ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ

"ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ"

सिग्नल लागला आणि धावणारी वाहने पटापट करकचुन ब्रेक दाबु लागली. क्षणात सर्व वाहने जागच्या जागी थांबली .

पिएमटी , फोरव्हिलर आणि टेम्पो , च्या मधोमध थोडीशी जागा होती , त्यात विरेन ने त्याची बाईक अँडजस्ट केली. विरेन २५ वर्षाचा हँण्डसम मुलगा. त्याच्या मागे तन्वी शांत बसली होती. त्याने वळुन तिच्याकडे बघीतले. तिने बळच हलकीशी स्माईल दिली. मग त्याने बाईकचा मिरर अँडजस्ट केला. आणि त्यात दिसणाऱ्या तन्वीकडे पाहुन , त्याने फ्लाईंग किस केले. त्याचा वेडेपणा पाहुन तिला हसु आलं. पण लगेच रागाने तिने मिरर परत पुर्वीसारखा केला. त्याने लगेच तिचा हात ओढुन घेतला आणि तिच्या हातावर ओठ टेकवले. तिने हात काढुन घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने दोन्ही हात घट्ट समोर ओढुन घेतले आणि प्रेमाने हातावर किस केल. शेवटी तिने त्याच्या पाठीला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर डोक टेकवून... डोळे मिटुन बसली.

हे सर्व आजुबाजुचे लोक बघत होते. त्यांच्याकडे बघुन लोक आपापसात कुजबुजत होते. बस मधील एक म्हातारी बाई , शेजारच्या बाईला तोर्यात , तोंड वाकड करुन म्हणाली,

आज्जी- ' बया.. लाजा तरी कशा वाटत नसतील बरं ह्या पोरासनी..? कुठ बी खेटाखेटी. '

तेवढ्यात कंडक्टर तिकीट फाडता फाडता म्हणाला ,

कंडक्टर - ' आवो आज्जी...कुठ बी जा..असलच दिसल तुम्हाला. पिढीच खराबयं आत्ताची. '

त्यावर लगेच एक पस्तिशीतील पुरुष स्वतःच्या २ वर्षाच्या मुलीला झोप गप्प नाहीतर फटका लावीन अशा अविर्भावात म्हणाला ,

वडिल - आई वडिलांनी लक्ष नको का ठेवायला ?

त्यावर एक ५० वर्षाचा गावाकडील माणुस , पायाजवळ पडलेले कोणाचे तरी ५ रुपय गुपचुप उचलत म्हणाला ,

माणुस - काय खरयं वं..शिकायला नोकरीला बाहिर राहत्याती ही पोरं अन असल करत्याती.. वळण ती वळणच असतयं.. कुणाचा धाकच नाही .

विरेन च्या मागील बाईकवरील न्युली मँरीड कपल , त्यांचा रोमँन्स पाहुन गालातल्या गालात गोड स्माईल करतात. टेम्पोमध्ये दोन तिशीतले पुरुष बसलेले आहेत. त्यांना पाहुन , टेम्पो ड्रायव्हर मिञाला म्हणतो ,

टेम्पो ड्रायव्हर - 'मायला..काँलेज ला असताना प्रेम करायची लय ईच्छा होती.. पर परिस्थिती लई वाईट. शिक्षण सोडुन काम करावं लागलं. पर हे अशे पोर बघीतले की लई भारी वाटतं . डेरिंग लागत लेका .. अस खुलेआम प्रेम करायला सुद्धा . '

बाजुच्या फोरव्हिलर मध्ये सो काँल्ड रिच फँमिली , आई , वडील , आणि विशीतली मुलगी बसलेले आहेत. माँडर्न मम्मी ड्रायव्हींग सिटवर बसली आहे. तिच्या बाजुला मुलगी आणि वजनदार पोटाचा घेर घेवुन वडिल मागच्या सिटवर झोप काढत बसले आहेत.काला चष्मा वर करुन आई म्हणते ,

आई - ओह गाँड... पुअर किड्स.. कुठे काय कराव याचही भान नाही

त्यावर मुलगी आशाळभुत नजरेने बघत बोलते

मुलगी - माँम..कधी कधी प्रेम व्यक्त करायला , जागा आणि वेळ पाहत नसतात. आणि बिचाऱ्या लव्हर्स ने जायच कुठे ?

आई - व्हाँट डु यु मिन ? तुम्ही रस्त्यावर काहीही करालं ?

मुलगी - नो.. काहीही नाही गं ! लिमीटेशन्स असायलाच हवेत . पण ते फक्त हग करत होते..नाँट मोअर दँन इट !

आई - अस उघड्यावर ?..पण तु का त्यांची बाजु घेतेस ? वेट वेट डु यु हँव बाँयफ्रेंड ?

मुलगी (रागाने ) - माँम.... आणि रागाने ती हेडफोन कानात घालुन सरळ दुसरीकडे बघते.

बाजुचा एक माणुस , तन्वीकडे बघुन दाढी खाजवतो.सिग्नल सुटतो आणि सर्वजण आपापल्या वाटेने निघुन जातात.

विरेन आणि तन्वी एका स्पाँटवर येवुन थांबतात तिथे त्यांचे मिञ वाट पाहत बसलेले असतात. त्या दोघांना बघुन ते आनंदाने जवळ येतात आणि विचारतात,

मिञ - ' गाईज काय झालं ? आई - पप्पांशी बोलतात ?बोला ना यार पटकन ? कधीपासून वाट पाहतोय आम्ही .

विरेन तन्वीकडे बघतो आणि मिञांना सांगतो ,

विरेन -' हो आई - पप्पांशी बोललोय. इनफँक्ट ते खुप खुश आहेत.'

मिञ - ' अरे यार... आई वडिल खुश का होणार नाहीत ? त्यांना तुझ्यावर केलेल्या त्यांच्या संस्काराचं सार्थक वाटत असेल. Congratulations guys !! '

मिञ दोघांनाही मिठी मारतात. तन्वी माञ शांतपणे अश्रु गाळत असते. विरेन प्रेमाने तिचे अश्रु पुसतो , तिची हनुवटी तर्जनीने वर करुन तिच्या डोळ्यात डोळे घालुन बोलतो .

विरेन - तन्वी... मी तुझ्याशी लग्न करुन कसलेही उपकार करत नाहीये . तुझ्यासोबत जे काही झालं( रेप ) त्यात तुझा काहीच दोष नाही. आणि त्यामुळे आपलं नातं ही बदलेल नाही.. माझ आधीही तुझ्यावर प्रेम होतं , आत्ताही आहे आणि शेवटपर्यंत राहीलं. मला तुझ्याशीच लग्न करायचयं... कारण मी तुझ्याशिवाय राहुच शकत नाही. आय रिअली लव यु.. प्लीज मँरी मी..!'

तन्वीच्या डोळ्यातुन पाऊस धो धो वाहत होता.तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या केसांवरुन मायेने हात फिरवला. आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मावळतीचा सूर्य त्याच्या ओठांआड लपला.

काही महिन्यांपुर्वी तन्वी सोबत घडलेल्या घटनेने ती हादरली होती. घाबरली होती. विरेन तिला त्यातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक क्षणाला तो तिला हसवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठलीच वेळ काळ तो बघत नव्हता. तिच्या मन परिवर्तन करण्यासाठी वाट्टेल ते करत होता. काहीही करुन त्याला ती हवी होती... पुर्वीसारखी हसरी.

बर्याचवेळा आपल्या आजुबाजुला वरवर दिसणाऱ्या गोष्टींकडे बघुन आपण लगेच रिअँक्ट करतो. अगदी पहिल्या भेटीत एखाद्याला जजही करतो. पण आपण विसरतो , की जशी दृष्टी तशी सृष्टी . ज्या साच्यातून आपण बघत असतो तसच आपल्याला दिसत असतं. काही अधीकार नसतो आपल्याला कुणालाच जज करण्याचा . कारण मुळात माहीतच नसतं आपल्याला की समोरचा सध्या काय फेस करतोय. त्याच्या अंतर्गत आयुष्यात किती वादळं उठली आहेत. तो सध्या कशा कशात गुरफटलाय . काय काय सहन करतोय. सर्वच गोष्टी जगजाहीर करता येत नसतात, त्यामुळे असंख्य लोक जगाच्या रंगमंचावर खर्या चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा घेवुन वावरत असतात. त्यामुळे प्रत्येकाला वाटेल तस जगण्याची मोकळीक द्यावी. आणि जगणाऱ्यांनीही काही मर्यादा स्वतः भोवती आखाव्यात. मर्यादे बाहेर असेल तेव्हा बोलतातच सर्व..पण प्रत्येक बारीकसारीक गोष्टीला चुकीच रिअँक्ट होण थांबायला हवं. बदलत्या काळानुसार मनाच्या चष्म्याची फ्रेम आणि काचा वारंवार बदलायला हव्यात. मानसिकतेची धुळ झटकुन गरजेच्या विचांरांचं माँडर्नायझेशन व्हायला हवं... !