Shyamachi Patre - 2 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 2

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र दुसरे

भारताला महान प्रयोग करायचा आहे ! प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.तूं सेवादलाची लहानशी का होईना शाखा सुरू केलीस, हें वाचून किती तरी आनंद झाला ! तुझ्या पत्राची मी वाटच पहात होतों. परंतु कांही तरी प्रत्यक्ष कार्यास आरंभ केल्याशिवाय उगीच कशाला लिहा पत्र, असें जें तूं मनांत ठरविले होतंस त्यामुळें आतांपर्यत तुझें पत्र आलें नाहीं. खरें आहें. आपण खंडीभर चर्चा करतों. परंतु प्रत्यक्ष कार्य आरंभणे सर्दव दूरच राहतें. तूं तसा नाहींस ही चांगली गोष्ट आहे.सेवादलांतील मुलें तुला नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. त्या मुलांना वाचून दाखविण्यासाठी तुला कांही हवें आहे. तूं या गोष्टीची मागणी केली आहेस. वसंता, मी तसें फार वाचलेले नाहीं. कोणत्या विषयाचा गाढ अभ्यास मी केलेला नाही. बहुधा खेडेगांवांतून हिंडत असल्यामुळें शहरांतील बौध्दिक वातावरणाशी माझा संबंध येत नाहीं. नवीन नवीन ग्रंथ पहावयास मिळत नाहींत. थोर थोर पुढा-यांचा प्रत्यक्ष परिचय मला नाहीं. वादविवाद, चर्चा फारशा ऐकल्या नाहींत. या अशा परिस्थितीमुळें मी विचारांची मौल्यवान भेट तुला कशी पाठवणार? माझी तितकी लायकी नाही. परंतु जे लायक आहेत ते जोंपर्यंत स्वस्थ आहेत तोंपर्यंत माझ्यासारख्यानींच जें थोडें फार देतां येईल तें दिलें पाहिजे. माझ्याजवळ ज्ञान फारसे नाहीं. परंतु या देशाचे भलें व्हावें असें सारखे वाटते. तरुणांनी उदार व थोर दृष्टीचें व्हावें असें फार वाटतें. ही जी तळमळ, तिच्यामुळे जे कांही मला सुचेल, स्फुरेल तें मी तुला लिहीत जाईन.मला एक लहानसा सुंदर पक्षीं समोर दिसेत आहे. त्याचे नीळसर पंख आहेत. तो आकाशात उडत आहे. स्वच्छ हवा व प्रकाश लुटीत आहे. वसंता, मीहि त्या पक्ष्याप्रमाणें आहें. काँग्रेसच्या ध्येयाच्या निर्मळ आकाशांत माझा आत्मा उड्डाण करीत असतो. तसें पाहिले तर काँग्रेसच्या संस्थेत का दोष नसतील? संस्था या व्यक्तींच्या गुणदोषांकडे फारसे बघत नाहीं. त्या गुणदोषांच्या पाठीमागें संस्थेचा जो ध्येयवाद असतो, त्याच्याकडे माझी दृष्टि असते. तें ध्येय म्हणजे संस्थेचा खरा आत्मा, संस्था ज्याच्यासाठी जन्मली व ज्याच्यासाठी मरणार तें त्या संस्थेचे ध्येय.काँग्रेस कशासाठी जन्मली? या हिंदुस्थानचा संसार सुखाचा करावा म्हणून. आरंभी आरंभी काँग्रेसच्या समोर ध्येयाची सुस्पष्ट अशी कल्पना नव्हती. परंतु आपण जसजसे उंच जातों, तसतसें अधिक दूरचें दिसूं लागतें. काँग्रेस अशा रीतीनेंच स्वातंत्र्याच्या ध्येयाकडे आली. कांही क्षुद्र लोक विचारीत असतात कीं तुमच्या काँग्रेसनें काय केलें. परंतु आईनें मुलांसाठी काय केलें असें विचारण्यासारखेंच हें आहें. काँग्रेस जणुं लोकमाता आहे. आई ज्याप्रमाणें मुलाला पाजते, पोसते, त्याला चालावयास बोलावयास शिकविते, त्याप्रमाणे काँग्रेसनें केलें आहे.टिशांनी अमदानींत हिंदुस्थानचें सर्वांत मोठें नुकसान कोणते झालें असेल तर तें हें कीं राष्ट्राचा आत्माच जणूं मेला. आपण केवळ भेकड बनलों. एक पोलीस पाटील सा-या गांवाला जरबेंत ठेवतो. एखादा पोलीस दिसताच सारे घाबरतात. काँग्रेसनें ही वस्तुस्थिती ब-याचशा अंशानें दूर केली आहे. राष्ट्रांत आज किती तरी निर्भयता आली आहे. काँग्रेसनें ज्या प्रचंड चळवळी केल्या त्यामुळे हें झालें आहे.

१९०४-५ सालापर्यंत काँग्रेसनें प्रत्यक्ष अशी चळवळ कधीं केली नव्हती. परंतु कर्झन साहेबांनी बंगालचे तुकडे केले. आणि या वंग-भंगामुळें बंगाल जनता जागृत झाली. रवीन्द्रनाथांसारखे महाकवि राष्ट्रगीते निर्मू लागले. वंदे मातरमचा मंत्र घोषिला जाऊं लागला. १९०५ मधल्या बनारस येथे भरलेल्या काँग्रेसचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे अध्यक्ष होते. गोखले नेमस्त पक्षाचे. परंतु त्यांनीहि आपल्या भाषणांत करवंदीची चळवळहि सनदशीर असते अशी घोषणा केली ! त्यामुळें टाइम्स गोखल्यांच्यावर रागावला होता. आणि पुढें १९०६ साली कलकत्ता काँग्रेस झाली. महर्षि दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. आणि 'स्वराज्य ' हा शब्द जन्माला आला. कलकत्ता काँग्रेसनें ध्येय दिले व साधनें दिली. स्वराज्य हें ध्येय; आणि स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही साधनें. या चार गोष्टींना चतु:सुत्री असें म्हणतात, स्वदेशीची प्रचंड लाट उसळली. परंतु बहिष्काराचें काय? बहिष्कार म्हणजे परकी मालावर बहिष्कार एवढाच का अर्थ? तो अर्थ तर स्वदेशींत येतोच. बहिष्कार म्हणजे सरकारवर बहिष्कार म्हणजे संपूर्ण असहकार. महात्मा गांधींनीं पुढें जो असहकार सांगितला तोच लोकमान्य टिळक बहिष्कार या शब्दांत पहात होते. सरकारी गाडा संपूर्णपणें बंद पाडणें. परंतु लोकमान्यांचा हा अर्थ पुष्कळांना मानवेना, रुचेना, पचेना. कोणी म्हणूं लागले बंगालच्या बाबतींत सरकारने अन्याय केला आहे तर बंगालनेंच फक्त बहिष्कार हातीं घ्यावा. परंतु ही संकुचित दृष्टि लोकमान्यांना कशी सहन होणार? त्यांनीं खणखणीतपणें सांगितले कीं, ' बंगालचें दु:ख सर्व हिंदुस्थानचे आहे !' हिंदुस्थानांत सरकारी अन्याय कोठेंहि होवो, त्याची सर्व हिंदी राष्ट्रास चीड आली पाहिजे. पायाला कांटा बोंचला तर डोळयांना टचकन् पाणी येतें. डोळा असें म्हणत नाहीं कीं खाली वांकून आम्ही तो कांटा कशाला काढूं? सा-या देहांत एकच प्राण असतो. एकच रक्त खेळत असतें. त्याप्रमाणे सर्व राष्ट्रांत एकात्मतेची खरी जाणीव हवी. लोकमान्य अशा व्यापक अर्थानें पहात होते. 'अशा व्यापक दृष्टीनें पहा, ख-या राष्ट्रीय दृष्टिनें पहा. ' अशी शिकवण ते देत होते. बंगालचें दु:ख दूर होईना. त्यामुळें तरुण लोक दहशतवादाकडे वळले. बाँब, पिस्तुले यांचे आवाज होऊं लागले. हुतात्मे फांशी जाऊं लागले. लोकमान्य टिळकांनाहि सहा वर्षाची काळया पाण्याची शिक्षा झाली ! काँग्रेसमध्यें चैतन्य राहिलें नाही. दहशतवादहि थंड पडला. आणि १९१४ मध्यें तें महायुध्द आलें. त्या वेळेस देशांत गदर चळवळ झाली. गदर म्हणजे बंड, देशाला स्वतंत्र करण्याचा, कांही उत्कट वृत्तींच्या देशभक्तांचा तो प्रयत्न होता. अनेक तरुण हुतात्मे झाले. महाराष्ट्रांतील समर्थ विद्यालयाचा विद्यार्थी श्री. विष्णु गणेश पिंगळे या गदर चळवळींतच फांशी गेला ! आणि लोकमान्य टिळक सुटले. त्यांनी व डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी स्वराज्याची चळवळ सुरू केली. सरकार अडचणीत होतें. 'लौकरच सुधारणा देणार आहोंत ' असें सरकारनें जाहीर केलें. काँग्रेस व मुस्लीम लीग यांचे ऐक्य झालें. काँग्रेसचें शिष्टमंडळ विलायतेस गेलें. परंतु सुधारणेचें असे वातावरण सर्वत्र असतांनाच सरकारनें एक नवीन कायदा केला. त्याला रौलट बिल असें म्हणतात. महायुध्दाच्या काळांत बंगालमधील शेंकडों तरुण सरकारनें विनाचौकशी डांबून ठेवले होते. शेवटीं सरकारनें एक चौकशी कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष रौलेट साहेब होते. देशांत कट करणारें तरुण सर्वत्र आहेत 'असा त्यांनी शोध लावला ! आणि सरकारनें या रौलट साहेबांच्या सूचनांनुरुप एक नवीन बिल पास केलें. म्हणून याला रौलट बिल म्हणतात. महायुध्दांत हिंदुस्थाननें मर्यादेबाहेर मदत केली. रौलट बिल हें बक्षीस मिळाले ! या बिलामुळें व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत होती. पोलीसांना वाटेल ते अधिकार देण्यांत आले होते. राष्ट्राचा हा अपमान होता. स्वातंत्र्य मिळणें तर दूर राहिलें. अधिकच बेडया घट्ट झाल्या. लोकमान्य इंग्लंडांतच होते. आणि इकडे महात्मा गांधी उभे राहिले. दक्षिण आफ्रिकेंत सत्याग्रहाचा मोठा लढा त्यांनी लढविला होतो. १९१४-१५ मध्यें ते हिंदुस्थानास परत आले. साबरमतीस आश्रम काढून तपस्या करीत होते. मधून मधून सत्याग्रहाचे प्रयोग करीत होते. चंपारण्याचा सत्याग्रह त्यांनी केला. खेडा जिल्हयांतील शेतक-यांचा सत्याग्रह चालविला. विरमगांव येथें जकातीचा फार त्रास होई, तेथे जाऊन तो त्यांनी बंद पाडला. असे प्रयोग ते करीत होते. आणि आतां अखिल भारतीय प्रयोग त्यांनी आरंभिला. या रौलट बिलाविरूध्द त्यांनी सत्याग्रह सुरू केला. देशभर हरताळ, मिरवणुकी, उपवास याचा त्यांनी कार्यक्रम दिला. आणि सरकारनें निरपराधी जनतेचें रक्त सांडले. दिल्लीत गोळीबार झाले. हुतात्मा श्रध्दानंद यांनी गुरख्याच्या बंदुकीसमोर आपली विशाल छाती उघडी केली ! आणि जालियनवाला बागेंतील तें पाशवी हत्याकांड झालें. लष्करी कायदा पुकारला गेला. विटंबनेस सीमा राहिली नाही. लोकांचें पाणी बंद केलें गेलें. उजेड बंद केला गेला. उघडयावर शेंकडोंना फटके मारण्यांत आलें. रस्त्यावरुन सरपटत जायला लावण्यांत आलें. नको, ती आठवण नको !

आणि या अपमानांतूनच पुढें असहकाराची प्रचंड चळवळ झाली. १९२० च्या १ ऑगस्टला लोकमान्य मरण पावले. महात्मा गांधींनी राष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. देशबंधु दास, मोतीलाल नेहरु, लालाजी सारे गांधीजींना येऊन मिळाले. प्रचंड चळवळ झाली. अमीर फकीर झाले. वकीलांनी वकिल्या सोडल्या. विद्यार्थी बाहेर आले. पुढें महात्मा गांधींना सहा वर्षांची सजा झाली. असहकाराची चळवळ थांबली. वर्षदीडवर्षांने महात्माजीं आजारी म्हणून सुटले. त्यांनी विधायक कार्याकडे सारी शक्ति लावली. खादीची प्राणप्रतिष्ठा केली. ठायीं ठायीं सेवाश्रम सुरू झाले. सेवेला वाहून घेतलेले लोक खेडयापाडयांतून जाऊं लागले. गांवांतून स्वच्छता करू लागले. उद्योगधंदा देऊं लागले. एकदां नेहरु-रिपोर्टाचा विचार करण्यासाठी अलाहाबादेस, मला वाटतें, वर्किंग कमिटीची बैठक होती. महात्माजींना बोलावण्यांत आले. परंतु महात्माजींनी लिहिलें, 'तुम्ही स्वराज्याची जी मागणी करणार आहांत, तिच्या पाठीमागे मी शक्ति उभी करीत आहे. तुम्हीं तुमचें काम करा. ' आणि त्या शक्तीचा प्रभाव दाखविण्याची वेळ आली. काँग्रेसनें स्वराज्याची मागणी केली. महात्माजींनीं अकरा गोष्टींची मागणी केली होती. परंतु सरकार ताठर होतें. आणि ३० सालचा तो अभूतपूर्व असा कायदेभंगाचा लढा झाला. ३१ साली थोडा वेळ तो थांबला. महात्मा गांधी विलायतेंत गोलमेज परिषदेला गेले. परंतु रिक्त हस्तानें त्यांना परत यावें लागलें. ते परत येतांच पुन्हां लढा सुरू झाला तो ३४ सालपर्यंत सुरू होता. या प्रचंड चळवळीमुळे खेडीपाडी जागृत झाली. स्वातंत्र्याचा संदेश सर्वत्र गेला. आणि पुढे सनदशीर राजकारण आलें. कौन्सिलांचे राजकारण आले. जेथे-गाडगीळ यांची ती ऐतिहासिक निवडणूक झाली. आणि पुढे प्रांतिक निवडणुकी झाल्या. काँग्रेसला अपार यश मिळालें. स्वातंत्र्याच्या लढयासाठी जनता अधिक तयार करतां येईल, या हेतूने काँग्रेसनें मंत्रिमंडळे बनविली. 'गव्हर्नर मंत्र्यांच्या कारभारांत पदोपदी हात घालणार नाही ' अशी कबुली घेऊन काँग्रेसनें हें काम सुरू केले. सरकारशी झगडून सत्याग्रही शेतक-यांच्या जप्त जमिनी परत देवविल्या. कर्ज-निवारण कायदा, कूळ-कायदा, दारूबंदी, वर्धा शिक्षण पध्दती, साक्षरता-प्रसार, खादी-ग्रामोद्योगांस उत्तेजन असें बहुविध कार्य केलें. मंत्र्यांनी केवळ ५०० रुपये पगार घेतला. कारण कराची काँग्रेसच्या ठरावांत जास्तींत जास्त ५०० रुपये पगार स्वराज्यांत द्यावा असें होतें. काँग्रेस शब्दाप्रमाणे वागणारी. काँग्रेसचा असा कारभार चालू असतां पुन्हां हे महायुध्द आले. एका शब्दानेंहि जनतेच्या प्रतिनिधीस न विचारतां हिंदुस्थानहि युध्दांत सामील आहे, असें जाहीर करण्यांत आलें. आम्ही केवळ गुलाम आहोंत, याची तीव्र जाणीव पुन्हां झाली ! काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. युध्दासंबंधी तें ऐतिहासिक पत्रक काँग्रेसनें प्रसिध्द केलें, 'युध्दाचे हेतु काय?' असे काँग्रेसनें विचारलें. 'युरोपांतील देशांचे स्वातंत्र्य ' असे पार्लमेंटमध्ये चेंबर्लेन म्हणाले. काँग्रेस आतां काय करणार? वैयक्तिक सत्याग्रह करणार की प्रचंड चळवळ पुन्हां करणार? बघूं या. तेजस्वी दिवस येत आहेत. सर्वांनीं तयार राहिलें पाहिजे.वसंता, काँग्रेसचा असा हा पन्नास-साठ वर्षांचा धांवता इतिहास तुला मी सांगितला. महात्माजींच्या चळवळीनें जर सर्वांत मोठें कोणतें कार्य केलें असेल तर तें निर्भयता देण्याचें. बंगालमधले एक मोठे पुढारी एकदां म्हणाले, '' १९१९-२० सालापूर्वी स्वराज्याची चर्चा करायची झाली तर ती आम्हीं तिस-या मजल्यावर बसून करींत असूं. परंतु गांधीजी आले व दिवाणखान्यांतील राजकारण रस्त्यावर आलें. ' हें सरकार आम्हांस नको ' असे रस्त्यातील सर्वसामान्य लोकहि निर्भयपणे म्हणू लागले. ''महात्माजींचे हें सर्वांत मोठें कार्य. त्यांनी निर्भयतेचे वातावरण आणले. त्यांनी भिक्षादेहीला आळा घातला. त्यांनी स्वावलंबनाचा व सत्याग्रहाचा मार्ग दर्शविला. जनतेंचें व जनतेच्या पुढा-यांचे तोंड सरकारकडे असे, तें महात्माजींनी दरिद्रनारायणाकडे वळविले. जनतेंत जा, जनतेची सेवा करा, तिला निर्भय बनवा, असें तें सांगूं लागले. जनतेला स्वत:च्या शक्तीचा साक्षात्कार घडविणें हें महान कर्म होतें. तें गांधीजींनी केलें.

गांधीजींनी साधेपणा पुढा-यास शिकविला. आब्बास तय्यबजी हे थोर पुरुष एकदां म्हणाले, '' पूर्वी मी खेडेगांवांत गेलों तर लोक माझ्यापासून दूर रहात. परंतु आता साधा खादीचा पोषाख घालून जाऊं लागलों. लोक माझ्याजवळ येऊं लागले. मी त्यांच्यांतीलच एक असें त्यांना वाटूं लागलें. ते आपली सुख:दुखें सांगूं लागले. गांधीजींनीं आम्हांला आमच्या कोटयावधि बंधूंची भेट करुन दिली. त्यांचे हे उपकार. ''वसंता, तुला बंगालमधील उल्हासकर दत्त कदाचित् ऐकून माहीत असेल. त्यानें स्वत:च्या स्मृति लिहिल्या आहेत. उल्हासकर मोठे क्रांन्तिकारक होते. ते कोमिल्लाचे राहणारे. १९०७-०८ सालांतील दहशतवादी चळवळीत ते होते. ते अंदमांनांतून सुटून आले. ते सुंदर लिहितात. महात्माजींवर असहकाराच्या चळवळींत जो खटला भरण्यांत आला व ज्यांत त्यांना सहा वर्षांची सजा झाली. त्यासंबंधींची एक स्मृति उल्हासकरांनीं एकदा दिली होती. महात्माजींनीं त्या खटल्यांत ''मी एक शेतकरी आहें. माझा विणकामाचा धंदा आहे. '' असें सांगितले होतें. महात्माजींच्या खटल्याची हकीगत वर्तमानपत्रांतून येत होती. उल्हासकरांच्या तेथला एक गरीब मुसलमान नोकर वर्तमानपत्र वाचून रडत होता. '' कायरे, काय झालें? '' असें त्यांनी विचारलें. तो म्हणाला, '' महात्मा गांधींना सहा वर्षांची सजा झाली. वाईट वाटतें, '' '' तुला कां वाईट वाटते? '' त्यांनी विचारलें. '' कां म्हणजे? अहो ते आमच्यांतलेच एक आहेत. आमची स्थिती सुधारावी म्हणून झगडत आहेत. ते एक शेतकरी व विणकर आहेत. '' असें म्हणून त्यानें डोळे पुसले. ही आठवण लिहून उल्हासकर लिहितात, '' या अहिंसक महात्म्यानें अशी क्रांति केली आहे तशी कोणी केली आहे? जनतेशी असा एकरूप झालेला दुसरा कोण आहे.? महात्माजी क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत. त्यांना अनंत प्रणाम. ''आपल्या ह्या महाराष्ट्रांत असे कांही पंडित आहेत कीं ते अद्यापहि गांधीजींना व काँग्रेसला शिव्या देतात. महात्माजींनी एक कोट टिळक फंड जमविला, परंतु त्या फंडाने टिळकांचे राजकारण मारलें, असें कांही करंटे महाराष्ट्रीय मुत्सदी म्हणत असतात. यांना मुत्सदी म्हणावें की महामूर्ख म्हणावें तेंच समजत नाही ! '' मला एक हजार लोक द्या, मी बंड करतों. '' असें म्हणणारे ते लोकमान्य ! '' डोकीं तापायलाच हवींत. डोकीं थंड ठेवण्याची ही वेळ नव्हे. '' असें म्हणणारे ते लोकमान्य ! '' येथल्या मुसलमानांच्या हातीं सारी सत्ता गेली तरी चालेल. परंतु सहा हजार मैलांवरचे हे परके आधीं जाऊं देत, '' असें तळमळीने म्हणणारे ते लोकमान्य ! त्यांचें राजकारण या दळभद्रयांना समजतें तरी कीं नाहीं देव जाणे. त्या एक कोटि फंडातील पुष्कळशी रक्कम निरनिराळया कार्यार्थच देणा-यांनी दिली होती. कोणी गुजरात विद्यापीठासाठी म्हणून १० लाख दिले. ते त्या कामांत गेले. खादीच्या कामांत २५ लाख घातले गेले. देशभर ज्या राष्ट्रीय शाळा, महाशाळा सुरू झाल्या त्यांना त्या फंडांतून मदत दिली गेली. कोणी स्वदेशी स्टोअर काढलें, त्यांना मदत दिली गेली. या एक कोटि फंडापैकीं कांही रक्कम आलीच नाहीं. कारण दिलेलीं अभिवचनें पुरी केलीं नाहींत ! असा हा एक कोटीचा इतिहास आहे. तरी बेटे पदोपदी म्हणत असतात कीं टिळकांच्या नांवाने फंड काढून टिळकांचें राजकारण यांनी मारलें. टिळकांचे राजकारण म्हणजे तेल्यातांबोळयांचे राजकारण, दरिद्रनारायणाचें राजकारण. या दरिद्री जनतेंत ज्यांनी प्राण ओतला, या दरिद्री जनतेला ज्यानें झुंजार बनविलें, त्यानें का टिळकांचें राजकारण मारलें? मागील महायुध्दाच्या वेळचे लोकमान्यांचे लेख वाचा आणि आजचे महात्माजींचे लेख वाचा. जणुं लोकमान्यच लिहीत आहेत असें वाटतें. इतकें भाषेंत व विचारांत साम्य आहें. महात्माजींनीं केलेल्या प्रचंड चळवळी पाहून लोकमान्य वरुन आनंदाश्रु ढाळीत असतील.

महाराष्ट्रांतील हे कोत्या दृष्टीचे पुढारी म्हणत असतात की, '' १९२० ते ३५ पर्यंतचा काळ काँग्रेसनें वनवासांत दवडला. काँग्रेसनें कायदे-मंडळांवर उगीच बहिष्कार घातला. '' आणि पुढें ३४ साली काँग्रेसनें जेव्हां निवडणुका लढवायच्या असें ठरविलें तेव्हां हे लोक म्हणूं लागले की '' आतां गाडी रुळावर आली. आम्ही वीस वर्षे जें सांगत होतो तें आज बरोबर ठरलें ! '' जणुं यांच्या तुणतुण्यामुळेंच काँग्रेसनें कायदे-मंडळात जाण्याचे ठरविलें ! कायदेमंडळांत केव्हां जावें व केंव्हां जाऊं नये तें काँग्रेस जाणतें. ज्या वेळेस आपल्याजवळ भरपूर कार्यकर्ते नसतात, ज्या वेळेस जनतेंत राजकीय जागृति झालेली नसते, त्या वेळेसं ते थोडेसेहि कार्यंकर्ते जर कायदेमंडळांत गेले तर जनतेंत कार्य कोणी करावयाचें? कायदेमंडळांतील कामाला तेव्हां महत्व आहे. जेव्हां तुमच्या पाठीमागें जनतेची शक्ति उभी आहे. तोपर्यंत सारें फोल आहे. महाराष्ट्रांत इतिहासाचार्य राजवाडयांहून अधिक थोर इतिहासज्ञ दुसरा कोणता आणायचा? परंतु पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी चित्रमय जगतमध्यें एक लेख लिहिला होता. त्यांत ते म्हणतात, '' आपल्या पाठीमागें जनतेची संघटित शक्ति असल्याशिवाय कायदेमंडळांतून जाण्यांत अर्थ नाहीं. नामदार गोखले दिल्लीच्या कौन्सिलांत जात. सुंदर बोलत. साहेब मान डोलवीत. परंतु गोखल्यांच्या टीकांचा काय उपयोग होई? गोखल्यांच्या शब्दापाठीमागे कोटयवधि जनतेची जागृत शक्ति नव्हती. बहुजनसमाजाला तिकडें काय चालले आहे, याची दादहि नसे. पुढारी व जनता यांच्यांत एकजीव नव्हता. जोंपर्यत संघटित असें जागृत राष्ट्र पाठीशीं नाहीं तोपर्यत कौन्सिलांतील राजकारणांत अर्थ नाहीं. '' अशा आशयाचें राजवाडयांनी लिहिले होतें. राजवाडयांचे हें मत वाचून काँग्रेसच्या धोरणाचा विचार करावा. काँग्रेसनें २० साली, ३० साली, ३२ साली राष्ट्रव्यापक प्रचंड चळवळी केल्या. कायदेभंग, सत्याग्रह हे शब्द द-याखो-यांतून गेले. अशी राष्ट्रव्यापी चळवळ दोन तीनदां केल्यावर निवडणुका लढविणें योग्य होते शिवाय १९३५ च्या कायद्यानें मतदारसंघ वाढला होता. साडेतीन कोटी मतदार झाले होते. जनता कोणाकडे आहे हें इंग्रजांना दाखवून द्यायला हवें होतें. बहुजन समाज कोणाच्या पाठीमागें आहे पहा, हें निवडणुकींने दाखवण्याची वेळ होती. कार्यकर्तेहि वाढले होते. कांहींना कायदेमंडळांत पाठवूनहि जागृत करुन, भरपूर कार्यकर्ते निर्मून, काँग्रेस निवडणुकीस उभी राहिली. प्रचंड विजय तिला मिळाला. मंत्रिमंडळेंहि बनविली. परंतु पुन्हां तीं आज फेंकलीं. सरकारचीं बाहुली होऊन बसण्यासाठी काँग्रेसचे मंत्री नाहीत. सरकारच्या धोरणाविरुध्द जरा जातांच हकालपट्टी करुन घेण्यासाठी काँग्रेसचे मंत्री नाहींत. या महायुध्दाच्या काळांत जर खरी सत्ता हातीं नसेल तर तेथें मंत्री म्हणून राहण्यांत काय अर्थ? ती का नुसती शोभा आहे? या महायुध्दाच्या काळांत सारें आर्थिक धोरण युध्दानुरुप होणार. चलन वाढणार. भराभरा नोटा छापल्या जाणार. महागाई होणार. अन्नान्नदशा होणार. याला आपल्या हाती सत्ता असल्याशिवाय काय करतां येणार आहे? आज युध्दानंतर प्रांतिक लोकसत्ता म्हणजे फार्स झाला आहे. काँग्रेसनें आधींच हें ओळखलें व स्वाभिमानपूर्वक त्या खर्च्या फेंकल्या.

परंतु कांही आशाळभुतांना काँग्रेसचें हें असें करणें म्हणजे आड रानांत जाणें, वनवासांत जाणें वाटतें. त्यांना हा काळ फुकट गेला असें वाटते. १९२० ते ३५ सालापर्यंतचा काळ का फुकट गेला? हा काळ फुकट नाहीं गेला. सार्थकीं लागला. राष्ट्र-संवर्धनाचा हा काळ होता. या काळांत नवें राष्ट्र तयार झालें. शहरें व खेडी एकजीव झाली. पूर्वी धडाला मुंडके नव्हतें, मुंडक्याला धड नव्हतें ! परंतु महात्माजींनीं धडामुंडक्यांची भेट घातली आणि राष्ट्र सजीव होऊन उभे राहिलें. आपल्या महाराष्ट्रांतले ब्राम्हणब्राम्हणेतर वाद कमी झाले. सत्यशोधकी गांवे सत्याग्रहांत आली. ३०-३२ सालच्या चळवळीत हे वाद मेले. बहुजन समाज चळवळींत आला. काँग्रेस आपली, असें त्याला वाटूं लागलें. तुरुंगात एके ठिकाणी कामें करूं लागले. एकाच चक्कीला, एकाच मोटेला ब्राम्हण, मराठा, न्हावी, धोबी यांचे हात लागले. तें एकमेकांस म्हणाले, '' आपण उगीच अलग राहून भांडत होतों. परंतु आतां सेवेसाठी एकत्र आलों. '' इंग्लंडमधील प्रतिगामी मुत्सदी सॅम्युअल होअर लिहितो, ''गांधींशीं माझे मतभेद आहेत. परंतु एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे. गांधींनीं हिंदुस्थानचा दर्जा वाढविला. गांधींच्या चळवळी होण्यापूर्वी हिंदुस्थानाकडें तुच्छतेनें आम्ही पहात असूं. परंतु आतां आदराने बघतो. ''वसंता, ज्या काळांत अशी गोष्ट घडली, ज्या काळांत राज्यकर्त्यांच्या अहंकारी दृष्टीतहि हा असा फरक पडला, तो काळ का वाया गेला? आणि होअर साहेबांसारख्यांस हिंदुस्थानविषयी हा आदर कां वाटूं लागला? कारण अन्यायाविरुध्द सारें राष्ट्र झगडण्यासाठीं उभें राहिलें. नि:शस्त्र राष्ट्रहि उठावलें. नसलें शस्त्र म्हणून का अन्याय मुकाटयाने सहन करायचे? आणि शस्त्रास्त्रें झालीं तरी कांही लोकच तीं वापरुं शकतात. परंतु गांधीजींच्या अहिंसक लढयांत सर्वांची गति होती. रामनाम ज्याप्रमाणें कोणीहि उच्चारावें, तसा हा गांधीजींचा मार्ग होता. स्त्रिया, पुरुष, मुलें सारीं या चळवळींत सामील झाली. सर्वांचा आत्मा जागा झाला.दुस्थानांतील लोकांस कोणी बक-या म्हणे, कोणी उंदीर म्हणे. परंतु या देशांत माणसें राहतात, ही गोष्ट महात्माजींनीं जगाला दाखविली. अन्यायाविरुध्द जो झगडत नाहीं तो का माणूस? गांधीजींनीं अन्यायाविरुध्द झगडायला शिकविले. दुस-यास मारुं नका, परंतु अन्यायहि सहन करुं नका असें शिकवून इतर राष्ट्रांतील मारमुटया माणसांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रकारची माणसें या देशांत आहेत असें गांधीजींनीं जगाला दाखविलें.गांधीजींची चळवळ आली व चुलीजवळ बसणा-या आया-बहिणीहि कायदेभंग करुं लागल्या. स्त्रिया लाठींमार खाऊं लागल्या. मुंबईच्या आझाद मैदानावर घोडयांच्या टापांखाली त्या चिरडल्या जाऊं लागल्या. मुंबईच्या रस्त्यावरुन समुद्राचे बेकायदा पाणी स्वातंत्र्याचीं गाणीं गात आणूं लागल्या. मीठ करुं लागल्या. परदेशी मालावर, दारुगुत्यांवर त्या निरोधने करुं लागल्या. कर्मवीर कर्वे एकदां म्हणाले, ''स्त्रियांची ती जागृत झालेली शक्ति पाहून माझ्या डोळयांचे पारणें फिटले ! '' ज्या महर्षीनें सारें आयुष्य स्त्रियांच्या उध्दारार्थ दिलें त्यालाहि महात्माजींच्या चळवळीतींल ती दिव्यता दिसली. ''सत्याग्रही शिबिरांत एक स्वयं-सेवक व्हावें असें मला वाटलें. '' असें ते म्हणाले. परंतु आमच्यातील अहंकारग्रस्तांना वाटलें की हा सारा काळ फुकट जात आहे ! त्यांच्या बुरसलेल्या बुध्दीला वाटलें कीं १९२० ते ३५ पर्यंतचा काळ वांझ गेला !

वसंता, महाराष्ट्राच्या इतिहासांत एक गोष्ट आहे. ज्याच्या नांवाने आपण महाराष्ट्रांत कालगणना करतों, ज्याच्या नांवाने शक चालवतो, तो शालिवाहक राजा तुला माहित असेल. या शालिवाहन राजानें शक नांवाच्या लोकांचा पराजय केला आणि त्या विजयाची खुण म्हणून गुढीपाडवा सुरू केला. शालिवाहन राजानें हा जो विजय मिळविला त्यासंबंधी एक आख्यायिका आहे. शालिवाहनानें कुंभाराच्या मडक्यांचें घोडेस्वार बनविले व शत्रू जिंकले, अशी दंतकथा आहे. परंतु दंतकथांत अर्थ असतो. या दंतकथेचा काय अर्थ? अर्थ इतकाच कीं त्यावेळी महाराष्ट्रीय जनता मातीप्रमाणें पडलेली होती. डोकीं जणुं मडकीं झाली होती ! परंतु या मडक्यांत शालिवाहन राजानें प्राण ओतला. त्यानें फुंक मारली, चैतन्य ओतले. आणि मातीप्रमाणे पडलेल्यांना त्यानें झुंजार राऊत बनविलें ! श्री. शिवछत्रपतींनीं तेंच केलें. साधेभोळे लंगोटे मावळे. परंतु छत्रपतींनीं त्यांच्यांत चित्कळा ओतली. आणि मावळे दिल्लीला जाऊन भिडले. अटकेवर त्यांनी झेंडे रोंवले. भीमथडी घोडयांना सिंधुगंगांचें पाणी पाजलें. महात्माजींनींहि तोच चमत्कार केला. सारें राष्ट्र पडलेलें होतें. या राष्ट्राला महात्माजींनी नवजीवन दिलें. अमृतधारा दिली. आणि लहान कोंवळी मुलें मध्यरात्री हातांत झेंडा घेऊन घरांतून पळून जात व सत्याग्रह करीत ! वंदे मातरमची गर्जना करीत करीत त्यांनी फटके खाल्ले. गुजरातमधील बोरसद गावी लाठीमार होत होता, ढोंपरें फुटली तरी स्त्रिया रस्त्यांतून उठल्या नाहींत ! कोणी केला हा चमत्कार? कोळशांना उष्णता देऊन त्याचे हिरे कोणी केले? ही महात्माजींचीं तपश्रर्या, त्यांनी खेडींपाडी जागविली. सारें राष्ट्र प्राणमय केलेंआणि म्हणून ज्ञानकोशकार डॉ. केतकर म्हणाले, ''एक कोट लोकांना महात्माजींनी असहकार, कायदेंभंग हे शब्द शिकवले असतील तर एक कोट टिळक फंड सार्थकीं लागला ! '' या फंडाने टिकांचें राजकारण मारण्यांत आलें असें म्हणणा-यांची कींव येते. वसंता, तूं महात्माजींचे दिव्य कर्म ओळख व त्यांना कोटि प्रणाम कर. ज्यानें राष्ट्राला माणुसकी दिली, त्यांचे उपकार कोण कसे फेडणार? कोटयवधि जनतेस त्यांनी त्यागाची दीक्षा दिली. राष्ट्राचा गाडा ओढण्यासाठी हजारों सेवक त्यांनी पुढें आणिले. निरनिराळया वृत्तींची प्रखर माणसें. परंतु त्यांना त्यांनी एकत्र नांदवून राष्ट्रनिर्मितीचें महान् कार्य केलें. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्लभभाई, पंडित जवाहरलाल हीं का एकाच वृत्तींचीं माणसें? परंतु गांधीजी सर्वांना सांभाळतात. ही थोर माणसें केवळ परप्रत्ययनेंयबुध्दि नाहींत. गांधींचे ते आंधळे अनुयायी नाहींत. त्यांना स्वतंत्र बुध्दि आहें. ते वाद करतात, चर्चा करतात. गांधींजी त्यांना पटवतात. मिळतेंजुळतें घेतात. आणि महात्माजींच्या अशा दिव्य नेतृत्वाखालीं राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यांत त्यांना प्रतिष्ठा वाटते.वसंता, महाराष्ट्रांतील कांही संकुचित बुध्दीच्या लोकांनी महात्माजींची व काँग्रेसची सदैव नालस्तीच केली. अजूनहि करतात. ' अफगाणिस्थानला गांधीजी हिंदुस्थान विकीत होते ' असले हीन आरोप करायला व ते छापायलाहि त्यांना कांही वाटलें नाही ! '' यांनी हिमालयासारख्या चुका केल्या, यांनी हिमालयांत चालतें व्हावें'' असें हिणवून म्हणतात. परंतु या पाप्यांच्या लक्षांत येईना कीं हिमालयासारखी चूक करुन ती कबूल करणाराजवळ हिमालयाची हिम्मत असावी लागते !

या राष्ट्रासाठी गेली पन्नास वर्षे अहोरात्र हाडें झिजविणारा दुसरा कोण आहे? आणि आज आयुष्याच्या सायंकाळी सर्वांच्या पुढें जाऊन तेच उभे आहेत. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ते नुसते तडफडत आहेत. वसंता, महाराष्ट्रांतील कांही क्षुद्रांनी या महापुरुषावर आग पाखडली. तरी महाराष्ट्राचे हृदय शाबूत आहे. महाराष्ट्रांतील बाळगोपाळ, महाराष्ट्रातील बहुजनसमाज महात्माजींभोंवती, काँग्रेसभोंवती उभा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रानें काँग्रेसची अब्रू सांभाळली. तें काम अधिकाच नेटानें पुढें झालें पाहिजे. तूं तुझ्या तरुण मित्रांच्या मनांवर ही गोष्ट बिंबव. त्यांना मोठी दृष्टि घेण्यास सांग. ज्या महात्म्याने हिंदी राष्ट्राची मान उंच केली, त्याच्यासमोर मान लववायला त्यांना सांग. कृतज्ञता दाखवायला सांग.आज आतां पुरे. मी पत्र लिहायला घेतले तेव्हां आकाशांत अभ्रे होतीं. हवा जरा चमत्कारिक होतीं. परंतु आतां समोर स्वच्छ प्रकाश पडला आहे. अभ्रें कोठल्या कोठें गेली ! त्याप्रमाणे आपल्या राष्ट्रावरची अभ्रेंहि जातील. स्वच्छ विचारांचा निर्मळ प्रकाश येईल. भारताचे भवितव्य उज्वल आहे यांत शंका नाहीं. हे महान् राष्ट्र हजारों वर्षे का उगीच जगलें? लिन यूटांग या प्रख्यात चिनी लेखकानें लिहिलें आहे कीं, ''चीन जुनें नाहीं झालें, म्हातारें नाहीं झालें. कांही राष्ट्रांची वाढ फार हळू होते. ज्यांची तारुण्य आतां कोठें सुरु झाले आहे ! '' हिंदुस्थानाविषयीं मला असेंच वाटतें. खरी अखिल भारतीय दृष्टि आतां येतें आहे. सारा भरत अंतर्बाह्य एक ही भावना वाढत आहे. आतां कोठें आपण डोळस होत आहोंत. नवीन प्रकाश घेत आहोंत. वाढतें वय आहे. हिंदुस्थान म्हातारा नाही, नवजवान आहे. त्याला भरपूर कार्य अद्याप करावयाचे आहे. सर्व धर्म व संस्कृति एकत्र नांदवण्याचा महान् प्रयोग त्याला करावयाचा आहे.वसंता, तुला अधूनमधून मी कांही ना कांही लिहीत जाईन. तुझ्या सेवादलांतील मुलांना तें वाचून दाखवीत जा. मी जणुं त्यांना माझें हृदयच पत्ररुपानें पाठवीत जाईन. दुसरें मी काय देऊं, काय पाठवूं? मी जें लिहून पाठवीन तें त्यांना आवडेल कीं नाहीं ते मी काय सांगू? माझ्या लिहिण्यांत नवीन कांही असेल असें नाही. त्यांच्या सर्व शंका-आशंका माझ्या लिहिण्यानें फिटतील असेंहि नाही. परंतु तरुणांबद्दल आशा बाळगणा-या एका माणसाचें हें तडफडणारे हृदय आहे एवढें त्यांना कळलें तरी पुरे. सर्वांस प्रणाम.

तुझाश्याम

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED