Shyamachi Patre - 7 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 7

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र सातवे

दीनदलितांचा कैवार हाच खरा धर्म ! प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.आज खूपच थंडी आहे. बाहेरच्या गुलाबावरच्या कळया नीट फुलल्या नाहींत. सूर्याची ऊब मिळेल तेव्हां त्या फुलतील. प्रेमाची ऊब सर्वांना हवी. सूर्याचे प्रसन्न व प्रेमळ असे हात लागतांच या कळया खुदकन् हंसतील. वसंता, आज पहाटें एक मांजर थंडीत कुडकुडत होतें. तें माझ्या दाराजवळ येऊन केविलवाणें ओरडत होते. मी दार उघडलें व ते आंत आले. ते माझ्या पांघरुणांत शिरलें. मी त्याला जवळ घेतलें. तें घुरघुर करीत मला बिलगलें. प्रेमानें अनोळखी पशुपक्षीहि माणसाळतात. मग माणसें नाहीं का माणसाळणार?

परंतु आम्हांला द्वेषाचेच डोहाळे होत आहेत. आणि आश्चर्य हें कीं धर्माच्या नांवानें हे द्वेष माजवले जात आहेत. संस्कृतीचें संवर्धन का द्वेषाने करायचें? धर्माच्या नांवानें आतांपर्यत जेवढी हिंसा जगांत झाली असेल तेवढी दुस-या कोणत्याहि कारणासाठी झाली नाहीं ! आम्ही पुन्हा आज तेंच करीत आहोंत. परंतु धर्माच्या लंब्याचौडया गप्पा मारणारे हे लोक गरिबांची पिळवणूक दूर करण्याच्या बाबतींत मात्र मुके असतात.

वसंता, कांहीं महिन्यांपूर्वी मुंबई कौन्सिलमधील रिकाम्या झालेल्या कांही जागांची निवडणूक होती. काँग्रेसनें आपले उमेदवार उभे केले होते. परंतु काँग्रेसच्या उमेदवारास प्रतिस्पर्धी म्हणून जे उमेदवार हिंदुमहासभावाले, वर्णाश्रमावाले, लोकशाहीवाले वगैरेंनीं मिळून उभें केले हाते, त्यांची भूमिका काय होती? काँग्रेसनें कुळ कायदा केला म्हणून जे लोक रागावले होते त्यांच्या वतीने जे उमेदवार होते. कुळ कायद्यांत वास्तविक कांही विशेष नव्हतें. तो एक साधा कायदा होता. जमिनदारांच्या जमिनी काढून कुळांना देण्यांत आल्या नव्हत्या. परंतु कुळकायद्यांचा पहिला खर्डा प्रसिध्द होतांच, '' आतां जमिनदारांना फांशीं द्या ! '' अशी ओरड होऊं लागली. अरे फांशीं कुणाला दिलें आहे? कुळांनी जर वेळच्या वेळी खंड दिला, जमीनीची नासधूस केली नाहीं तर त्यांना काढून टाकूं नये अशा अर्थाचें तें साधं बिल होते. परंतु आमचे खोत व जमीनदार रागावले. आणि या रागावलेल्यांची बाजू केसरी वगैरे पत्रांनी घेतली ! कर्नाटकांतील श्री. बेळवी हे स्वत:ला लोकमान्यांचे अनुयायी म्हणवितात. परंतु लोकमान्य तर तेल्यातांबोळयाचे पुढारी म्हणून उपहासिले जात. लोकमान्यांना अटक झाली तेव्हां मुंबईच्या कामगारांनीं दंगे केले. बेळवी जर स्वत:ला लोकमान्यांचे अनुयायी समजत असतील तर गरीबांची बाजू त्यांनीं घेतली असती. परंतु ते म्हणाले, '' काँग्रेस कुळकायदा करते. तिला विरोध केलाच पाहिजे, '' आणि अशा या बेळवी वगैरे असंतुष्टांस कोणी पाठिंबा दिला?

हिंदुमहासभावाले, वर्णाश्रमवाले, केसरी वगैरे पत्रें-सर्वांनीं.

या कौन्सिलच्या निवडणुकींत काँग्रेसचे कांहीं उमेदवार पडले. कारण या निवडणुकीचे मतदार जरा मोठे जमीनदार असतात. जमीनदार रागावले होते. केसरीनें लिहिलें, '' काँग्रेसचे उमेदवार पडले. याचा काँग्रेसनें धडा घ्यावा. '' धडा कोणता घ्यायचा बाबा? धडा काँग्रेसनें हा घेतला कीं श्रमणा-यांची बाजू जसजशी काँग्रेस घेईल, तसतशी भांडवलवाल्यांची काँग्रसभक्ति नाहीशी होईल. पू. विनोबाजींना जळगावाला एका कम्युनिस्टाने एक प्रश्र विचारला कीं '' काँग्रेस ही भांडवलवाल्यांची नाहीं का? '' विनोबांजींनी शांतपणे उत्तर दिलें, '' स्वातंत्र्याचा खरा लढा अद्याप सुरू झाला नाहीं. तो लढा सुरू झाल्यावर हे काँग्रेसवाले खडयासारखे वेगळे पडतील. आणि तरीहि जे राहतील ते मग भांडवलवाले म्हणून राहणार नाहींत. '' स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे सर्व दरिद्रयनारायणाचा संसार सुखाचा करणें. हें कार्य जसेजसें जोरानें होऊं लागेल तसतसें श्रीमंताचें व वरिष्ठ वर्गांचें काँग्रेस-प्रेम कमी कमी होऊ लागेल.

लोकनायक अणे त्यांच्या षष्ठयब्दपूर्ति समारंभाच्या वेळेस म्हणाले, '' काँग्रेसनें समाजवाद सोडून द्यावा. '' अद्याप समाजवाद काँग्रेसमध्यें आला आहे तरी कोठें? परंतु इतक्यांतच यांना भीति वाटत आहे. अण्यांसारख्यांसहि जर ही भीति वाटते तर मग इतरांची कथा काय? केसरी पत्रानें एकदां लिहिलें होतें, '' सावकार, जमीनदार, इनामदार, कारखानदार यांच्या दु:खास वाचा फोडण्यासाठी हें पत्र आहे ! '' मला नक्की शब्द आठवत नाहींत. परंतु अशा अर्थाचें लिहिलें होतें. यावरुन केसरी पत्र कोणाची बाजू मांडणारें आहे हें तुझ्या ध्यानांत येईल. आणि हिंदुमहासभेचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदो उदो करणारें हें पत्र गरिबांच्या बाबतीत कोणतें धोरण स्वीकारील तेंहि दिसत आहे.धर्माच्या नांवानें ओरडून ओरडून या संघटकांना वरिष्ठांचे वर्चस्व राखायचें आहे व गरीबांची पिळवणूक कायम करायची आहे. कल्याणच्या पुढचें नेरळ स्टेशन तुला माहीत असेल. त्या बाजूस कोणी एक मुसलमान आहे. तो पैसेवाला आहे. तरीचा मत्त्का नेहमी आपला त्यालाच मिळतो ! जंगलातील कूप तोच विकत घेतो !! हा मुसलमान गोरगरीबांना फार छळतो. आसपासच्या चाळीस पन्नास गांवच्या लोकांस त्याचा त्रास. तो वेळेवर तरच सोडणार नाही. शेतकरी गरीब असतात. त्यांच्या जवळून अधिकच पैसे मागतो. नाहींतर तरच सोडीत नाही म्हणतो. मग तो शेतक-यास म्हणतो, '' पैसे तुमच्या जवळ नाहींत. परंतु जंगलांत मोफत चार दिवस लांकडें तोडायला याल?'' अडलेले शेतकरी कबूल करतात. मग ती तर सुटते. शेतकरी वेठला धरल्याप्रमाणें जंगलांत जाऊन त्याचीं झाडें तोडतात. लांकडें तोडतात. अशा गोष्टी तिकडें कानांवर येतात. या छळवाद्या मुसलमानांस तरीचा मक्ता मिळूं नये म्हणून काँग्रेसनें दुसरा एक मनुष्य उभा करायचें ठरविलें. केवळ मुसलमानविरोध हें काँग्रेसचें ब्रीद नव्हें. परंतु तो मुसलमान पिळवणूक करतो म्हणून काँग्रेसनें दुस-यांस उभें केलें. परंतु वसंता, काय तुला सांगूं? हिंदुमहासभेच्या वरिष्ठानीं, खोतांनी व श्रीमंतानीं त्या मुसलमानासच मक्ता मिळावा म्हणून खटपट केली. श्रीमंत श्रीमंतास मिळाले. ते हिंदु असोत वा मुसलमान असोत. गरिबांची दैना तशीच चालूं राहिलीं.पंडित जवाहरलाल पुण्याच्या प्रंचंउ सभेंत म्हणाले, '' हिंदु संस्थानिकाहि मुस्लिम लीगला पैशाची मदत करीत असतात, '' याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच कीं मुस्लीम लीग काय, हिंदुमहासभा काय, या श्रीमंतांच्या, इनामदारांच्या बाजू घेणा-या संस्था आहेत. त्या धर्माच्या नांवानें अलग दिसल्या तरी आर्थिक बाबतींत आजची गरीबांची पिळवणूक कायम ठेंवणें हेंच त्यांचें ध्येय आहे.मागें एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले होते म्हणे कीं '' जपानशीं हिंदुस्थाननें वांगडें धोरण धरुं नयें. जपान बलवान राष्ट्र आहे. जपानला दुखवूं नये. '' चीनचा गळा दाबणा-या साम्राज्यवादी जपानशीं हें हिंदु-महासभावाले प्रेमाचा संबंध राखूं इच्छितात. आज जगांत साम्राज्यवाद व समाजवाद हे दोनच प्रमुख वाद आहेत. हिंदुमहासभा साम्राज्यवादी आहे. त्यांना साम्राज्याचींच स्वप्नें पडत असतात. परंतु साम्राज्य शब्द काँग्रेसला सहन होत नाही.

काँग्रेसनें चीनला सहानुभूति दाखविली. चीनमध्यें जखमी शिपायांची शुश्रूषा करावयास डॉक्टर पाठविले. काँग्रेसनें स्पेनला गलबतभर धान्य पाठविलें. कॉग्रेसनें अबी सिनीया, पॅलेस्टाईन यांना सहानुभूति दाखविली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौध्दिक वर्गातून सांगण्यांत येत असते की '' काँग्रेसची बाहेर दृष्टि. ती चीनला मदत पाठवील, स्पेनला पाठवील, तुर्कस्तानला पाठवील. परंतु सक्करच्या हिंदूंना मदत पाठवणार नाहीं. '' काँग्रेसनें सक्करच्या हिंदूनाहि मदत पाठविली. हिंदुमहासभावाल्यांनीं पाठविली त्याहून अधिक पाठविली. साठ सत्तर हजार रुपयांची मदत तेथें काँग्रेसनें पाठविली. सिंधमध्ये हिंदूंचे खून होत आहेत याचा काँग्रेसला कांहीं आनंद नाही. काँग्रेस रडत आहे. महात्माजींनीं सिंधमधील काँग्रेस कमिटीस लिहिलें, '' हे अत्याचार थांबवण्यासाठीं मरा, नाही तर काँग्रेस खतम् करा. '' सिंधमधील त्या आगीत उडी घ्यायला काँग्रेसचे राष्ट्रध्याक्षच शेवटी गेले ! महात्माजींच्या आश्रमांतील मुस्लीम भगिनी तेथें गेल्या. हिंदुमहासभेचे कोण तेथें गेले होते? राष्ट्रध्यक्षांनीं शक्य तें सर्व तेथें जाऊन केलें. केसरी पत्रानें लिहिलें, '' काँग्रेसला हे पूर्वीच करतां आलें असतें ! '' परंतु बाबा काँग्रस तर मुसलमान धार्जिणी ना? तुम्ही तर हिंदूंच्या हितासाठी सवता सुभा उभारलात ना? तुम्हीं कां तेथें जाऊन दिले लावले नाहींत? काँग्रेस काय करायचें, केव्हां करायचें तें जाणते. सक्करमध्यें हिंदुबंधूचे खून होतात. आमची ही कसोटी आहे. ज्याप्रमाणें डॉ. आंबेडकर अलग राहण्यासाठी कॉग्रेसची परीक्षा घेतात, त्याप्रमाणे मुस्लीम-हिंदी जग अलग करण्यासाठी धर्मांध मुसलमानांचे ते प्रयत्न असतील. परंतु अशाच वेळी श्रध्देची सत्वपरीक्षा असते. सामान्य परिस्थितींत कोणीहि श्रध्दा राखतो. असामान्य व गंभीर परिस्थतींतहि जो आपली मांगल्यावरची श्रध्दा ढळूं देत नाहीं, तोच खरा धर्मात्मा व पुण्यात्मा !शेतकरी घरांतले मढें झांकून ठेवतो, दु:ख गिळतो व शेतांत पेरणी करायला जातो. त्या दु:खानें तो वेडा होईल तर घरांतील मुलेंबाळे उद्यां काय खातील? त्याप्रमाणें सिंधमध्ये किंवा इतरत्र होणारे अत्याचारहि दु:खानें पोटांत गिळून स्वातंत्र्याची पेरणी करुन, उद्यांचा सर्व भारतीय संसार हिरवाहिरवा दिसावा म्हणून काँग्रेस अहोरात्र झटत आहे. तिची अवहेलना नका करू. तिच्या महान् ध्येयनिष्ठेचें कौतुक करा. समर्थांनी म्हटलें आहे ' अधीर माणसे खोटी '. चुटकी सरसे सर्व प्रश्न सुटणार नाहींत. त्यांनीं पाकिस्तान म्हणतांच आम्ही हिंदूंचें हिंदुस्थान, हिंदूंचे राज्य असें म्हणणें यानें प्रश्र सुटत नाहीं. यामुळें द्वेषाचे वणवे अधिकच पेटतात. ज्यांचें तेंच ध्येय असेल त्यांनीं तसे करावें. माझी माय माउली काँग्रेस शांतीचे कुंभ होऊन हे वणवे विझविण्यासाठीं शक्यतसें सारें करील. श्रध्देनें व विश्वासानें सर्व धर्माचें, सर्व जातींचें, सर्व वर्गांचें कल्याण साधूं पाहील. ती श्रध्देनें आपला दिवा घेऊन जाईल. ज्यानें त्यानें आपल्या हृदयांतील ईश्वराला स्मरून वागावें. दुसरें काय?

नागपूरचा एकदां एक बी.ए. च्या वर्गातील विद्यार्थी माझ्याकडे आला व म्हणाला, '' काँग्रेसने इतर देशांत मदत पाठविणें बरें नव्हें. येथले मरणारे लोक कां काँग्रेसला दिसत नाहींत? आपल्या शेजारचा मनुष्य जर संकटात असला तर आपण त्याला गरीब असूनहि मदत नाहीं का देत? आपल्या चतकोरांतही नितकोर भाकर त्याला नाहीं का देत? जग आज जवळ आलें आहे. लांब लांब नाहीं. रेडियो, बिनतारी यंत्रें या सर्वांनीं दुनिया म्हणजे एक घर झालें आहे. अशा या जगांत अलग राहून चालणार नाही. चीनमध्यें चार डॉक्टर काँग्रेसनें पाठविले. ते हिंदुस्थानांत कितीसे पुरले असते? ते चार डाँक्टर पाठवून काँग्रेसनें काय साधले? चिनी हृदय हिंदी हृदयाला जोडलें ! उद्यां स्वतंत्र होणारा हिंदुस्थान चीनच्या बाजूचा राहील, साम्राज्यवादी जपानच्या बाजूचा राहणार नाहीं, हें काँग्रेसनें जगाला जाहीर केलें. चाळीस कोटी चिनी जनतेचें हृदय जोडण्यासाठी काँग्रेसनें जगाला जाहीर केलें. चाळीस कोटी चिनी जनतेचें हृदय जोडण्यासाठी काँग्रेसनें जे चार डॉक्टर पाठविले ते का अनाठायीं गेले? ४० कोटी स्वतंत्र होणा-या चिनी जनतेची सहानुभूति काँग्रेसनें जोंडली. तिची का किंमत नाही? हिंदुस्थान आज जरी परतंत्र असला तरी तो लौकरच स्वतंत्र होणार यांत शंका नाहीं. एकदा अदविंद घोष कोणी तरी विचारलें, ''तुम्हीं योगसाधना सोडून स्वातंत्र्यासाठी चला ना झगडायला.'' ते म्हणाले, ''हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालेलें मला दिसत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचे याचा विचार मी करीत आहे.'' हिंदुस्थानचें स्वातंत्र्य आतां कालावधीचा प्रश्न नाहीं. ४० कोटी लोकांचा स्वतंत्र होणारा हिंदुस्थान उद्यां जगांत कोणाची बाजू घेईल? या स्वतंत्र हिंदुस्थानचें जगात कोणते धोरण राहील? परराष्ट्रीय धोरण कसें राहील? हे प्रश्न एव्हांपासून महत्वाचे होऊं लागले आहेत. जग या प्रश्नांकडें लक्ष देत आहे. काँग्रेसच्या बैठकींतून पास होणारे ठराव दुनियेंतील सर्व देशांतून प्रसिध्द होतात. काँग्रेस लुंगीसुंगी संस्था नाहीं. उद्यांच्या हिंदुस्थानचे परराष्ट्रीय धोरण तीच ठरवील, तींच बनवील, हें जग ओळखतें. आपल्या देशांतील कांही घमेंडनंदन काँग्रसचा उपहास करीत असतील. परंतु अद्याप हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीं लढणारी साम्राज्यविरोधी संस्था म्हणून एक काँग्रेसच ओळखली जाते. युरोपांतील स्वित्झरलँड वगैरे चिमुकल्या देशांतील वर्तमानपत्रांतूनहि काँग्रेसची हकिगत येत असते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल वगैरेंच्यामुळें काँग्रेस दुनियेला ज्ञात झाली आहे. जवाहरलाल मागें सर्वत्र दौरे करुन आले. युरोपमध्यें ते गेले. ईजिप्तमध्यें गेलें. ते स्पेनमध्यें गेले, चीनमध्यें गेले. काही वर्षापूर्वी ते ब्रह्मदेश, सयाम, जावा वैगरे भागांतहि जाऊन आले. काँग्रेसची प्रतिष्ठा त्यांनीं सर्वत्र वाढविली आहे. ठिकठिकाणी त्यांचा सन्मान झाला. काँग्रेस सर्व जगाला आज माहित आहे.अशा या काँग्रेसचें उद्याचें धोरण काय राहील? ती साम्राज्यवाद उचलून धरणार नाहीं. स्पेनमध्यें शेतकरी व कामकरी यांनी निवडणुकींत बहुमत मिळविलें. सनदशीर रीतीनें बहुमत मिळविले. गरिबांच्या हिताचे कायदे ते करू लागले परंतु स्पेनमधील सठवाले, सरदार, इनामदार, कारखानदार सारे एक झाले. फ्रँको या हडेलहप्यानें त्यांची बाजू घेतली. स्पेनमध्यें शेतक-यां-कामक-यांचे राज्य झालें तर इटलीला धोका होता. जवळच्या ज्वालाग्रही फ्रान्सला धोका होता. पलीकडे असलेल्या जर्मनीला व इंग्लंडला धोका होता. कारण हीं सारीं भांडवलवालीं राष्ट्रें स्पेनमधील फ्रँकोला इटली व जर्मनी यांनीं मदत केली. फ्रान्समधील क्रातिकारी, स्पेनमधील शेतकरी कामकरी वर्गांस कदाचित् मदत पाठवतील या भीतीनें फ्रान्समधील सरकानें आपली दक्षिण सरहद्य बंद केली ! इंग्लंड नत्त्काश्रु ढाळीत बसले. स्पेनमधील श्रमणा-या जनतेस एका रशियाची फक्त मदत होती. श्रमणा-या दुनियेची बाजू घेणारा रशियाच फक्त. एका हातानें तो दूर स्पेनला व एका हातांनें दूर चीनला मदत देत होता. बाकीचीं साम्राज्यवादी राष्ट्रें काय करीत होती?

परंतु काँग्रेसनें स्पेनमधील शेतक-या-कामक-यांस गलबतभर धान्य पाठविले. कांही कपडे पाठविले. जवाहरलाल स्पेनमधील बॉबवर्षाव स्वत: पाहून आले होते. तेथील गरिबांचा जय व्हाव असें त्यांना वाटत होते. दुसरी मदत करतां येत नव्हती. परंतु काँग्रेसनें आपण कोणत्या बाजूचे आहों हें जगाला कळविले.ईजिप्त, तुर्कस्थान, वगैरे मुसलमानी राष्ट्रांस उद्यांच्या स्वतंत्र होणा-या हिंदुस्थानचा सहकार मिळेल. कारण हीं मुसलमानीं राष्ट्रे साम्राज्यवादी नाहीत. आमच्यांतील कांही संकुचित दृष्टीच्या लोकांना वाटत असतें कीं सारी मुस्लीम राष्ट्रें एक होतील व हिंदुस्थानवर येतील ! हा त्यांचा भ्रम आहे. जें तें राष्ट्र स्वत:पुरते पाहते. केमालपाशाला हिंदुस्थानांतील एक धर्मवेडा मुसलमान जाऊन म्हणाला, '' जमाना बदल गया है बेटा ! मला आज कोण मानील? ईजिप्तमधले लोक म्हणतील 'ईजिप्त ईजिप्शियन लोकांचा.' इराणांतील लोक म्हणतील, 'इराण इराण्यांचा.' अफगाण म्हणतील, 'अफगणिस्थान अफगाणांचे.' खलीफा होऊन हंसें करुन घेण्याइतका मी वेडा नाहीं. मला माझ्या तुर्कस्थानचें कल्याण पाहूं दें. ''खेदाची गोष्ट ही कीं आमच्यांतील कांही धर्मवाल्या लोकांची दृष्टि अद्याप प्राचीन काळांतच ०आहे. अद्याप मुसलमानांच्या स्वा-यांचीच त्यांना भीति वाटत असते. अद्याप पंधराव्या, सोळाव्या, सतराव्या शतकांतील राजकारणाहून पलीकडे त्यांची दृष्टि गेली नाहीं. हिंदुस्थानांतील मुसलमान मनांत काय मांडे खात असतील ते खावोत, परंतु हिंदुस्थानाबाहेरचे मुसलमान हिंदी मुसलमानांची कींवच करतात ! काँग्रेसच्या अधिवेशनास इजिप्तमधील प्रतिनिधी हजर राहतात. पॅलेस्टाइनमधील अरब जवाहरलालना बोलावतात. एवढेंच नव्हे तर क्केटा-बलुचिस्थानमधील मुस्लीमबंधु खानसाहेब व जवाहरलाल यांनाच आमंत्रणें देतात. जगांतील स्वातंत्र्यप्रेमी मुस्लीम जनता स्वातंत्र्यार्थ झगडणा-या काँग्रेसची किंमत जाणते.सर सिकंदर हयादखान पंजाबमध्यें म्हणाले, '' काँग्रेस या युध्दांत सहकार करीत नाही. मुस्लीम राष्ट्रांच्या दाराशीं संकट आलें तरी काँग्रेस सत्याग्रहाची भाषा बोलतें. मुसलमान राष्ट्रांबद्दल काँग्रेसला कोठें आहे सहानुभूती? '' शिकंदर हयातखान हिंदुस्थानांत असा विषारी प्रचार करुं शकतील. परंतु मुस्लिम राष्ट्रातून जाऊन जर काँग्रेसवर ते असे आरोप करतील तर कोणतें बक्षीस त्यांना मिळेल बरें? स्वातंत्र्य-प्रेमी व स्वातंत्र्यार्थ झगडणा-यांची किंमत जाणतो. स्वार्थासाठी ब्रिटिशांचे जूं हिंदुस्थानावर कायम राखूं पहाणा-यांस कोणतें स्वातंत्र्य प्रेम? '' वसंता, महात्मा गांधी सर्वांनी जगावें असें म्हणत आहेत. एकदां एका जमीनदारानें त्यांना विचारलें '' जमीनदार सारे नष्ट व्हावे असें काँग्रेसचें म्हणणे आहे काय? '' महात्माजी म्हणाले, '' तुम्ही सर्वांनी जगावें असें मला वाटतें. जमीनदार, जहागिरदार, संस्थानिक सारे रहा. परंतु गरींबांचे विश्वस्त म्हणून रहा. तुमच्या जवळची धनदौलत गरीबांची ठेव समजा. ती त्यांच्या हितासाठीं खर्चा. त्यांतून स्वत:ची चैन करूं नका. तुम्ही जगावें असें मला वाटतें. परंतु माझ्या इच्छेनें काय होणार? तुमचें जगणें व मरणें तुमच्या कृतीवर अवलंबून आहे ! '' अर्थपूर्ण शब्द.भांडवलवाले, संस्थानिक, जमीनदार, काँग्रेसच्या लहान सहान सुधारणांनाही जर विरोध करतील तर ते पुढें कसे जगतील?

वसंता, स्पेनमध्ये जसें झालें तसेंच या देशांत एखादे वेळेस होईल. बहुजनसमाजाच्या, श्रमणा-या जनतेच्या हिताचे जसजसे अधिकाअधक कायदे काँग्रेस करु पाहील तसतसे वरिष्ठ वर्ग, मग ते हिंदु असोत वा मुस्लिम असोत वा पारशी असोत, काँग्रेसला विरोध करावयास उभे राहतील. आणि मग हिंदुमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मुस्लिम लीगचे स्वयंसेवक एक हेऊन हिंदूस्थानांतील फ्रॅकोचें लष्कर उभें राहील ! येथील गरीब जनतेच्या चळवळीवर ते हल्ला करतील. साम्राज्यवादी राष्ट्रें त्यांना मदत करतील. असें हें भविष्यकालीन दृश्य माझ्या डोळयांना दिसत आहे.पांढरपेशा तरुणांनी विचार करावा. संस्कृतीच्या व धर्माच्या नांवांनी फसूं नयें. धर्मा सर्व जनतेला सुखी करणे हा आहे. केमालपाशानें मशिदींची क्रीडांगणें बनविली. प्रभूच्या घरीं मुलें खेळूं लागली. रशियांत चर्चची हॉस्पिटलें झाली. चर्चची हॉस्पिटलें झाल्यामुळें त्या चर्चमध्यें देव नव्हता तो आला. देव म्हणजे गप्पा नव्हते. '' सर्वेsपि सुखिन: सन्तु ! सर्वे सन्तु निरामय: '' हें ध्येय गांठण्यासाठीं क्रान्ति करणें म्हणजेच धर्म.तरुणांसमोर हा प्रश्र आहे. त्यांना या जातीय संघांतून शिरून गरिबांची पिळवणूक कायम ठेवावयाची आहे का? जर नसेल ठेवायची तर त्यांनी हे संघ सोडले पाहिजेत. संघटना कोणत्या तरी ध्येयासाठी असतात. ध्येयहीन संघटना फोल आहेत. ज्या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूमहासभेचा उदो उदो करतो, आणि समाजवादी लोकांना शिव्या देतों, त्या अर्थी या संघाचें ध्येय धर्माच्या नांवानें पिळवणूक कायम ठेवणें हेंच ठरतें ! आम्ही हिंदू एक होऊन मग समाजवाद आणूं असें म्हणणें हा वदतो व्याघात् आहे. हिंदूतील श्रीमंत लोक व हिंदू संस्थानिक मग मुसलमान नबाबांशी संगनमत करतील, तुम्हांला गाडूं पहातील. आर्थिक भूमिका एकरां स्वीकारली म्हणजे मग हा हिंदु व हा मुसलमान हा भेद रहात नाहीं. हिंदु भांडवलवाले व मुस्लिम भांडवलवाले, हिंदु सत्तावाले व मुस्लिम सत्तावाले परस्पर भांडले तरी ते शेवटी गरिबांना चिरडण्यासाठीं एक होतील !हिंदी तरुणांसमोर हा प्रश्र आहे. डॉक्टर, वकील, पेन्शनर, भटजी, प्रोफेसर, शिक्षक, इंजिनिअर, जमीनदार, इनामदार वगैरे प्रतिष्ठित वर्गांच्या मुलांसमोर हा प्रश्न आहे. उद्यां तुमची संघटना घेऊन तुम्ही खेडयांत गेलेत व शेतक-यांनीं जर विचारलें, '' हे सावकार व जमिनदार छळीत आहेत. यांचें काय? '' तर त्यांना काय उत्तर देणार? हिंदु, हिंदु तेंवढे आधी एक होऊ या, या उत्तरानें त्यांचें समाधान होणार नाहीं. कांहीं वेळ ही धार्मिक पुंगी कदाचित् अडाणी लोकांनी गुंगवील, परंतु पुढें भ्रम उडेल. त्या वेळेस हे संघवाले काय करणार?

भारतीय तरुणांनी गरीबांची बाजू घेऊन उभें रहावें. जगांत दोन वाद आहेत. त्यांतील गरीबांकडे जाणा-या वादाला मिठी मारावी. काँग्रेस जपून कां होईना, परंतु गरिबांकडे जात आहे. अद्याप ती मर्यादेनें जात आहे. श्रीमंत लोकांना सद्बुध्दि येईल व ते श्रमणा-यांस सुखी करतील, अशी आशा ती बाळगते आहे. महात्माजी ' ट्रस्टी व्हा ' असे सांगत आहेत. श्रमणारे अधीर होत आहेत. काँग्रेस त्यांना जरा धीर राखा असें सांगत आहे. परंतु भांडवलवाल्यांनीं शेवटी काँग्रेसचें न ऐकले तर? मग इतर देशांत झालें ते या देशांत होईल. एक तर येथे फॅसिझम् स्थापन होईल किंवा समाजवाद येईल. रक्तांतून राष्ट्राला जावें लागेल.काँग्रेस शेवटीं गरिबांच्या सागराला जाऊन मिळणार आहे. तो खालीं जो अनंत असा श्रमणारांचा सागर आहे, तेथें काँग्रेस जाणार आहे. कधीं तिच्या हातून चुका होतील, कधीं ज्यांचे संसार सुंदर व सुखी करण्यासाठी तिचा अवतार त्यांनाहि तिला दुखवावें लागेल. परंतु म्हणून तिला नांवें ठेवूं नका. वेडीवांकडी, नागमोडी ती गेली तरी गरिबांकडे ती जात आहे. तिच्या हृदयावर चरखा कोरलेला आहे. तिच्या हृदयांत गरिबांची-दरिद्री नारायणाची मूर्ति आहे. हें विसरुं नका.वसंता, किती रे तुला लिहुं? हा हृदय-सागर तुझ्यांपुढें कसा रिता करूं? परंतु थेंबामध्येंहि सर्व सागराची चव असते. असो.

तुझाश्याम.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED