल समोरच्या देव्हार्‍यात वाहीली, उदबत्ती, निरांजनाने एकवार देवाला ओवाळले आणि मग कुंकुवाचा करंडा घेऊन ते उभे राहीले आणि माघारी वळले….

“पंत…..”, रामुकाकांच्या तोंडुन अस्पष्ट शब्द बाहेर पडले.

पंत रामुकाकांच्या जवळ आले आणि त्यांनी कुंकुवाचे एक बोट रामुकाकांच्या कपाळाला लावले.

पंतांचे डोळे तेजाने चमकत होते, त्यांच्या चेहर्‍यावर आत्मीक समाधान, शांती ओसंडुन वहात होती.

रामुकाकांनी खाली वाकुन पंतांना नमस्कार केला आणि हात जोडुन ते पुन्हा उभे राहीले.

पंतांनी त्यांच्या बंडीच्या खिश्यातुन मळकट-चॉकलेटी रंगाची गुंडाळी केलेली काही पत्रकं रामुकाकांच्या हातात ठेवली. रामुकाकांना त्यावरुन काहीही अर्थबोध होत नव्हता. ते प्रश्नार्थक नजरेने पंतांकडे बघत होते.

पंतांच्या चेहर्‍यावर क्षणभर एक मंद हास्य येऊन गेले. त्यांनी आपले डोळे बंद केले आणि आपला उजवा हात रामुकाकांच्या डोक्यावर ठेवला.

रामुकाका त्या तेजाच्या स्पर्शाने मोहरुन गेले होते. डोळे बंद करुन पंतांच्या हातातुन येणारा तेजाचा तो झरा आपल्या ज्ञानकोशात भरुन घेण्यात ते मग्न होऊन गेले होते. पंतांनी हात काढुन घेतला तसे रामुकाकांनी डोळे उघडले.

“यशस्वी भव!”, एवढे दोनच शब्द बोलुन पंत माघारी वळले आणि धुराच्या त्या वलयात निघुन गेले. त्यांची पाठमोरी आकृती अंधुक अंधुक होत त्या प्रकाशात विलीन झाली.

रामुकाका भारावलेल्या नजरेने त्या दिशेकडे पहात राहीले.


रामुकाका पुन्हा व्हरांड्यात आले तेंव्हा आकाश आणि जयंता अजुनही त्यांच्या खोल्या धुंडाळण्यात व्यस्त होते. रामुकाकांनी दोघांनाही हाक मारुन बाहेर बोलावुन घेतले.

“काय झालं रामुकाका?”, जयंताने विचारले.

“आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला सापडले आहे, आता अजुन शोध पुरे”, रामुकाका म्हणाले.

रामुकाकांच्या चेहर्‍यावर असामान्य तेज पसरले होते, त्यांच्या कपाळाला लागलेले कुंकुवाचे ते दोन थेंब तेजाने तळपत होते. जयंता आणि आकाश आश्चर्याने रामुकाकांमध्ये झालेला हा बदल पहात होते.

“काय आहे हे? आणि हे सापडले कुठे?”, आकाशने विचारले.

“ही भोजपत्र आहेत…”, रामुकाका म्हणाले

“भोजपत्र?? म्हणजे??”, आकाश आणि जयंताने एकदमच विचारले.

“पुर्वीच्या काळी झाडाच्या खोडांच्या साली काढुन त्याचा वापर लिहीण्यासाठी केला जायचा त्याला भोजपत्र म्हणतात…”, रामुकाका म्हणाले.

“पण ही तुम्हाला मिळाली कुठे? आणि आहे काय त्यामध्ये लिहीलेले….??”, आकाशने विचारले

“सांगतो..”, असं म्हणुन रामुकाकांनी त्या खोलीत घडलेला सर्व वृत्तांत दोघांना ऐकवला.

दोघंही जण स्तंभीत होऊन रामुकाकांचे बोलणे ऐकत होते.

“पण ही भोजपत्र आहेत कसली? आपल्याला त्याचा फायदा काय? पंतांनी काही सांगीतले का तुम्हाला?”, आकाशने विचारले

“नाही.. तसं म्हणलं तर पंत काहीच बोलले नाहीत, परंतु तरीही काय करायचे आहे? कसं करायचं आहे? केंव्हा करायचं आहे हे मला पुर्ण समजलं आहे.. असत्यावर सत्याचा, दुर्गुणांवर सज्जनांचा नेहमीच विजय होत आलेला आहे, कदाचीत तो मार्ग खडतर असेल, कदाचीत तिथे पोहोचायला आपल्याला थोडा वेळ लागेल, पण सत्याची कास धरल्यावर, चांगुलपणा अंगीकारल्यावर यशश्री आपलीच आहे….” रामुकाका बोलत होते…..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED