सिद्धार्थ बुद्ध का झाले ??
रात्रीच्या दरवाळणाऱ्या सुगंधाच्या शोधात काजवाही फुलात जागा शोधतो . सुखाचा शोध सारेच घेतात . पण , दुःख म्हणजे कुणालाही नकॊसच वाटतं . सुख आणि दुःख ह्या एका नाण्यांच्या दोन्ही बाजू म्हटलं तरी चालेलं . जो अशाही दुखात स्वतःला सावरत जगला तो जगला . दुःखात जो निर्णय आपण घेतो तो टोकाचा असतो . त्याच निर्णयाने त्याला एका वेगळ्या दिशेने नेले .
सिद्धार्थ एक राजकुमार होता . राजमहालात राहताना त्याला बालपणापासून तर तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंत दुःखाचा लवलेश नव्हता ; पण महालाच्या बाहेर त्याने पाऊल ठेवल्यावर वृद्धकाळ इतरांचं रडणार मन बघून त्याचं हृदय घायाळ व्हायला लागायचं . सिद्धार्थ राजकुमार तारुण्यात आल्यावर शाक्य संघाचा सदस्य होता . संघात प्रिय असं त्याचं व्यक्तिमत्व होतं . संघात दोन , तीन वर्षातच दुःखद घटना घडली .आणि त्याच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न . ....
शाक्यांच्या राज्याच्या सीमेवर कोलियांचे राज्य होते . दोन्ही राज्याचा सीमा रोहिणी नदीने विभाजित केल्या होत्या . दोन्ही शाक्य कोलीय राज्य ते पाणी शेतीसाठी उपयोगात आणीत होते . ह्या वर्षी पाणी कुणाचे ? यासाठी वाद तर कधी युद्धही होत असे सिद्धार्थ आठवीस वर्षाचा झाला होता . पाण्यावरून तेव्हा मोठा संघर्ष झाला . सिद्धार्थाला वाद , विवाद , युद्ध मुळात आवडतच नव्हते . तो सभेत आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला ," मी ह्या युद्धाला विरोध करतो , युद्ध हे कोणत्याही निर्णयाचे समाधान नाही . युद्धाने जीवित हानी होऊन एक दुसऱ्याच्या मनात विषमता मात्र पेरली जाते . युद्धघोषणेने काहीच सफल होणार नाही . जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याचीही हत्या करणारा भेटतोच . विजेत्यालाही त्याच्यावर विजय मिळवणारा भेटतोच . जो दुसर्यांना लुटतो त्यालाही लुटलेच जाते ."
सिद्धार्थ गौतमाला उद्देशून सेनापती म्हणाले ," संघाचे सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या प्रतिज्ञाचं तुला स्मरण आहे काय ? जर त्यापैकी तू एकही प्रतिज्ञाचं भंग केलास तर तुला लोकनिंदेला सामोरे जावं लागेल ." सिद्धार्थ उतरला ," होय , मी तनमन धनाने शाक्यांच्या हितरक्षणाची प्रतिज्ञा केली होती ; पण मलाच हे युद्ध शाक्याचा हिताचे वाटतं नाही आणि माझ्यासाठी शाक्याचा हितापुढे लोकनिंदेचे काय मोल ?"
सेनापतीने सिद्धार्थाला आठवण करून दिले ...
संघाच्या विरोधात गेल्याने संघ तुझ्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार पुकारू शकतो आणि त्या करिता संघाला कौशल नरेशच्या ( राजा शुदोधन सिद्धार्थाचे पिता ) अनुमतीची गरज पडणार नाही .
सिद्धार्था समोर तीन पर्याय होते . सैन्यात दाखल होऊन युद्धात सहभाग घेणे . फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगावी . त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे व संघाने त्यांच्या कुटुंबीयांची जमीन जप्त करावी .
प्रथम पर्याय त्याला ठामपणे अस्वीकृत होता . तिसऱ्या पर्यायाविषयी तो कल्पनादेखील करू शकतं नव्हता . सिद्धार्थाला फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा योग्य वाटली . सिद्धार्थाने ठरविले परिवारजक होतो आणि देशत्याग करतो . हाही एक प्रकारचा देश त्यागच आहे . जेव्हा ही बातमी संपूर्ण राजमहालात पसरली तेव्हा सर्वांची मने दुःखाने व्याकुळ झाली . सिद्धार्थाला कपिल वस्तीची जनता आपल्या हृदयात बसवंत होती .
सिद्धार्थाने राजत्याग केला पत्नी यशोधरा आणि झोपेत असलेल्या राहुलला शेवटचा निरोप देऊन ते महालाच्या बाहेर पडले . त्यांनी मुंडन केले कषायवस्त्र परिधान केले . हातात भिक्षापात्र घेतले राजकुमाराच्या वेष त्यागाला . रस्त्याने जाताना सिद्धार्थ तेव्हा त्याच्या सोबत आलेल्या छन या सेवकाला म्हणाला , " मी गृहत्याग केल्यामुळे शोक संतप्त होऊ नये . माणसाच्या त्यांच्या संपत्तीचे अनेक वारसदार पुढे येतात ; परंतु त्याच्या गुणांचा वारसा सांगणारे ह्या भूतलावर थोडेच आढळतात कदाचित कुणी अस्तित्वातही नसतात . "
" ज्याप्रमाणे संध्याकाळी पक्षी आश्रयासाठी आपापल्या झाडावर एकत्र येतात आणि सकाळ झाली की पुन्हा झाड सोडून दूर कुठे तरी उडून जातात तेच मनुष्यप्राण्याचेही आहे . त्याच्या मिलनाची समाप्ती वियोगातच होते ."
सिद्धार्थ गौतम म्हणतात ," एखाद्याच्या मनात असे विचार येत असतील तो मला अपशब्द बोलला, तो माझ्यासोबत वाईट वागला , त्याने माझ्यावर विजय मिळवला तर अशा व्यक्तीचा क्रोध कधीच शांत होतं नाही ."
ज्याचा मनात हे विचार नाही त्याचा क्रोध शांत पावला आहे . तोच जीवनात सर्वसुखी आहे . माणसाने क्रोधाला प्रेमाने जिंकावे , असाधुला साधुत्वाने जिंकावे . असत्याला सत्याने जिंकावे , लोभाला उदारतेने जिंकावे . कुणी काही मागितल्यावर थोडे तरी द्यावे . कुणाचे वाईट होईल असे मनात कधीच चिंतू नये . आजही बुद्धाच्या ह्या विचारांची जगाला गरज आहे . लोभासाठी , स्वार्थापोटी इथे भाऊ भावाचा वैरी आहे .
लोभात , रागात मनातील वाईट भावनांनी घर केले ... म्हणून म्हणावंसं वाटतंय ,
सिद्धार्था तुझ्या माझ्यातील तो काळ आता स्मृतिशेष झाला ...
तुझ्यातील काषायवेश आता दिसेनासा झाला !
मनातील गाळ उत्तखनुन गेलाय
डोळ्यातील अश्रूलाही येतो करुणेचा
दरवळ...
भररस्त्यात लागते चाहूल जेव्हा
थिंगळ घातलेल्या आधुनिक तरुणाईची
तेव्हा आठवण येते सिद्धार्था तुझ्या विचारांची
कुणाकुणाच्या डोळ्यात उराड़ते इच्छा हिंसेची
वाघासारख्या झडप घालणाऱ्या अन स्त्रीला
तिच्या आयुष्यातून उध्वस्त करणाऱ्या नरभक्षकांची
सिद्धार्था तू ऐकू दे पुन्हा त्यांना तुझ्या ओठातील धम्मपद ..
माणूस माणसातली दरी कधी संपत नाही
माणसं मारून पशुची हिंसा करून धर्म वाचवता येत नाही
पशुची लक्षणे माणसात येऊ नये
देशात धर्माच्या दंगली नव्याने होऊ नये ..
तोच रक्तपात आणि वाद होऊन कुणाचा जीव
जाऊ नये ...
म्हणून मी म्हणते आम्हाला युद्ध नको
सिद्धार्था तुझातला बुद्ध परत एकदा हवा
परत एकदा हवा ....!!!
- कोमल प्रकाश मानकर
Email :- mankar123komal@gmail.com