Shyamachi Patre - 10 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 10

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र दहावे

खरी गीर्वाण वाणी

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.आज तुला निराळयाच गोष्टीविषयीं लिहिणार आहे. राष्ट्रभाषेविषयीं आज थोंडें सांगणार आहे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी; त्याप्रमाणें स्वतंत्र होऊ पाहणा-या हिंदुस्थानला सर्व राष्ट्राची अशी एक भाषा असणें जरूर आहे. त्या त्या प्रांतांतून प्रांतीय भाषा असतीलच, परंतु अखिल भारतीय भाषा हवी.

काँग्रेसचें प्रथम प्रथम सारें कामकाज इंग्रजीतून चाले. इंग्रजी बोलणारे व इंग्रजी जाणणारें यांचा मेळावा तेथें जमे. बहुजनसमाज या सर्व गोष्टींपासून अलग राही. बंगालमधील देशबंधु बंगालबाहेर पडले कीं त्यांना इंग्रजींची कास धरावी लागे. बाबू बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशीवरील व्याख्यानांनी मद्रासचा समुद्र किनारा दणाणून सोडला. परंतु इंग्रजी वक्तृत्वानें !

महात्मा गांधीच्या लक्षांत ही गोष्ट आली. सारी जनता काँग्रेसशीं एकरुप करायची असेल तर काँग्रेसचा कारभार सर्व जनतेला समजेल अशा प्रकारे चालला पहिजे. राष्ट्रांचें हृदय एक होण्यासाठी एक भाषा हवी. एक हिंदी सोडली तर सर्व हिंदुस्थानची होण्यास सोपी अशी दुसरी कोणती भाषा आहे?

हिंदुस्थानांतील ब-याचशा प्रांतिक भाषा संस्कृतोध्दव आहेत. हिंदी व उर्दू यांच्यांत पुष्कळ समान शब्द आहेत. संस्कृतोध्दव भाषा बोलणा-यांस हिंदी समजावयास कठीण नाही. प्रश्न होता तो द्रविडी प्रांतांचा. कन्नड, तामिळ, तुलगु, मल्याळम या भाषा बोलणा-यांना हिंदी समजणें कठीण. म्हणून महात्माजींनीं प्रथम त्या प्रांतांतच प्रचार सुरू केला. १९१७ मध्यें इंदूरच्या हिंदी साहित्य संमंलनाचे महात्माजी अध्यक्ष होते. अध्यक्ष होण्यापूर्वी महात्माजींनी, '' हिंदी प्रचारासाठी एक लाख रुपये जमत असतील तर मी अध्यक्ष होतो. '' एक लाख रुपये मिळाले. हिंदी प्रचार समिति स्थापन करण्यांत आली. दक्षिण हिंदुस्थानांत गाजावाजा न करतां तिचे काम सुरूं झालें. आणि हजारो लाखों लोकांनी हिंदीच्या परीक्षा दिल्या.

उद्यांची सर्व राष्ट्राची म्हणून जी हिंदी भाषा होईल तिच्यांत इतर प्रांतीय भाषांतील शब्दांचीहि भर पडणार. मूळची हिंदी अधिक व्यापक व संग्राहक होईल. ती आम जनतेची भाषा होईल. ती सबकी बोली होईल. प्रांतीय हिंदी भाषा ' राष्ट्रभाषा ' या संज्ञेस पोंचेल.

भाषेचें काम हृदयाची ओळख करुन देणें हें आहे. त्या त्या प्रांतीय भाषांनीसुध्दा अखिल हिंदुस्थानची एकता निर्मिण्यासाठीं प्रयत्न करायला हवा. आज आपण अखंड भारत, अखंड भारत असें तोंडानें नेहमीं बोलतों. परंतु या भारताची आपणांस ओळख आहे का? गुजराती भाषेंत, बंगाली भाषेंत, उर्दू भाषेंत, हिंदी भाषेंत, कन्नड, तामिळ, तेलगु, मल्याळम् इत्यादि भाषांतून जें वाङमय आहे त्याची ओळख प्रांतीय भांषानीं आपापल्या लोकांस करून दिली पाहिजे. महाराष्ट्रांतील लोकांस प्रेमचंद, शरच्चं व रवींद्रनाथ थोडेसे माहीत आहेत. परंतु दक्षिणात्यांतील कोण माहीत आहेत? गुजरातेमधील नर्मद, मेघाणी, खबरदार, कलापी, न्हान्हालाल वगैरेंची कितीशी माहिती आहे?

मी एकदां बडोद्याला गेलो होतों. तेथील कॉलेजमधील ' मराठी मंडळातर्फे ' माझें व्याख्यान होतें. मी तेथील मुलांस म्हटलें, '' तुम्ही सीमेवर आहात. येथें गुजराती व मराठी यांचा संगम आहे. येथील तुम्हां लोकांस गुजराती समजते. येथील मराठी बोलणा-यांचे हें काम आहे कीं त्यांनीं गुजरातच्या आत्म्याची, गुजरातच्या हृदयाची ओळख महाराष्ट्रास करुन द्यावी. हें काम तुम्ही न कराल तर कर्तव्यास विरलेत असें होईल. बेळगांवच्या बाजूस राहणा-या मराठी भाषेच्या भक्तांनी कर्नाटकचें हृदय मराठीला कळवावें. विश्वभारतीत वगैरे जाणा-या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बंगाली आत्मा आम्हांला द्यावा. अशा रीतीनें त्या त्या प्रांतीय भाषांनीं आपापल्या भाषेंतून अखिल भारताची ओळख आपल्या लेकरांस करुन द्यावी. आपण कलशाची पूजा करतांना म्हणतो, ' येथें गंगा, सिंधु, नर्मदा, तापी सर्व नद्या आहेत.'' माझ्या घरांतील त्या लहानशा तांब्यांत मी सर्व हिंदुस्थानच्या नद्या पाहतों त्याप्रमाणें माझ्या भाषेंत मला सर्व भारताचा आत्मा दिसला पाहिजे. परंतु तो आज कोण दाखवीत आहे? ''मी १९३०-३१ मध्यें त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होतों. रोज रात्रीं प्रार्थना झाल्यावर आम्ही कांही लिहून वाचीत असूं. एके दिवशीं माझ्या एका नवीन मल्याळी मित्राला मीं म्हटलें, '' तूं कांही लिही. तं इंग्रजींत लिही. मी त्यांचें मराठींत भाषांतर करुन वाचीन.'' त्या मित्राचें नांव व्यंकटाचलम्. मोठा आनंदी तरुण. तो बी.एससी्. झालेला होता. तो चांगले गात असे. त्याला मल्याळी, तामिळ, तेलगु, तिन्ही भाषा येत. आणि हल्लीं त्यानें हिंदीचाहि अभ्यास केला आहे. तो हिंदी प्रचारक म्हणूनहि कांही दिवस काम करीत होता व त्याचें हिंदीतून मला पत्र आलें होतें. व्यंकटाचलमची् मला आठवण होते. त्या वेळेस वीस-एकवीस वर्षांचे फक्त त्यांचें वय होतें. त्यानें शेवटी इंग्रजीत एक लेख लिहिला. कोणत्या विषयावर लिहिला बरें? ' मलबारकडील एक दिवस ! ' हा विषय. पहांटे उठल्यापासून रात्रीं निजेपर्यत मल्याळी मराठी कुटुंबाचा दिवस कसा जातो त्यांचे हृदयगंभ वर्णन त्याने केलें होतें. मी अनुवाद करुन वाचला. '' पहांटे बायका उठतात, चूल सारवतात, तुळशींपुढें सारवतात. मग दुधें काढतात. कॉफी तयार होते. सुना भांडी घांसतात. स्नानें झाल्यावर तळयांवर धुणीं धुवावयास जातात. मुलांची शाळेंत जाण्याची घाई होते वगैरे तें वर्णन होतें. तो निबंध वाचल्यावर आमचे महाराष्ट्रीय म्हणाले, '' हें आपल्याकडच्या सारखेंच आहे !

''त्या एका निबंधानें महाराष्ट्र एकदम मलबारच्या जवळ गेला ! महाराष्ट्रांतील शारदा नाटकासारखेंच नाटक तेलगु भाषेंत आहे. या गोष्टी कळल्या म्हणजे सारें हिंदुस्थान एक आहे असें वाटतें.प्रांतिक भाषांनी हें काम केलें पाहिजे. परंतु त्याबरोबरच सर्व राष्ट्राची अशी एक भाषा हवीं. म्हणून राष्ट्रभाषेवर काँग्रेस जोर देत आहे. काँग्रेसच्या बैठकांतील भाषणेंहि आतां बरीचशीं हिंदीतून होतात. काँग्रेसच्या दृष्टिनें राष्ट्रभाषेचा प्रचार करणारें सांगत असतात कीं, आपण जी हिंदी राष्ट्रभाषा करूं इच्छितों ती बहुजनसमाजाची असावी. आज हिंदी म्हणून जी समजली जाते तिच्यांतहि अनेक प्रकार आहेत, असावयाचेच. ती जी हिंदी तिला अधिक व्यापक करूं याअसें काँग्रेसचें म्हणणें. हिंदी भाषाभिमान्यांनीं यापुढें हिंदीला असें स्वरूप द्यावें कीं, तें सर्वांना समजेल. कांही हिंदी भाषाभिमान्यांस या गोष्टींचा राग येतो. ही हिंदीवर कुरघोडी आहे, हिंदीचा आत्मा नष्ट होईल, असें त्यांना वाटतें ! हिंदी अधिक लोकांना समजूं लागण्यानें हिंदीचा आत्मा कसा नष्ट होणार तें समजत नाही !! तें पूर्वींचें व आतांपर्यंतचे हिंदी वाङमय का फुकट जाणार आहे? तें जनता वाचीलच. परंतु यापुढचें वाङमय जरा निराळें पाहिजे. ज्ञानेश्वरांची भाषा निराळी आहे म्हणून का ती खेडयापाडयांतून वाचली जात नाही? हिंदींचे विशाल स्वरूप होऊन हिंदी जर हिंदुस्थानी झाली, बहुजन समाजाची झाली तर त्यांत काय नुकसान आहे? शिवाय ज्यांना हिंदीचें प्रौढ व संस्कृतप्रचुर स्वरूपच ठेवायचे असेत त्यांना कोण प्रतिबंध करणार आहे? प्रतिष्ठित बोलतात तीच भाषा प्रौढ असें मानलें जातें. अद्याप सर्वत्र हा प्रतिष्ठितेचा अहंकार कायम आहे. बहुजन समाजाकडे कोणाचेंच लक्ष नाहीं.

बहुजन बोलतात ती भाषा का कम-दर्जाची? आमच्या मराठी नाटकांतून पूर्वी जरी विनोद करायला झाला तरी एखादें खेडवळ पात्र आणून '' व्हय, असं म्हनतुस व्हय ! '' वगैरे त्याच्या तोंडी घालून हंशा पिकवण्यांत येत असे ! ज्याच्या श्रमावर आपण जगतों त्याच्या बोलण्याचें हंसें करणारे आम्ही पांढरपेशे केवळ पापात्मे आहोंत !हिंदी ही सबकी बोली होऊं दे. त्यांनें का पूर्वींचे साहित्य नष्ट होणार आहे? पूर्वीचे राहील आणि नवीन बहुजनसमाजाच्या हाती जाईल. आपलें वाङमय जास्तींत जास्त लोकांच्या हाती जावे असें ख-या साहित्यसेवकास वाटत असतें. बहुजनसमाजास समजेल असें हिंदींचे स्वरूप करा, असें गांधीजी व खरे काँग्रेसवादी म्हणतात, परंतु बहुजनसमाजास कचरा मानणा-या लोकांना तें कसें पटावें? आमच्या या दुदैवी देशांत राष्ट्राचीं छकलें सांधण्यासाठी कोणतीहि गोष्ट निघाली कीं, तेथें अहंकारी लोक येऊन मोडता घालतात ! सर्वांना समजणारी अशी जी भाषा होईल ती हिंदु-मुसलमान सर्वांसच समजेल. परंतु मुसलमान म्हणुं लागले हिंदी अशी असावी कीं, जिच्यांत उर्दू शब्द पुष्कळ असतील. आमच्यांतील कांही हिंदु म्हणूं लागले कीं, संस्कृतोभ्दव शब्दच तिच्यांत अधिक असावेत. काँग्रेसचे म्हणणें असें कीं, ती हिंदु मुसलमान दोघांसहि समजेल अशा स्वरूपाची असावी.

लिपी उर्दू लिहा वा नागरी लिहा, परंतु भाषा अशी वापरा की, जी सर्वांना समजेल. परंतु मुसलमानांतील आग्रही लोक हिंदूंना न समजणारे बोलणार व हिंदूतील आग्रही मुसलमानांस न समजणारें बोलणार ! परंतु परिणाम येथेंच थांबत नाहीं. हिंदूना न समजणारें असे उच्च उर्दू मुसलमान वत्त्के बोलूं लागले कीं, तें बहुजन मुसलमानांसहि समजत नाही. आणि मुसलमानांस न समजणारें संस्कृतप्रचुर हिंदी हिंदु बोलतील तर तें हिंदूसहि समजणार नाही. हिंदू व मुसलमान यांचा जो संमिश्र बहुजन समाज आहे तो अशी भाषा बोलतो कीं, जी दोघांसहि समजते. परंतु आमचे प्रतिष्ठित वर्ग उभयविध बहुजनसमाजापासून दूर राहूं इच्छितात. भाषा ही आपलें हृदगत दुस-याला कळविण्यासाठी आहे, परंतु ही साधी गोष्टहि अभिमानानें अंध झालेल्यांच्या लक्षांत येत नाही.

राष्ट्रध्यक्ष अबुल कलम आझाद पूर्वी उच्च उर्दू बोलत. परंतु बहुजन समाजाचा विचार त्यांच्या लक्षांत येतांच ते लोकांस समजेल असें बोलण्याची खटपट करूं लागले. आचार्य नरेंद्र देव पूर्वी संस्कृतप्रचुर हिंदी बोलत, परंतु आतां त्यांची हिंदी बहुजनसमाजाची होऊ लागली आहे. बहुजन समाजाचा विचार करील त्याला हें धोरण स्वीकारावें लागेल. स्वराज्य हें बहुजनसमाजासाठी आहे, पलंगपंडितांसाठी, प्रतिष्ठित पंडितांसाठी केवळ नाही.

ईश्वराने हास्याची व अश्रूंची अशी विश्वव्यापक भाषा निर्मिली. अश्रु हें संस्कृत नाहीत, उर्दू नाहीत, अमुक मनुष्य संस्कृतमध्यें रडला, इंग्रजीत रडला, असें आपण म्हणत नाहीं ! अमुक मनुष्य मराठींत हंसला, अमुक कानडींत हंसला असें होत नाहीं ! मनुष्याचे अश्रु सर्वांना समजतात. त्यांचे स्मित सर्वांना समजतें. मनुष्य रडत आहे त्या अर्थी तो दु:खी आहे. मनुष्य हंसतमुख आहे त्या अर्थी तो समाधानी आहे, असें आपण जाणतो. देवानें सर्वांसाठी दिलें, परंतु माणसाने ह्यांत भेद पाडले, भांडणे निर्मिली !

वसंता, आपला हा देश चाळीस कोटींचा आहे. आपण मोठया देशांत राहतों. मोठया देशांत राहणा-यांवर जबाबदा-याहि फार असतात. आपणांस एक राष्ट्रभाषा शिकूनच भागणार नाहीं. इतर भाषांतीलहि थोडें थोडें ज्ञान पाहिजे. थोडें गुजराती, थोडें कानडी, थोडें बंगाली असें केलें पाहिजे.महात्माजींजवळ ही दृष्टि आहे. महात्माजी पेशावरकडे गेले तर अधिक उर्दू शब्द वापरतात. ते काशीला बोलले तर संस्कृत शब्द अधिक असलेली हिंदी बोलतील. बंगालमध्यें गेले तर तेथील लोकांजवळ दोन चार तरी बंगाली वाक्यें बोलतील. महात्माजींनीं तेलुगु, तामिळ वगैरे भाषांतीलहि कांही शब्द पाठ करून ठेवले आहेत. त्या त्या प्रांतांत ते गेले तर थोडे थोडे त्यांचे शब्द ते वापरतात. येरवडयाच्या तुरुंगांत असतांना हा थोर राष्ट्रपिता मराठी शिकूं लागला ! मनाचे श्लोक पढूं लागला. महात्माजींच्या पत्रांत ' सेवाग्राम वर्धा-होकर ' असें नागरी लिपीत असतें वे उर्दू लिपीतहि असतें. उर्दू व नागरी दोन्ही लिप्या हिंदी मनुष्यास यायला हव्यात असें एकदां ठरलें ना, मग महात्माजींच्या पत्रावर तसें दोन्ही लिपींत लिहिलेलें आढळेल. किती ही राष्ट्रचिंता ! हिंदुस्थान हें अखंड राष्ट्र आहे. सारे प्रांत भाऊ भाऊ, हिंदु-मुसलमान एकत्र राहूं. हे ध्येय रात्रंदिवस डोळयापुढें ठेवून बारीकसारीक गोष्टीतहि लक्ष देऊन वागणारा महात्माजींसारखा दुसरा कोणता महापुरुष या देशांत आहे? माझे डोकें तर या सेवेच्या हिमालयासमोर रात्रंदिवस नमतें. परंतु रागोपालाचारी एकदां म्हणाले, '' देवानें महात्माजींची थोर देणगी आपणाला दिली, परंतु आपणच तिला पात्र नसूं कदाचित् !'' वसंता, आशुतोष मुकर्जीचें नांव तुला माहीत आहे का? आशुतोष म्हणजे बंगालचे एक अति थोर महान् सत्पुत्र. कलकत्याचे विद्यापीठ ही त्यांची निर्मिति. त्यांनीं बंगालमध्यें सर्वांगीण ज्ञानविकासाला चालना दिली. त्यांची बुध्दि असामान्य होती. वयाच्या सतराव्या वर्षीच गणितशास्त्रातील असें कांही सिध्दांन्त त्यांनीं सोडविले, जे रॅग्लरच्या परीक्षेत असतात ! डॉ परांजपे म्हणाले, '' हिंदुस्थानांतील एकागणितज्ञाच्या सिध्दान्तांचा आम्हांस अभ्यास करावा लागे व त्याचा आम्हांस अभिमान वाटे ! '' 'आशुतोष सिध्दांन्त' असें त्या सिध्दांन्ताचे नांव आहे.एकदां हे सर आशुतोष कांही कामासाठीं मद्रासकडे गेले होते. एका मित्राकडे उतरले होते. त्या मित्रानें आपल्या मुलांना सांगून ठेवलें हातें की, ते बडे पाहुणे आले आहेत, त्यांना त्रास देऊं नका ! तो मित्र बाहेर गेला. आशुतोष काम करीत होते. ती मुलें दारांत येत, डोकावत व जात ! आशुतोष दिसायला उग्र दिसत. त्यांचा रंग काळा होता. मिश झुबकेदार होत्या. डोळे विजेप्रमाणें तेजस्वी होते. त्या मुलांना वाटे कोण आला आहे वाघोबा ! परंतु तो बंगाली वाघ प्रेमळ होता. तीं मुलें जवळ बोलवावीं, त्यांच्याजवळ बोलावें, हंसावें, असें आशुतोषांच्या मनात येई. परंतु मुलांजवळ कोणत्या भाषेंत बोलणार? त्यांना तामिळ, तेलुगु थोडीच येत होती? आशुतोंषांचा मन:संतोष नष्ट झाला. ते खिन्न होऊन बसले. त्यांचा मित्र बाहेरून आला. आशुतोष खिन्न आहेत असें पाहून त्या मित्रानें विचारलें, '' मुलांनी त्रास दिला. होय ना? '' आशुतोष म्हणाले, '' गडया तुझ्या मुलांनी नाही त्रास दिला. परंतु तुझी मुलें दारांतून डोकावत; मी त्यांना हाक मारूं शकलों नाही. त्यांच्याजवळ दोन शब्द मला बोलतां आले नाहीत. मला वाईट वाटलें. दोन चार वाक्यें तुमच्या भाषेंतील येत असती तर किती बरें झालें असतें? ''

अशुतोषजींचे हे उद्गार आपण लक्षांत ठेवूं या. कलकत्ता विद्यापीठांत एम. ए. च्या परीक्षेस भाषाविषय घ्यायचा असेल तर बंगालच्या बाहेरचीहि कोणती तरी एक भाषा आवश्यक आहे ! या मोठया देशांत राहणा-यांवर फार मोठी जबाबदारी आहे. परंतु आपणाला सारी थट्टाच वाटत आहे. देशाचा विचार दूर ठेवून केवळ फाजील अभिमानाचे पूजक होऊन आपण बसलों आहोंत. जर दु:खीकष्टी बहुजनसमाज आपल्या डोळयांसमोर येईल तर आपण हे क्षुद्र वाद माजवीत बसणार नाहीं.महाराष्ट्रांतील पूर्वीच्या साधुसंतांनीं हिंदुस्थानींत रचना केली आहे. तुकाराम महाराजांचे हिंदी अभंग आहेत. रामदास स्वामींनीं हिंदीत काव्यरचना केली आहे. साधुसंतांसमोर सर्व भरतखंड असे. ते पायीं दूरवर प्रवास करीत. उत्तरेकडचे रामानंद वगैरे दक्षिणेकडे येत तर दक्षिणचे साधु उत्तरेकडे जात. नामदेवांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथांत जाऊन बसले. कबीराचे दोहरे, मीराबाईंचीं गाणीं, गोपीचंदाची गाणीं हिदुस्थानभर बिनपंख उडत गेलीं ! साधुसंत वादविवाद करीत बसले नाहींत. श्रीशिवाजी महाराजांनीं मराठींत शिरलेल्या उर्दू शब्दांबद्दल संस्कृत शब्द तयार करण्यासाठी कोशकारांस सांगितले. रघुनाथपंत आमात्यांनीं तसाकोश बनविलाहि, परंतु शिवाजी महाराजांनीं स्वराज्य मिळविल्यावर तो उद्योग आरंभला. आणि तो प्रांतिक भाषेपुरता होता. आजचा काळ निराळा. मुसलमान आतां येथले झाले. शेजारीं शेंकडो वर्षे राहिले. आतां मुद्दाम खोडसाळपणा करणें म्हणजे देशद्रोह आहे.मागें मला एक गोष्ट कळली होती. सातारची वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुअरन्स कंपनी आहे ना, तिच्यांत एक कारकून होते. त्यांना मुसलमानांची फार चीड. ते शहरांचीं नांवेंच बदलूं लागले. सातारा जिल्हयातील इस्लामपूर शब्द त्यांना सहन होईना ! त्यांनीं तें नांव बदलून ' ईश्वरपूर ' असें नांव आपल्या मनांत ठेवलें. अहमदनगरचें असेंच कांही दुसरें नांव त्यांनी केलें. आणि गंमत ही कीं, पुढें पत्यावरहि त्यांनी ईश्वरपूर वगैरे ती नवीन नांवें लिहिली ! ती पत्रे परत आली !! व्यवस्थापकांच्या टेबलावर ती परत आलेली पत्रें पडली. व्यवस्थापकाने तें सारे पाहिलें. त्यानें त्या कारकुनांस बोलावलें व विचारलें. ते कारकून म्हणाले, '' माझ्यानें इस्लामपूर शब्द लिहवेना, मी काय करूं? '' मॅनेजर म्हणाले, '' ही ध्येयवाद ठीक आहे. परंतु अशानें कंपनी चालणार नाहीं. तुम्ही ध्येयवाद जरा गुंडाळून ठेवून शहराची नांवे सध्यां आहेत तशींच ठेवा ! ''इतका हा मुस्लिमद्वेष करून आम्ही काय मिळविणार? मुसलमानांच्या श्वासोच्छ्वासाची हवा पृथ्वीवरील हवेंत मिसळते. यासाठी अशा द्वेषी लोकांनी पृथ्वी सोडून दुसरीकडे वस्ती केली तर बरें ! नाही तर मुसलमानांचे तरी पृथ्वीकरुन उच्चाटन करायला हवें. परंतु तें कसे होणार. द्वेषाने मनुष्य किती अंध होतो ते यावरुन दिसेल. आणि ईश्वरपूर तरी नांव का ठेवायचे? दुसरें एखादें द्राविडी नांव शोधूं या कीं, कारण आपणहि या देशांत बाहेरूनच आलों आहोंत !अशा या बिकट परिस्थितींतून आपणांस जावयाचें आहे. या देशाच्या मंगल भवितव्यावर श्रध्दा ठेवणा-यांची आज कसोटी आहे. मुस्लीम लीग, हिंदुमहासभा व इतर अनेक पक्षोपपक्ष यांच्या चिखलांतुन राष्ट्राचा गाडा काँग्रेसला ओढावयाचा आहे. वाद करणारे वाद घालोत. संस्कृतप्रचुर हिंदी हवी की उर्दूप्रचुर हवी - करा लठ्ठालठ्ठी ! आपण नीट अभ्यास करूं या. आपण बहुजनसमाजाचे उपासक होऊं या.

आर्य लोक मध्य आशियाच्या बाजूस असतांना आजच्या संस्कृताहून जरा निराळी अशी एक अति प्राचीन संस्कृत भाषा बोलत. पुढें त्या आर्यांची एक शाखा हिंदुस्थानांत आली व एक इराणांत राहिली. हिंदुस्थानांत आले त्यांच्या भाषेस संस्कृत नांव मिळालें. इराणांत राहिले त्यांच्या भाषेस पेहेलवी असें नाव मिळालें. पुढें अरबी मुसलमानांनी इराण जिंकले तेव्हा पेहेलवी भाषेंत अरबीचे मिश्रण होऊन पेहेलवीची पर्शियन भाषा बनली. ही पर्शियन भाषा मुसलमानी सत्तेबरोबर हिंदुस्थानांत आली. हिंदुस्थानांतील व्रज भाषा व ही पर्शियन भाषा मिळून आजची उर्दू बनली. मुसलमानांच्या लष्करांत शेंकडों ठिकाणचे लोक असत. या सर्वांनी एक भाषा तयार केली. ही बाजारांत, लष्करांत सुरू झाली. बहुजन समाजाची ही भाषा उर्दू म्हणून संबोधली जाऊं लागली. हिला ' हिंदुस्थानी ' असेंहि नांव दिलेलें आढळतें. आपल्या हिंदुमुस्लिम पूर्वजांनी संस्कृतप्रचुर व पर्शियन प्रचुर अशी भाषा सोडून आम जनतेला समजेल अशी नवी भाषा निर्माण केली. तिला नांव उर्दू द्यावयाचे की हिंदी? काँग्रेस म्हणते, ' हिंदुस्थानी ' नांव द्या. ही हिंदुस्थानी भाषा सर्वाची होईल. पूर्वजांच्या त्यागानें निर्माण झालेली ही हिंदुस्थानी आपण वाढवूं या. उर्दू ही संस्कृतीशीं संबध्द भाषा आहे. शेंकडो उर्दू शब्द मूळ संस्कृतांतील आहेत. या भाषांचे थोडक्यात मोघम वर्गीकरण करावयाचें झाले तर पुढीलप्रमाणें करतां येईल ----आर्य एकत्र मध्य आशियाचे बाजूस होते त्यावेळची मूळ भाषाइराणांतील आर्य शाखेच्या भाषेस पेहेलवी ही संज्ञा मिळाली.हिंदुस्थानांतील आर्य शाखेच्या भाषेस संस्कृत म्हणूं लागलेया पेहेलवींत अरबी शब्द मिळून पर्शियन झाली संस्कृताच्या प्राकृत व अपभ्रष्ट भाषा होऊन हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, इत्यादी भाषा झाल्या.हिंदुस्थानी, सबकी बोली, आम जनतेची हिंदी वा उर्दूअशा रीतीनें हिंदी व उदूर या एकमेकांस परक्या नाहींत. अशी ही बहुजनसमाजाची हिंदुस्थानी भाषा आपण शिकू या. बहुजनसमाजास समजणारी भाषा शिकूं या. रवींन्द्रनाथ म्हणतात, 'देव दिवाणखान्यांत नाही. तो रस्त्यांत काम करणाराजवळ आहे. शेतांत काम करणा-याजवळ आहे. कारखान्यांत, रेल्वेंत काम करणा-याजवळ आहे !'' अशांचें बोलणें आपणांस समजले पाहिजे, अशांना समजेल असें आपण बोललें पाहिजे. ही जी बहुजनसमाजाची वाणी तीच खरी गीर्वाण वाणी, तीच आपली देवभाषा. कारण आपला देव स्वर्गात नाहीं. आपला देव झोपडींत आहे. दरिद्रनारायण हें क्राँगेसचे उपाध्य दैवत आहे. लक्षांत ठेव. सर्वांत सप्रेम प्रणाम. तुझाश्याम

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED